आर्यन खान: प्रभाकर साईलचा मृत्यू #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, VIDEO SCREEN SHOT
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1.मुंबई ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा मृत्यू
आर्यन खानला कॉर्डालिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अटक केल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या पंच प्रभाकर साईलचा मृत्यू झाला आहे.
प्रभाकर साईलचा शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेनंतर किरण गोसावी चर्चेत आला. प्रभाकर साईल हा गोसावीचा बॉडीगार्ड होता. आज सकाळी 11 वाजता प्रभाकर साईलचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी अंधेरी येथील त्यांच्या घरी आणले जाईल. तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 'एबीपी माझा'ने ही बातमी दिली आहे.
क्रुझ कारवाई प्रकरणातील प्रथम क्रमांकाचे नाव असणारे ते पंच होते. हा पंच किरण गोसावी यांचा बॉडीगार्ड होता. किरण गोसावींकडेच याची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था होती.
प्रभाकर साईल यांनी जबाबात सांगितलं होते की, ''क्रूझ कारवाई झाली त्या दिवशी मी किरण गोसावींसोबतच होतो. किरण गोसावी एनसीबी ऑफिसला गेले. मी खालीच थांबलो होतो. गोसावी बरोबर सव्वा बारा वाजता खाली आले. आम्ही तिथून जवळच जाऊ फ्रँकी, थम्स अप घेतलं. तिथू ग्रीन गेटला गेलो. ग्रीन गेटच्या आत गेलो तिथे समीर वानखेडे, त्यांचे सहकारी बसले होते तिथे त्यांना फ्रँकी आणि पाणी-थम्सअप वगैरे दिले. नंतर क्रूझच्या बाहेर गेलो. तिथून मला एका ठिकाणी थांबवून बाहेर जाऊ नको असे सांगितलं. मला काही फोटो दाखवण्यात आले होते आणि ते फोटो असलेले लोक आले की त्यांना ओळखायला सांगितलं होतं. फोटोतल्या व्यक्ती आल्या की मला गोसावींना रिपोर्ट करायचं होतं'', असं साईल यांनी सांगितलं.
2. पालघर साधू हत्याकांडप्रकरणी 10 जणांना हायकोर्टाकडून जामीन
पालघर साधू हत्याकांड प्रकरणी 10 आरोपींची ओळख न पटल्यानं जामीन मंजूर करत असल्याचं हायकोर्टानं अधोरेखित केलं आहे. अन्य आठ आरोपींचा त्या हल्ल्यात सहभाग असल्याचं पुराव्यांनिशी निष्पन्न होत असल्याचं स्पष्ट करत त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.
पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडचिंचले गावाजवळ 16 एप्रिल 2020 रोजी चोर-दरोडेखोरांच्या अफवेमुळे गस्त घालणाऱ्या जमावाकडून काही जणांवर हल्ला करण्यात आला. चोर समजून गुजरातमधील सुरत इथं अंत्यसंस्कारासाठी चाललेल्या दोन साधू आणि त्यांच्या वाहन चालकाची निर्घूणपणे दगडांनी ठेचून हत्या करण्यात आली होती. प्राथमिक तपासानंतर पालघर पोलिसांकडून हे प्रकरण राज्य गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं.

फोटो स्रोत, ANI
याप्रकरणी शेकडो जणांना अटक करून त्यांच्यावर ठाणे सत्र न्यायालयात आरोपपत्रही दाखल करण्यात आलंय. याप्रकरणी दाखल याचिकेत मुंबई उच्च न्यायालयातही राज्य सरकारकडून दोन सीलबंद अहवाल सादर करण्यात आलं आहेत. त्यापैकी काहींना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयानं यापूर्वीच जामीन मंजूर केला होता.
3.पठाणकोट हल्ल्यावेळी लष्कर पाठवण्यासाठी केंद्राने मागितले 7.5 कोटी-भगवंत मान
पठाणकोट हल्ल्यावेळी लष्कर पाठवण्याच्या बदल्यात केंद्र सरकारने पंजाब सरकारकडे 7.5 कोटी रुपयांची मागणी केली होती असा आरोप पंजाबचे नवे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केला आहे.

