अजित पवारच सरकार चालवतात या भाजपच्या आरोपात तथ्य आहे का?

उद्धव ठाकरे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"अजित पवार राज्य चालवतात. मुख्यमंत्री कधीतरीच दिसतात. आधी उध्दवजींना कोव्हीडमुळे बाहेर पडणं शक्य नव्हतं. आता आजारपणामुळे शक्य नाही. मला त्यांची कुंडली बघायची आहे. काय भाग्यवान माणूस आहे. कशाचच सोयरसुतक नाही. तरीही त्यांना कोणी अडवू शकत नाही. सगळे आमदार त्यांचे प्रश्न घेऊन अजित पवारांकडे जातात. कारण त्यांच्याकडे प्रश्न सोडवण्याची धमक आहे, " भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना हे वक्तव्य केलं होतं.

अजित पवार हे राज्य चालवतात, असं म्हणत त्यांनी अजित पवारांचं कौतुक केलंय. हे कौतुक करत असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर अनेक चर्चांना आणि प्रश्नांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.

पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाची तुलना का होत आहे? त्यामागे काय कारणं आहेत?खरंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे इतर मुख्यमंत्र्यांच्या तुलनेने काम करत नाहीत का? अजित पवारांचं चंद्रकांत पाटील यांनी कौतुक का केलं?

मुख्यमंत्री वर्षभर मंत्रालयात गेलेच नाहीत?

2019 मध्ये उध्दव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तीन महिन्यात कोव्हीडचं संकट आलं. त्यानंतर मुख्यमंत्री ऑनलाईन बैठका घेऊ लागले. काही महिन्यांनंतर "मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत. राज्याचा कारभार 'ऑनलाईन' सुरू आहे." अशा टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर होऊ लागली.

कोव्हीड काळात मुख्यमंत्र्यांचे बोटावर मोजण्याइतकेच दौरे झाले. मुंबईबाहेरचे बरेचसे दौरे रद्द करण्यात आले. मंत्रिमंडळाच्या बैठकीला इतर मंत्री उपस्थित असले तरीही मुख्यमंत्री ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहत असत.

12 नोहेंबर 2021 ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. 22 दिवस ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्यानंतर त्यांना आरामाचा सल्ला डॉक्टरांनी दिल्यामुळे ते वर्षा बंगल्यावरून मर्यादित काम करत होते. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ते उपस्थित राहू शकले नाहीत.

नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनाच्या 15 दिवसांच्या कामकाजात त्यांनी तीन दिवस प्रत्यक्ष सहभाग घेतला. पण विधानभवनात ते उपस्थित राहत होते.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, facebook

मंत्रालयातून मिळालेल्या माहितीनुसार, 19 फेब्रुवारी 2021 ला मुख्यमंत्री शेवटचे मंत्रालयात कामासाठी उपस्थित राहीले होते.

या कामाच्या पध्दतीवर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, "उध्दवजींना आधी कोव्हीडमुळे जमत नव्हतं आता आजारपणामुळे जमत नाहीये. आमदार सगळी कामं घेऊन अजित पवारांकडे जातात."

'मुख्यमंत्र्यांच्या सहीशिवाय राज्य चालत नाही'

शिवसेनेच्या आमदार आणि प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

त्या म्हणतात, "राज्याचा कुठलाही निर्णय मुख्यमंत्र्यांच्या सल्याने किंवा सहीशिवाय होत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याच्या प्रमुखपदी बसले आणि कोरोनाचं संकट ओढावलं. पण त्याकाळातही ते ऑनलाईन बैठकांच्या मार्फत राज्याचा आढावा घेत होते. उपाययोजना करत होते.

त्यामुळे सुरूवातीपासून ते कामात सक्रिय होते. त्यानंतर त्यांची शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे त्यांना आराम सक्तीचा होता. पण तरीही त्यातून बरे झाल्यावर त्यांनी हळूहळू का होईना कामाला सुरुवात केली."

आमदारांसाठी किंवा इतर शिवसैनिकांच्या प्रश्नांसाठी ते उपलब्ध असतात का? याबाबत बोलताना मनिषा कायंदे पुढे सांगतात, "जर मुख्यमंत्र्यांपर्यंत जाण्याची जिथे गरज असेल तिथे ते निश्चितपणे वेळ देतात. अधिवेशनाच्या काळात त्यांनी सर्व शिवसेनेच्या आमदारांना रात्री जेवायला वर्षा बंगल्यावर बोलावलं होतं. तेव्हाही त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. आमचे प्रश्न समजून घेतले. त्यामुळे अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या कामाची तुलना करणे हे खोडसाळपणाचं लक्षण आहे."

अजित पवारांच्या कामाची पद्धत रोखठोक?

