28 बँकांची तब्बल 22,842 कोटी रुपयांची फसवणूक, 'या' कंपनी विरोधात गुन्हा दाखल #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आजच्या वृत्तपत्रातील महत्त्वाच्या बातम्याचा थोडक्यात आढावा पाहूया,
1. 28 बँकांची तब्बल 22,842 कोटी रुपयांची फसवणूक, 'या' कंपनी विरोधात गुन्हा दाखल
ABG शिपयार्डने 28 बँकांची 22 हजार 842 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) ABG शिपयार्ड संस्थेचे अध्यक्ष ऋषी कमलेश अगरवाल यांच्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.
ABG शिपयार्ड कंपनी गुजरातमध्ये दहेज आणि सुरतमध्ये आहे. प्रामुख्याने कंपनीचं काम जहाज निर्मिती आणि दुरुस्तीचं आहे.
संबंधित गुन्हा एप्रिल 2012 ते जुलै 2017 दरम्यान झाल्याचं एफआयआरमध्ये म्हटलं आहे. तसंच ABG शिपयार्ड आणि ABG इंटरनॅशनल या दोन कंपन्यांची नावं एफआयआरमध्ये आहेत.
एएफआयआरनुसार, एबीजी शिपयार्डने एलआयसीची 136 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. तर एसबीआयला 2468 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. हा पैसा विदेशात पाठवल्याचा आणि गुंतवणूक केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
2. गांधी कुटुंबावर टीका करण्याची हिंमत बाळगावी - हिमंता बिस्वा सर्मा
देशाने आता गांधी कुटुंबावर टीका करण्याची हिंमत बाळगावी असं आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी म्हटलंय
"लष्कराचा अपमान करणं किंवा सर्जिकल स्ट्राईक केल्याचा लष्कराकडे पुरावा मागणे सर्वात मोठा गुन्हा आहे. राहुल गांधीबाबत मी बोललो तर तेलंगनाच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर टीका केली. पण लष्कराचा अपमान केला तेव्हा ह्यांनी ट्वीट का केलं नाही." सर्मा यांनी माध्यमांशी बोलताना हे स्पष्टीकरण दिलं. सकाळने हे वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK/HIMANTA BISWA SARMA
काही दिवसांपूर्वी सर्मा यांनी राहुल गांधींवर खालच्या पातळीची टीका केली होती. यानंतर त्यांच्यावर अनेकांनी तीव्र आक्षेप घेतला.
सर्जिकल स्ट्राईक केल्याचा लष्कराने पुरावा द्यावा असं राहुल गांधी म्हणाले होते. यावर प्रत्युत्तर देताना सर्मा म्हणाले, "राहुल गांधी हे माजी पंतप्रधान राजीव यांचे चिरंजीव आहेत याचा पुरावा कधी त्यांच्याकडे मागितला आहे का?"
आता पुन्हा एकदा हिमंता सर्मा यांनी गांधी कुटुंबावर निशाणा साधला. "गांधी कुटुंबाला तुम्ही काही बोलू शकत नाही ही मानसिकता या देशातून जायला हवी. त्यांनी लष्कराचा अपमान केला. दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्यावर टीका केली. पण तरीही गांधी कुटुंबाबाबत कोणी काहीही बोलत नाही."
3. 'दगड भिंतीच्या निर्जीव स्मारकात हे शक्य आहे का?', 'सामना'तून लतादीदींच्या स्मारकावरुन भाजपवर टीका
'भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार झाले हे चांगलंच झालं. याच ठिकाणी लता मंगेशकर यांचं स्मारक व्हावं अशी मागणी भाजपने केली आहेत. परंतु आधी बाळासाहेब ठाकरे आणि आता लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून असा सुरू करण्याची भाजपची ही रोगट मानसिकता आहे,' अशी टीका आज (13 फेब्रुवारी) सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून करण्यात आली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला, हिंदूंना जे दिले ते विसरता येण्यासारखे आहे का? लता दीदींनी तर सात दशके सूरस्वरांच्या माध्यमातून जगभरात आपलं संगीत पोहचवलं. ह्यांना विसरणं शक्य आहे का? त्यामुळे ह्यांची स्मारकं बनली काय आणि न बनली काय? काही फरक पडत नाही असंही खासदार संजय राऊत यांनी आपल्या 'रोखठोक' या सदरात म्हटलं आहे.
ते पुढे म्हणाले, 'दिल्लीतील मोदी सरकारने गांधी,नेहरू यांचे कार्य झाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण असे प्रयत्न करून गांधी,नेहरुंचे विस्मरण कोणाला होईल का?'
लता मंगेशकर यांच्या नावाने महाराष्ट्र सरकारने मेमोरियल आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची संगीत अकादमी उभारण्याची घोषणा केली आहे.
4. '10 मार्चनंतर महाविकास आघाडी सरकारवर सत्ता सोडण्याची वेळ येणार' - चंद्रकांत पाटील
पाच राज्यांच्या निवडणुकींच्या निकालानंतर अशी परिस्थिती निर्माण होईल की महाराष्ट्रातून महाविकास आघाडी सरकारलाही सत्तेवरून जावं लागेल असं भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा वर्तवलं आहे.
भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात पोलीस पक्षपातीपणे कारवाई करत असल्याचा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. ममहाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणाले, "महाविकास आघाडी सरकारची आताची परिस्थिती पाहिली तर कोणाही सांगू शकेल की हे सरकार आता जास्त काळ टिकणार नाही. आतापर्यंत दोन मंत्र्यांचे राजीनामे झाले. इतरांचेही येतील. पोलिसांच्या बदल्यांबाबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून आपल्याला यादी येत होती असं माजी मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी मान्य केलं आहे. तर देशमुख म्हणाले अनिल परब यांच्याकडून त्यांना यादी येत होती."
"तसंच परमबीर सिंह यांनी सचिन वाझे यांना पुन्हा नोकरीत घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी दबाव आणल्याचं म्हटलं आहे. अशी स्थिती निर्माण होईल की महाविकास आघाडीला सत्ता सोडावी लागेल," असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
5. 2 लाख किलो आणि 500 कोटी किमतीचा गांजा आंध्र प्रदेश सरकारने जाळला
आंध्र प्रदेश पोलिसांनी शनिवारी (12 फेब्रुवारी) तब्बल 2 लाख किलो वजनाचा आणि 500 कोटी रुपये किंमतीचा गांजा जाळून टाकल्याचं समोर आलं आहे. अंमली पदार्थांबाबतची राज्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं मानलं जात आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
ऑक्टोबर 2021 मध्ये आंध्र प्रदेश सरकारने 'मिशन परिवर्तन' ही मोहीम सुरू केली होती. या अंतर्गत गेल्या तीन महिन्यात पोलिसांनी 2 लाख किलोचा गांजा जप्त केला. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.
या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी आतापर्यंत 8 हजार 500 एकरवर असलेल्या गांजाच्या शेतीवर कारवाई केली आहे.
एकूण 1 हजार 363 गुन्हे नोंद करण्यात आले असून 1 हजार 500 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी 562 आरोपी हे इतर राज्यातले असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









