नवनीत राणा : 'संजय राऊतांनी कायमचं मौन बाळगलं तर शिवसेनेचं भलं होईल' #5मोठ्याबातम्या

नवनीत राणा संजय राऊत

फोटो स्रोत, Getty Images

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..

1. संजय राऊतांनी कायमचं मौन बाळगलं तर शिवसेनेचं भलं होईल - नवनीत राणा

"संजय राऊत यांनी कायमचं मौन बाळगलं तर शिवसेनेचंच भलं होईल," अशा शब्दांत खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

नवी दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना राणा यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला.

"कधी-कधी मौन हेच सर्वांत चांगलं उत्तर असतं," असं ट्वीट करत संजय राऊत यांनी यापुढे आपलं उत्तर मौन स्वरूपात असेल," असे संकेत नुकतेच दिले होते. त्याच्यावर प्रतिक्रिया देताना राणा यांनी त्यांना टोला मारला आहे.

शिवसेनेच्या इतर खासदारांना विचारलं तर त्यांना आघाडी नको असून युतीच हवी आहे. राऊतांनी बोलणं बंद केलं तर शिवसेनेचं चांगलं होऊ शकतं, असं राणा म्हणाल्या.

याशिवाय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडणं शक्य नसेल, तर त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद द्यावं. ते शिवसेनेतील सर्वांत हुशार व्यक्ती आहेत, असंही नवनीत राणा यांनी म्हटलं. ही बातमी लोकमतने दिली.

2. प्रेमाने आलात तर बाजूला बसू, पण वार सहन करणार नाही - आदित्य ठाकरे

प्रेमाने बोलायला आलात तर बाजूला बसू. वार करायला आलात तर सहन करणार नाही, राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचं आहे. तेच बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलं आहे, असं वक्तव्य पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, facebook

विरोधी पक्षात नैराश्य आलं आहे. सत्ता गेल्यानंतर सध्या चिंतेत आहेत. पण सत्ता येत जात असते. निवडणुका झाल्या की, विकास सुरू करायचा असतो. लोकांची सेवा करण्याचा हा काळ असतो, असं ठाकरे म्हणाले.

मामा श्रीधर पाटणकर यांच्यावरील कारवाईवरही आदित्य ठाकरे यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली.

एक्सपोज कोण होतंय हे मी सांगायची गरज नाहीय. कोण कोणाला धमक्या देतंय. केंद्रीय यंत्रणा प्रचार यंत्रणा म्हणून काम करत आहेत. आम्ही अशांना घाबरणार नाही आम्ही विकासांचे काम करत राहणार, असं ते म्हणाले.

3. द कश्मीर फाईल्स चित्रपटाच्या माध्यमातून बंधूप्रेम संपवलं जात आहे - शरद पवार

द कश्मीर फाईल्स चित्रपटावर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे. द कश्मीर फाईल्स चित्रपटाममुळे देशातील एक विचार मारला जात आहे. त्यामुळे देशातील बंधूप्रेम संपवलं जात आहे, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

दिल्ली येथे आयोजित राष्ट्रवादी युवक काँग्रेस मेळाव्याला शरद पवार उपस्थित होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केलं. विशेष म्हणजे, याच मेळाव्यात युपीएचं अध्यक्षपद शरद पवारांकडे देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.

"पंतप्रधान कुठल्याही पक्षाचे असोत त्यांनी देश एक ठेवणं महत्त्वाचं असतं. मात्र चित्रपट चांगला आहे, असं पंतप्रधान म्हणतात. महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन सुरू होतं तेव्हा एका दुपारी एकही आमदार सदनात नव्हता. ते सगळे चित्रपट पाहायला गेले होते. असंच सुरू राहिलं तर देशात एकता राहणार नाही," अशी भीती शरद पवारांनी यावेळी व्यक्त केली. ही बातमी लोकसत्ताने दिली.

4. एका मुख्यमंत्रिपदासाठी आमदारांना नाराज केलं, कधीतरी स्फोट होईल - रावसाहेब दानवे

राज्याचं मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी शिवसेनेकडून राज्यभरातील आमदारांना नाराज करण्याचं धोरण स्वीकारण्यात आलं आहे. आमदारांच्या नाराजीमुळे महाविकास आघाडीचा कधी ना कधी स्फोट होईल, असा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

रावसाहेब दानवे

फोटो स्रोत, facebook

ते बुधवारी (30 मार्च) मुंबई येथे प्रसारमध्यमांशी बोलत होते. यावेळी दानवे म्हणाले, "महाविकास आघाडीत केवळ महामंडळांवरील नियुक्त्यांवरूनच नाराजी नाही. तर निधीवाटपाच्या मुद्द्यावरूनही तीन पक्षांमध्ये समन्वय नाही. त्यामुळे भविष्यात महाविकास आघाडीचं सरकार येणं तर लांबच राहिलं पण आघाडी टिकवणंही अवघड आहे," महाराष्ट्र टाईम्सने ही बातमी दिली आहे.

5. नारायण राणेंच्या खात्याला 6 हजार कोटी रुपयांची मंजुरी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याला केंद्र सरकारने सढळ हाताने निधी देऊ केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने राणे यांच्या खात्याला 6062.45 कोटी रुपयांच्या कार्यक्रमाला मंजुरी दिली.

रेझिंग अँड एक्सेलरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स (RAMP), ही योजना जागतिक बँकेच्या सहाय्याने केंद्र सरकारने आखली आहे. जी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या विविध COVID-19 साथीच्या रोगाशी लढताना आलेली मरगळ झटकून पुन्हा पुनर्प्राप्ती हस्तक्षेपांना समर्थन देईल. ही योजना आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सुरू होईल.

या योजनेसाठी एकूण खर्च 6,062.45 कोटी रुपये इतका आहे, ज्यापैकी 3,750 कोटी रुपये जागतिक बँकेचे कर्ज असेल आणि उर्वरित 2,312.45 कोटी रुपये भारत सरकारकडून निधी दिला जाईल, असे एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली.

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)