मेधा पाटकर ED च्या रडारवर, राजकीय सूडबुद्धीने कारवाईचा आरोप

मेधा पाटकर

फोटो स्रोत, MANJUNATH KIRAN

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..

1. मेधा पाटकर ED च्या रडारवर, राजकीय सूडबुद्धीने कारवाईचा आरोप

राज्यातील राजकीय नेत्यांवर होत असलेल्या ED कारवाईवरून आरोप-प्रत्यारोप होत असताना आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचंही नाव या यादीत समाविष्ट होण्याची शक्यता आहे.

मेधा पाटकर यांच्याविरुद्ध ED कडे संशयास्पद व्यवहारसंदर्भात तक्रार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण 2005 चं असून यासंदर्भात ED चौकशीही करणार आहे.

मेधा पाटकर यांची नर्मदा नवनिर्माण अभियान नामक स्वयंसेवी संस्था (NGO) आहे. या संस्थेच्या खात्यावर काही संशयास्पद व्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.

या प्रकरणावर मेधा पाटकर यांनी प्रतिक्रियाही दिली. "ED ने अद्याप माझ्यावर गुन्हा दाखल केलेला नाही. ही माझ्याविरुद्ध दाखल करण्यात आलेली तक्रार आहे. हे माझ्याविरुद्धचं राजकीय कारस्थान आहे," असं त्या म्हणाल्या. ही बातमी ई-सकाळने दिली.

2. मला तुम्ही कधीपर्यंत रोखणार? - संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर EDने कारवाई करत त्यांची संपत्ती जप्त केली आहे. यासंदर्भात ट्विट करून त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत

फोटो स्रोत, Getty Images

या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं, "मैं सागर से भी गहरा हूँ, तुम कितने कंकड फेंकोगे! चुन चुन कर आगे बढूंगा मै, तुम मुझको कब तर रोकोगे!"

माझ्यावरचे आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेन. ED-CBI माझ्या मागे भाजपनेच लावलं आहे. या खोटेपणाला मी घाबरत नाही, असंही ते म्हणाले आहेत. ही बातमी एबीपी माझाने दिली.

3. इंधन दरवाढ करणे ही अर्थ मंत्रालयाची बौद्धिक दिवाळखोरी, भाजप नेत्याचा घरचा आहेर

देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरात दिवसेंदिवस सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

सुब्रह्मण्यम स्वामी

फोटो स्रोत, Pti

इंधन दरवाढ करणं ही अर्थ मंत्रालयाची बौद्धिक दिवाळखोरी आहे. हे देशविरोधी आहे, अशी प्रतिक्रिया सुब्रह्मण्यम स्वामी यांनी दिली आहे.

इंधनाच्या किंमती वाढवून अर्थसंकल्पीय तूट भरून काढणं योग्य नाही, असंही स्वामी यांनी म्हटलं. स्वामी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून वरील ट्वीट केल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. ही बातमी लोकमतने दिली.

4. राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर

गेली दोन वर्षे महाविकास आघाडीवर नाराजी व्यक्त करत टीकेची झोड उठवणार्‍या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अखेर आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

राजू शेट्टी

फोटो स्रोत, facebook

माजी खासदार राजू शेट्टी यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे आणि याबाबत आज कार्यकारिणीच्या बैठकीत अधिकृत घोषणा केली.

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हावेत म्हणून सूचक म्हणून मी होतो, पण त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या निर्णयात घटक पक्षांना कुठेच विचारात घेतले नाही. अवकाळी आणि अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यानंतर सरकारने अतिशय तुटपुंजी मदत केली. महापुरात झालेल्या नुकसानीची भरपाई देताना त्यांनी केवळ 150 रुपये मदत देऊन शेतकऱ्यांना फसवले, असं राजू शेट्टी यावेळी म्हणाले. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.

5. भारतात कोरोनाची चौथी लाट आल्यास ती सौम्य असेल - अदर पुनावाला

देशाने योग्य लस निवडल्यामुळेच आज भारतात करोना रुग्णसंख्या इतकी कमी आहे. याच कारणामुळे भविष्यात भारतात कोरोना व्हायरसची चौथी लाट आली तरी ती सौम्य असेल, असा विश्वास सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी व्यक्त केला आहे.

पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. "इतर देशांच्या तुलनेत आपली लस चांगली असल्याचं सिद्ध झालं आहे. सर्व देश बुस्टर डोस देत असताना आता भारतानेही याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)