रोहित शर्मा आता कसोटी संघाचाही कर्णधार; रहाणे-पुजाराला डच्चू

ट्वेन्टी, वनडेपाठोपाठ भारताच्या कसोटी संघाचं नेतृत्वही रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी निवडसमितीने संघ जाहीर केला. त्यावेळी कसोटी संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडेच असेल हे त्यांनी स्पष्ट केलं.

युवा कर्णधारांनी रोहितच्या नेतृत्वाखाली जबाबदारीसाठी तयार व्हावं असं निवडसमितीने म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर विराट कोहलीने कसोटी संघाचं कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती.

कोहलीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येच आयपीएलमधल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ट्वेन्टी20 विश्वचषकानंतर त्याने भारताच्या ट्वेन्टी20 संघाचं कर्णधारपद सोडलं. यानंतर निवडसमितीने कोहलीला वनडे कर्णधारपदावरून दूर केलं.

रोहित शर्माची वनडे आणि ट्वेन्टी20 संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली. दुखापतीमुळे रोहित दक्षिण आफ्रिका दौऱ्यात खेळू शकला नाही. कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी रोहितचं नाव चर्चेत होतं. मात्र दुखापतींची शक्यता पाहता रोहितऐवजी के.एल.राहुल किंवा ऋषभ पंत यांना ही जबाबदारी मिळणार का अशीही चर्चा होती. मात्र निवडसमितीने रोहितच्याच नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. या मालिकेसाठी जसप्रीत बुमराह उपकर्णधारपदी असणार आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना संघातून वगळण्यात आलं आहे. या दोघांच्याही फॉर्ममध्ये गेल्या वर्षभरात घसरण झाली आहे. श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी त्यांच्या जागी खेळतील. अनुभवी इशांत शर्मा आणि वृद्धिमान साहा यांचाही संघनिवडीसाठी विचार करण्यात आलेला नाही.

या कसोटी मालिकेसाठी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनची निवड फिटनेसवर अवलंबून आहे. के.एल.राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर हे दुखापतीमुळे या मालिकेसाठी संघाचा भाग नाहीत. अक्षर पटेल दुखापतीतून सावरत असल्याने त्याचीही मालिकेसाठी निवड करण्यात आलेली नाही.

प्रियांक पांचाळला संघात संधी मिळाली आहे. के.एस.भरतचा राखीव यष्टीरक्षक फलंदाज म्हणून समावेश करण्यात आला आहे. प्रदीर्घ काळ दुखापतीमुळे बाहेर असलेला रवींद्र जडेजा संघात परतला आहे. सौरभ कुमारला पहिल्यांदाच संघात समाविष्ट करण्यात आलं आहे. डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादवही संघात आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी20 सामन्यासाठी तसंच श्रीलंकेविरुद्धच्या तीन ट्वेन्टी20 सामन्यांसाठी विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना विश्रांती देण्यात आली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या संपूर्ण मालिकेसाठी अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूरला विश्रांती देण्यात आली आहे.

श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यात तीन ट्वेन्टी20 सामने आणि 2 कसोटी खेळणार आहे. लखनौ, धरमशाला, मोहाली आणि बंगळुरू इथे हे सामने होणार आहेत.

भारतीय कसोटी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), मयांक अगरवाल, प्रियांक पांचाळ, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुबमन गिल, ऋषभ पंत, के.एस.भरत, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार.

भारतीय ट्वेन्टी20 संघ: रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अवेश खान.

श्रीलंकेचा दौरा

  • पहिला ट्वेन्टी20 सामना- 24 फेब्रुवारी, लखनौ
  • दुसरा ट्वेन्टी20 सामना- 26 फेब्रुवारी, धरमशाला
  • तिसरा ट्वेन्टी20 सामना- 27 फेब्रुवारी, धरमशाला
  • पहिली कसोटी- 4 ते 8 मार्च, मोहाली
  • दुसरी कसोटी- 12 ते 16 मार्च, बंगळुरू

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)