उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांविरुद्ध आक्रमक झालेत का?

उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, ANI

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून सतत राज्य विरुद्ध केंद्र असा संघर्ष पहायला मिळाला आहे. त्यात केवळ सरकारांमधला संघर्ष नाही आहे तर तो राजकीयही आहे.

भाजपा त्यांच्या ताब्यात असलेल्या केंद्रीय यंत्रणांचा वापर महाविकास आघाडीतल्या नेत्यांना टारगेट करण्यासाठी करते आहे असा आरोप कायम शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून होत आला आहे. पण आता कायम अन्यायाची तक्रार करणारी महाविकास आघाडी आक्रमक मोडमध्ये दिसते आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये भाजपाच्या राज्यातल्या नेत्यांवर कारवाई वाढली आहे.

संजय राऊत आणि आघाडीतले इतर नेते आक्रमक प्रत्युत्तर देण्याची वक्तव्य करत आले आहेत. पण आता असं दिसतं आहे की आघाडीच्या काही मंत्र्यांवर आणि नेत्यांवर कारवाई झालेली असतांना आता राज्यामध्ये भाजपाच्या नेत्यांवरही विविध प्रकरणांत गुन्हे दाखल होणं, चौकशी होणं अशा प्रकारची पावलं उचलली गेली आहेत. विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे अशी नावं त्यात असल्यानं या पावलांचं गांभीर्य वाढलं आहे.

अशा बातम्या आल्या आहेत की भाजपा नेत्यांवर होणाऱ्या कारवाई बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही राज्य भाजपानं तक्रार केली आहे. "आम्ही अशा अटका आणि कारवायांना घाबरत नाही," असं देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्य सरकारवर टीका करतांना म्हटलं आहे.

दुसरीकडे अनिल देशमुख, नवाब मलिक या मंत्र्यांच्या अटकेत असण्यासोबत अनिल परब, भावना गवळी, संजय राऊत, प्राजक्त तनपुरे असे आघाडीचे नेतेही चौकशीच्या नजरेत आहेत. त्यामुळे आता राज्यातली प्रकरणं भाजपा नेत्यांच्याही मागे लागल्यानं भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी हा अटका-कारवायांचा पुढचा कोणता अध्याय महाराष्ट्रात लिहिला जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

पण कोणकोणत्या भाजपा नेत्यांची नावं या अशा प्रकरणांत पुढे आली आहेत आणि त्यात अद्याप काय कारवाई झाली आहे हे पाहूया.

1. प्रविण दरेकर

प्रविण दरेकर यांचं 'मुंबै जिल्हा सहकारी बँके'चं प्रकरण चांगलंच गाजलं. या प्रकरणी आता त्यांच्यावर मुंबईतल्या 'रमाबाई आंबेडकर नगर' पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दरेकर हे अनेक वर्षांपासून या सहकारी बँकेवर संचालक होते आणि त्यांचं इथं वर्चस्व होतं. पण मजूर प्रवर्गातून त्यांची उमेदवारी होती हे समोर आल्यावर सहकार खात्यानं कारवाई करत त्यांची यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी रद्द केली. परिणामी प्रविण दरेकर आणी त्यांच्या गटाला मुंबै बँकेवरचं वर्चस्व गमवावं लागलं.

प्रवीण दरेकर

फोटो स्रोत, @MIPRAVINDAREKAR

फोटो कॅप्शन, प्रवीण दरेकर

त्यानंतर दोन दिवसांपूर्वी दरेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरेकरांनी शक्यता लक्षात घेऊन अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. ही बातमी लिहित असतांना या बाबतीतली शेवटची घडामोड म्हणजे उच्च न्यायालयानं दरेकरांना दिलासा न देता सत्र न्यायालयात अटकपूर्वी जामीनासाठी अर्ज करण्यास सांगितलं आहे. दरेकर हे विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते आहेत आणि विविध प्रकरणात सरकारला धारेवर धरणारे भाजपाचे महत्त्वाचे नेते आहेत.

