पाकिस्तान भारताच्या क्षेपणास्त्रांचे रिव्हर्स इंजिनिअरिंग करणार का?

    • Author, सारा अतीक
    • Role, बीबीसी, इस्लामाबादहून

20 ऑक्टोबर 2020 साली पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी लंडनमधील पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की, क्लिंटन (अमेरिकेचे अध्यक्ष) यांनी जेव्हा अफगाणिस्तानवर टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रांचा मारा केला होता, तेव्हा त्यातील काही क्षेपणास्त्रं चुकून बलुचिस्तानमध्ये पडली होती. त्यातल्या क्षेपणास्त्रांचे जे काही भाग शिल्लक होते त्याचं रिव्हर्स इंजिनीअरिंग करून पाकिस्तानने 'बाबर' हे क्षेपणास्त्रं तयार केलं होतं.

अतिरेकी संघटना अल कायदाने ऑगस्ट 1998 मध्ये केनिया आणि टांझानियामधील अमेरिकन दूतावासांवर बॉम्बहल्ले केले होते. याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानमधील अतिरेक्यांच्या ठिकाणांवर क्रूझ मिसाईल टॉमाहॉक डागली होती. यातलं एक क्षेपणास्त्रं चुकून पाकिस्तानात पडलं.

त्यावेळी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांना फोन करून आपला निषेध नोंदवला होता.

या घटनेनंतर पाकिस्तान या क्षेपणास्त्राचा अभ्यास करत असून ते रिव्हर्स इंजिनियरिंग करून स्वतःचे क्रूझ क्षेपणास्त्रं देखील बनवू शकतात. असे दावे काही अमेरिकन वृत्तपत्रांनी केले होते.

रिव्हर्स इंजिनियरिंग म्हणजे नेमकं काय ?

तर मशीनचे सर्व भाग सुटे करून आणि त्याची रचना समजून घेऊन नंतर त्याची कॉपी करणे म्हणजे रिव्हर्स इंजिनीअरिंग.

भारतातील पाकिस्तानचे राजदूत अब्दुल वसीत यांनी त्यांच्या एका विश्लेषणात लिहिलं आहे की, पाकिस्तानात पडलेल्या त्या मिसाईल्सचा ढीग अमेरिकेला परत करावा यासाठी अमेरिकेने पाकिस्तानवर खूप दबाव आणला होता.

पाकिस्तान या क्षेपणास्त्राचं रिव्हर्स इंजिनियरिंग करू शकणार नाही असं त्यावेळी बऱ्याच तज्ञांना वाटलं होतं.

पण 11 ऑगस्ट 2005 मध्ये पाकिस्तानने आपलं पहिलं क्रूझ क्षेपणास्त्र बाबरची यशस्वी चाचणी घेतली. त्यावेळी जगात पाकिस्तानसह काही निवडक देशांकडेच क्रूझ क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान होतं.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या चन्नू भागात भारताचं सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र पडलं होत. हे ब्रह्मोस क्षेपणास्त्र असल्याचं बातम्यांमधून बोललं जातंय. या क्षेपणास्त्राचा स्पीड आवाजाच्या वेगाच्या तिप्पट आहे.

पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 9 मार्च रोजी पाकिस्तानमध्ये पडलेले हे क्षेपणास्त्र भारतातून डागण्यात आलं होतं. भारतात या घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे.

दुसरीकडे, पाकिस्तानने हा तपास एकतर्फी आणि अपुरा असल्याचे सांगत या घटनेच्या संयुक्त चौकशीची मागणी केली आहे. मात्र भारताने पाकिस्तानची ही मागणी अद्याप मान्य केलेली नाही.

या क्षेपणास्त्रावर वॉरहेड लोड केलेले नव्हतं आणि या घटनेत दोन्ही बाजूने कोणीही जखमी झालेलं नाही.

दरम्यान, आता प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे, रिव्हर्स इंजिनीअरिंग करून पाकिस्तान या क्षेपणास्त्राचं तंत्रज्ञान मिळवू शकेल का.

भारताचं हे क्षेपणास्त्र 3 मिनिटे 44 सेकंदांसाठी पाकिस्तानच्या हद्दीत होतं.