फोटो स्रोत, BHAGWANT MANN/FB
पठाणकोट एअरबेसवर हल्ला झाल्यानंतर लष्कर नंतर पोहोचलं. त्याआधी सरकारचं पत्र आलं की लष्कर पंजाबमध्ये पाठवण्यात आलं आहे. यामुळं पंजाबला 7.5 कोटी रुपये द्यावे लागतील असं मान यांनी सांगितलं. मी आणि आम आदमी पक्षाचे साधू सिंह संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे गेलो. त्यांना म्हणालो, आम्हाला मिळणाऱ्या संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजनेच्या निधीतून ही रक्कम कापून घ्या आणि या बदल्यात आम्हाला फक्त पंजाब, भारताचा भाग नाही, लष्कर भाड्याने घेत आहोत असं लिहून द्या असं मान म्हणाले. 'दैनिक भास्कर'ने ही बातमी दिली आहे.
1 जानेवारी 2016 रोजी पाकिस्तानच्या चार दहशतवाद्यांनी पठाणकोट एअरबेसवर हल्ला केला होता. यामध्ये सात भारतीय सैनिकांचा मृत्यू झाला होता. 80 तास चकमक सुरू होती. प्रत्युत्तरात भारतीय लष्कराने केलेल्या हल्ल्यात चारही दहशतवाद्यांचा मृत्यू झाला.
4. ग्लिसरीनची बाटली घेऊन सगळे पवार लाईनमध्ये उभे- सोमय्या
"अजित पवारांचा जरंडेश्वर जप्त झाला ना?, न्यायालयाने मान्यता दिली ना? शरद पवार पण रडत होते. ग्लिसरीनची बाटली घेऊन सगळे पवार लाईनमध्ये उभे होते टीव्हीवर. सगळ्या चॅनेलवर. कधी सुप्रिया सुळे रडताना दिसायच्या. कधी त्यांच्या ताई कधी कुणाची माई, कधी कुणाची बायको, कुणाचा मुलगा.. सगळे लाईनीत पवार. सदनभर पवार रडत होते ग्लिसरीनच्या बाटली वापरुन," असा टोला सोमय्यांनी लगावला. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील वकील सतीश उके यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी सकाळी छापेमारी केली. मात्र ही छापेमारी राजकीय हेतूने केल्याचा आरोप नाना पटोले यांनी केलाय. यावरच उत्तर देताना किरीट सोमय्या यांनी कागदपत्रांशिवाय ईडी कारवाई करत नाही असं सांगितलं आहे
आता न्यायालयाने दिलं ना. अजित पवारांवर बेनामी संपत्तीच्या अंतर्गत पण चौकशी सुरु आहे. तुम्ही लुटणार आणि महाराष्ट्राची जनता बघत बसणार असं होणार नाही," असंही सोमय्या म्हणाले.
5.संघर्षाची गुढी उभारावी लागेल-सामनातून केंद्र सरकारवर टीका
निवडणुकीपुरती स्वस्ताईची गुढी उभारून निवडणुका संपल्यावर महागाईची काठी उभारणाऱ्या केंद्र सरकारशी नवीन वर्षात जनतेला दोन हात करावे लागतील. कोरोनाचा राक्षस गाडून जनतेने एक युद्ध जिंकले आहे. आता जनतेला नवनिर्मितीबरोबरच महागाईला गाडण्यासाठी संघर्षाचीही गुढी उभारावी लागेल असं 'सामनाच्या अग्रलेखात' म्हटलं आहे.
राज्यातल्या आणि देशातल्या जनतेनं कोरोनाला तोंड दिलं पण महागाईच्या सरकारनिर्मित विषाणूला तोंड कसं द्यायचं याचं मात्र कुठलंही उत्तर जनतेला सापडताना दिसत नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








