You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईत टीबी रुग्णांची संख्या वाढण्याची ही आहेत कारणं...
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
"माझा चेहरा आधी असा नव्हता... सतत घ्याव्या लागणाऱ्या औषधांच्या रिअॅक्शनमुळे पूर्ण काळा पडलाय... वजन 30 किलोपेक्षाही कमी झालंय."
"एक फुफ्फुस निकामी झालंय... डॉक्टर म्हणतात काढावं लागेल. जराजरी चाललं तरी धाप लागते. श्वास घेण्यासाठी लागणारा पंप माझी लाईफलाईन आहे."
टीबीग्रस्त 31 वर्षांच्या सविता पवार, बीबीसी मराठीशी बोलताना सांगत होत्या.
सविता यांना XDR, ज्याला वैद्यकीय भाषेत Extremely Drug Resistant किंवा कोणत्याच औषधांना दाद न देणारा टीबी आहे.
2021 मध्ये मुंबईत 58 हजार टीबी रुग्णांची नोंद झाली. भारताने 2025 पर्यंत टीबी निर्मूलनाचं ध्येय ठेवलंय. पण, टीबी रुग्णांची संख्या कमी होत नाहीये.
पण, मुंबईत टीबीरुग्णांची संख्या कमी न होण्यामागच्या कारणांचा घेतलेला आढावा.
'औषधं बंद केली, वाटलं मी मरेन तरी...'
मुंबईच्या वरळी परिसरात जेमतेम 10 बाय 10च्या खोलीत सविता पवार राहतात. घरातच छोटं किचन आणि टॉयलेट आहे. हवा खेळती रहाण्यासाठी फक्त दोन खिडक्या आहेत.
"मी खिडक्या उघड्या ठेवते. हवा खेळती रहाते. सूर्यप्रकाश येतो. प्रसन्न वाटतं," त्या म्हणाल्या.
टीबीमुळे एक फुफ्फुस निकामी झाल्याने त्या घराबाहेर जास्त पडत नाहीत. "मी घराचा दरवाजे बंद करून ठेवते."
टीबी रुग्णाच्या खडतर आयुष्याबद्दल त्या सांगतात, "सतत औषधं घेऊन चेहरा काळा पडला. 10 वर्षं इंजेक्शनचा जीवघेणा त्रास सहन केला," फक्त एका जिद्दीने, मला जगायचंय म्हणून.
21 वर्षांच्या असताना सविता यांना टीबी असल्याचं निदान झालं. तेव्हापासून गेली 10 वर्षं त्याचा संघर्ष दिवसरात्र सुरू आहे.
"एकवेळ अशी आली, मला खूप डिप्रेशन आलं. वाटायचं लोक सारखं माझ्यावर हसतायत. सगळीकडे फक्त काळोख दिसायचा. मी विचार केला. आता बस्स, आत्महत्या करायची," हे सांगताना त्यांचा आवाज खोल गेलेला जाणवत होता.
XDR टीबी असल्याने सविता चेहऱ्यावर मास्क कायम ठेवतात. म्हणतात, माझ्यामुळे कोणालाही त्रास नाही झाला पाहिजे.
टीबीबाबतचे गैरसमज आणि नकारात्मक भावना यामुळे समाजाकडून रुग्णांना तुच्छतेची वागणूक दिली जाते. याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. सविता यांच्याबाबतही असंच घडलं.
त्या पुढे म्हणाल्या, "लोक आजूबाजूने जाताना तोंड वाकडं करून जायचे. घरी कोणी येत नसे. लोक म्हणायचे टीबी आहे हिला."
मला वाटायचं माझ्या जगात मी एकटीच आहे. इतर कोणीच नाही. टीबी रुग्णांसाठी घरातून मिळणारा सपोर्ट किंवा धीर हा अत्यंत महत्त्वाचा आहे. पण सविता यांना घरातून मदत मिळाली नाही.
टीबीमुळे नवरा सोडून गेलाय. आता घरी त्या एकट्याच असतात. घरच्यांनी साथ दिली असती तर समाजाने अशी वागणूक दिली नसती, त्या सांगतात.
या मानसिक दडपणामुळे त्यांनी उपचार अर्धवट सोडून दिला "दोन वर्षं मी औषधं घेणं बंद केलं. माझं वजन 23 किलो झालं होतं. वाटलं मी मरेन, पण मेले नाही," त्या सांगतात. औषध बंद केल्यामुळे सविता यांचा आजार जास्त बळावला.
"एकदिवस मी सकाळी खिडकीबाहेर पाहिलं. तो दिवस खूप छान होता. घराबाहेर पडले आणि टीबी रुग्णालय गाठलं. माझ्यासारख्या इतरांना पाहिलं आणि जगण्याची नवी उमेद मिळाली. "
"त्यावेळी डिप्रेशन हळूहूळ कमी होऊ लागलं. मला कळलं आपण माणसांमध्ये उठलं-बसलं पाहिजे. एकटं राहू नये. घरचं वातावरण चांगलं पाहिजे. प्रेम करणारी समजून घेणारी माणसं हवीत," त्या पुढे सांगतात.
टीबी रुग्णांचं आयुष्य खूप हाल-अपेष्टांचं आहे. नोकरी नाही, घरच्यांचा पाठिंबा नाही. त्यामुळे आर्थिक समस्यांनाही सातत्याने तोंड द्यावं लागतं.
"एकटं रहायला आवडत नाही. पण कधी वाटतं, माझं हे आयुष्य ,चांगलं आहे. खूप काही शिकायला मिळालंय." मला टीबीवर विजय मिळवायचा आहे हे एकच धेय्य सद्यस्थितीत माझ्यासमोर आहे.
सविता यांचं एक फुफ्फुस निकामी झाल्यामुळे काढून टाकावं लागणार आहे. पण, रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच ही शस्त्रक्रिया शक्य होईल.
भारतात टीबी रुग्णांची संख्या किती?
टीबीचं देशातून समूळ उच्चाटन करण्यासाठी 2025 चं लक्ष्य ठेवण्यात आलंय. केंद्र आणि राज्य स्तरावर अनेक उपाययोजना केल्या जातायत. पण, टीबी रुग्णांची संख्या कमी होत नाहीये.
केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, भारतात नोव्हेंबर 2021 पर्यंत 19 लाखापेक्षा जास्त टीबी रुग्णांची नोंद करण्यात आली.
ऑगस्ट 2021 मध्ये केंद्र सरकारने टीबीबाबत काय काम केलं याची माहिती देताना केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया म्हणाले होते, "भारतातील टीबी रुग्णांमध्ये 65 टक्के रुग्ण 15 ते 45 या वयोगटातील आहेत."
58 टक्के टीबीची प्रकरणं ग्रामीण भारतातून नोंदवण्यात आली होती.
केंद्र सरकारने 2020-21 मध्ये टीबी मोहिमेसाठी 3110 कोटी रूपये मंजूर केलेत. डिसेंबर 2021 अखेरपर्यंत 2062 कोटी रूपये खर्च करण्यात आलेत.
तर 2019-20 या आर्थिक वर्षात राष्ट्रीय आरोग्य योजनेअंतर्गत उत्तर प्रेदशला बजेटच्या 43 टक्के तर महाराष्ट्राला 22 टक्के निधी मंजूर करण्यात आलाय.
गणेश आचार्य टीबी सर्व्हायवर आहेत. त्यांनी दोन वेळा टीबीवर मात केलीये.
बीबीसीशी बोलताना ते म्हणतात, "देशात टीबी रुग्णांची संख्या कमी होण्याचा दर फक्त 1.2 टक्के आहे. हा दर 5 ते 10 टक्क्यांपर्यंत गेला पाहिजे. यासाठी टीबी निर्मूलन मोहिमेत केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणत आर्थिक तरतूद केली पाहिजे."
"2025 पर्यंत टीबी निर्मुलनाची प्रमुख तीन उद्दिष्ट्य आहेत. टीबी केसेस 90 टक्के कमी होतील यासाठी प्रयत्न करणं, 95 टक्के रूग्णांना उपचार मिळणं. टीबी उपचारांवर रुग्णाचा होणारा खर्च कमी करणं. 2025 पर्यंत केसेस शून्य होतील असं नाही. पण आपल्याला सतत प्रयत्न करावे लागतील, असं टीबी निर्मुलन मोहीमेचे माजी डीडीजी डॉ. सुनील खरपडे बीबीसीशी बोलताना म्हणाले.
"कोरोना काळात टीबीची शोधमोहीम, टीबी रुग्णांचं नोटीफिकेशन कमी झालं होतं. त्यामुळे केसे कमी दिसल्या. पण आता पुन्हा नोटीफिकेशन वाढल्याने केसेस जास्त दिसत आहेत," असंसुद्धा त्यांनी सांगितलं आहे.