पाकिस्तानी लष्कराच्या जनसंपर्क विभाग आयएसपीआरचे डीजी इफ्तिखार बाबर यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितलं की, हे सुपरसॉनिक मिसाईल जमिनीवरून जमिनीवर मारा करणार मिसाईल होतं.

त्याचवेळी, पाकिस्तानी हवाई दलाने या क्षेपणास्त्राचे अवशेष जप्त केल्याचे निवेदन दिले आहे.

पाकिस्तानच्या निवेदनात सांगितल्याप्रमाणे, भारताचं हे क्षेपणास्त्र 3 मिनिटे 44 सेकंदांसाठी पाकिस्तानच्या हद्दीत होतं. या क्षेपणास्त्राने सीमेपासून 124 किलोमीटर एवढं अंतर कापलं आहे.

पाकिस्तानच्या हद्दीत घुसलेलं हे क्षेपणास्त्र पाकिस्तानी हवाई दलाच्या देखरेखीखाली असल्याचा दावाही पाकिस्तानच्या लष्करी सूत्रांनी केला आहे.

जमिनीच्या अगदी जवळून आणि कमी उंचीवर उडणाऱ्या सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल्सचं रडार ट्रॅकिंग सोपं नसतं.

पाकिस्तान आणि भारताजवळ कोण-कोणती क्षेपणास्त्रं आहेत ?

क्रूझ क्षेपणास्त्राचे तीन प्रकार असतात. एक असतं सबसॉनिक, ज्याचा वेग हा आवाजाच्या वेगापेक्षा कमी असतो. दुसरं असतं सुपरसॉनिक ज्याचा वेग आवाजाच्या वेगाच्या तिप्पट असतो आणि तिसरं असतं हायपरसॉनिक क्षेपणास्त्र. याचा वेग आवाजाच्या वेगाच्या पाचपट अधिक असतो.

पाकिस्तान जवळ बाबर आणि राद नावाची सबसॉनिक क्षेपणास्त्र आहेत. ही क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीकडे मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या यादीत मोडतात.

भारताकडे रशियाच्या मदतीने तयार केलेले अत्याधुनिक असे सुपरसॉनिक ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्र आहेत. याशिवाय हायपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोस-2 वर देखील काम सुरु आहे. हे क्षेपणास्त्र 2024 पर्यंत तयार होऊ शकते.

आता ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्र देखील चार प्रकारात मोडतात. यात जमिनीवरून जमिनीकडे, आकाशातून जमिनीकडे, समुद्रावरून जमिनीकडे आणि समुद्राच्या तळाशी मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचा समावेश होतो.

ब्रह्मोस हे जगातील सर्वात वेगवान क्षेपणास्त्रापैकी एक क्षेपणास्त्र आहे. ते जमिनीपासून कमी उंचीवर खूप वेगाने उडते, त्यामुळे या मिसाईलला अँटी मिसाईल सिस्टीमने पकडणे सोपे नसते. यामुळेच हे क्षेपणास्त्र कमी वेळात लांब पल्ल्यापर्यंत अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असतात.

पाकिस्तान ब्रह्मोस मिसाईलचं रिव्हर्स इंजिनीअरिंग करू शकतं का?

पाकिस्तानकडे सुपरसॉनिक किंवा हायपरसॉनिक मिसाईलचं तंत्रज्ञान नाही. अशा स्थितीत भारताचे हे मिसाईल तंत्रज्ञान आत्मसात करण्याची संधी असू शकते का?

यावर सेंटर फॉर एरोस्पेस अँड सिक्युरिटी स्टडीजचे संचालक सय्यद मोहम्मद अली सांगतात की, मिसाईल क्रॅश झालं असल्याने त्याच सध्या या मिसाईलचं रिव्हर्स इंजिनीअरिंग करणं कठीण आहे.

ते सांगतात, "या प्रकारच्या तंत्रज्ञानासाठी मूलभूत रचना आणि तंत्रज्ञानाची आवश्यकता असते, अन्यथा रिव्हर्स इंजिनीअरिंग करणं खूप कठीण असतं.

