हृदयनाथ मंगेशकर आणि आकाशवाणीबाबतचा वाद काय आहे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी ऑल इंडिया रेडिओवर सावरकरांची एक कविता प्रसारित केली म्हणून त्यांना काढून टाकण्यात आलं होतं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत म्हणाले.
कॉंग्रेसच्या काळात अभिव्यक्तीच्या संदर्भात कशी गळचेपी होत होती याचं उदाहरण देताना मोदींनी हृदयनाथ मंगेशकर यांचा दाखला दिला होता.
मोदींच्या संसदेतल्या वक्तव्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या.
खरंच ह्रदयनाथ मंगेशकर यांना सावरकरांची कविता प्रसारित केली म्हणून काढून टाकण्यात आलं होतं का? ह्रदयनाथ मंगेशकर खरंच आकाशवाणीमध्ये काम करत होते का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
पंतप्रधान संसदेत काय म्हणाले होते?
"लता मंगेशकर यांच्या निधनाने आज देश दुःखी आहे. लता मंगेशकर यांचा परिवार गोव्याचा आहे. त्यांच्या परिवारासोबत कसं वागण्यात आलं हे सुद्धा देशाला कळायला हवं. लता मंगेशकर यांचे छोटे बंधू पंडित ह्रदयनाथ मंगेशकर गोव्याच्या मातीचे सुपुत्र, त्यांना ऑल इंडिया रेडिओवरुन काढून टाकण्यात आलं होतं. त्यांचा गुन्हा काय होता? तर त्यांच्या गुन्हा होता की त्यांनी वीर सावरकरांच्या देशभक्तीवरील एका कवीतेची ऑल इंडिया रेडिओवर प्रस्तुती केली. ह्रदयनाथ जी यांनी एका मुलाखतीत हे सांगितलं होतं," असं मोदी त्यांच्या भाषणात म्हणाले होते.
घटनात्मक पदावरील व्यक्तीने खोटं बोलू नये - संजय राऊत
मोदींच्या संसदेतील वक्तव्यावर माध्यमांशी बोलताना घटनात्मक पदावरील व्यक्तीने खोटं बोलू नये, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
राऊत म्हणाले, "मला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून मी सागरा प्राण तळमळला हे मंगेशकरांच गाणं आकाशवाणीवरच ऐकलं आहे. हे गाणं लोकप्रिय करण्याचं काम आकाशवाणीने केलंय. माणसाने किती खोटं बोलावं. विशेषतः घटनात्मक पदावरील व्यक्तीने खोटं बोलू नये हे आमचे संकेत आहेत. पण मी प्रधानमंत्र्यांना वंदन करतो."
पुढे राऊत म्हणाले, "ऑल इंडिया रेडिओमध्ये 36 वर्षं काम केलेले महेश केळुस्कर यांचं निवेदन ऐकत होतो. त्यांना आश्चर्य वाटलं. एखादं गाणं संगितबद्ध केल्याबद्दल एखाद्या संगितकाराला काढलं असेल तर ते गाणं वाजवणार नाहीत ना आकाशवाणीवर. आजही हे गाणं मी आकाशवाणीवर ऐकतो. वीर सावरकरांबाबत आमची भक्ती आहे अशी नौटंकी नाहीये."
ह्रदयनाथ मंगेशकर खरंच आकाशवाणीला काम करत होते?
आकाशवाणीमध्ये 36 वर्षं विविध पदांवर काम केलेले महेश केळुस्कर यांनी ह्रदयनाथ मंगेशकर आकाशवाणीमध्ये काम करत होते याचे रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचं म्हणतात. मुंबई तकने प्रसिद्ध केलेल्या व्हीडिओमध्ये त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
केळुसकर म्हणाले, "माझ्या नोकरीच्या संपूर्ण कालावधीमध्ये मला जुन्या माणसांपैकी कुणीही असं म्हंटलं नाही की पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची आकाशवाणीवर नियुक्ती झाली होती. आकाशवाणीवर परीक्षा देऊन नियुक्ती केली जाते. कायम नियुक्ती असलेल्या व्यक्तीला तडकाफडकी काढून टाकता येत नाही. त्याची केस तयार करून संयुक्तिक कारण असेल तर समिती निर्णय घेते काय करायचं. हृदयनाथ मंगेशकर यांचं सर्विस रेकॉर्ड आकाशवाणीकडे उपलब्ध नाही अशी माहिती आहे."

फोटो स्रोत, Getty Images
"दुसऱ्या प्रकारात कॉन्ट्रॅक्टवर लोकांना घेतलं जातं आणि कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर त्यांचं काम संपतं. माझ्या अंदाजानुसार हृदयनाथ मंगेशकर जे सांगत आहेत की सागरा प्राण तळमळला हे गाणं संगितबद्ध केल्यामुळे त्यांना काढण्यात आलं हे खरं वाटत नाही. ते कदाचित कॉन्ट्रॅक्टवर काम करत असतील. कॉन्ट्रॅक्ट कधीही रद्द करण्याचा अधिकार स्टेशन डायरेक्टरला असतो. परंतु सागरा प्राण तळमळला यासाठी त्यांना काढून टाकण्यात आलं त्याला काय आधार आहे असा प्रश्न निर्माण होतो.
मी सावरकरांच्या माझी जन्मठेप या पुस्तकाचा कार्यक्रम आकाशवाणीवर केला तेव्हा मला कुठलीही प्रशासकीय अडचण आली नाही. हे करु नका असं कोणी सांगितलं नाही. सागरा प्राण तळमळला हे गाणं खरंतर आकाशवाणीने लोकप्रिय केलं. हजारो वेळा हे गाणं आकाशवाणीवर वाजलं आहे," असं देखील केळुसकर म्हणतात.
हृदयनाथ मंगेशकर यांना आकाशवाणीवरून काढून टाकण्यात आल्याबाबतचा प्रसंग स्वतः मंगेशकर यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितला होता.
मंगेशकर सांगतात, "मी 1955 साली आकाशवाणीवर कामाला होतो. त्यावेळी मला 500 रुपये पगार होता. आज ते फार कमी वाटतात त्यावेळी वय फक्त 17 वर्षं होतं."
सावरकरांबाबतची आठवण सांगताना मंगेशकर म्हणतात, "मी आयुष्यातील सर्वांत मोठा प्रयोग केला. मी सावरकरांकडे गेलो. त्यांना म्हणलो तुम्ही तर एवढे मोठे कवी. तुमची एखादी कविता द्या ना मला चाल लावायला. तर ते म्हणाले, का तुला कारागृहात जायचे का?
"तेव्हा म्हणालो तुमच्या कवितेला चाल लावल्याने कशाला कारागृहात जाईल? त्यावेळी ते म्हणाले, येईल तुला अनुभव. त्यांनी मला 'ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला' ही कविता दिली. त्या कवितेला मी चाल लावली. ती ध्वनिमुद्रित झाली. सर्व खुश झाले. दुसऱ्या दिवशी कारणे दाखवा नोटीस आली. ही कविता का वापरली म्हणून विचारणा करण्यात आली.
मी दोन मोठी कारणं दिली, फार मोठा कवी आणि फार मोठी कविता म्हणून निवडली असे उत्तर पाठवले. आकाशवाणीने नोकरीवरून काढूनच टाकले," असं मंगेशकर त्या मुलाखतीत सांगतात.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता









