हवामान : महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट, पुढच्या दोन दिवसांत पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज

फोटो स्रोत, Twiiter / K S Hosalikar
महाराष्ट्रात पुढच्या दोन दिवसांमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागांमध्ये 19 आणि 20 फेब्रुवारीला अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
प्रामुख्यानं मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता असल्याची माहिती पुणे हवामन विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्वीटरद्वारे दिली.
खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळं राज्यातील शेतकऱ्यावर आधीच संकट निर्माण झालं आहे. त्यात या अवकाळी पावसाचा फटका बसल्यास रब्बी हंगामातही नुकसानीचा सामना करावा लागण्याची चिंता शेतकऱ्यासमोर आहे.
महाराष्ट्राबरोबरच मध्य आणि पूर्व भारतातही पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगामी 5 दिवसांत पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पाऊस पडेल. तसेच झारखंड, ओडिशा आणि बिहारमध्ये 20-21 फेब्रुवारीला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रावर ढग दाटले
भारतीय हवामान विभागाच्या पुणे केंद्राचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी महाराष्ट्रावर ढग तयार झालेल असल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे.
"17 फेब्रुवारीला दुपारी 3 च्या सुमारास महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात ढगांची निर्मिती झाल्याचं उपग्रहामार्फत दिसून आलंय," असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
"ढगांची निर्मिती ही मराठवाडा आणि विदर्भावर होत असल्यामुळं या भागामध्ये आगामी दोन दिवसांत कमी ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे," असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
शेतकऱ्यांवर पुन्हा संकट?
उत्तर केरळपासून मराठवाडा ते विदर्भापर्यंत कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळं ईशान्येकडील वाऱ्यांमुळं वातावरणात बदल झाला आहे.
याचा परिणाम म्हणजे राज्यासह मराठवाडा, विदर्भात कोरड्या वातावरणानंतर अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्यात परभणी, बीड, नांदेड आणि लातुरमध्येही काहीठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तर विदर्भात अकोला, अमरावती, भंडारा, वाशिम, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या सरींचा अंदाज व्यक्त केला आहे.
राज्यातल्या शेतकऱ्यांना यापूर्वी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळं मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे. त्यात पुन्हा एकदा हे संकट निर्माण झाल्यानं शेतकरी अधिक अडचणीत येण्याची शक्यता आहे.
सहा महिन्यांत अनेकदा अवकाळीचा फटका
राज्यात पावसाचा विचार करता गेल्या वर्षभरात आणि त्यातही गेल्या सहा महिन्यांमध्ये पावसाचं अगदीच अनिश्चित असं रुप पाहायला मिळालं आहे.
मुळात 2021 मध्ये राज्यात पावसाचं आगमन हे उशिरानं झालं होतं. मात्र, त्यानंतर अद्याप पाऊस परतलाच नाही, असं म्हणण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
सप्टेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 या काळात महाराष्ट्रात अनेक भागांत त्यातही मराठवाडा आणि विदर्भात 7 ते 8 वेळा अवकाळी पाऊस झाला. तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीटही झाली होती.
त्यात पुन्हा एकदा मराठवाडा आणि विदर्भात 19 व 20 फेब्रुवारीला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं दुष्काळानंतर अतिवृष्टी आणि अवकाळीच्या संकटानं या भागातील शेतकऱ्यांना घेरलं आहे.
अतिवृष्टी गारपीट यामुळं खरिपात झालेलं नुकसान रब्बीत भरून काढू अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. पण सततच्या अवकाळी पावसाच्या हजेरीमुळं रब्बीचा हंगामही हातचा जाणार अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