मुंबई टीबी रुग्णांची संख्या किती?
मुंबईला भारताची टीबीची राजधानी म्हणून ओळखलं जातं. 2021 मध्ये शहरात 58 हजारपेक्षा जास्त टीबीरुग्णांची नोंद झालीये. 2019 मध्ये सर्वांत जास्त 60,597 टीबी रुग्ण नोंदवण्यात आले होते
कोरोनासंसर्गाच्या काळात टेस्टिंग कमी झाल्याने 2020 मध्ये ही संख्या 43 हजारावर खाली आली होती
कोरोनाकाळात टीबी रुग्णांची संख्या कमी का झाली. याबाबत मुंबई महापालिकेच्या टीबी विभाग प्रमुख डॉ. प्रणिता टिपरे सांगतात, "कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे मुंबई बाहेरून येणाऱ्यांची संख्या कमी होती. ही संख्या साधारणत: 10 टक्के असते."
पूर्व मुंबईतील शिवाजीनगर, गोवंडी, मानखुर्द तर उत्तर मुंबईतील मालाड, मालवणी, धारावी, चेंबूर याभागात सर्वांत जास्त अॅक्टिव्ह टीबी रुग्ण आहेत.
मुंबईत टीबी नियंत्रणात न येण्याचं कारण काय?
टीबी झोपडपट्टी आणि बैठ्या चाळींपुरता मर्यादित नाहीये. उच्चभ्रू वस्तीतही टीबीचे रुग्ण आढळून आलेत. पण प्रामुख्याने टीबीचे रुग्ण दाटीवाटीच्या वस्त्यात जास्त आढळून येतात.
मुंबईत टीबी नियंत्रणात न येण्याचं प्रमुख कारण जाणून घेण्यासाठी आम्ही पूर्व मुंबईच्या शिवाजीनगर, गोवंडी परिसरात जायचं ठरवलं.
शिवाजीनगरमधील बैंगनवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रावर औषंध घेण्यासाठी टीबी रुग्ण येण्यास सुरूवात झाली होती. या रुग्णांकडे पाहताना एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली. रुग्णांमध्ये महिलांचं प्रमाण जास्त होतं.
आरोग्य केंद्रातील टीबी विभागात पर्यवेक्षक असलेले इर्शाद अन्सारी सांगतात, "हे खरं आहे टीबी रुग्णांमध्ये महिलांचं प्रमाण अधिक आहे."
पूर्व मुंबईतील एम-पूर्व (M-East) वॉर्ड टीबीचा 'हॉटस्पॉट' समजला जातो. या परिसरात सध्या टीबीचे 3 हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
टीबी विभागात काम करणारे डॉ. नरेंद्र सुतार महिलांमध्ये टीबी जास्त असण्याची दोन कारणं सांगतात-
- घरातील आजारी रुग्णांची महिला काळजी घेतात. त्यामुळे रुग्णांशी येणारा थेट संपर्क.
- महिला घरातून जास्त बाहेर पडत नाहीत. त्यामुळे घरी टीबीचा रुग्ण असेल तर महिला जास्त एक्सपोज होतात.
"नव्याने टीबीची लागण होणाऱ्या मुलींची संख्या वाढलीये. या मुली 11 ते 20 वयोगटातील आहेत," फुफ्फुसविकारतज्ज्ञ आणि महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात टीबी नियंत्रण कार्यक्रमाचे सदस्य डॉ. विकास ओस्वाल म्हणतात.
या परिसरात चालताना दोन्ही बाजूला दुमजली घरं दिसून आली. अत्यंत अरूंद गल्लीबोळात एकमेकाला खेटून दाटीवाटीने ही वस्ती वसलेली आहे.
रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांना एखाद-दोन खिडक्या आहेत. पण जमतेम एकावेळी एकच व्यक्ती शिरू शकेल अशा गल्लीबोळातील घरात उजेड पोहोचत नाही. हवा खेळती रहाण्यासाठी जागाच नसल्याचं दिसून आलं.
लोकांचं रहाणीमान आणि भौगोलिक परिस्थितीमुळे टीबी रुग्णांची संख्या कमी होत नाहीये का? मुंबईत रुग्णसंख्या वाढण्याचं कारण काय?
