पोद्दार शाळेची पाच तास गायब झालेली बस नेमकी कुठे गेली होती?

सोमवारी (4 एप्रिल) मुंबईतील पोद्दार शाळेची मुलांना घरी सोडणारी बस पाच तास अचानक गायब झाली. संध्याकाळच्या सुमारास बस मिळाली आणि मुलं घरी पोहोचल्यानंतर घाबरलेल्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास टाकला.

नवीन बस ड्रायव्हरला रस्ता माहित नसल्यामुळे तो भरकटला होता, अशी माहिती मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. शाळा प्रशासनाने स्कूलबस ड्रायव्हरना पुन्हा ट्रेनिंग दिलं जाईल, अशी माहिती प्रेसनोट काढून दिलीये.

पण, त्या पाच तासात नेमकं काय झालं? शाळेची बस कुठे भरकटली होती? हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

स्कूल बसचे ते पाच तास?

सोमवार दुपारची वेळ. साधारणत: साडे-तीन, चार वाजले असतील. मुंबईतील सांताक्रूज परिसरातल्या पोद्दार शाळेत एकच धावपळ उडाली.

दुपारी 12 वाजता शाळा सुटल्यानंतर मुलं स्कूल बसने घरी पोहोचणार होती. पण, शाळा सुटून पाच तास लोटल्यानंतरही मुलं वेळेत घरी न पोहोचल्याने बिथरलेले पालक मुलांच्या शोधात शाळेत पोहोचू लागले.

एक-दोन-तीन करता, करता जवळपास अनेक मुलांचे पालक शाळेत पोहोचले. पालक शाळा प्रशासनाकडे स्कूल बस कुठे आहे याची माहिती विचारू लागले. पण, स्कूल बसचा पत्ता लागत नव्हता. ड्रायव्हर आणि बस अटेंडंटचा फोन बंद झाल्याने शाळेलाही बस नक्की कुठे आहे, काय झालंय याची माहिती नव्हती.

कोरोनानंतर दोन वर्षांनी शाळा ऑफलाईन सुरू झाली होती. या बसमध्ये 25 च्या आसपास मुलं होती.

शाळा प्रशासन आणि पालकांमध्ये खटके उडू लागले. दरम्यान, मुलांचा काहीच पत्ता नव्हता. मग पोलिसही चौकशीसाठी शाळेत पोहोचले. बसचा नेहमीचा रूट, बस कुठे जाणार आहे, कोणत्या भागातील मुलं आहेत यावर बसचा शोध घेणं सुरू झालं.

स्कूल बसमध्ये ड्रायव्हरसोबत अटेंडंट किंवा दीदी असतात. पण कोणाशीच संपर्क होऊ शकत नव्हता.

अखेर संध्याकाळी बसचा पत्ता लागला. शाळा प्रशासन, पालक आणि मुंबई पोलिसांनी मुलं सुखरूप असल्याने सुटकेचा निश्वास सोडला.

पोलीस काय म्हणाले?

शाळेच्या मुलांसह बस अचानक गायब झाली होती. त्यामुळे मुंबई पोलिसांवरही तपासाचा दबाव मिनिटागणिक वाढत होता.

संध्याकाळी साडे-पाचच्या सुमारास बस मिळाली आणि मुलं सुखरूप असल्याची माहिती मिळाली.

मुंबई पोलीस सहआयुक्त (कायदा-सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, "पोद्दार शाळा प्रशासनाच्या माहितीनुसार कोरोनानंतर शाळेचा पहिला असल्यामुळे बस उशीला निघाली होती." या बसचा ड्रायव्हर नवीन असल्याने त्याला रस्त्याची माहिती नव्हती. त्यामुळे बस योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी उशीर झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, बसमध्ये उपस्थित दीदी आणि ड्रायव्हरमध्ये काही संवादाचा गोंधळ झाला होता.

पोलीस उपायुक्त शिवाजी राठोड म्हणाले, "या घटनेनंतर शाळा आणि पालकांची बैठकही झाली. यात शाळेने अशी घटना पुन्हा होणार नाही याची ग्वाही दिलीये."

शाळा प्रशासनाने काय माहिती दिली?

या घटनेनंतर शाळा प्रशासनाने मीडियाशी बोलण्यास नकार दिलाय. एक प्रेस नोट काढून पोद्दार शाळा प्रशासनाने माहिती दिलीये.

शाळा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर स्कूल बस ड्रायव्हरला पुन्हा नव्याने ट्रेनिंग दिलं जाईल. जेणेकरून शाळेचा ट्रान्सपोर्ट विभाग योग्य पद्धतीने काम करेल.

सरकार करणार कारवाई?

पोद्दार शाळेच्या या घटनेची गंभीर दखल राज्याच्या शिक्षण उपसंचालकांनी घेतलीये.

विभागीय शिक्षण उपसंचालकांनी विद्यार्थ्यांना झालेल्या या मानसिक त्रासाबाबत खुलासा करण्यासाठी शाळा प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

या नोटीशीत शिक्षण उपसंचालक म्हणतात, विद्यार्थी वेळेत घरी न पोहोचल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना मानसिक त्रास झाला. ही गोष्ट अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. विद्यार्थी सुरक्षा लक्षात घेऊन बस सेवेचं योग्य नियोजन करणं आवश्क होतं.

विद्यार्थी सुरक्षेबाबत शाळा प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचं स्पष्ट होतंय, अशा शब्दात सरकारने पोद्दार शाळेची कानउघडणी केलीये. विभागीय शिक्षण उपंसंचालकांनी शाळा प्रशासनाला तात्काळ खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

स्कूलबसमध्ये जीपीएस नव्हता?

सर्व स्कूल बसमध्ये जीपीएस ट्रॅकर असणं बंधनकारक आहे. जेणेकरून शाळेची बस कुठे आहे याची माहिती मिळू शकते. पण, या बसमध्ये जीपीएस होता का, याबाबत शाळा प्रशासनाने काहीही बोलण्यास नकार दिलाय.

मुलांच्या सुरक्षेबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना मनसे नेते अखिल चित्रे म्हणाले, "शाळेचा दावा आहे की स्कूल बसमध्ये जीपीएस ट्रॅकर आणि अत्याधुनिक सुविधा आहे. मग, अत्याधुनिक सेवा असेल तर जीपीएस ट्रॅकर का सुरू नव्हता?"

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)