You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कर्नाटक : बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर शिमोगामध्ये तणाव, नेमकं काय घडलं?
कर्नाटकातील शिमोगामध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केलं आहे, तसंच तपासादरम्यान महत्त्वाचे पुरावे मिळाल्याचंही त्यांनी म्हटलं.
विश्व हिंदू परिषदनेने या घटनेचा निषेध केला असून काँग्रेसवर 'तुष्टीकरण' केल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणाची चौकशी एनआयएने करावी, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री शोभा करांदलाजे यांनी केली आहे. काँग्रेसने कर्नाटक सरकारवर प्रश्न उपस्थित करत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
अधिकारी आणि मीडिया रिपोर्टनुसार बजरंग दलाचे कार्यकर्ता हर्षा (26 वर्ष) यांच्या हत्येनंतर तणावाचे वातावरण आहे. काही ठिकाणी हिंसक घटनांचंही वृत्त आहे, तर अनेक ठिकाणी निदर्शनं करण्यात आली असून काही गाड्यांना पेटवण्यात आल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
पीटीआय वृत्तसंस्थेनुसार जमावाला नियंत्रित करण्यासाठी 'पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला.' शिमोगामध्ये दोन दिवसांपासून संचारबंदी लागू केली आहे.
कर्नाटकची राजधानी बंगळुरूपासून शिमोगा सुमारे 250 किमी अंतरावर आहे. काही दिवसांपूर्वीच याठिकाणी हिजाबच्या वादावरून तणाव होता. परंतु अधिकारी आणि सरकारचे म्हणणे आहे की, या घटनेचा हिजाब वादाशी कोणताही संबंध असल्याचं समोर आलेलं नाही.
राज्य सरकारचे मंत्री आणि स्थानिक आमदारांनी मात्र या घटनेला 'मुस्लीम गुंडांना' जबाबदार धरलं आहे.
हल्ला आणि रोष
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बजरंग दलाचे कार्यकर्ता हर्षा (26 वर्ष) यांच्यावर रविवारी (20 फेब्रुवारी) रात्री काही लोकांनी चाकूने हल्ला केला. रात्री साधारण 9 वाजता हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे.
हल्ल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं परंतु त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.
हत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. घटनेनंतर हर्षा यांच्या समर्थनार्थ काही जणांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं केली आणि निषेध नोंदवला.
यासंदर्भातला एक व्हीडिओ समोर आला असून यात काही लोक दगडफेक करताना दिसतात. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याचंही दिसून येतं.
या घनटेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (21 फेब्रुवारी) शाळा आणि महाविद्यालयं बंद करण्यात आले होते.
पोलीस उपायुक्त सेल्वामणि आर यांनी सांगितलं, "पूर्ण शहरात संचारबंदी लागू केली आहे. शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे."
या घटनेच्या चौकशीसाठी स्थानिकांनी सहकार्य करावं, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
सरकारने आतापर्यंत काय म्हटलं?
राज्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचं गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी सांगितलं. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पाच जणांचा हल्ल्याशी संबंध असल्याचं उघड झालं आहे. यापैकी तिघांना अटक केली आहे.
हर्षा यांच्या कुटुंबाची भेट घेतल्याचंही गृहमंत्र्यांनी सांगितलं. 'आम्हाला न्याय मिळवून द्या' अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
ते म्हणाले, "शिमोगा येथे बंगळुरू येथून 200 अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात केले आहे. 1200 पोलीस कर्मचारी आधीपासूनच तिथे आहेत. आरएएफ सुद्धा उपस्थित आहे. राज्यातील इतर पोलीस अधीक्षकांनी परिस्थितीवर नजर ठेवण्याची सूचना केली हे."
गृहमंत्री म्हणाले, "शिमोगा संवेदनशील शहर आहे. या घटनेचा हिजाब वादाशी संबंध असल्याची कोणतीही माहिती आतापर्यंत समोर आलेली नाही."
मुख्यमंत्री बसावराज बोम्मई यांनी सांगितलं, "या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत."
तणावपूर्ण परिस्थितीमध्ये कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्क राहण्याचे निर्देश पोलिसांना दिल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.
"शिमोगातील जनतेला मी सांगू इच्छितो की, "गुन्हेगाराला पकडण्यासाठी आम्ही लवकरात लवकर पकडण्यासाठी पावलं उचलली आहे. अफवांवर विश्वास ठेऊ नका."
काँग्रेसने काय मागणी केली?
काँग्रेस नेते सिद्धारमैया यांनी गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
सिद्धारमैया म्हणाले, "मी या हत्येचा निषेध करतो. कारण आमचा विश्वास अहिंसेत आहे. हत्येमध्ये सामील असलेल्या लोकांना शिक्षा व्हायला हवी. मी राज्याच्या गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करतो."
भडकवण्याचा आरोप
वृत्तसंस्था पीटीआयनुसार शिमोगाचे आमदार आणि मंत्री केएस इश्वरप्पा यांनी आरोप केला आहे की, "या घटनेच्या मागे मुस्लीम गुंड आहेत."
ईश्वरप्पा यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्यावर लोकांना भडकवण्याचा आरोप केला आहे. शिवकुमार यांनी हे आरोप फेटाळले असून त्यांच्या मानसिक परिस्थितीवर प्रश्न उपस्थित केला.
केंद्रीय राज्यमंत्री शोभा करांदलाजे यांनी या प्रकरणाचा तपास एनआयएने करावा अशी मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.
पीटीआय वृत्तसंस्था विश्व हिंदू परिषदेचे नेते सुरेंद्र जैन यांच्या हवाल्याने सांगितलं, "मुस्लीम तुष्टीकरणासाठी विष पसरवलं जात आहे."
श्रीराम सेनेचे समन्वयक प्रमोद यांनी पीपल्स फ्रंट ऑफ इंडिया आणि सोशल डेमोक्रटिक पार्टी ऑफ इंडियावर प्रतिबंध लावण्याची मागणी केली आहे.
हिजाब वाद
यापूर्वी हिजाब वादग्रस्त प्रकरणादरम्यान शिमोगामध्ये तणावाची परिस्थिती होती. याची सुरुवात कर्नाटकमधील उडपी इथून झाली होती.
सरकारी महिला महाविद्यालयात सहा मुस्लीम विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास बंदी घातली होती. विद्यार्थ्यांनी या निर्णयाला विरोध केला होता. या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू आहे.
या मुद्यावरुन शिमोगासह काही शहरांमध्ये आंदोलन आणि हिंसा झाली होती.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काही लोकांनी हिजाब घालून जाणाऱ्या विद्यार्थिनींना रोखण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे काही काळ तणावपूर्ण स्थिती होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)