रवणीर ब्रार: कोथिंबीर भारताची राष्ट्रीय वनस्पती घोषित करा, 'या' शेफने केली मागणी

फोटो स्रोत, RANVEER BRAR
- Author, गीता पांडे
- Role, बीबीसी न्यूज
लाखो भारतीयांप्रमाणे माझ्या स्वयंपाकात एका गोष्टीचा वापर नक्की होतोच - कोथिंबीर
डाळीत वरून घालण्यासाठी, भाज्यांसाठी किंवा फक्त सोबत टोमॅटो- हिरवी मिरची - आलं - मीठ घालून चटणी करण्यासाठी.
आणि आता भारताल्या एका अतिशय लोकप्रिय शेफने कोथिंबीरीला 'भारताची राष्ट्रीय वनस्पती' घोषित करा, अशी मागणी केलीय.
अमेरिकेत सिलांट्रो (Cilantro) म्हटली जाणारी आणि भारतात धनिया किंवा कोथिंबीर म्हणून ओळखली जाणारी ही वनस्पती 'किचनमधली सुपरस्टार' असल्याचं शेफ रणवीर ब्रार सांगतात.
"भारतातला कोणताच खाद्यपदार्थ कोथिंबिरीशिवाय पूर्ण होत नाही. इतर कोणतीही हर्ब - वनस्पती याच्या जवळपासही येत नाही," मुंबईहून माझ्याशी फोनवर बोलणाऱ्या शेफ रणवीर ब्रार यांनी सांगितलं.
अमेरिकेतल्या बॉस्टनमध्ये ब्रार यांची दोन रेस्टॉरंट आहेत आणि भारतात ते एक सेलिब्रिटी शेफ म्हणून ओळखले जातात. इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर त्यांचे 17 लाख फॉलोअर्स आहेत तर फेसबुकवर त्यांचे 33 लाख फॉलोअर्स आहेत. त्यांच्या युट्यूब चॅनलचे जवळपास 50 लाख सबस्क्रायबर्स आहेत.
रणवीर ब्रार सांगतात, "कोथिंबीर ही एक अशी गोष्ट आहे जी एकतर तुम्हाला खूप आवडते किंवा अजिबात आवडत नाही. बहुतेकांना कोथिंबीर आवडते. तिची चवच वेगळी आहे. त्यात थोडी लिंबाच्या सालीची, मिरीची आणि सेलरीचा झाक आहे."
आपण घरी स्वयंपाक करतानाही भरपूर कोथिंबीर वापरत असल्याचं शेफ ब्रार सांगतात. कोथिंबीर स्वयंपाकात घातली जाते....अगदी सुरुवातीला की वरून यावरून पदार्थाची चव बदलत असल्याचं ब्रार सांगतात.
"कोथिंबिरीचा प्रत्येक भाग स्वयंपाकात वापरला जातो. पानं डाळी आणि भाज्यांमध्ये वरून घातली जातात. पराठे आणि मांसाहारी पदार्थात कोथिंबिरीची पानं घालतात. कोथिंबिरीचे देठ आणि मुळं सूप आणि स्ट्यू करण्यासाठी वापरतात आणि त्याची फळं - बिया म्हणजे धणे स्वयंपाकातले मसाले म्हणून वापरतात."
"साध्यासुध्या कोथिंबिरीला तिचा मान मिळणं गरजेचं आहे," असं म्हणत रणवीर ब्रार यांनी काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली. आपण कोथिंबिरीला राष्ट्रीय वनस्पती किंवा National Herb चा दर्जा मिळवून देण्यासाठी मोहीम सुरू करूयात, असं त्यांनी म्हटलं होतं.
'मला माझी नॅशनल हर्बची संकल्पना मांडायची होती,' ब्रार सांगतात. या पोस्टवरून अनेक इंटरेस्टिंग संभाषणं सुरू झाली आणि अनेकांनी अशा ऑनलाईन याचिकेवर (Petition) सह्या करायच्या हे ब्रार यांना विचारलं.

फोटो स्रोत, RANVEER BRAR
यानंतर शेफ रणवीर ब्रार यांनी change.org वर एक ऑनलाईन याचिका सुरू केली.