2. नारायण राणे आणि नितेश राणे

राणे विरुद्ध शिवसेना हा तर जुना सामना आहे. पण आता केंद्र विरुद्ध राज्य अशा सुरु झालेल्या सामन्यात ज्या भाजपा नेत्यांवर कारवाई झाली त्यात नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे हे दोघेही आहेत.

नारायण राणे मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री होताच त्यांच्यावर कारवाई झाली. त्यांच्या कोकणातल्या आशीर्वाद यात्रेदरम्यान त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत केलेल्या आक्षेपार्ह विधानचं निमित्त झालं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

या यात्रेदरम्यानच संगमेश्वरजवळ त्यांना अटकही करण्यात आली. मोदींच्या मंत्रिमंडळातल्या कोणत्या मंत्र्याला अटक होण्याची ही एकच वेळ होती. राणे यांना त्या दिवशी उशीरा महाड न्यायालयानं जामीन मंजूर केला.

त्यांचे पुत्र आणि भाजपाचे कणकवलीचे आमदार नितेश राणे यांचंही अटकनाट्य बराच काळ रंगलं. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीदरम्यान शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मारहाणीचं प्रकरण होतं आणि त्यात नितेश यांचं नाव आलं.

त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. अटक टाळण्यासाठी सत्र न्यायालय ते सर्वोच्च न्यायालय असा मोठा प्रवास त्यांना करावा लागला. शेवटी न्यायालयासमोर ते शरण आले आणि त्यांना अटक झाली. पोलिस कोठडीतनंतर न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर त्यांना जामीन मिळाला.

नारायण राणे

फोटो स्रोत, FACEBOOK/NARAYAN RANE

त्याशिवाय दिशा सालियान प्रकरणात सातत्यानं विधानं केल्यानंतर नारायण राणे आणि नितेश राणे यांना मुंबईच्या मालवणी पोलिस स्टेशनमध्ये बोलावण्यात आलं आणि अनेक तास त्यांची चौकशी करण्यात आली. याचदरम्यान शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधानं केल्याबद्दल नितेश राणे आणि निलेश राणे या दोघांविरुद्ध आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

राणेंच्या बाबतीत केवळ पोलीस कारवाईच नाही तर मुंबई महापालिकेची कारवाईसुद्धा झाली. त्यांचं मुंबईतलं जुहू येथील निवासस्थान असलेल्या 'अधीश' या बंगल्यात नियम डावलून बांधकाम झाल्याचं म्हणत मुंबई महापालिकेनं त्यांना नोटीस दिली. महापालिकेच्या पथकानं तिथं जाऊन पाहणी करुन काही भाग पाडायलाही सांगितला.

3. देवेंद्र फडणवीस

'पेन ड्राईव्ह' बॉम्ब टाकून राज्य सरकारला अडचणीत आणणारे विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाही एका प्रकरणात मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवला. अनिल देशमुख गृहमंत्री असतांना अधिवेशनात पोलिसांच्या बदल्यांचं रॅकेट सुरु आहे, असे आरोप करत फोन रेकॉर्डिंग असलेला एक पेन ड्राईव्हसुद्धा सगळ्यांसमोर त्यांनी आणला. त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. केंद्री गृहसचिवांकडेही तक्रार केली.

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, @DEV_FADNAVIS

गोपनीय असणारा हा डेटा बाहेर कसा गेला याबद्दल मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम विभागानं गुन्हा दाखल करुन चौकशी सुरु केली आहे. त्याबद्दल जबाब नोंदवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना पोलिसांनी बोलावण्याची नोटीस धाडली. गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार अनेकांना जबाबासाठी बोलावलं गेलं होतं. शेवटी फडणवीसांच्या निवासस्थानी पोलिसांनी जाऊन त्यांचा जबाब नोंदवला. फडणवीसांनी त्यावर म्हटलं की त्यांना सहआरोपी करण्यासारखे सगळे प्रश्न पोलिसांनी विचारले, पण ते घाबरणार नाहीत.

4. चंद्रशेखर बावनकुळे

भाजपा नेते आणि फडणवीसांच्या काळात ऊर्जामंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामागेही चौकशीचा ससेमिरा सध्याच्या सरकारनं लावला आहे. बावनकुळे यांच्या काळात ऊर्जा विभागातल्या कामांची चौकशी करणात असल्याची घोषणा अधिवेशनात झाली.

