कोव्हिड-19 : 'डेल्टाक्रॉन' व्हेरियंट काय आहे? याचा भारताला धोका किती?

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

कोरोनासंसर्गाचं महामारीचं संकट ओसरून जग पूर्वपदावर येत असतानाच नवीन व्हेरियंट 'डेल्टाक्रॉन' काही देशात आढळून आलाय. चीनमध्येही जिलीन आणि शेंझेन प्रांतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन लावण्यात आलाय.

'डेल्टाक्रॉन' सध्या काळजीचं कारण वाटत नसला तरी, तो डेल्टा आणि ओमिक्रॉनचं कॉम्बिनेशन आहे. डेल्टामुळे व्हेरियंट जीवघेणा तर, ओमिक्रॉनमुळे तो तीव्र वेगाने पसरणारा आणि संसर्ग करणारा ठरत आहे.

चीनमध्ये लॉकडाऊन

चीनमध्ये कोरोनारुग्णांची संख्या वाढल्यामुळे काही शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलाय. जिलीन आणि शेंझेन प्रांतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन लावण्यात आलाय. टोयोटा, फॉक्सवॅगन आणि अॅपलला पुरवठा करणाऱ्या फॉक्सकॉनसारख्या कंपन्यांना या लॉकडाऊनचा फटका बसलाय. मंगळवारी (15 मार्च) चीनमध्ये 5000 हजारांपेक्षा जास्त केसेस नोंदवल्या गेल्या. यामधल्या बहुतेक केसेस जिलिन प्रांतात होत्या.

चीनच्या ईशान्येला असणाऱ्या या प्रांतात लॉकडाऊन लावण्यात आलाय आणि इथले 2.4 कोटी नागरिक सध्या क्वारंटाईन आहेत. कोरोनाच्या साथीच्या सुरुवातीच्या काळात चीनने वुहान आणि हुबेई प्रांतात लावलेल्या लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच अशाप्रकारे एखाद्या संपूर्ण प्रांतावर लॉकडाऊन लावण्यात आलाय.

जिलिन प्रांतातल्या रहिवाशांना घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. आणि त्यांना प्रांताबाहेर जायचं असेल तर त्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल. यासोबतच शेंजेंन प्रांतातही 5 दिवसांसाठी लॉकडाऊन लावण्यात आला होता.

एकीकडे कोरोनाचं नवीन म्युटेशन आणि दुसरीकडे चीनमधील वाढती रुग्णसंख्या याचा भारताला काही धोका आहे का? Deltacron' व्हेरियंट काय आहे? याबाबत आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

डेल्टाक्रॉन काय आहे?

कोरोनाव्हायरसचा नवीन व्हेरियंट 'डेल्टाक्रॉन' हा डेल्टा (AY.4) आणि ओमिक्रॉन (BA.1) या व्हेरियंटचं कॉम्बिनेशन आहे.

युरोपातील फ्रान्स, नेदरलॅंड्स, यूके आणि डेन्मार्क या देशांमध्ये 'डेल्टाक्रॉन' व्हेरियंटने बाधित रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारी महिन्याच्या सुरूवातीला हा व्हेरियंट पहिल्यांदा आढळून आला होता.

जागतिक आरोग्य संघटनादेखील 'डेल्टाक्रॉन' व्हेरियंटवर लक्ष ठेऊन आहे. या नवीन व्हेरियंटबद्दल पत्रकार परिषदेत माहिती देताना जागतिक आरोग्य संघटनेच्या टेक्निकल हेड डॉ. मारिया वॅन-कारकोव्ह म्हणाल्या, "डेल्टाक्रॉन, डेल्टा आणि ओमिक्रॉनचं कॉम्बिनेशन आहे. काही देशात हा नवीन व्हेरियंट आढळून आला असला तरी, याचे रुग्ण अत्यंत कमी आहेत."