"जर तुम्ही आज काही शिजवलं असेल तर कदाचित तुम्ही त्यात बारीक चिरून किंवा हाताने तोडून कोथिंबिर घातलीच असेल. किंवा काहीच नाही तर वरून भुरभुरवली असेल. या हर्बमध्ये भरपूर फ्लेवर्स आहेत. तुम्ही बनवत असलेल्या कोणत्याही पदार्थाला ती बहार आणू शकते. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक भारतीयाला बहुतेक सगळ्या पदार्थांमध्ये कोथिंबीर आवडतेच," ब्रार लिहीतात.
अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाला उद्देश्यून करण्यात आलेल्या या याचिकेवर 5,500 पेक्षा अधिकांनी सह्या केलेल्या आहेत.
"कोथिंबिरीशिवायचं जेवण म्हणजे मुकुटाशिवाय राजकन्या," याचिकेवर सह्या करणाऱ्या एकाने लिहीलंय. "कारण कोणताही पदार्थ कोथिंबिरीशिवाय अपूर्णच असतो," दुसऱ्या एकाने लिहीलंय.
ख्रिस्तपूर्व 5000 वर्षांआधीही कोथिंबीर माहित होती आणि बायबलमध्येही कोथिंबिरीचा उल्लेख असल्याचं फूड सायन्सेस अँड न्यूट्रिशन एनसायक्लोपीडिया सांगतो. रोमन आणि ग्रीक लोक पचनाच्या समस्या, श्वसनाच्या आणि लघवीच्या विकारांवर उपाय म्हणून कोथिंबिरीचा वापर करत. चायनीज, भारतीय आणि युरोपियन लोकांनी हजारो वर्ष कोथिंबिरीची शेती केलेली आहे.
आता युरोपभरात, मेडिटरेनियन, उत्तर आफ्रिका, अमेरिकाज, चीन आणि बांगलादेशातही कोथिंबिर मोठ्या प्रमाणात उगवली जाते आणि वापरलीही जाते.
डॉ. भोपाल सिंह तोमर हे कृषी वैज्ञानिक आहेत आणि 'इंडियन अॅग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट'च्या भाज्यांविषयी संशोधन करणाऱ्या विभागाचे प्रमुख आहेत. कोथिंबिर देशभरात आणि वर्षंभर पिकवली जात असल्याचं ते सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
"चाळीस वर्षांपूर्वी कोथिंबीर भारतातलं एक हंगामी पीक होतं आणि फक्त थंडीत होई आणि बहुतेकदा फक्त शहरांमध्ये विकलं जाई. पण आज आयात केलेल्या बियाणांपासून कोथिंबीर वर्षभर पिकवली जाते आणि लाखो भारतीय त्यांच्या किचन गार्डनमध्ये किंवा कुंडीतही ती उगवतात."
चव आणि स्वादाशिवाय कोथिंबिर लोकप्रिय असण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्यातले आरोग्यकारी गुणधर्म.
"स्वस्तात उपलब्ध असणाऱ्या कोथिंबिरीत मोठ्या प्रमाणात लोह असल्याने तिचा रोजच्या आहारात समावेश करावा आणि पोटातल्या बाळाच्या सुदृढ वाढीसाठी हे गरजेचं असल्याचं" एक स्त्रीरोग तज्ज्ञ दिल्लीच्या झोपडपट्टीतल्या गरीब कुटुंबातल्या प्रेग्नंट महिलांना सांगताना मी काहीवर्षांपूर्वी पाहिलं होतं.
यासोबतच कोथिंबिरीच्या बिया - धणे हे Anti-inflammatory असून त्याचा परिणाम संधिवाताचा त्रास असणाऱ्यांना होत असल्याचं संशोधनातून आढळलंय.
कोथिंबिर एक 'सुपरफूड' असून 'त्याने मधुमेह नियंत्रणात आणण्यास आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मदत' होत असल्याचं शेफ रणवीर ब्रार यांनी त्यांच्या याचिकेतही म्हटलंय.
भारतामध्ये 8 कोटींपेक्षा अधिकांना मधुमेह आहे आणि दरवर्षी 1.7 कोटींपेक्षा अधिकजण हृदयरोगाने मृत्यूमुखी पडतात.
"एक अशी वनस्पती जी प्रत्येक पदार्थात एका वेगळ्या चवीने बहार आणते आणि आपल्या मनाला संतुष्ट करते, तिला तिचं महत्त्वं मिळायलाच हवं," रणवीर ब्रार लिहीतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