डॉ. प्रणिता टिपरे याची कारणं सांगतात,
- लोकांचं रहाणीमान आणि घरांमध्ये हवा अजिबात खेळती न रहाणं.
- आजाराचं निदान योग्यवेळी झालं नाही तर उपचार वेळेवर होत नाहीत. परिणामी रुग्ण आजार पसरवत रहातो.
- काही रुग्ण शहर सोडून गावी जातात.
- काही रुग्ण मास्क घालत नाहीत.
अत्यंत दाटीवाटीच्या या वस्त्यांमध्ये एकाच घरात 10 ते 12 लोक रहातात. या परिसरात स्वच्छतेचा प्रश्न मोठा आहे.
MDR टीबीचा वाढता धोका?
मुंबईतील एकूण टीबी रुग्णांपैकी 10 टक्के रुग्ण Multi Drug Resistant (MDR) म्हणजे औषधांना दाद न देणाऱ्या टीबीचे आहेत. काही प्रकरणात रुग्णांना थेट MDR टीबीचा संसर्ग झाल्याचं समोर आलंय.
MDR टीबी होण्याची तीन प्रमुख कारणं,
- टीबीचे उपचार अर्धवट सोडून देणं
- वेळेवर योग्य औषधं न मिळणं
- आर्थिक स्थितीमुळे परणारा बोजा
डॉ. ओस्वाल पुढे सांगतात, "ज्यांना पहिल्यांदा कधीच टीबीची लागण झाली नव्हती अशांना थेट औषधांना दाद न देणारा टीबी होतोय. ही मोठी चिंतेची गोष्ट आहे."
टीबीचे रुग्ण शोधण्यासाठी डोअर-टू-डोअर शोध मोहिम आणि रुग्णांनी उपचार अर्धवट सोडू नयेत यासाठी फॉलोअप सर्वांत महत्त्वाचा आहे. आम्ही बोलत असताच आरोग्य केंद्रातील कर्मचारी टीबी रुग्णांच्या घरी होम व्हिझिटसाठी निघाले होते.
"होम व्हिझिट महत्त्वाची आहे. घरात इतर कोणाला त्रास तर होत नाहीये. रुग्ण वेळेवर औषध घेतायत का याची माहिती मिळते. रुग्णांशी कनेक्ट रहातो," आरोग्य कर्मचारी सांगतात. रुग्ण औषध घेत नसेल तर त्यांचं समुपदेशन केलं जातं.
टीबीकडे अजूनही एक स्टिग्मा म्हणून पाहिलं जातं. लोक उपचारासाठी पुढे येत नाहीत त्यामुळे संसर्ग पसरत असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
केंद्र सरकारनेही ग्रामीण भागात टीबीचं प्रमाण जास्त असल्याचं मान्य केलंय.
टीबी रुग्णांसाठी काम करणारे गणेश आचार्य पुढे सांगतात, "ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना टीबीचं निदान आणि उपचारासाठी ट्रेनिंग नाही. यामुळे रुग्णसंख्या वाढते."
टीबी सेंटर्सना डॉट सेंटर असंही म्हणतात. यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी बोलताना, अपुरं मनुष्यबळाचा मुद्दा पुढे आला. नाव न घेण्याच्या अटीवर कर्मचारी सांगतात, "डोअर-टू-डोअर, पेशंटचा फॉलोअप यासाठी मनुष्यबळ अपुरं आहे. सरकार, पालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला हवं."
टीबीचा स्टिग्मा रुग्णसंख्या वाढण्यास कारणीभूत?
टीबीबाबत मोठ्याप्रमाणात जनजागृती केली जातेय. पण अजूनही आपल्या समाजासाठी टीबी स्टिग्मा आहे. अनेक गैरसमज आणि चुकीची माहिती पसरवण्यात येत आहे.
गणेश आचार्य म्हणतात, "टीबीबद्दलची जनजागृती विविध सेक्टरमध्ये होणं गरजेचं आहे. फक्त आरोग्य केंद्रात जनजागृती होऊन टीबी कमी होणार नाही. समाजात टीबीबद्दल जनजागृती अजूनही खूप कमी आहे."
दीर्घकाळ खोकला असेल तर लोक घराच्या बाजूच्या डॉक्टरकडे जातात. एका डॉक्टरकडून दुसरीकडे फिरतात. यात खूप वेळ वाया जातो आणि आजार बळावतो, आचार्य सांगतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)