You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लैंगिक अत्याचारापासून लहान मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी 'ही' काळजी घ्या
- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी
गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहरात अल्पवयीन मुलामुलींवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. एकीकडे राज्य सरकार शक्ती कायदा आणत असताना दुसरीकडे महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहेत.
बुधवारी (23 मार्च) पुण्यातील शिवाजीनगर भागातील एका शाळेच्या बाथरूममध्ये 11 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. एका 40 वर्षीय महिलेने याबाबत शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार ही घटना बुधवारी (23 मार्च) दुपारी 11 ते 11.30 च्या सुमारास घडली. फिर्यादी महिलेच्या मुलीला एका व्यक्तीने ओळख असल्याचा बहाणा करून तिला ढकलत शाळेच्या बाथरूममध्ये नेले. तिथे त्या व्यक्तीने मुलीचे तोंड दाबून त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर कोणाला काही सांगितलंस तर बघ अशी धमकी सुद्धा दिली.
यापूर्वी 19 मार्चला 11 वर्षाच्या मुलीवर वडील, भावाकडून लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. या घटनेत मामा आणि आजोबांकडून देखील मुलीसोबत लैंगिक गैरवर्तन केले होते.
एका इंग्लिश माध्यमाच्या शाळेत समुपदेशन सुरू असताना 'गुड टच, बॅड टच' बाबत विद्यार्थ्यांना सांगितले जात असताना मुलीने सगळा प्रकार सांगितला. याप्रकरणी 29 वर्षीय समुपदेशक महिलेने बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी पीडित मुलीचे वडील, भाऊ, आजोबा आणि चुलत मामा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
21 मार्चला 14 वर्षीय मुलीवर शेजाऱ्याकडून बलात्कार केल्याची घटना घडली होती. नववीत शिकणाऱ्या मुलीला ऑनलाईन क्लाससाठी मोबाईल दिला होता. शेजारी राहणारी व्यक्तीने तिच्या मोबाईलवर मेसेज केले आणि धमक्या दिल्या. तिला धमकावून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार सप्टेंबर 2021 पासून सुरु होता.
पीडित मुलीच्या घरी कोणी नसल्याचे पाहून शेजारी राहणारा आरोपी तिच्या घरी जबरदस्तीने जायचा. मुलीला वारंवार होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासामुळे तिने घडलेला प्रकार तिच्या आई वडिलांना सांगितला. तिच्या आई वडिलांना या घटनेचा मानसिक धक्का बसला. ते त्यांच्या कामावर जाऊ शकले नाही. त्यामुळे त्यांच्या मालकाने घरी जाऊन चौकशी केल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.
या आणि अशा अनेक घटनांमध्ये नातेवाईकांकडून किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून अत्याचार होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मुलांना अशा घटनांपासून वाचवण्यासाठी त्याचबरोबर अशा घटना घडल्या तर याबाबत त्यांनी कोणाकडे याबाबत सांगायला हवं हे आम्ही काही समुपदेशक आणि या विषयात काम करणाऱ्या लोकांकडून जाणून घेतलं.
1. सेफ टच, अनसेफ टच
पुण्यात प्रयास हेल्थ ग्रुप या संस्थेच्या माध्यमातून लैंगिक शिक्षणावर काम केलं जातं. त्याचबरोबर लैंगिक प्रश्नांसंबंधी संशोधन देखील केलं जातं. या संस्थेतले ज्येष्ठ संशोधक शिरीष दरक म्हणाले, ''मुलांना गुड टच, बॅड टच याबाबत मार्गदर्शन केलं जातं. परंतु याला 'गुड टच, बॅड टच' पेक्षा 'सेफ आणि अनसेफ टच' असं म्हणायला हवं. अनेकदा ओळखीची लोक असल्याने त्यांचा स्पर्श बॅडच असेल हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे त्यांना 'सेफ आणि अनसेफ टच' काय आहे हे समजवायला हवं.''
2. लैंगिकतेबाबतचा खुला संवाद
दरक पुढे म्हणातात, ''लैंगिकतेबाबत पालक आणि मुलांमध्ये बोलणं होत नाही. मुलगी आहे तर असं बसायला नको, असे कपडे घालायला नको असं सांगितलं जातं. त्यामुळे लैंगिकता ही काहीतरी घाण गोष्ट आहे, याच्याबद्दल बोलायला नाही पाहिजे असं वातावरण निर्माण होतं. त्यामुळे त्यातून काही घडलं तर त्या अत्याचाराबाबत आई वडिलांना सांगितलं जाण्याची शक्यता कमी असते. सांगितलं तरी तुझंच काहीतरी चुकलं असेल असं म्हणून मुलीचा आवाज दाबून टाकण्याच्या सुद्धा गोष्टी घडतात.''