भारतात कोरोनासंसर्गाची दुसरी लाट फेब्रुवारी 2021 मध्ये डेल्टा व्हेरियंटमुळे पसरली होती. देशात हाहा:कार माजला होता. डेल्टा व्हेरियंट अत्यंत तीव्र गतीने पसरला. यामुळे होणारा आजारही खूप गंभीर स्वरूपाचा होता. डेल्टाच्या लाटेत हजारो लोकांचे बळी गेले.

तर, गेल्यावर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस मुंबई आणि दिल्लीसारख्या महानगरांमध्ये ओमिक्रॉनची लाट आली. कोरोनासंसर्गाच्या तिसऱ्या लाटेत पहाता-पहाता मुंबईत रूग्णांची संख्या 20 हजारपार पोहोचली. पण, ओमिक्रॉन, डेल्टासारखा घातक नव्हता. अत्यंत संसर्गजन्य आणि तीव्र गतीने पसरणारा असला. तरी यामुळे होणाऱ्या आजाराची तीव्रता कमी होती. ओमिक्रॉनची लाट ज्या झपाट्याने पसरली त्याच वेगाने परिस्थिती नियंत्रणात आली.

डेल्टाक्रॉन व्हेरियंट यूकेमध्येही आढळून आलाय. बीबीसी न्यूजच्या ब्रेकफास्ट कार्यक्रमात यूकेचे आरोग्य मंत्री साजिद जावेद म्हणाले, "यूकेमध्ये हातांच्या बोटावर मोजण्या इतके रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे याकडे धोका म्हणून पाहण्याची गरज नाही." आम्ही यावर दररोज अभ्यास करतोय. पण, उपलब्ध डेटानुसार सद्यस्थितीत काळजी करण्याचं कारण नाही.

डेल्टाक्रॉनबाबत जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं काय?

कोरोना व्हायरसचं नवीन म्युटेशन झपाट्याने पसरत असेल तर जागतिक आरोग्य संघटनेकडून त्याला व्हेरियंट ऑफ कर्न्सर्न किंवा व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट असं जाहीर केलं जातं.

पण सद्यस्थितीत डेल्टाक्रॉनबाबत जागतिक आरोग्य संघटनेने काही गंभीर इशारा दिलेला नाही.

डॉ. मारिया वॅन-कारकोव्ह पुढे सांगतात, "डेल्टाक्रॉनमुळे आजार तीव्रतेने पसरतोय किंवा आजार गंभीर होतोय असं काहीच आढळून आलेलं नाही. यावर अनेक देशांमध्ये संशोधन सुरू आहे."

डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरियंट जगभरात झपाट्याने पसरल्यामुळे यात नवीन म्युटेशन होईल याची अपेक्षा होती.

"व्हायरसमध्ये आपलं रूप सारखं बदलत असतो. त्यामुळे यात नव-नवीन म्युटेशन होत राहणार," डॉ मारिया पुढे सांगतात. त्यामुळे आपल्याला व्हायरस पसरणार नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे.

भारताला या व्हेरियंटचा धोका आहे का?

जागतिक आरोग्य संघटनेच्या लिस्टमध्ये डेल्टा आणि ओमिक्रॉन अजूनही 'व्हेरियंट ऑफ कन्सर्न' आहेत. अशा परिस्थितीत या दोन्हीच्या कॉन्बिनेशनमुळे भारताला काही धोका आहे?

डेल्टाक्रॉनबद्दल बोलताना मुंबईच्या व्होकार्ट रुग्णालयाच्या इंटर्नल मेडिसनतज्ज्ञ डॉ. हनी सावला सांगतात, "डेल्टाक्रॉन हा डेल्टा आणि ओमिक्रॉनचं कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे यात ओमिक्रॉनची झपाट्याने पसरण्याची क्षमता आणि डेल्टा गंभीर आजार करण्याची तीव्रता असू शकते."

पण, येणाऱ्या काळात काय होईल याकडे आपल्याला काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागेल.

एकीकडे डेल्टाक्रॉनचा धोका तर, दुसरीकडे चीनच्या काही शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलाय. चीनमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंट मोठ्या प्रमाणात पसरला आहे. कोव्हिड-19 अत्यंत संसर्गजन्य असल्याने एकाद्या देशात या विषाणूचा नवीन म्युटंट निर्माण झाला की लगेचच काही दिवसात जगभरात हा व्हेरियंट पसरतोय.

