काँग्रेसचे 20 आमदार नाराज आहेत, कारण...

संग्राम थोपटे, प्रणिती शिंदे

फोटो स्रोत, FACEBOOK

फोटो कॅप्शन, प्रणिती शिंदे आणि संग्राम थोपटे
    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी

"काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात लेखी तक्रार करणार," असा इशारा काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिला आहे.

तसंच काँग्रेसच्या 20 आमदारांनी अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. यासंदर्भात काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे.

ठाकरे सरकारमध्ये कोंडी होत असल्याचं सांगत यापूर्वीही काँग्रेसने अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. 'सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाही' असंही वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होतं.

काँग्रेस नेत्यांच्या या पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ठाकरे सरकाचे दोन मंत्री तुरुंगात असताना आणि अनेक नेते ईडीच्या रडारवर असताना आधीच संकटात अडकलेल्या सरकारमध्ये आता अंतर्गत कलह आणखी तीव्र झालाय का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पत्रात नेमकं काय म्हटलंय?

काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून भेटीसाठी वेळ मागितली आहे.

या पत्रावर काँग्रेसच्या इतरही 20 आमदारांच्या सह्या आहेत.

3 किंवा 4 एप्रिलला सोनिया गांधी यांनी भेटीसाठी वेळ द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या दिवशी शक्य नसल्यास तुम्ही वेळ असेल तेव्हा भेट द्यावी असंही त्यांनी म्हटलं आहे.

या दरम्यानच्या काळात काँग्रेसचे आमदारांचं दिल्लीत प्रशिक्षणही आहे.

महत्त्वाचं म्हणजे राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी वेळ हवी असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलंय.

भेटीसाठी माझ्यासोबत 20 ते 25 आमदार असतील असंही संग्राम थोपटे म्हणाले आहेत.

'बाळासाहेब थोरातांची लेखी तक्रार करणार'

जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवर टीका करत 'घरचा आहेर' दिला आहे.

काँग्रेसचे मंत्रीच काँग्रेसच्या आमदारांना मदत करत नाहीत. तसंच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवर विश्वास नाही असंही ते म्हणाले आहेत.

काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल

फोटो स्रोत, FACEBOOK

फोटो कॅप्शन, काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल

शिवाय, बाळासाहेब थोरात यांची लेखी तक्रार करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

यापूर्वीही कैलास गोरंट्याल यांनी नाराजीबाबात उघड भूमिका घेतली होती. ऑगस्ट 2020 मध्येही कैलास गोरंट्याल यांनी निधी मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली होती. 11 आमदारांसह उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

एकनाथ शिंदे मंत्री असलेल्या नगरविकास खात्याकडून जाणीवपूर्वक निधी दिला जात नसल्याचा आरोप करत शिवसेनेवर निशाणा साधला होता.

कैलास गोरंट्याल हे जालना जिल्ह्यातून काँग्रेसचे आमदार आहेत. जालना मतदारसंघातून ते तीन वेळा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेत. त्यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल जालना नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आहेत.

2019 विधानसभा निवडणुकीत कैलास गोरंट्याल यांनी शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांचा पराभव केला. या मतदारसंघात काँग्रेसचे गोरंट्याल आणि शिवसेनेचे खोतकर यांच्यात कायम अटीतटीची लढत पहायला मिळते.

काँग्रेस आमदारांच्या नाराजीची कारणं काय?

महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेपासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांचं सरकार कोसळणार अशी भाकितं भाजपकडून वर्तवली जात आहेत.

शिवाय, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनीही निधी वाटपात भेदभाव होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.

सोनिया गांधी, राहुल गांधी

फोटो स्रोत, PRAKASH SINGH/GETTYIMAGES

आता काँग्रेसच्या 20 आमदारांनी थेट सोनिया गांधींना यासंदर्भात चर्चा करण्यासाठी भेटीची वेळ मागितली आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत या चार मुद्यावरून नाराजी असल्याचं दिसून येत आहेत.

  • निधी वाटपावरून नाराजी
  • काँग्रेस नेते ठाकरे सरकारमध्ये भूमिका घेत नाहीत
  • विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर
  • काँग्रेसमध्ये अंतर्गत खदखद

ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात, "काँग्रेसमध्ये मंत्री झालेले नेते आहेत ते आणि ज्यांना सत्तेचा काहीही लाभ मिळालेला नाही अशांचा संघर्ष कायम सुरू असतो. यात काहीही नवीन नाही. सोनिया गांधींपर्यंत ते या गोष्टी घेऊन जातील. पण तरीही केंद्रात काँग्रेसला आशेचा किरण दिसत नाही तोपर्यंत काँग्रेसला सत्तेसाठी आणि भाजपचा सामना करण्यासाठी नमतं घ्यावं लागेल असं वाटतं."

