You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदी: चांगल्या आरोग्यासाठी किती तासांची झोप आवश्यक आहे?
"नरेंद्र मोदी 22 तास काम करतात. आता ते प्रयोग करतायत. ज्यात त्यांना झोपावं लागणार नाही. अशी साधना ते करत आहेत."
महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान करत असलेल्या नवीन प्रयोगाची माहिती दिलीये.
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या दाव्यामुळे मानवी शरीराला किती झोप आवश्यक आहे, याबद्दलची चर्चा रंगली आहे.
तज्ज्ञ सांगतात, निरोगी जीवन जगण्यासाठी प्रौढ व्यक्तीला दररोज साधारणत: सात ते आठ तासांच्या झोपेची गरज आहे. यामुळे शरीरातील अवयवांना आणि मेंदूला आराम मिळतो. सातत्याने अपुरी किंवा कमी झोप ही आरोग्यासाठी हानिकारक आहे.
दोन तास झोप खरंच पुरेशी आहे? कमी झोप चांगली का वाईट? न झोपता काम करणं शक्य आहे का? झोपेचे फायदे काय? हे आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
किती तास झोप आवश्यक आहे?
सहा तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्यांना 'शॉर्ट स्लीपर्स' आणि 10 तासांपेक्षा जास्त झोप घेणाऱ्यांना 'लॉंग स्लीपर्स' म्हटलं जातं.
शरीर आणि मानसिक आरोग्य निरोगी रहाण्यासाठी साधारणत: दररोज आठ तासांची झोप घ्यावी असं सांगितलं जातं. शरीराला रिचार्ज करण्यासाठी झोपेची गरज असते.
- 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीला आठ तास झोपेची गरज
- 13 ते 18 वर्ष वयोगटातील मुला-मुलींनी 9 तास झोप घेणं चांगलं
- 6 ते 12 वयोगटातील मुलांना 10.5 तास झोप मिळाली पाहिजे
- तर 3 ते 5 वर्षांच्या लहान मुलांना 11.5 झोप आवश्यक
- 1-2 वर्षांच्या मुलांना 13 तास आणि नुकत्याच काही महिन्यांच्या बाळाला 14 तास झोप महत्त्वाची
फोर्टीस-हिरानंदानी रुग्णालयाचे डॉ. प्रेयस वैद्य सांगतात, "विकसित देशांमधील दोन-तृतिआंश लोकांना रात्रीची आठ तास शांत झोप मिळत नाही."वेकफिट नावाच्या एका कंपनीने लोकांच्या झोपेच्या पॅटर्नबाबत एक सर्व्हेक्षण केलं होतं. यात महानगरांमधील लोक खूप उशिरा झोपत असल्यामुळे त्यांनी झोप पूर्ण होत नसल्याची तक्रार केलीये. तर, काही लोकांना आपल्याला निद्रानाशाचा आजार असल्याची भीती वाटतेय.
"शरीराचा थकवा घालवण्यासाठी झोप अत्यंत महत्त्वाची आहे," वोक्हार्ट रुग्णालयाचे इटरव्हेन्शनल न्यूरोलॉजिस्ट डॉ. पवन पै म्हणाले.
कमी झोप चांगली की वाईट?
तज्ज्ञ सांगतात, सातत्याने अपुरी झोप किंवा झोप कमी होत असेल तर आरोग्यासाठी हानिकारक आहे.
बदललेली जीवनशैली, कामाचा प्रचंड ताण, रात्री झोपताना मोबाईलचा वापर, कॉफी-चहाचं अतिसेवन यांसारख्या अनेक कारणांमुळे झोप कमी होतेय. अनेकांना रात्री झोप न येण्याची तक्रार असते. पण, याचे दिर्घकालीन परिणाम माहिती नसतात.
प्रौढ व्यक्तीला दररोज सात ते आठ तासांच्या झोप आवश्यक असते. सातत्याने सहा ते सात तासांपेक्षा कमी झोपेमुळे शरीरावर होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांची डॉ. वैद्य माहिती देतात,
- शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते
- कॅन्सर आणि अल्झायमरसारखे आजार होण्याची शक्यता दुपटीने वाढते
- मधूमेह होण्याची शक्यता
- कमी झोपेमुळे हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता. ज्यामुळे हृदयरोग किंवा स्टोकचा धोका वाढतो
रात्री झोप योग्य झाली नाही तर, दुसऱ्या दिवशी डोळे बंद होऊ लागतात. याचा थेट परिणाम कामावर होतो. चिडचिडेपणा, कामावर लक्ष केंद्रीत करण्यास अडथळा आणि लवकर राग येतो.
इंग्लंडच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, संशोधनातून हे स्पष्ट झालंय की दररोज सात तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्यांचं वजन जास्त वाढतं. याचं कारण, झोप पुरेशी न घेतल्यामुळे शरीरातलं ग्रेलिन हार्मोनचं प्रमाण वाढतं त्यामुळं तुम्हाला भूक लागली आहे असं वाटत राहतं. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी सांगतात, "स्लीप डिप्रायव्हेशन किंवा झोप कमी मिळाल्यामुळे शरीराचं नुकसान आपण विचार करतो त्यापेक्षा अधिक जास्त होतं."
झोप कमी झाल्याने शरीरातील स्ट्रेस हॉर्मोन वाढतात. त्यामुळे सातत्याने कमी झोप घेणाऱ्या महिलांना गर्भधारणेदरम्यान त्रास होण्याची शक्यता असते.