नितीन राऊत अध्यक्ष असलेली त्रिसदस्यीत समिती ही चौकशी करुन महिन्याभरात अहवाल तयार करेल. बावनकुळे पाच वर्षं ऊर्जामंत्री असतांना केलेली कामं, झालेला खर्च, दिलेल्या निविदा या सगळ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. ओबीसी प्रश्नावर भाजपाची बाजू सातत्यानं बावनकुळे यांनी मांडली आहे.

5. गिरीश महाजन

देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय आणि भाजपाचे माजी मंत्री गिरीश महाजन हेही सध्या चर्चेत आहेत आणि त्यांच्याशी संबंधित प्रकरणावरुन अधिवेशनातही मोठा गदारोळ झाला.

जळगावच्या एका शिक्षणसंस्थेबद्दलचं हे २०१८ सालचं प्रकरण आहे. दोन गटांच्या वर्चस्वासाठीच्या लढाईतून राजकारण झालं. त्यातल्या कथित गैरप्रकारांबद्दल २०२० मध्ये पुण्यात गुन्हा दाखल झाला. यात गिरीश महाजनांचंही नाव येतं आहे.

महाजनांनीही हे आरोप फेटाळले आहेत आणि देवेंद्र फडणवीसांनी अजून एक 'पेन ड्राईव्ह बॉम्ब' विधानसभेत फोडत महाजनांना अडकवण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहेत, असे आरोप केले. फडणवीसांनी या प्रकरणात सरकार वकील असणाऱ्या प्रवीण चव्हाण यांचं एक स्टिंग ऑपरेशन विधानसभेत समोर ठेवलं.

6. किरीट सोमय्या आणि नील सोमय्या

महाविकास आघाडी सरकारवर सातत्यानं भ्रष्टाचाराचे आरोप करणारे किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांत सातत्यानं आरोप केले आहेत.

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

राऊत यांच्या आरोपाप्रमाणे सोमय्यांचे पीएमसी बँक घोटाळ्यातल्या आरोपींशी आर्थिक संबंध आहेत. याबद्दल मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे सगळ्या कागदपत्रांसहित तक्रार केल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे. राऊत यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहिलं आहे.

पण हे सरकार किती आक्रमक होऊ शकेल?

अशा प्रकारची आक्रमक भूमिका महाविकास आघाडी सरकारकडून घेतलेली पाहायला मिळते आहे. पण केंद्राविरुद्धच्या या संघर्षात ते किती पुढे जातील आणि ताणू शकतील असा राजकीय प्रश्न समोर आहेच.

मुंबईसह राज्यातल्या महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत. अशा प्रकारच्या आक्रमक बाण्याविरुद्ध महाविकास आघाडीमध्येही वेगवेगळ्या मतांचे गट आहेत. नुकतंच अजित पवारांनी पुण्यात 'अशा कारवायांचं राजकारण लोकांना पटत नाही' अशा आशयाचं विधान केलं होतं.

राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणतात, "असं दिसतंय की जसं ममतांनी बंगालमध्ये भाजपाला अंगावर घेतलं तसं महाविकास आघाडीला महाराष्ट्रात करायचं आहे. पण ते त्यात किती पुढे जाऊ शकतील याबद्दल शंका आहे. एक म्हणजे केंद्रीय यंत्रणांसाठी जे कायदे आहेत ते अधिक कडक आहेत. तुलनेनं राज्य पोलिसांकडे असलेले कायदे तसे नाहीत. त्यामुळे त्याचा दबाव आहेच.

दुसरं म्हणजे अशा संघर्षात जेव्हा अस्थिरता असते तेव्हा प्रशासनातले अधिकारीही आक्रमक होत नाहीत. त्यांना भविष्यात होऊ शकणाऱ्या राज्यकर्त्यांसोबत शत्रुत्व नको असतं. त्यामुळे आता हा जो संघर्ष आहे तो किती आणि कसा पुढे जाईल याबद्दल प्रश्नच आहेत."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)