कुठल्याही पक्षामध्ये दोन घटक असतात. सत्तेचा लाभ झालेले संतुष्ट आणि सत्तेचा लाभ न झालेले असंतुष्ट यांच्यात संघर्ष सुरू असतो आणि पक्षांतर्गत खदखद दिसून येते.

"अशा बातम्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा लाभ काँग्रेसला मिळावा यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाईल. पण नेते, आमदार, मंत्र्यांनी कितीही प्रस्ताव दिला तरी अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांचा असतो. त्यामुळे या राजकारणात काँग्रेसची कोंडी होताना दिसत आहे." असंही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

महाविकास आघाडी सरकारला आता जवळपास अडीच वर्षे झाली. त्यामुळे आता सरकारमधील पक्षांतर्गत नाराजी बाहेर येऊ लागली आहे. यापूर्वीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीची 15 वर्षे सत्ता होती तेव्हाही अनेक मुद्यावरून दोन्ही पक्षात कायम पदांसाठी, निधीसाठी रस्सीखेच सुरू असायची. यूतीच्या काळातही शिवसेना, भाजपमध्ये टोकाचा संघर्ष दिसून आला होता.

संग्राम थोपटे काय म्हणाले?

बीबीसी मराठीशी बोलताना आमदार संग्राम थोपटे यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं. काँग्रेस आमदारांमध्ये कोणतीही नाराजी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

ते म्हणाले, "6 तारखेला संसदेत सर्वपक्षीय आमदारांचं प्रशिक्षण आहे. त्यासाठी आम्ही दिल्लीत जाणार आहे. यानिमित्त भेट व्हावी म्हणून पक्षश्रेष्ठींची वेळ मागितली आहे. नाराजीचा प्रश्न नाही. आमच्यासोबत आमचे नेते बाळासाहेब थोरातही असणर आहेत."

काही आमदारांच्या मतदारसंघातील अडचणी, विकास कामं यासंदर्भात आम्हाला चर्चा करायची आहे असंही ते म्हणाले.

काँग्रेसचं अंतर्गत राजकारण

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांमध्येही त्यामुळे अस्वस्थता असल्याचं दिसून येत आहे.

एकाबाजूला विधानसभा अध्यक्ष पदावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत स्पर्धा आहे तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मंत्रिपद हवं असल्याने राजकारण सुरू असल्याचंही काँग्रेसचे नेते खासगीत सांगतात.

महाविकास आघाडी

फोटो स्रोत, TWITTER

शिवाय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस महाविकास आघाडीसोबत लढवणार की स्वतंत्र लढवणार यावरूनही मतभेद असल्याचे समजते.

मुंबईसारख्या शहरात काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढल्यास पक्षाला मोठा फटका बसू शकतो असंही जाणकार सांगतात. राज्यात सत्तेत एकत्र असताना मुंबईत स्वतंत्र लढल्याने मतांचं मोठ्या प्रमाणात विभाजन होण्याची शक्यता असल्याने काँग्रेसला नुकसान होऊ शकतं असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सांगतात, "काँग्रेसमध्ये नाना पटोले विरुद्ध ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यातला संघर्ष आता उघड आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याचं स्पष्ट होतं. निधी वाटपात शिवसेनेला दुय्यम स्थान दिलं अशी टीका शिवसेनेच्याही काही नेत्यांनी केली. त्याचप्रमाणे आता काँग्रेसचे आमदारही आक्रमक झाले आहेत."

"ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला डावललं जातं असं भाजपकडूनही वारंवार काँग्रेसला डिवचलं जातं. तसंच काँग्रेसमध्ये राष्ट्रीय पातळीवरही अजूनही गोंधळाची परिस्थिती आहे. त्याचाही फटका पक्षाला बसत आहे,"

UPA अध्यक्षपदाच्या वक्तव्यावरून काँग्रेस आणि शिवसेनेत जुंपली

केंद्रात भाजप सरकारला आव्हान देण्यासाठी विविध विरोधी पक्षांची आघाडी स्थापन करण्याच्या घडामोडींना गेल्या काही काळापासून वेग आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी UPA चे नेतृत्त्व करावं अशी भूमिका मांडली जात असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. देशपातळीवर विरोधी पक्षांना एकजूट करायचं असल्यास हे काम शरद पवार करू शकतात असंही ते म्हणाले.

दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यक्रमात शरद पवार यांच्या उपस्थितीत संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजे यूपीए अध्यक्षपदाची धुरा शरद पवार यांच्याकडे सोपवायला हवी असा ठराव मंजूर करण्यात आला होता.

काँग्रेसने संजय राऊत यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे. यूपीएचे सदस्य नसणाऱ्यांनी यूपीएबाबत बोलू नये असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांचं व्यक्तिगत मत असू शकतं. शिवसेना अद्याप यूपीएमध्ये सामील नाही. त्यांनी आधी यूपीएमध्ये सामील व्हावं असंही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)