You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
The Kashmir Files चे रेटिंग IMDb ने घटवलं, विवेक अग्निहोत्रींची नाराजी
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवर आज प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
1. 'द कश्मिर फाईल्स'चं रेटिंग IMDbने घटवलं, रेटिंग पद्धत बदलल्याबद्दल दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींची नाराजी
फिल्म आणि टीव्ही शोजबद्दलचे रिव्ह्यू आणि रेटिंग्स असणाऱ्या IMDb या वेबसाईटने त्यांची सिनेमांचं रेटिंग मोजण्याची पद्धत बदलली आहे. यामुळे 'द कश्मिर फाईल्स' या सिनेमाचं IMDb वरचं रेटिंग कमी झालंय.
'या सिनेमाच्या पेजवर नेहमीपेक्षा वेगळी अॅक्टिव्हिटी होत असल्याचं लक्षात आलंय. आमच्या रेटिंग प्रणालीची विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी रेटिंगची वेगळी पद्धत अवलंबण्यात आल्याचं' या सिनेमाच्या रेटिंग पेजवर म्हटलंय.
सध्या या सिनेमाचं रेटिंग 8.3 वर आहे. 94% लोकांनी या सिनेमाला 10 रेटिंग दिलंय. तर 4% लोकांनी 1 रेटिंग दिल्याचं हिंदुस्तान टाईम्सने त्यांच्या बातमीत म्हटलंय.
ट्विटरवर एका व्यक्तीने ही गोष्ट या सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या लक्षात आणून दिल्यावर त्यांनीही यावर प्रतिक्रिया दिलीय. 'असं नेहमी केलं जात नाही आणि असं करणं अनैतिक आहे' असं अग्निहोत्री यांनी म्हटलंय.
2. 'गरिबांनी जगायचं कसं?' सुप्रिया सुळेंचा लोकसभेत सवाल
'देशात महागाई आधीच वाढली असून 2018 ते 2021 या काळात प्रचंड महागाई वाढली असून गरिबांनी जगायचं कसं?' असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केलाय.
'रशिया - युक्रेन युदधामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढतील अशी चर्चा आहे. केंद्र सरकारने मंत्र्यांची समिती तयार केली असून जनतेच्या हिताचा विचार करून महागाई न वाढण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्न करेल,' असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सांगितलं होतं.
त्यावर सुप्रिया सुळेंनी हा सवाल केलाय. लोकमतने याविषयीची बातमी दिली आहे.
देशात वाढलेली महागाई आणि त्याचा सर्वसामान्य जनतेवर झालेला परिणाम याचा मुद्दा सुप्रिया सुळेंनी मांडला. महागाईचा दर गेल्यावर्षीच्या तुलनेत 14.23% वाढला असून रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवर होत असून त्याचा देशातल्या जनतेलाही फटका बसत आहे, सध्या वाढलेली महागाई कमी करण्यात यावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केलीय.
3. नारायण राणेंना BMCची तिसरी नोटीस
मुंबई महापालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या जुहूतल्या अधिश बंगल्यासंदर्भात तिसऱ्यांदा नोटीस पाठवली आहे. नारायण राणेंच्या अधिश बंगल्याची पाहणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी केली होती.
महापालिकेने पाठवलेल्या दुसऱ्या नोटीसला नारायण राणे यांच्याकडून देण्यात आलेलं उत्तर न पटल्याने तिसरी नोटीस देण्यात आल्याचं TV9 मराठीने दिलेलया बातमीत म्हटलंय.
नारायण राणे यांनी 15 दिवसांमध्ये अनधिकृत बांधकाम तोडावं असं मुंबई महापालिकेने पाठवलेल्या नोटिसमध्ये म्हटलंय. आणि या नोटिसला उत्तर देण्यासाठीही 15 दिवसांचा काळ देण्यात आलाय.
या बंगल्याच्या कोणत्या मजल्यावर काय बदल करण्यात आले आहेत, याची यादी मुंबई महापालिकेने दिलेल्या नोटीसमध्ये देण्यात आली आहे.
4. पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेना टोला
'कर्ते नाकर्तेपणाची चर्चा खुल्या व्यासपीठावर होऊ द्या' असं म्हणणाऱ्या मंत्री धनंजय मुंडेंना भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी प्रत्युत्तर दिलंय.
'तुमच्या कर्तेपणाचे किस्से तुमच्या फेसबुक वॉलपासून, सेशन कोर्ट, सुप्रीम कोर्ट ते ईडीपर्यंत जगजाहीर आहेत,' असं म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडे यांना टोला लगावलाय.
बीडच्या कायदा सुव्यवस्थेवरून भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या बातमीत म्हटलंय.
गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात बीड जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याची टीका पंकजा मुंडे यांनी केली होती. त्यावर 'माझ्यावर टीका करा, पण बीड जिल्ह्याला बदनाम करू नका, कोण काय करतंय याची चर्चा खुल्या व्यासपीठावर होऊ द्या' असं धनंजय मुंडेंनी म्हटलं होतं.
5. आजपासून 10वीची परीक्षा
महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा आजपासून सुरू होतेय. राज्यभरात 16 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत.
कोव्हिडच्या साथीमुळे गेल्यावर्षी दहावी - बारावीच्या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आले होते. यावर्षी प्रत्यक्ष परीक्षा होत आहेत. बारावीची परीक्षा यापूर्वीच 4 मार्चला सुरू झालेली आहे.
कोरोनाचे नियम पाळून परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यामध्ये 70 ते 100 मार्कांच्या पेपरसाठी विद्यार्थ्यांना 30 मिनिटांचा जास्त वेळ मिळणार असून 40 ते 60 मार्कांचा पेपर लिहीण्यासाठी 15 मिनिटांचा अधिकचा वेळ मिळणार आहे.
लोकसत्ताने याविषयीची बातमी दिली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)