राहुल बजाज यांचं निधन: जेव्हा भर कार्यक्रमात अमित शाहांना सुनावलं होतं

ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं निधन झालं आहे. ते 83 वर्षांचे होते.

भारतातील प्रसिद्ध बजाज कंपनीचे राहुल बजाज सर्वेसर्वा होते. बजाज कंपनीला देशातील उद्योग क्षेत्रात आघाडीवर नेण्यात राहुल बजाज यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 रोजी झाला. त्यांनी अर्थशास्त्र आणि विधी या विषयांमध्ये आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. पुढे त्यांनी हॉर्वर्ड विद्यापीठातून MBA चं शिक्षणही घेतलं.

राहुल बजाज हे बजाज ऑटोमध्ये रुजू झाल्यानंतर त्यांनी या उद्योगामध्ये कंपनीला पुढे नेण्यात प्रयत्न केले.

उद्योग क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी राहुल बजाज यांना 2001 साली पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं.

राहुल बजाज यांनी बजाज ऑटो कंपनीची धुरा सुमारे 50 वर्षं सांभाळली. त्यानंतर गेल्या वर्षी त्यांनी कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

जेव्हा भर कार्यक्रमात अमित शाहांना सुनावलं होतं..

राहुल बजाज यांना त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखलं जायचं. कोणत्याही पक्षाचं सरकार असो ते त्यांच्याबाबत स्पष्ट शब्दात आपलं मत नोंदवायचे.

2019 साली राहुल बजाज यांचा अमित शाह यांच्यासोबत झालेला वादविवाद चर्चेत आला होता.

त्यावेळी बजाज यांनी केंद्र सरकारवर कठोर शब्दांत टीका करताना हे सरकार भीती आणि अनिश्चिततेचं वातावरण निर्माण करत असल्याचं म्हटलं होतं.

30 नोव्हेंबर 2019 रोजी मुंबईमध्ये पार पडलेल्या Economic Times Awards कार्यक्रमात बजाज बोलत होते. त्यावेळी त्यांच्यासमोर अमित शाह हेसुद्धा उपस्थित होते.

राहुल बजाज त्यावेळी म्हणाले, "आम्ही तुमच्याकडून जरा चांगल्या उत्तराची अपेक्षा करतो, फक्त गोष्टी फेटाळू नका. यूपीएच्या काळात सरकारला टीका करण्याचं स्वातंत्र्य होतं. सध्या मात्र सरकारला टीका सहन होत नाही. लोक सरकारला प्रश्न का विचारू शकत नाहीत?"

राहुल बजाज यांनी हा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांना उद्देशून विचारला होता.

बजाज यांच्या प्रश्नाला उत्तर देताना शाह यांनी म्हटलं, की कोणी घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही.

दरम्यान, बजाज यांनी अमित शाह यांना खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसेंबद्दल केलेल्या विधानासंबंधीही प्रश्न विचारला.

"गोडसे दहशतवादी होता, यामध्ये कोणतीही शंका आहे का?" असं राहुल बजाज यांनी विचारलं. यावर उत्तर देताना अमित शाह यांनी पक्षानं प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे, असं स्पष्ट केलं होतं.

महात्मा गांधींचा 'पाचवा मुलगा'

जून 1938 मध्ये जन्मलेले राहुल बजाज भारताच्या त्या निवडक उद्योजक कुटुंबातील होते, ज्यांचं नातं थेट देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंशी होतं.

राहुल बजाज यांचे आजोबा जमनालाल बजाज यांनी 1920 च्या दशकात 20 हून अधिक कंपन्यांच्या बजाज कंपनी समूहाची स्थापना केली होती.

राजस्थानातील मारवाडी समाजातून येणाऱ्या जमनालाल बजाज यांना त्यांच्या दूरच्या नातेवाईकानं दत्तक घेतलं होतं. हे नातेवाईक महाराष्ट्रातील वर्ध्यात राहायचे. त्यामुळे वर्ध्यातूनच जमनालाल बजाज यांनी त्यांच्या उद्योगाला सुरुवात केली. त्यानंतर ते महात्मा गांधीजींच्या संपर्कात आले आणि त्यांच्या आश्रमासाठी जमनालाल बजाज यांनी जमीन दान दिली.

जमनालाल बजाज यांना पाच मुलं होती. कमलनयन हे त्यांचे सर्वात मोठे पुत्र होय. त्यानंतर तीन बहिणींनीतर रामकृष्ण बजाज सर्वात लहान भाऊ.

राहुल बजाज हे कमलनयन बजाज यांचे थोरले पुत्र. राहुल यांची मुलं राजीव आणि संजीव हे सध्या बजाज ग्रुपच्या कंपन्या सांभाळतात. काही इतर कंपन्या राहुल बजाज यांचे लहान भाऊ आणि चुलत भाऊ सांभाळतात.

बजाज कुटुंबाला जवळून ओळखणारे सांगतात की, जमनालाल बजाज यांना महात्मा गांधींचा 'पाचवा मुलगा' म्हटलं जायचं. त्यामुळे नेहरूही जमनालाल बजाज यांचा आदर करायचे.

'लायसन्स राज' मध्ये बजाज

कमलनयन बजाज यांच्या प्रमाणेच राहुल बजाज यांनीही परदेशात शिक्षण घेतलं. दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी घेतल्यानंतर राहुल यांनी जवळपास तीन वर्षं बजाज इलेक्ट्रिकल्स कंपनीत प्रशिक्षण घेतलं. याच दरम्यान त्यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं.

60 च्या दशकात राहुल बजाज यांनी अमेरिकेतल्या हार्वड बिझनेस स्कूलमधून MBAची पदवी घेतली.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 30 वर्षांच्या राहुल बजाज यांनी 1968मध्ये 'बजाज ऑटो लिमिटेड'चं सीईओपद स्वीकारलं त्यावेळी ते अशा उच्च पदावरचे सर्वांत तरूण भारतीय असल्याची चर्चा झाली होती.

त्या काळाविषयी अर्थतज्ज्ञ मोहन गुरुस्वामी म्हणतात, "राहुल बजाज यांच्या हाती कंपनीची धुरा आली तेव्हा देशात लायसन्स राज होतं. म्हणजे देशभरात अशी काही धोरणं-नियम होते ज्यामुळे सरकारच्या मर्जीशिवाय उद्योगपतींना काहीही करता येत नव्हतं. व्यापाराच्या दृष्टीने ही कठीण परिस्थिती होती.

मर्यादित उत्पादन होत होतं. ईच्छा असूनही उद्योगपती मागणी पूर्ण करू शकत नव्हते. असं म्हटलं जायचं की कोणी स्कूटर बुक केली, तर अनेक वर्षांनी डिलीव्हरी मिळायची. म्हणजे ज्या परिस्थितीत इतरांना काम करणंही कठीण जात होतं, त्याच परिस्थितीत बजाज यांनी तथाकथितपणे निरंकुश पद्धतीने उत्पादन केलं आणि स्वतःच्या कंपनीला देशातल्या सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी एक करण्यात यश मिळवलं."

'हमारा बजाज...'

70-80 च्या काळात राहुल बजाज यांची ओळख युथ आयकॉन म्हणून बनली होती. त्यांच्या कंपनीची चेतक ही स्कूटर त्या काळात विशेष लोकप्रिय होती.

"या स्कूटरचं 1 लाख उत्पादन करण्याची परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली होती. पण सरकारने त्यांना फक्त 80 हजार स्कूटर तयार करण्याची परवानगी दिली. त्यावरून त्यांची सरकारसोबत खडाजंगी झाली होती," असं आलोक जोशी सांगतात.

त्या काळी उत्पादन घेण्याआधी सरकारकडून परवानगी घ्यावी लागत होती. त्यावेळीसुद्धा त्यांनी सरकारच्या विरोधात भूमिका घेतली.

पुढे 1991 ला खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्यामुळे अशा प्रकारचा प्रसंग पुन्हा निर्माण झाला नाही, असं ते सांगतात.

रोहित चंदावरकर सांगतात, "बजाजची स्कूटर ऐतिहासिक ठरली होती. तिने भारतीय बाजारपेठेत वेगळं स्थान प्राप्त केलं होतं. या स्कूटरसाठी पंधरा-पंधरा वर्षे वेटिंग लिस्ट असायची. चेतकची हमारा बजाज ही जाहिरात आजसुद्धाअनेकांच्या लक्षात असेल."

गेल्या दोन दशकांमध्ये राहुल बजाज यांनी अनेक मोठ्या मुलाखतींदरम्यान 'लायसन्स राज' चुकीचं होतं असं म्हणत यावर टीका केलेली आहे.

बजाज चेतक (स्कुटर) आणि नंतर बजाज पल्सर (मोटरसायकल) यासारख्या उत्पादनांमुळे त्यांच्या ब्रँडची बाजारातली विश्वासार्हता वाढल्याचं त्यांनी अनेकदा म्हटलंय. यामुळेच त्यांच्या कंपनीची उलाढाल 1965 मधील तीन कोटींवरून 2008 मध्ये जवळपास 10,000 कोटींवर गेला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)