स्वामी शिवानंद: नरेंद्र मोदींच्या पाया पडणारे हे आजोबा कोण आहेत?

पद्म पुरस्कार स्वीकारताना योग गुरू स्वामी शिवानंद पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडले.

पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुढे येताना त्यांनी नरेंद्र मोदींना गुडघ्यावर बसून नमस्कार केला. पंतप्रधान मोदींनी देखील त्यांना वाकून नमस्कार केल्याचं पहायला मिळालं.

स्वामी शिवानंद यांना 'योग' विषयक कामासाठी पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलंय. पण, ते चर्चेत आलेत त्यांच्या नम्र वर्तनामुळे.

राष्ट्रपती भवनाच्या माहितीनुसार, 'स्वामी शिवानंद यांचा जन्म 1896 मध्ये झाला. म्हणजे सद्यस्थितीत ते 125 वर्षांचे आहेत. या दाव्यावरून सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा रंगलीये.'

पण, स्वामी शिवानंद आहेत तरी कोण? हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

पद्म पुरस्कार सोहळ्यात काय घडलं?

सोमवारी राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

स्वामी शिवानंद यांना 'योग' विषयाची जनजागृती आणि प्रसार कार्यात भरीव योगदानाबाबत पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार होता.

पुरस्कार देण्यासाठी स्वामी शिवानंद यांचं नाव पुकारण्यात आलं. पांढरा सदरा आणि धोतर नेसलेले हे स्वामी शिवानंद पुढे आले आणि ते समोर बसलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडले. स्वामी शिवानंद यांनी गुडघ्यावर बसून नरेंद्र मोदींना नमस्कार केला.

स्वामी शिवानंद यांना पाया पडताना पाहाताच पंतप्रधान मोदींनी वाकून त्यांनी नमस्कार केला. त्यानंतर स्वामी शिवानंद यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासमोर जाऊनही गुडघ्यावर बसून पुन्हा नमस्कार केला.

योग गुरू स्वामी शिवानंद यांचं हे नम्र वर्तन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय.

कोण आहेत स्वामी शिवानंद?

स्वामी शिवानंद उत्तरप्रदेशातील काशी म्हणजेच वाराणसीत असतात.

कित्येक वर्ष 'योग' या विषयावर जनजागृती, समाजप्रबोधन केल्यामुळे योगगुरू म्हणून त्यांची ख्याती आहे.

स्वामी शिवानंद यांचा जन्म 1896 साली झाल्याचं राष्ट्रपती भवनाने म्हटलंय. याचा अर्थ त्यांचं वय सद्यस्थितीत 125 वर्षं आहे.

कोलकात्याचे डॉ. सुभाषचंद्र गराई स्वामी शिवानंद यांना 1993 पासून ओळखतात. दिल्लीत राष्ट्रपती भवनातील पद्म पुरस्कार कार्यक्रमातही डॉ. गराई उपस्थित होते.

बीबीसी मराठीशी फोनवरून बोलताना ते म्हणतात, "बाबांची कोणतीही योग इन्स्टिट्यूट नाही. ते स्वत: निरोगी रहाण्यासाठी योग करतात. योग त्यांच्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग आहे," बाबांचं जीवन कडक शिस्तीचं, नियंत्रणात आहे. त्यांची एकच शिकवण आहे, माझी जीवनशैली पटत असेल किंवा आवडत असेल ती फॉलो करण्याचा प्रयत्न करा.

स्वामी शिवानंद दररोज सकाळी 3 वाजता उठतात. एक ते दोन तास चालतात. डॉ. गराई सांगतात, "आम्ही हॉटेलमध्ये आहोत. स्वामीजींनी सकाळी तीन वाजताच हॉटेलच्या लॉबीमध्ये चालण्यास सुरूवात केली." त्यानंतर देवाची पूजा, मंत्रोच्चार अशी त्यांची दिनचर्या असते. स्वामीजी आता अर्धातास योग करतात.

हिंदुस्तान टाईम्सच्या बातमीत स्वामी शिवानंद यांनी त्यांच्या जीवनशैलीबाबत माहिती दिली होती. "मी फार साधेपणाने जीवन जगतो. फार साधं खातो. तेल, मसाले नसलेल्या उकडलेल्या भाज्या, भात आणि वरण खातो. "मी शक्यतो दूध आणि फळं खात-पित नाही. मला वाटतं हे फॅन्सी खाद्यपदार्थ आहेत." मी लहान असताना कित्येक दिवस पोटात काही नसताना झोपलोय.

