You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पेन्शनः निवृत्तीनंतर दरमहा पुरेसं उत्पन्न मिळत राहावं म्हणून काय करायला हवं?
- Author, आयव्हीबी कार्तिकेयन
- Role, बीबीसीसाठी
इतर देशांच्या तुलनेत भारतासाठी चांगली म्हटली जाणारी गोष्ट म्हणजे मोठं - Working Population किंवा मोठ्या प्रमाणातली कार्यक्रम लोकसंख्या. पण अजून वीस - तीस वर्षांनंतर आजची हीच कार्यक्षम लोकसंख्या निवृत्तीला आलेली असेल. निवृत्तीच्या काळात सगळ्या आर्थिक गरजा पूर्ण करता याव्यात यासाठी रिटायरमेंट प्लानिंग म्हणजे निवृत्तीसाठीची आर्थिक तरतूद व्यवस्थित करायला हवी.
ज्यावेळी आर्थिक नियोजन केलं जातं त्यावेळी अनेकजण रिटायरमेंट प्लानिंगचा विचार करत नाहीत. आतापासून निवृत्तीचा विचार करण्याची गरज नाही, असं अनेकांचं म्हणणं असतं.
कदाचित 2 कारणांमुळे असा विचार केला जातो. आपल्यापैकी अनेकांच्या घरातले ज्येष्ठ हे सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले होते आणि दुसरं म्हणजे आता आपली बहुतेक लोकसंख्या ही तरूण आहे.
रिटायरमेंट प्लानिंग करताना दोन गोष्टी लक्षात घ्यायला हव्या :
1. निवृत्तीनंतर आपल्याला किती पैशांची गरज लागू शकते?
2. हा पैसा उभा करण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारची गुंतवणूक करायला हवी?
रिटायरमेंट फंड किती असायला हवा?
निवृत्तीनंतर किती पैसे असायला हवेत हे काढण्यासाठी म्हणजेच रिटायरमेंट फंड मोजण्यासाठी वेगवेगळी सूत्रं वापरली जातात. यातला एक लोकप्रिय फॉर्म्युला आहे - 4 टक्क्यांचा.
90 च्या दशकात विल्यम बेंझेन या फायनान्शियल प्लानरने हे 4 टक्क्यांचं गणित मांडलं. 1929 ते 1976 या काळातल्या अमेरिकन मार्केट्सची पाहणी करून त्यांनी ही थिअरी मांडली.
यानुसार निवृत्तीच्या वेळी तुमच्याकडे जितके पैसे असतील त्याच्या 4% तुमचा दरवर्षीचा खर्च असायला हवा. बेंझेन यांच्यामते असं केल्यास तुमच्याकडे जमा झालेले पैसे हे तुमच्या निवृत्तीनंतर किमान 33 वर्षं पुरू शकतात.
हे सूत्रं वापरून रिटायरमेंट फंड कसा मोजायचा ते पाहूयात..
पण या सूत्रामध्ये घराची किंवा इतर मोठ्या खरेदीचा विचार करण्यात आल्याची टीका या पद्धतीवर केली जाते. पण असं असलं तरी निवृत्तीनंतर साधारण किती पैसे लागतील याची एक कल्पना या सूत्रवरून येते.
रिटायरमेंट फंडासाठी कुठे गुंतवणूक करायची?
रिटायरमेंट फंड किती असायला हवा, याची कल्पना आली की मग तेवढे पैसे उभे करण्यासाठी कोणत्या प्रकारे, किती गुंतवणूक करायला हवी, हे समजून घ्यायला हवं. मासिक पगारावर उत्पन्नाची भिस्त असणाऱ्यांसाठी गुंतवणुकीचे पुढील पर्याय आहेत.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी - Employee's Provident Fund
शेअर बाजाराशी संबंध असणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये काही प्रमाणात धोका हा असतोच. म्हणून कोणत्याही प्रकारची जोखीम नसणाऱ्या EPF मध्ये गुंतवणूक करण्याचा फायदा घेणं महत्त्वाचं आहे. केंद्र सरकार दरवर्षी या भविष्य निर्वाह निधीसाठीचा व्याजदर जाहीर करतं. गेल्या काही वर्षांमध्ये या व्याजदरांमध्ये घट झाली असून भविष्यातही घट होण्याची शक्यता आहे.
