You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इम्तियाज जलील: MIM ने महाविकास आघाडीला प्रस्ताव देण्यामागची 3 कारणं
- Author, दीपाली जगताप, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठी
भाजपला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त करत एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत हातमिळवणीची तयारी दर्शवलीय.
जलील यांच्या या ऑफरनंतर महाविकास आघाडीतल्या तिन्ही प्रमुख पक्षांमधून प्रतिक्रिया उमटू लागल्यात.
एमआयएमने महाविकास आघाडीला हातमिळवणी करण्यासाठी असा अचनाक प्रस्ताव देण्यामागे 3 महत्त्वाची कारणं असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.
1) शिवसेनेच्या हिंदुत्वाबाबत संभ्रम निर्माण करणं?
औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचं हे राजकारण असू शकतं, असं ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात.
ते म्हणाले, "औरंगाबादमध्ये एमआयएम आणि शिवसेना कायम एकमेकांचे विरोधक राहिले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीतही ते प्रमुख स्पर्धकांपैकी आहेत. शिवसेनेने धर्मनिरपेक्ष विचारधारा असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी केल्यापासून विरोधकांकडून शिवसनेच्या हिंदुत्ववादावर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. त्यात एमआयएमसोबत आघाडी करण्यासाठी शिवसेना तयार आहे का अशी चर्चा घडवून जनतेमध्ये शिवसेनेच्या हिंदुत्वाबाबत संभ्रम निर्माण करायचा."
एमआयएमचे बलस्थान असलेल्या औरंगाबादमध्ये शिवसेनेचा आतापर्यंतचा एकूणच प्रवास कट्टर हिंदुत्ववादाचा आहे. शिवसेनेने औरंगाबादचा उल्लेख कायम संभाजीनगर असाच केला आहे.
तर 'द हिंदू'चे पत्रकार अलोक देशपांडे म्हणतात की, "मुंबई आणि औरंगाबाद हे दोन्ही शिवसेनेसाठी महत्त्वाचे जिल्हे आहेत. औरंगाबादमध्ये शिवसेनेचे पारंपरिक मतदार आहेत. एमआयएमचा अचानक आलेला हा प्रस्ताव म्हणजे अशा मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असावा असं मला वाटतं."
एमआयएमचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार इम्तियाज जलील हे औरंगाबादमधून निवडून आले आहेत. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात ते निवडणूक जिंकले आहेत.
लोकसत्ताचे राजकीय संपादक संतोष प्रधान सांगतात, "एमआयएमने जो प्रस्ताव दिला तो राष्ट्रवादीकडे दिला. एमआयएमचे 26-27 नगरसेवक निवडून येतात. या प्रस्तावामुळे एका दगडात दोन पक्षी मारले गेले. एकतर एमआयएमला सत्तेत वाटा पाहिजे म्हणून राष्ट्रवादीकडे एमआयएमने प्रस्ताव दिला. दुसरीकडे भाजपने बाळासाहेबांचा 'जनाब बाळासाहेब' उल्लेख करणं. त्यात शिवसेनेने फडणवीसांवर उत्तर देणं ठीक आहे, पण प्रस्तावावर व्यक्त होण्याची गरज नव्हती. ते व्यक्त झाले आणि भाजप-एमआयएमची खेळी यशस्वी झाली."
लोकमतचे सहाय्यक संपादक संदीप प्रधान सांगतात, "ही एक भाजपची खेळी आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडलं हे परसेप्शन तयार करण्यासाठी हा प्रस्ताव दिला गेला असावा असं वाटतं. यातून शिवसेना सत्तेसाठी एमआयएमशी पण युती करायला तयार होईल अशी प्रतिमा तयार होऊन त्याचा फायदा अप्रत्यक्षपणे भाजपला होणार होता. जर शिवसेनेने प्रतिक्रिया देणं टाळलं असत, तर हा मेसेज नक्कीच गेला असता. ओवेसींच्या गाडीवर उत्तर प्रदेशात हल्ला होणे, त्याचा फायदा एमआयएम आणि अप्रत्यक्षपणे भाजपलाही झाल्याच आपण पाहिलं आहे. हा प्रस्तावही अशाच राजकारणाचा भाग असल्याचं वाटतं."
2) महाविकास आघाडीच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करणे
दुसरं कारण म्हणजे, महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेपासून भाजपने सातत्याने ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे सरकारमधील मंत्री भ्रष्ट असून त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप भाजपकडून करण्यात आले आहेत.
"एका बाजूला शिवसेनेच्या हिंदुत्ववादी भूमिकांवर संभ्रम निर्माण करायचा आणि दुसऱ्या बाजूला सतत महाविकास आघाडीचे सरकार भ्रष्ट असल्याची प्रतिमा तयार करायची अशी राजकीय रणनीती विरोधकांची असू शकते. महाविकास आघाडीमधून काही आमदार फुटले तरी ते पुन्हा निवडून येणार का? हा एक प्रश्न आहे. त्यामुळे तोपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करायचे," असंही अभय देशपांडे सांगतात.
"मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणारी शिवसेना एमआयएमसोबतही जाऊ शकते अशी एक चर्चा उठवण्याचा हा प्रयत्न असू शकतो. शिवसेना ज्या कट्टर हिंदुत्ववादाचा दावा करते ते संपवण्याच्या दृष्टीने केलेली ही राजकीय खेळी आहे. यामुळे काँग्रेस मतदारांमध्येही संभ्रम निर्माण होऊ शकतो."
3) औरंगाबाद महापालिकेच्या पार्श्वभूमीवर राजकीय खेळी?
लोकमतचे समूहातील ज्येष्ठ पत्रकार यदू जोशी सांगतात, "एमआयएमने महाविकास आघाडीत सामील होण्याचा दिलेला प्रस्ताव ही भाजपची खेळी असल्याची टीका शिवसेनेने केलेली आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि त्या आधी बिहारच्या निवडणुकीत भाजपविरोधी मतांचे विभाजन करण्यात एमआयएमची भूमिका होती असा तर्क आकडेवारीसह दिला गेला होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही एमआयएमच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप विशेषत: शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र त्यात तथ्य वाटत नाही."
यदू जोशी पुढे म्हणतात, "इम्तियाज जलील हे औरंगाबादचे खासदार आहेत आणि औरंगाबादच्या महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून ते बोलत असावेत असे दिसते. शिवसेनेच्या हिंदुत्ववादी मतदारांच्या मनात शिवसेनेविषयी एक संभ्रम निर्माण करण्याची जलील यांची खेळी दिसते. ओवेसी यांची मान्यता घेवून महाविकास आघाडीत जाण्याचा प्रस्ताव जलील यांनी दिलेला दिसत नाही. कारण स्वत: ओवेसी गेले तीन दिवस त्यावर काहीही बोललेले नाहीत. याचा अर्थ जलील यांनी औरंगाबादचे राजकारण समोर ठेवून एमआयएम महाविकास आघाडीत जाण्याबद्दलचे पिल्लू सोडून दिले. महविकास आघाडीने जलील यांना अवास्तव महत्त्व दिले."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)