You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबई : मंत्र्यांचा कार्यकर्त्यांसह 200 वडापाववर ताव, बिल न भरताच निघून गेल्याचा व्हीडिओ व्हायरल #5मोठ्याबातम्या
विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी #पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1. नेत्यांची कार्यकर्त्यांसह वडापाव पार्टी, पण बिलावरून चर्चा
मध्य रेल्वेवरील लोकलच्या ठाणे-दिवा मार्गावरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झालं. पण या कार्यक्रमानंतरची एक वडापाव पार्टी सध्या चांगलीच चर्चेत आहे. टीव्ही 9 मराठीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
मार्गिकांच्या लोकार्पणानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, भाजप नेते विनय सहस्त्रबुद्धे, आमदार निरंजन डावखरे यांनी दिवा ते ठाणे असा लोकल प्रवास केला.
यानंतर ठाणे स्टेशनबाहेर गजानन वडापाव सेंटरमध्ये नेत्यांसह कार्यकर्त्यांनी वडापाव आणि भजी खाल्ली. मंत्री, खासदार, आमदारासंह कार्यकर्त्यांचा 200 वडापाववर ताव मारला. पण, बील न देताच ही मंडळी तिथून निघून गेली. त्यानंतर याबाबतचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
सगळे निघून गेल्यानंतर हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी व्हीडिओ तयार केला. त्यामुळं याबाबत सगळीकडं चर्चा सुरू झाली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी प्रकरण वाढू नये म्हणून तिथं जात बिल भरलं.
2. औरंगाबादेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वाधिक उंच पुतळ्याचं अनावरण
औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी रात्री अनावरण करण्यात आलं. सोहळ्यासाठी मध्यरात्रीपर्यंत औरंगबादकर शिवप्रेमींनी प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. एबीपी माझानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
औरंगाबादेतील या पुतळा अनावरणाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. शिवजयंती असल्यानं आधीच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याची मागणी केली जात होती. तर औरंगाबाद महापालिकेनं शुक्रवारी मध्यरात्री पुतळ्याचं अनावरण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मध्यरात्री आधीच पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न होता. मात्र, आदित्य ठाकरे यांच्या हस्तेच अखेर पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी शिवसेनेसह सर्वपक्षीय नेते आमदार आणि खासदारांची उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजी महाराजांचा हा देशातील सर्वात उंच आश्वरुढ पुतळा आहे. पुतळ्याची उंची 21 फूट तर चौथऱ्यासह या पुतळ्याची उंची 52 फूट एवढी आहे.
3. भारतानं विंडिज विरोधातील टी 20 मालिकाही घातली खिशात, दुसऱ्या सामन्यातही विजय
भारतीय क्रिकेट संघानं वन डे पाठोपाठ वेस्ट इंडिजच्या विरोधातील टी 20 मालिकाही खिशात घातली आहे. शुक्रवारी भारतानं दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा 8 धावांनी पराभव केला. लोकसत्तानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
कोलकात्याच्या ईडन गार्डन्सच्या मैदानावर झालेल्या सामन्यात भारतानं ही विजयी कामगिरी साकारली आहे. विंडिजनं अखेरच्या षटकापर्यंत विजयासाठी झुंज दिली, पण त्यांना अपयश आलं.
विंडिजनं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. कोहली आणि पंत यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतानं विंडिजसमोर 178 धावांचं आव्हान ठेवलं होतं.
त्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतलेल्या विंडिंजची सुरुवात चांगली झाली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनीही कमाल दाखवली. मात्र पूरन आणि पॉवेल जोडीनं केलेल्या खेळीमुळं विंडिजच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
अखेरच्या षटकात सलग दोन षटकार खेचत पॉवेलनं भारताच्या अडचणी वाढवल्या होत्या. पण हर्षल पटेलनं नंतर विंडिजला यशस्वी होऊ दिलं नाही.
4.हिजाबचा समावेश अनिवार्य धार्मिक प्रथांमध्ये होत नाही - कर्नाटक सरकार
कर्नाटकातील हिजाब प्रकरणी कर्नाटक हायकोर्टातील सुनावणीदरम्यान कर्नाटक सरकारनं मत मांडलं. आमच्या मते, हिजाब परिधान करण्याचा समावेश आवश्यक धार्मिक प्रथांमध्ये होतो, असं आम्हाला वाटत नाही, असं सरकारनं म्हटलं आहे. एनडीटीव्हीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
कर्नाटकातील महाविद्यालयात मुस्लीम विद्यार्थिनींना हिजाब परिधान करून महाविद्यालयात प्रवेश देण्यावरून सुरू झालेला हा वाद उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे.
कलम 19 अंतर्गत अधिकारांच्या संदर्भात राज्याद्वारे तयार केल्या जाणाऱ्या कायद्यांच्या माध्यमातून नियंत्रण आणता येऊ शकतं असं अॅडव्होकेत जनरल म्हणाले.
यापूर्वी गुरुवारी झालेल्या सुनावणीमध्ये याचिकाकर्त्यांनी हिजाबवर निर्बंध घालणं म्हणजे कुराणवर निर्बंध घालण्यासारखं असल्याचं म्हटलं होतं.
5.केजरीवाल यांच्या खलिस्तान प्रकरणावरून पंजाबमध्ये राजकीय वातावरण तापलं
कुमार विश्वास यांनी केजरीवालांबाबत केलेल्या आरोपांबाबत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी लिहिलेल्या पत्राला, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिलं आहे. आजतकनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
केजरीवाल यांनी खलिस्तानचा पंतप्रधान बनण्याबाबत वक्तव्य केल्याचा दावा कुमार विश्वास यांनी केला होता. त्यावर हा प्रकार धोकादायक असून याची चौकशी करण्याची मागणी चन्नी यांनी पंतप्रधानांकडे केली होती.
"पंजाबच्या नागरिकांनी फुटीरतावाद्यांशी लढताना मोठी किंमत मोजली आहे. त्यामुळं पंतप्रधानांनी सर्व पंजाबींची काळजी दूर करावी", असं चन्नी ट्विटमध्ये म्हटले होते.
त्यावर, "भारत सरकारनं हा मुद्दा अत्यंत गांभीर्यानं घेतला आहे. मी स्वतः यात लक्ष घालेन. सत्तेसाठी लोक फुटीरतावाद्यांशी हात मिळवत पंजाबला देशापासून तोडण्यापर्यंत जाऊ शकतात, हे निषेधार्ह आहे," असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्राच्या माध्यमातून चन्नी यांना सांगितलं.
केजरीवाल यांनी एक तर ते पंजाबचे मुख्यमंत्री बनतील किंवा एक स्वतंत्र राष्ट्र (खलिस्तान) चे पंतप्रधान तरी बनतील असं वक्तव्य केल्याचा दावा कुमार विश्वास यांनी केला होता. त्यावर पंजाबचं राजकारण पेटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)