दिवसातील वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करणारे कर्मचारी घरी आल्यावर चुकीच्या वेळी झोपतात किंवा कमी झोप घेतात. त्यांना मधुमेह आणि अतिरक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. शिफ्टमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचं नियमित वेळी काम करणाऱ्यांच्या तुलनेत आजारी पडण्याचं प्रमाण अधिक असतं असं एका पाहणीमध्ये एनएचएसला आढळून आलं होतं. जे लोक शिफ्टमध्ये कष्टाची कामं करतात त्यांची झोप पुरेशी होत नाही आणि त्यांना वेगवेगळे आजार होऊ शकतात.
प्रत्येक व्यक्तीची झोपेची गरज वेगळी आहे?
ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गरेट थॅचर या चार ते पाच तासच झोपत असत.
इंग्लंडच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, प्रत्येक व्यक्तीला लागणाऱ्या झोपेची गरज वेगळी असू शकते. त्यामुळे, प्रत्येकाने आपल्या झोपेची गरज ओळखली पाहिजे. जशी सातत्याने कमी झोप आरोग्यासाठी चांगली नाही. त्याचप्रमाणे, जास्त झोपही आरोग्यासाठी हानिकारक आहे.
डॉ. पवन पै पुढे सांगतात, "अतिप्रमाणात झोपेमुळेही अनेक दुष्प:रिणाम होतात. हृदयविकार किंवा स्ट्रोकचा आजार होण्याची शक्यता असते." याशिवाय स्लिप अॅप्निया असणाऱ्या रुग्णांना इतरांपेक्षा दिवसा आणि रात्री जास्त झोप येते. त्यामुळे अतिझोपेकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे.
नागपूरमधील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रितम चांडक प्रत्येक व्यक्तीची झोपेची गरज वेगळी का असते याबाबत माहिती देतात. "प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील अवयवांचं कार्य, चयापचय क्रिया यावरून त्या व्यक्तीला किती काळ झोप पुरते हे ठरतं."
व्यक्तीच्या शरीराच्या ठेवणीवरून त्याला लागणाऱ्या झोपेची गरज अवलंबून असते.
डॉ. चांडक पुढे सांगतात, "सामान्य व्यक्तीच्या शरीराला रिफ्रेश होण्यासाठी सात-आठ तास लागत असतील. तर, काही व्यक्तीना रिफ्रेश होण्यासाठी सहा किंवा कमी तास लागतात." कमी झोप म्हणजे त्यांना काही आजार असतो असा नाही.
या व्यक्तींच्या शारीरिक ठेवणीमुळे त्यांना कमी झोप लागले. 24 तास कोणीच काम करू शकत नाही.
अमेरिकन अकादमी ऑफ न्यूरॉलॉजीचे संशोधक म्हणतात, "सातत्याने नऊ तासांपेक्षा जास्त किंवा दुपारी दीर्घकाळ झोप घेतली तर स्ट्रोक येण्याचा धोका वाढतो."
योगसाधना केल्यामुळे झोप कमी होते? असं योग अभ्यासक सांगतात, वर्षोनवर्ष योग साधना केल्यामुळे झोप कमी होते हे खरं आहे. याचं कारण तुमचं मन शांत असतं, स्ट्रेस लेव्हल खूप कमी असते. त्यामुळे झोप कमी होते.
शरीरासाठी झोप का आवश्यक आहे?
दिवसभर आपण काम करतो. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा येतो. शरीरीची होणारी झीज भरून काढण्यासाठी झोप अत्यंत महत्त्वाची आहे.
झोपेत हृदयाची हालचाल मंदावते, श्वासोच्छवासाची गती कमी होते आणि स्नायू शिथिल होतात. पुरेशा झोपेचे फायदे कोणते,
- दररोज पुरेशी झोप घेतल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते
- मानसिक आरोग्य चांगलं रहातं. चिडचिडेपणा कमी होतो.
- संशोधनातून समोर आलंय की पाच तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्यांना टाईप-2 मधूमेह होण्याचा धोका असतो. त्यामुळे योग्य झोप मिळाली तर मधुमेहाचा धोका कमी
झोप फक्त जगण्यासाठी आवश्यक नाही तर, शरीराची महत्त्वाची कार्ये करण्यासाठी गरजेची आहे.
वोक्हार्ट रुग्णालयाचे मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. प्रशांत मखिजा सांगतात, "झोपेमुळे स्मरणशक्ती मजबूत होते. जनुक कार्य, प्रथिनांचे संश्लेषण आणि वाढ यासाठी आवश्यक आहे. यामुळे शरीरात उर्जेची बचत होते." तर थर्मोरेग्युलेशसाठी झोप गरजेची आहे."
झोपेबाबतचे गैरसमज आणि सत्यता
लोकांनी किती काळ झोप घ्यावी आणि पुरेशी झोप किती याबाबत अनेक गैरसमज लोकांमध्ये पसरलेले आहेत. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार या चुकीच्या किंवा गैरसमजामुळे लोकांना त्रास होतोय.
- शरीराला कमी झोपेची सवय होते हा गैरसमज आहे. याचा शरीरावर विपरित परिणाम होतो
- स्लीप फाउंडेशनच्या मते प्रौढांना पाच किंवा त्यापेक्षा कमी तासांची झोप पुरेशी असं समजणं चुकीचं आहे. चाळीस लाखांमधील एका व्यक्तीमध्ये जनुकीय बदलामुळे असं शक्य होतं. ज्यांना कमी झोप मिळाली तरी ते फ्रेश राहू शकतात
- किती काळ झोप मिळाली यासोबत झोप किती चांगली झाली याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे
- दीर्घकाळ झोपलं पाहिजे हा गैरसमज आहे. जास्त झोप येणं म्हणजे आरोग्याशी निगडीत समस्या असण्याची शक्यता आहे वय जास्त असेल तर झोप अधिक हा देखील गैरसमज आहे. वयोवृद्ध व्यक्ती कमी झोपतात
हे वाचलं का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)