3. सुरक्षित वातावरण
''मुलांवर अत्याचार झाला असेल तर कुठल्याच पद्धतीने त्यांची चूक नसते. त्यामुळे प्रौढ लोकांवर जास्त काम करण्याची गरज आहे. मुलांना सेफ राहण्यास सांगण्यापेक्षा त्यांच्यासाठी सेफ परिस्थिती कशी तयार करु शकतो याचा विचार करायला हवा.
लहान मुलांना नाही म्हणायची स्पेस त्यांना द्यायला हवी. त्याचबरोबर वयाबरोबर त्यांना लैंगिकतेबाबतचं मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. पालक आणि मुलांबाबत एक मोकळी जागा असायला हवा. जेणेकरुन त्यांच्यासोबत चुकीची गोष्ट घडली तर त्यांना त्यांच्या पालांना सांगता येईल,'' असं देखील दरक सांगतात.
4. शारीरिक बदलांबाबतची माहिती
पुण्यात विविध शाळांमध्ये लैंगिक आरोग्याबाबत समुपदेशन करणाऱ्या 'पंख' या संस्थेच्या समुपदेशिका स्मिता आपटे म्हणतात, ''वयात येणाऱ्या मुलांना योग्य वयात योग्य शास्त्रीय माहिती द्यायला हवी. शरीरात होणारे बदल, हार्मोनमध्ये होणारे बदल, नैसर्गिक बद्दल याबाबत बोललं पाहिजे. हे बदल होत असताना आकर्षण वाटू शकतं. मुलांना आकर्षणातील धोके सांगितले तर अशा घटना रोखण्यास मदत होते.''
5. प्रेम आणि आकर्षण
''विद्यार्थ्यांना शरीरात होणाऱ्या नैसर्गिक बदलांबद्दल सांगितल्यानंतर प्रेम आणि आकर्षण याबद्दल सांगितलं जातं. काही रोल प्लेच्या माध्यामातून त्यांना आकर्षणाबद्दल सांगितलं जातं. त्यात कुठलीही भावनिक जवळीक नाहीये त्यात शारिरीक आकर्षण आहे हे समजावलं जातं. त्यामुळे त्यांना प्रेम आणि आकर्षण यामधील फरक समजण्यास मदत होते,'' असंही आपटे सांगतात.
6.लैंगिक अत्याचार झाला तर कोणाला सांगायचं ?
लैंगिक अत्याचाराची वाच्यता करण्याबाबत आपटे सांगतात, ''अत्याचाराच्या घटनांमध्ये एखादा स्पर्श केल्यानंतर तुम्हाला तो सुरक्षित वाटतोय याबाबत मुलांना मार्गदर्शन केलं जातं. एखादी व्यक्ती प्रायव्हेट पार्टला स्पर्श करत असेल त्याविषयी बोललं पाहिजे हे सांगितलं जातं. त्यात एका विश्वासाच्या व्यक्तीला त्यांनी सांगायला हवं असं त्यांना सांगितलं जातं. त्याचबरोबर शाळेतील समुपदेशिका, किंवा शिक्षिका यांना देखील मुलं त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत सांगू शकतात.''
शाळांमध्ये सखी सावित्री समिती स्थापन करणार - वर्षा गायकवाड
शाळांमध्ये होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांबाबत बोलताना शाळांमध्ये 'सखी सावित्री समिती' स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी अधिवेशनात केली.
गायकवाड म्हणाल्या, "शाळेच्या आवारात अशा घटना घडू नये म्हणून राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरा बंधनकारक असेल, त्यात हार्डडीस्क असणंही अनिवार्य आहे. सर्व सरकारी शाळांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात येणार.
शाळांमध्ये 'सखी सावित्री समिती' स्थापन करण्यात येईल. या समितीमध्ये महिला शिक्षक, मुख्यध्यापक, डॉक्टर, अंगणवाडीसेविका, विद्यार्थी, विद्यार्थिनी असतील. शाळांमधील वातावरण चांगलं करण्यासाठी ही समिती काम करेल. शाळेत काही आक्षेपार्ह आढळल्यास ही समिती त्याची चौकशी करेल. शिक्षण आयुक्तांकडे त्याची जबाबदारी असेल.''
''शाळांमध्ये पोलीस काका, पोलीस दीदी, समितीच्या सदस्यांची नावं आणि नंबर्स शाळेच्या दर्शनी भागात लावण्यात येईल. शाळेत 'गुड टच, बॅड टच' शिकवण्यात येईल. शाळेत तक्रार पेटी बसवण्यात येईल. शालेय शिक्षण, गृह विभागात समन्वयाने करू'' असं देखील गायकवाड म्हणाल्या.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)