मुख्यमंत्र्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मात्र भाजप उघडपणे कौतुक करतेय. अजित पवारांच्या कामाबद्दल किंवा त्यांच्या राजकीय वक्तव्याबद्दल भाष्य करताना भाजपचे महत्त्वाचे नेते थेट टीका करणं टाळतात अशी चर्चा आहे.

अजित पवार देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

त्याची काही उदाहरणंही समोर आहेत. त्यामुळे भाजप आणि अजित पवारांचं चाललंय काय? असा प्रश्‍न उपस्थित होतोय.

विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाच्या भाषणाची सुरुवात अजित पवारांनी कवितेने केली. सुरुवातीला अजित पवार म्हणाले, "तुमच्यामुळे मलाही कविता म्हणाव्यात लागतात."

त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आमच्यामुळे अजितदादा कविता म्हणायला लागले, याचं तरी श्रेय आम्हाला द्या" फडणवीसांनी अजित पवारांच्या कवितेलाही दाद दिली.

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सरकारी वकील प्रविण चव्हाण यांच्या 'स्टींग ऑपरेशनचा' पेनड्राईव्ह सादर केला. सव्वाशे तासांच्या या रेकॉर्डींगमधला अजित पवारांच्याबाबतच्या एका व्हीडिओतील संवाद त्यांनी वाचून दाखवला. त्यामध्ये "अजित पवार सपोर्ट करत नाहीत. लेकीन बडे सहाब सब देख रहे है..." हे वाक्य त्यांनी आवर्जून सांगितलं.

देवेंद्र फडणवीस अजित पवार

फोटो स्रोत, Getty Images

12 मार्चला देवेंद्र फडणवीस यांना बदल्यांच्या घोटाळ्याबाबत official secret act भंग झाल्याप्रकरणी साक्ष घेण्यासाठी नोटीस आली. त्यांची सागर बंगल्यावर पोलीसांनी चौकशीही केली. या नोटीसीबाबत अजित पवारांना विचारलं असता, ते म्हणाले होते, "देवेंद्र फडणवीस यांना कशामुळे नोटीस दिली? यापूर्वी देशात राज्यात एकमेकांना नोटिसा देणे, यंत्रणांचा वापर करणे असे प्रकार कधीच झाले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर देखील मी हे बोलून दाखवलं. प्रत्येकाने आपापलं काम केलं पाहिजे. सगळ्याच पक्षांनी हे लक्षात घेतलं पाहिजे."

अजित पवार यांच्या या वक्तव्यावर चौकशीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार यांच्यावर टीका करण्याऐवजी ते म्हणाले, "ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे त्यांना मनातून वाटत असेल की अशी नोटीस देणं चुकीचं आहे." अजित पवार यांच्या रोखठोक वक्तव्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत जाहीर अभिनंदन केलं.

कोल्हापुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विधानसभेतली घटना सांगितली, "एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या प्रश्नावर अजित पवार यांना परवा विधानसभेच्या सभागृहांमध्ये चिठ्ठी लिहून हवं तर श्रेय घ्या पण संप मिटवा असं सांगितल्याचं म्हटलं. अजित पवार यांची कामाची पद्धतही रोखठोक आहे. होय तर होय नाहीतर नाही अशा पद्धतीने ते काम करतात."

अजित पवार यांच्या कौतुकाबद्दल शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारलं असता, ते म्हणाले, "भाजपमध्येही काही कौतुक करण्यासारखी लोकं आहेत. नितीन गडकरींच्या कामाचं आम्हालाही कौतुक आहे. काही विषय राजकारणाच्या पलिकडचे असतात. अजित पवार आणि भाजपचं प्रेम म्हणजे पुतणा मावशीचे प्रेम आहे."

भाजपची राजकीय खेळी?

अजित पवारांच्या कामाचं आताच कौतुक करून राजकीयदृष्ट्या काय साध्य होणार आहे? याबाबत जेष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी सांगतात, "अजित पवारांचं कौतुक करणे म्हणजे उध्दव ठाकरेंना कमी दाखवणे. आपल्यापेक्षा पदाने लहान असलेल्या व्यक्तीच्या कामाचं सतत कौतुक केलं तर प्रमुख पदावर बसलेली व्यक्तीचं महत्त्व कमी केल्यासारखं आहे. उध्दव ठाकरेंचं महत्त्व कमी आहे हेच भाजपला यातून दाखवायचं असू शकतं.

दुसरा मुद्दा म्हणजे, सरकारमध्ये राष्ट्रवादी ताकदवान आहे. त्यांना सर्व लाभ मिळतायेत, आमदारांमध्ये ही खदखद आहे. अजित पवार यांच्या सततच्या कौतुकामुळे सरकारमधल्या नाराजीची दरी ही अधिक वाढू शकते. "

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)