सय्यद मोहम्मद अली सांगतात की, एखादं शस्त्र किंवा क्षेपणास्त्र सुस्थितीत जरी सापडलं तरी ते पाहून त्याच रिव्हर्स इंजिनीअरिंग करणं ही बऱ्याचदा अशक्य असतं.त्याचवेळी, या मिसाईलचं रिव्हर्स इंजिनीअरिंग करणं पाकिस्तानसाठी सोपं नसलं तरी त्यातून भारताकडे असणाऱ्या तंत्रज्ञानाचं विश्लेषण त्यांना नक्कीच करता येईल, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांसाठी काम करणारे अणु सुरक्षा तज्ज्ञ मोहम्मद खालिद यांनी व्यक्त केला आहे.

"प्रत्येक क्षेपणास्त्र कोणत्या ना कोणत्या कमांड आणि कंट्रोल सिस्टीमशी जोडलेलं असतं. यासाठी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर वापरण्यात येत. आता त्यांची कॉपी करणे शक्य नसलं तरी, त्याच्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचे स्वरूप समजता येऊ शकतं."

अमेरिकेच्या मिडलबरी इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल स्टडीजचे प्रोफेसर डॉ. जेफ्री लुईस सांगतात की, पाकिस्तानकडे स्वतःची क्रूझ मिसाईल्स आहेत. पण पाकिस्तान, भारतीय क्षेपणास्त्राच्या अवशेषांची चाचणी काळजीपूर्वक करेल यात मात्र शंका नाही. मात्र, इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे भारताची ब्राह्मोस क्षेपणास्त्र विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

रिव्हर्स इंजिनीअरिंगद्वारे लष्करी आणि गैर-लष्करी तंत्रज्ञानाची कॉपी केल्याचा आरोप जगभरातील अनेक देशांवर होतो.

चीनला अमेरिकेचे तंत्रज्ञान हवं होतं, पण आपल्या विमानाच्या भग्न अवशेषांवर अमेरिकेची नजर होती. ते चीनच्या हाती लागलंच नाही.

त्याचप्रमाणे 1958 मध्ये तैवानच्या लढाऊ विमानाने 'साइड वंडर' हे अमेरिकन क्षेपणास्त्र डागलं होतं पण ते फुटलं नव्हतं. पुढे चीनने हे क्षेपणास्त्र ताब्यात घेऊन सोव्हिएत युनियनला दिलं. पुढे त्याचंच रिव्हर्स इंजिनीअरिंग करून K-13 नावाचं क्षेपणास्त्र तयार करण्यात आलं.

क्षेपणास्त्र तंत्रज्ञान शोधणे कठीण मात्र चोरण सोपं असतं

अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्राच्या तंत्रज्ञानाचा प्रसार रोखण्यासाठी MTCR नावाची यंत्रणा आहे. सध्या अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, इस्रायल आणि भारतासह 35 देश याचा भाग आहेत. पण पाकिस्तान त्याचा भाग नाही.

या व्यवस्थेअंतर्गत जे देश या प्रणालीचा भाग आहेत ते क्षेपणास्त्राच तंत्रज्ञान एकमेकांशी शेअर करू शकतात. याबाबत सर्व सदस्य देशांना माहिती देणं आवश्यक असत. कोणत्याही सदस्य नसलेल्या देशाच्या हाती हे तंत्रज्ञान पोहोचू नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.

सय्यद मोहम्मद अली यांच्या मते, जगातील क्षेपणास्त्रांचा प्रसार थांबवणं हे यामागचं एक कारण आहे. तसंच प्रत्येक देशाला असं ही वाटतं की, आपल्याकडे असलेलं तंत्रज्ञान इतर कोणत्याही देशाकडे नसावं. त्यामुळे हेही एक कारण आहेच.

त्यामुळे सामान्य देशांना अशा तंत्रज्ञानापर्यंत पोहोचणं कठीण होऊन बसतं.

"पण तरीही सर्व देश एकमेकांचे तंत्रज्ञान पाहून शिकतात आणि त्यातून चांगलं तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न करतात यात शंका नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)