राज ठाकरेंना 'हिंदुहृदयसम्राट' म्हणणाऱ्या बॅनर्समुळे मनसेच्या हिंदुत्वाची चर्चा #5मोठ्याबातम्या

राज ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

आज सकाळी विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा-

1. राज ठाकरेंना 'हिंदुहृदयसम्राट' म्हणणाऱ्या बॅनर्समुळे मनसेच्या हिंदुत्वाची चर्चा

घाटकोपरमध्ये राज ठाकरे यांच्या नावासमोर 'हिंदुहृदयसम्राट' असं लिहिलेले बॅनर लागल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिवसैनिक 'हिंदुहृदयसम्राट' असे म्हणत. आता थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच हिंदुहृदयसम्राट म्हणणारे बॅनर लागल्याने चर्चा होत आहे.

सोमवारी (14 फेब्रुवारी) घाटकोपरमध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या कार्यालयचं उद्घाटन होतं. त्यासाठी कार्यकर्त्यांनी भले मोठे बॅनर लावले होते. त्यावर राज ठाकरे यांच्या नावासमोर 'हिंदुहृदयसम्राट' असे लिहले होतं.

मुंबई महानगरपालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे. त्यातच थेट राज ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे 'हिंदुहृदयसम्राट' म्हटल्याने मनसेची महापालिका निवडणुकीतील दिशा काय असेल याचा अंदाज बांधला जात आहे.

एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

2. एबीजी शिपयार्ड घोटाळा युपीएच्या काळात- निर्मला सीतारामन

एबीजी शिपयार्ड बँकिंग घोटाळ्याबाबत केंद्र सरकारनं भूमिका मांडली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एबीजी घोटाळ्याबाबत तत्कालीन यूपीए सरकारकडे बोटं दाखवलं आहे.

यूपीए सरकारच्या कालखंडात एबीजीची सर्व बँक खाती एनपीएमध्ये वर्ग करण्यात आल्याचा दावा सीतारामन यांनी केला आहे.

निर्मला सीतारामन

फोटो स्रोत, Getty Images

एबीजी शिपयार्ड आणि त्यांच्या संचालकांच्या विरोधात तब्बल 28 बँकांसह 22,842 कोटींच्या आर्थिक फेरफार प्रकरणी प्राथमिक गुन्ह्याची नोंद केली आहे. एबीजी शिपयार्ड जहाज बांधणी आणि जहाज देखभाल क्षेत्रातील आघाडीची कंपनी मानली जाते.

देशातील आजवरचा सर्वात मोठा बँकिंग घोटाळा प्रकाशझोतात आल्याचा दावा याप्रकरणी सीबीआयनं केला आहे.

काँग्रेसने गुन्हा नोंद करण्यासाठी उशीर झाल्याचा आरोप केला आहे.

टीव्ही9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

3. 'सावित्रीबाईंचा प्लेगमध्ये काम करताना मृत्यू, पण आज पतीला करोना झाला, तरी...'

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात सावित्रीबाईंच्या पुतळ्याचं अनावरण केलं. यावेळी त्यांनी सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी केलेलं काम तसंच त्यांनी प्लेग आणि दुष्काळ या संकटात केलेल्या कामावर भाष्य केलं.

हे सांगताना कोश्यारी यांनी आज मात्र पतीला करोना झाला; तर पत्नी, मुलगा, मुलगी कोणीच त्याच्यासोबत राहत नाही किंवा त्याला पाहायला देखील जात नाही, असं वक्तव्य केलं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

"प्लेगच्या साथीने देशभरात थैमान घातले होते, तेव्हा सावित्रीबाईंनी नागरिकांना सेवा देण्याचे काम केले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. आता आपण ज्या कोरोना आजाराचा सामना करीत आहोत, त्यामध्ये पतीला करोना झाला, तर पत्नी, मुलगा आणि मुलगी कोणीच त्याच्यासोबत राहत नाही किंवा त्याला पाहायला देखील जात नाही. हे आपण पाहिले आहे," असं भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं.

"आज आपण सावित्रीबाई फुले यांच्या पावलावर पाउल ठेऊन पुढे जाण्याची गरज आहे," असंही कोश्यारी यांनी नमूद केलं.

लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

4. तुर्की एअरलाइन्सचे माजी अध्यक्ष इल्कर आइची एअर इंडियाचे नवीन CEO

एअर इंडियाचे नवीन सीईओ आणि एमडी म्हणून टाटा समूहाने इल्कर आइची यांची नियुक्ती केली आहे.

एअर इंडिया बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. इल्कर आइची यांना विमान कंपन्यांमध्ये मोठ्या पदांवर काम करण्याचा अनुभव आहे. ते तुर्की एअरलाइन्सचे माजी अध्यक्षही होते

टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरदेखील या बैठकीला विशेष निमंत्रक म्हणून उपस्थित होते.

आइची यांच्या नियुक्तीबद्दल बोलताना चंद्रशेखर यांनी म्हटलं की, इल्कर यांनी त्यांच्या कार्यकाळात तुर्की एअरलाइन्सचे नेतृत्व केले. इल्कर यांचे टाटा समूहात स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. ते एअर इंडियाला नवीन उंचीवर नेतील.

आइची यांच्या नियुक्तीच्या निर्णयाला नियामक मंडळाची मंजुरी मिळणे बाकी आहे.

लोकमतनं ही बातमी दिली आहे.

5. क्रिप्टोकरन्सीवर बंदी हाच भारतासाठी योग्य पर्याय- रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर

क्रिप्टोकरन्सी या पॉन्झी स्कीमप्रमाणे किंवा त्यापेक्षाही वाईट आहेत. त्यामुळे त्यावर बंदी घालणं हाच भारतासाठी योग्य पर्याय असू शकतो असं मत रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी. रबी संकर यांनी व्यक्त केलं.

क्रिप्टोकरन्सी

फोटो स्रोत, Getty Images

"क्रिप्टोकरन्सीला कोणत्याही चलनाची, मालमत्तेची व्याख्या लागू होत नाही. इथे पैसा खेळता राहत नाही. त्यांना मूलभूत किंमत नसते. त्यामुळेच क्रिप्टोकरन्सी या एखाद्या फसव्या योजनेप्रमाणे आहेत," असं मत रबी संकर यांनी व्यक्त केलं.

याच सर्व गोष्टींचा निष्कर्ष म्हणजे देशासमोर क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालणं हा एकच मार्ग खुला असल्याचंही त्यांनी म्हटलं.

एनडीटीव्हीनं ही बातमी दिली आहे.

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)