संभाजीराजे छत्रपतींवर उपोषण करण्याची वेळ आलीय कारण...

फोटो स्रोत, @YuvrajSambhaji
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपोषणाला बसले आहेत. आज (28 फेब्रुवारी) त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे.
संभाजीराजे उपोषणास बसल्यानंतर विविध नेत्यांनी उपोषणस्थळी येऊन त्यांच्या भेटी-गाठी घेतल्या. त्यामध्ये प्रामुख्याने भाजप नेत्यांचा सहभाग होता.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधान परिषद आमदार प्रसाद लाड तसंच माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील आदी नेत्यांनी संभाजीराजे यांची भेट घेत काहीवेळ उपोषणास्थळी व्यासपीठावर उपस्थिती नोंदवली. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही संभाजीराजेंची भेट घेतली.
याशिवाय सरकारकडून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संभाजीराजेंची भेट घेतली आणि तुमच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू असं आश्वासन दिलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
पण, संभाजीराजेंनी मात्र जोपर्यंत त्यांच्या मागण्यांवर अंमलबजावणी सुरू होत नाही, तोवर उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
संभाजीराजे छत्रपती यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत? त्यांच्यावर उपोषणावर बसण्याची वेळ का आली? त्यासाठी कोणती राजकीय कारणं जबाबदार आहेत? याचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.
संभाजीराजेंच्या मागण्या काय?
संभाजीराजे यांनी सोनवारी सकाळी (28 फेब्रुवारी) आंदोलकांना संबोधित केलं.
मराठा समाजाला जोवर आरक्षण मिळत नाही, तोवर आमच्या 5 प्रमुख मागण्या सरकारनं मान्य कराव्यात आणि यावर अंमलबजावणी सुरू करावी, जेणेकरून गरीब मराठा समाजाला न्याय मिळेल, असं संभाजीराजेंनी यावेळी म्हटलं.
या मागण्या सरकार मान्य करू शकतं. यासाठी काही केंद्र सरकारकडे जाण्याची गरज नाही. यावर सर्वोच्च न्यायालयाचेही काही निर्बंध नाही, असंही ते म्हणाले.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
संभाजीराजेंच्या 5 प्रमुख मागण्या अशा आहेत-
- मराठा तरुणांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी असलेली सारथी संस्था सक्षम करावी. यासाठी विस्तृत आराखडा तयार करून राज्याच्या अर्थसंकल्पात यासाठी विशेष तरतूद करावी.
- मराठा तरुणांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळास राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करावी. कर्ज व्याज परताव्याची मर्यादा वाढवून 25 लाख करावी.
- मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनातून ज्या आत्महत्या झाल्या त्यांच्या कुटुंबीतील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याच्या आश्वासनाची पूर्तता करावी.
- ESBC आणि SEBC आरक्षणाच्या माध्यमातून शासकीय सेवेत निवड झालेल्या, पण अद्याप नियुक्ती न झालेल्या उमेदवारांना त्यांची ज्या पदावर निवड झाली आहे, त्याच पदावर कायमस्वरुपी नियुक्ती द्यावी.
- कोपर्डी खटल्याची लवकरात लवकर सुनावणी घ्यावी. यासाठी शासनानं पाठपुरावा करून आरोपींना फाशी होण्यासाठी आग्रही राहावे.
दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी 27 फेब्रुवारीला संभाजीराजेंची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली.
मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग गठित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्याची माहिती यावेळी त्यांनी संभाजीराजेंना दिली.

फोटो स्रोत, @maharashtra_hmo
छत्रपती संभाजीराजे यांनी मांडलेले प्रश्न लवकर सुटलेच पाहिजेत. त्यामुळे हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावेत यासाठी राज्य सरकारशी चर्चा करून प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया वळसे पाटील यांनी दिली आहे.
संभाजीराजे कोणत्या पक्षाचे?
राज्यात भाजपाची सत्ता असताना राष्ट्रपतीनियुक्त खासदार म्हणून संभाजीराजे राज्यसभेत पोहोचले. गेल्या काही दिवसांपासून ते मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचं नेतृत्व करताना दिसत आहेत.
पण, तुम्ही हे नेतृत्व भाजपचे खासदार म्हणून करताय की छत्रपती म्हणून करता? असा प्रश्न बीबीसी मराठीनं त्यांना विचारला होता. तेव्हा त्यांनी म्हटलं होत की, "मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. नरेंद्र मोदींनी माझी शिफारस केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पण भाजपची भूमिका मला लागू होत नाही."
संभाजीराजेंची राजकीय भूमिका स्पष्ट नाहीये. यामुळेच भाजप असो की महाविकास आघाडी, दोन्हींनी त्यांचा राजकीय वापर करून घेतल्याचं राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सांगतात.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "संभाजीराजे म्हणतात की देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र आहेत आणि उद्धव ठाकरेही चांगले मित्र आहेत. यातून ते स्वत:ची बिगर राजकीय नेता म्हणून इमेज बनवायचा प्रयत्न करत असले, तरी राजकारणात असं चालत नसतं. राजकारणात ठोस भूमिका लागते. तीच नसल्यामुळे संभाजीराजे सध्या कोणत्या पक्षाला अनुकूल आहेत, हे कळत नाही."