EPF मधून किती परतावा मिळू शकतो, ते पाहूयात. 2021-22 साठीचा केंद्र सरकारने जाहीर केलेला व्याजदर होता 8.1%. पुढच्या 20 वर्षांसाठी सरासरी 7.1% दराने व्याज मिळेल असं धरून आपण EPF मधून किती परतावा मिळेल ते पाहूयात.
EPF मध्ये दरमहा 10 हजार रुपये जमा करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे 20 वर्षांनंतर EPF मध्ये 53 लाख रुपये असतील. EPF ची रक्कम ही पगारानुसार वाढत असते.
राष्ट्रीय पेन्शन योजना - National Pension Scheme
EPF प्रमाणेच NPS वर कर लागत नाही. या दोन्ही योजनांचा हा पहिला फायदा आहे. निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी म्हणूनच नॅशनल पेन्शन स्कीम महत्त्वाचा पर्याय ठरते. यामध्ये गुंतवलेल्या पैशांपैकी 60% रक्कम ही निवृत्तीनंतर काढता येते आणि उरलेली रक्कम दरमहा घेते येते. ज्यांना निवृत्तीनंतर सगळे पैसे एकत्र हातात घेण्याची इच्छा असेल, ते या योजनेचा विचार करू शकतात. या योजनेत गुंतवलेल्या पैशांपैकी काही रक्कम इक्विटीमध्ये गुंतवली जात असली, तरी या योजनेतली एकूण जोखीम तशी कमी आहे.
म्युच्युअल फंड्स
रिटायरमेंट फंड उभा करण्यासाठीचा आणखी एक महत्त्वाचा पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड्स. EPF आणि NPS सोबत तुलना करायची झाल्यास म्युच्युअल फंड्समध्ये जोखीम जास्त आहे. काहीच्या मते जर तुम्ही 15 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी SIP (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान) केलीत तर त्यामध्ये धोका कमी असतो.
मार्केटमध्ये सध्या असणाऱ्या काही फंड्सच्या नावातच 'रिटायरमेंट फंड' म्हटलंय. सामान्य गुंतवणूकदार या नावामुळे आकर्षित होऊ शकतो. पण या कंपन्या दावा करतात त्याप्रमाणे हे फंड्स खरंच फायद्याचे आहेत का, याचा अभ्यास करायला हवा. शेअर मार्केटशी संबंधित गुंतवणूक म्हटली की त्यामध्ये काही प्रमाणात जोखीम ही असतेच. म्हणूनच टयोजनेत कोणतीही जोखीम नाही' असं म्हणणाऱ्या जाहिरातींवर विश्वास ठेवून गुंतवणूक करू नये.
आधीचंच उदाहरण आपण पुढे पाहू. 2 कोटी 40 लाखांचा रिटायरमेंट फंड उभा करायचा असेल तर तुम्हाल SIP मध्ये किती पैसे गुंतवावे लागतील ते पाहूयात.
जर 18% वार्षिक परतावा मिळत असेल तर मग 2 कोटी 30 लाखांचा निधी उभा करण्यासाठी 10 हजार दरमहा गुंतवणूक पुरेशी आहे. पण 18% नफा मिळवणं कठीण आहे. 12 ते 15 % वार्षिक परतावा देणारे अनेक फंड्स आहेत. त्यांचा अभ्यास करून त्या अनुषंगाने योग्य पैसे गुंतवता येतील.
सूचना : कोणतीही गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेऊन विचारपूर्वी निर्णय घ्यावा.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)