स्वामी शिवानंद गेल्या 50 वर्षांपासून ओडिशातील पूरी शहरात कुष्ठरोग पिडीतांसाठी काम करत आहेत. दररोज जवळपास 400 ते 600 कुष्ठरोग्यांची ते सेवा करतात. लोकांच्या सेवेसाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलंय, अशी माहिती राष्ट्रपती भवनाने दिलीये.

उपेक्षितांची सेवा त्यांच्या जीवनाचं धेय्य आहे. ईशान्य भारत, वाराणसी, ओडिशातील पूरी आणि हरिद्वार याठिकाणी स्वामींचं कार्य अविरत सुरू आहे.

डॉ. गराई यांना 1993 मध्ये त्यांच्या ओळखीच्यांकडून कोलकात्यात एक गुरू आल्याचं समजलं होतं. ते स्वामी शिवानंद यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीचा अनुभव सांगतात, "एका लहान जागेमध्ये 20-30 लोक असतील. स्वामी आले आणि माझ्या पाया पडले." मला थोडचं शरमल्यासारखं वाटलं. ते बंगालीत म्हणाले, "नारायण प्रत्येकात आहे. मी त्या नारायणाला नमस्कार केला," राष्ट्रपती भवनाच्या कार्यक्रमातही त्यांनी असंच केलं.

स्वामी शिवानंद उपेक्षितांच्या मागणीप्रमाणे खाद्यपदार्थ, फळं, कपडे, थंडीत ब्लॅंकेट, भांडी गोळा करून लोकांना देतात असं त्यांना ओळखणारे सांगतात.

त्यांच्या आई-वडीलांचं ते सहा वर्षांचे असतानाच निधन झालं. नातेवाईकांनी त्यांना एका धर्मगुरूकडे नेलं अशी माहिती आहे.

स्वामी शिवानंद खरंच 125 वर्षांचे आहेत?

प्रेस इन्फोर्मेशन ब्यूरो (PIB) ने आपल्या ट्विटमध्ये स्वामी शिवानंद 125 वर्षांचे असल्याची माहिती दिलीये. तर, राष्ट्रपती भवनाने ट्विटरवर स्वामी शिवानंद यांचा जन्म 1896 सालचा असल्याचं सांगितलंय.

तेव्हापासूनच स्वामी शिवानंद खरंच 125 वर्षांचे आहेत का? यावर सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा रंगली आहे.

स्वामी शिवानंद यांच्याबाबत माहिती शोधताना आम्हाला 2016 मध्ये हिंदुस्तान टाईम्स या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेली त्यांची एक बातमी मिळाली. या बातमीत स्वामी शिवानंद हातात पासपोर्ट घेऊन उभे असल्याचा फोटोही आहे.

या फोटोवर नजर टाकली तर जन्मतारीख 8 ऑगस्ट1896 आणि जन्मगाव कोलकाता शहराजवळचं बेहला असं लिहिण्यात आलंय. स्वामी शिवानंद यांना 2010 मध्ये पासपोर्ट मिळाला होता आणि 2020 मध्ये त्याची मुदत संपत असल्याचं या फोटोवरून दिसून येतंय.

या बातमीत असं सांगण्यात आलंय की, पासपोर्ट अधिकाऱ्यांनी स्वामी शिवानंद याचं वय देवळातील रजिस्टरमधून तपासून घेण्यात आल्याची माहिती दिलीये.

वाराणसीचे स्थानिक पत्रकार शैलेश चौरसिया सांगतात, स्वामी शिवानंद 1979 पासून काशीमध्ये रहातात. त्यांच्याबाबत मिळालेल्या पुराव्यांनुसार त्यांचा जन्म बांग्लादेशातील हरिपूर गावात 1896 मध्ये झालाय.

आधार कार्ड आणि वोटिंग कार्डवर हीच माहिती आहे.

सूर्योदयापूर्वी उठून ते योग आणि प्राणायाम करतात. गोड अजिबात खात नाहीत.

ते पुढे सांगतात, वाराणसीच्या दुर्गाकुंड भागातील स्थित कबीर मानस नगरमध्ये बाबांचा आश्रम आहे. या आश्रमातून जेवण केल्याशिवाय कोणालाच परत पाठवलं जात नाही.

दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी स्वामींना भेटण्यासाठी येत असत, असं चौरसिया सांगतात.

स्वामी शिवानंद पहिल्यांदा केव्हा चर्चेत आले?

स्वामी शिवानंद यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आम्ही वाराणसीच्या स्थानिक पत्रकारांशी चर्चा केली.

पद्मश्री मिळण्याआधी स्वामी पहिल्यांदा 2014 मध्ये चर्चेत आले होते, स्थानिक पत्रकार सांगतात. 2014 मध्ये नरेंद्र मोदींनी वाराणसीतून निवडणूक लढवली होती. त्यावेळी 100 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीने पहिल्यांदा मतदान केलं म्हणून स्वामी मीडियामध्ये चर्चेचा विषय बनले होते.

त्यानंतर 2016 मध्ये स्वामी पुन्हा स्वामी शिवानंद मीडियामध्ये चर्चेत आले. हिंदूस्तान टाईम्स वृत्तपत्राने त्यांच्याबद्दल प्रसिद्ध केलेल्या बातमीत स्वामी शिवानंद सर्वात जास्त वयाचा जिवंत व्यक्ती म्हणून गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डकडे वयाचा दावा खरा आहे यासाठी अर्ज करणार होते. नाव न घेण्याच्या अटीवर स्थानिक पत्रकार सांगतात, "2016 नंतर स्वामी शिवानंद यांच्या गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डच्या अर्जाबाबत पुढे काय झालं याची माहिती नाही," मीडियानेही या मुद्यावर पुढे फार तपास केला नाही.

"मला पब्लिसिटी नकोय म्हणूनच मी कधीच रेकॉर्ड दाखवण्यासाठी पुढे आलो नाही," स्वामी शिवानंद म्हणाल्याचं हिंदुस्तान टाईम्सच्या बातमीत छापण्यात आलंय.

स्वामी शिवानंद यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं 2021 मध्ये कोरोनाविरोधी लसीकरण सुरू असताना. 100 वर्षावरील व्यक्तीने लस घेतल्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा सुरू होती..

स्थानिक पत्रकार उत्पल पाठक यांनी स्वामी शिवानंद यांचं लसीकरण होताना बातमी प्रसिद्ध केली होती. ते सांगतात, "त्याकाळात वृद्ध व्यक्ती लसीकरणासाठी पुढे येत नव्हत्या. स्वामी शिवानंद यांनी लस घेतल्यानंतर त्यांना काहीच त्रास झाला नाही." जिल्हा प्रशासनाने याला खूप प्रसिद्धी दिली होती. त्यामुळे वृद्धांच्या लसीकरणाचा टक्का वाढला होता.

स्थानिक पत्रकार पुढे सांगतात, स्वामी योग शिकवतात पण त्यांचा कोणीच शिष्य नाही.

सोशल मीडियावर काय चर्चा आहे?

स्वामी शिवानंद यांच्या नम्र वर्तनाबाबत सोशल मीडियावर खूप चर्चा होतेय. त्यांचा पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना नमस्कार करतानाचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झालाय.

ट्विटरवर त्यांचा एक व्हीडिओ व्हायरल होतोय. वाराणसीत गंगेच्या काठावर शूट करण्यात आलेल्या व्हीडिओ स्वामींना त्यांच्या दिनचर्येबाबत विचारण्यात आलंय. ते म्हणतात, "माझं वय आहे 123." यात स्वामी शिवानंद व्यायाम आणि योगासन करताना दिसत आहेत. स्वामींना प्रश्न विचारण्यात आला कोणी 123 वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतं का? ते इंग्रजीत उत्तर देतात, NO, Never. हे कलियुग आहे. सर्व लालची आहेत ते म्हणतात.

चांगला विचार, कर्म आणि इच्छाशक्ती असेल तर तुम्हाला तुमच्यातील देव सापडेल या व्हीडिओत ते सांगतात. शरीर आणि मनाचा एकमेकांशी संबंध आहे. याचा संबंध काय हे कोणालाच माहित नाही.

मला कोणतीही इच्छा नाही, आजार नाही आणि डिप्रेशन नाही.

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने ट्वीटवर म्हटलंय, स्वामीजी 126 वर्षांचे आहेत. त्यांची प्रकृती एकदम चांगली आहे. हा व्हीडिओ पाहून खूप छान वाटलं.

हे वाचलंत का?

बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)