विनोद निकोले : मराठी आमदार जे पत्र्याच्या घरात राहतात..

विनोद निकोले

फोटो स्रोत, BBC/Shardul Kadam

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी

"मला 70 लाख रुपये देणं परवडणारं नाही. मी ज्यासाठी काम करतो आणि ज्या पार्श्वभूमीतून मी आमदार म्हणून निवडून आलोय, मला मिळणारी जी सॅलरी आहे त्यातली 70 ते 75 टक्के रक्कम मी प्रत्येक महिन्याला चळवळीला देतो."

डहाणूचे आमदार विनोद निकोले आमदारांना घरं देण्याच्या सरकारी योजनेविषयी आपलं मत मांडत होते.

महाराष्ट्रातील सर्वपक्षीय आमदारांसाठी मुंबईत 300 घरं बांधणार असल्याचा निर्णय गुरुवारी (24 मार्च) ठाकरे सरकारने जाहीर केला होता.

राज्यातील समस्या सोडवण्याऐवजी, अनेक क्षेत्रातील कामगार, नोकरदार वर्गाच्या मागण्या प्रलंबित असताना आमदारांना घरं देण्यावरून विरोधकांनी टीका केली. सर्वसामान्य जनता, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांनी सोशल मीडियावर या निर्णयाबाबत तीव्र टीका केली.

दुसरीकडे ही घरं आमदारांना मोफत देणार नसल्याचं स्पष्टीकरण तेव्हाचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलं.

व्हीडिओ कॅप्शन, हा मराठी आमदार पत्र्याच्या घरात राहतो

या सगळ्या राजकीय गदारोळात आम्ही आमदार विनोद निकोलेंना भेटलो ज्यांच्याकडे अगदी आमदार होईपर्यंतही स्वतःचं घर नव्हतं आणि आमदार झाल्यावरही ते एका पत्र्याच्या घरात राहतात. या घराच्या बांधकामासाठी ते स्वतः राबलेही आहेत.

2019 साली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून विधानसभेवर निवडून आलेले विनोद निकोले यांच्यासाठी मुंबईत घर असणं खरंतर गरज आहे, पण तरीही सरकारी योजनेतून मिळणारं असलं तरी मुंबईत घरं घेणं मला परवडणारच नाही, असं ते सांगताहेत.

एका आमदाराला मुंबईत घर कसं काय परवडू शकत नाही, असा विचार तुमच्या मनात आला असेल तर आधी विनोद निकोलेंचा प्रवासही जाणून घ्यायला हवा.

पाचशे रुपयांच्या मानधनावर कामाला सुरुवात

संघर्षातून वर आलेला आमदार म्हणून डहाणूमध्ये विनोद निकोले यांची ओळख आहे आणि आजही ते कुदळ फावडं घेऊन बागेत काम करताना दिसतात.

आमदार होण्यापूर्वी विनोद डहाणूत चहा आणि वड्यांचं दुकान चालवायचे. तिथेच त्यांची मार्क्सवादी विचारांशी ओळख झाली आणि ते पक्षाचं काम करू लागले.

विनोद निकोले

फोटो स्रोत, BBC/Shardul Kadam

त्या सगळ्या प्रवासाबद्दल विनोद निकोले सांगतात, "कामाला सुरुवात केल्यानंतर मला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून 500 रुपयांचं मानधन मिळायला लागलं. काम करत असताना सुरुवातीला मी पायीच फिरायचो. डहाणूमध्ये एक व्यापारी होते, ज्यांना आमच्याबद्दल सहानुभूती होती. त्यांनी मला त्यांची जुनी मोटरसायकल दिली."

"मी ती मोटरसायकल दुरुस्त केली आणि जवळपास पंधरा-वीस वर्षं म्हणजे अगदी आमदार होईपर्यंत मी त्या मोटरसायकलवरून फिरायचो. संपूर्ण जिल्ह्यामध्ये मी काम करायचो. जव्हार मोखाडा, भिवंडीपर्यंत मी फिरायचो आणि काम करायचो.

उमेदवारी मिळाली तेव्हा बँक अकाउंटही नव्हतं

त्या काळात विनोद आपल्या एका मित्राकडे, कृष्णा कुवरा यांच्यासोबत राहायचे. आजही ते कुटुंबासोबत तिथेच राहतात.

कृष्णा हे आपला मानलेला भाऊ असून त्यांनीच आपल्याला आधार दिल्याचं विनोद सांगतात.

निकोले यांचं कुटुंब

फोटो स्रोत, BBC/Shardul Kadam

फोटो कॅप्शन, निकोले यांचं कुटुंब

"माझं अगदी जेवणखाणंही इथेच व्हायचं. खूप संघर्षातून काम केलंय."

लग्न केलं, आमदारकीची उमेदवारी मिळाली तेव्हाचे दिवस आठवताना निकोले सांगतात, "2010 मध्ये मी लग्न केलं. उमेदवारी मिळाली, तेव्हा माझं बँक अकांउंटही नव्हतं. कारण दोन-अडीच हजार रुपये मानधन होतं आणि त्या मानधनात जगायचं की ते बँकेत ठेवायचे असा प्रश्न होता. उमेदवारी मिळाल्यावर मी बँकेत खातं काढलं."

घर बांधण्यासाठी पक्षानं दिली काही रक्कम

आमदार होईपर्यंत विनोद निकोलेंचं स्वतःचं घरही नव्हतं.

"आधी अगदी साधं कुडाचं, शेणानं सारवलेलं घर होतं. नंतर मग आम्ही पत्र्याचं छोटंसं घर बनवलं, नाहीतर आमदार होईपर्यंत माझं स्वतःचं घरच नव्हतं.

परिस्थिती अगदी साधी असल्याने पक्षानं पगारातली काही रक्कम घर बांधण्यासाठी दिल्याचं विनोद सांगतात. या घरासाठी खड्डे काढणं, माती भरणं ही कामंही त्यांनी स्वतः केली आहेत. पण मुंबईत घर नसल्यामुळे आणि आमदार निवासाचं काम सुरू असल्यामुळे ते कामासाठी डहाणू ते मुंबई असा प्रवास करतात.

विनोद निकोले

फोटो स्रोत, BBC/Shardul Kadam

अशा लोकांची काही सोय व्हायला हवी, असं विनोद यांचे मित्र कृष्णा कुवरा यांना वाटतं.

कृष्णा म्हणतात, "चार वाजता उठून जायचं, त्यांनी समाजाचे प्रश्न मांडायचे आणि रात्री परत दीड वाजता घरी येऊन पुन्हा पहाटे जायचं. ही वाईट परिस्थिती आहे. समाजाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या व्यक्तिची अशाप्रकारची शोकांतिका दिसून येते."

मुंबईत घरं नसलेल्या आमदारांची अशीच गैरसोय लक्षात घेऊन कदाचित सरकारनं मुंबईत घरं देण्याची योजना मांडली असेल, पण ती आपल्याला परवडणारी नसल्याचं विनोद सांगतात.

"मुंबईत घर द्यायचं ठरवलं तरी सत्तर लाख रुपये मी नाही देऊ शकणार. आमदारकीची आता दोन तीन वर्षं आहेत. पुढचा भाग सोडून देऊया, पण आताही महिन्याचे 50-60 हजार असले तरी वर्षाचे तेवढे नाही होऊ शकणार आणि मी तेवढे नाही देऊ शकणार."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)