फोटो स्रोत, @YuvrajSambhaji
संभाजीराजेंच्या आताच्या उपोषणाविषयी विचारल्यावर विजय चोरमारे म्हणाले, "जून महिन्यात संभाजीराजेंची राज्यसभेच्या खासदारकिची मुदत संपत आहे. त्यामुळे त्यांचे सगळे प्रयत्न पुढच्या दृष्टीनं सुरू आहेत. गेल्या वेळी महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनामुळे फडणवीसांविरोधात वातावरण होतं. त्याला काऊंटर करण्यासाठी संभाजीराजेंना खासदारकी देण्यात आली, किंबहुना त्यांनी ती स्वीकारली.
"आता पुढच्या राजकीय प्रवासासाठी संभाजीराजेंना पाठीमागे काहीतरी पाठबळ लागणार आहे. त्यामुळे मग आपण मराठा समाजाचं एकमुखी नेतृत्व करत असल्याचं चित्र निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येत आहे."

फोटो स्रोत, CMOMAHARASHTRA/FACEBOOK
11 जून 2016 रोजी संभाजीराजे यांची सामाजिक कार्यकर्ते या श्रेणीसाठी राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून निवड करण्यात आली होती.
त्यावेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.
कोल्हापूरच्या एका ज्येष्ठ पत्रकारानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं, "जून महिन्यात खासदारिकीची टर्म संपल्यानंतर आपल्याला पुन्हा संधी मिळेल, असं संभाजीराजेंना वाटत नाहीये. खरंतर खासदारकिच्या कार्यकाळात त्यांनी आंदोलनं करण्यापेक्षा प्रत्यक्षात कामं करण्यावर भर द्यायला हवा होता. तसं न केल्यामुळे त्यांना हवा तसा पाठिंबा मिळताना दिसत नाहीये."

फोटो स्रोत, @devendra.fadnavis
पण, संभाजीराजेंचं राजकारण नेमक्या कोणत्या पक्षाला अनुकूल आहे, असं विचारल्यावर ते म्हणाले, "खासदारकिची टर्म संपल्यानंतर गरज सरो, वैद्य मरो अशी भूमिका संभाजीराजे घेऊ शकतात. महाराष्ट्राचा ट्रेंड पुरोगामी विचारांकडे वळतोय, असं लक्षात आलं तर ते महाविकास आघाडीकडे जाऊ शकतात."
'खासदारकी नाही मराठा समाजाचे प्रश्न महत्त्वाचे'
'पुण्य नगरी'च्या सातारा आवृत्तीचे वृत्तसंपादक विनोद कुलकर्णी मात्र वेगळं मत मांडतात.
त्यांच्या मते, "संभाजीराजेंनी याआधी महाविकास आघाडी सरकारकडे काही मागण्या मांडल्या होत्या आणि सरकारनेही त्या मान्य केल्या होत्या. पण, त्यावर अद्यापही अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे मग मराठा समाजात संभाजीराजेंच्या भूमिकेविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली. काहींनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे मग मी समाजाबरोबरच आहे, हे सांगण्यासाठी संभाजीराजे उपोषणाला बसले आहेत."

फोटो स्रोत, YUVRAJ SAMBHAJIRAJE CHHATRAPATI/FACEBOOK
"आपली राज्यसभेची टर्म संपेल आणि पुढे काही मिळेल की नाही, हा विषयच आता बाजूला राहिला आहे. महाविकास आघाडीनं शब्द पाळला असता तर ते महाविकास आघाडीसोबत राहिले असते. पण, आता संभाजीराजेंना खासदारकिपेक्षा मराठा समाजाचे प्रश्न सोडवणं महत्त्वाचं वाटतं," विनोद कुलकर्णी पुढे सांगतात.
दरम्यान, "जर बहुजन समाजाची इच्छा असेल तर नव्या राजकीय पक्षाचा निश्चित विचार केला जाईल," अशीही घोषणा संभाजीराजेंनी गेल्या वर्षी केली होती. पण, याचं पुढे काहीच झालं नसल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