डॉ. सावला पुढे म्हणतात, "चीनमध्ये रुग्णसंख्या वाढतेय. लोक आता एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करू लागलेत. त्यामुळे, आपल्या देशातही या व्हेरियंटचे काही रुग्ण कॅरिअर असतील किंवा काहींना लक्षणं असण्याची शक्यता जास्त आहे."

विषाणूवर नियंत्रणाचा एकमेव उपाय म्हणजे, ज्या देशात रुग्ण वाढू लागलेत. त्या देशातून प्रवासावर निर्बध आणि परदेशातून प्रवास करून आलेल्यांची नवीन म्युटेशनसाठी तपासणी करणं.

डेल्टाक्रॉनबाबत महाराष्ट्र सरकारही लक्ष ठेऊन आहे. महाराष्ट्राच्या संसर्गजन्य आजार विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे सांगतात, "भारतात सद्यस्थितीत डेल्टाक्रॉन व्हेरियंट आढळून आलेला नाही. जगभरातील परिस्थितीवर लक्ष ठेऊन सावधपणे आपणही स्क्रिनिंग करतोय."

भारतात कोरोना व्हायरसमध्ये झालेलं म्युटेशन शोधण्याचं काम केंद्र सरकारनं स्थापन केलेला 'इन्सागॉर्ग' हा ग्रुप करतोय. देशात आढळून आलेल्या नवीन व्हेरियंटची माहिती सर्व राज्यांना दिली जाते.

तज्ज्ञांच्या मते कोरोनासंसर्गाची महामारी आता संपूष्ठात येणाऱ्या मार्गावर असून कोव्हिड आता एंडेमिक स्वरूपात कायम आपल्यासोबत रहाणार आहे. त्यामुळे याला घाबरण्याची काही गरज नाही. पण काळजी घेतली पाहिजे.

डॉ. अविनाश भोंडवे म्हणतात, "कोरोना आता एंडेमिक स्वरूपात राहणार आहे. त्यामुळे फ्रान्समध्ये आढळलेले डेल्टाक्रॉन किंवा चीनमध्ये आढळून आलेले ओमिक्रॉन हा त्या विशिष्ठ परिसरातच राहिल जगभर पसरणार नाही."

कोरोनाचे नवनवीन व्हेरियंट येत रहातील. त्यामुळे काळजी करण्याचं काहीही कारण नाही. लसीकरण, मास्कचा वापर ही योग्य काळजी आपण घेतली पाहिजे.

चीनमध्ये काय परिस्थिती आहे?

चीनमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंट झपाट्याने पसरतोय. गेल्याकाही दिवसांपासून कोरोनारुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होतोना दिसून येतेय. त्यामुळे काही शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलाय. जिनिन आणि शेनझेन प्रांतातील लोकांवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

ग्लोबल टाईम्सच्या माहितीनुसार, चीनमध्ये कोरोनाविरोधी लशीचे 3.2 अब्ज डोस लोकांना देण्यात आले आहेत.

चीनमध्ये मंगळवारी 5000 कोरोनारुग्ण आढळून आले. यातील बहुसंख्य रुग्ण जिनिन प्रांतातील आहेत. या भागातील सर्व नागरिकांना घरी रहाण्याचे आदेश देण्यात आले असून, कोरोनासंसर्गाची सुरूवात झाल्यापासून पहिल्यांदाच चीनकडून असे निर्बंध घालण्यात आलेत. काही दिवसांपूर्वीच शेनझेन परिसरातही रेल्वे आणि बससे बंद करण्यात आल्या होत्या.

चीन सरकारने घातलेल्या निर्बंधामुळे टोयोटा आणि अॅपलाल कच्चामाल पुरवणाऱ्या कंपन्या आणि फोक्सव्हॅगनसारख्या कंपन्यांवर मोठा परिणाम झालाय. एका अंदाजानुसार चीनमध्ये 3 कोटी लोक लॉकडाऊनमध्ये आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)