अजिंक्य रहाणे : मेलबर्न टेस्ट, विराट कोहलीची सुट्टी आणि भारतीय क्रिकेटमधला श्रेयवाद

फोटो स्रोत, NurPhoto
- Author, ऋजुता लुकतुके
- Role, बीबीसी मराठी
अजिंक्य रहाणे हा काही 'अँग्री यंग मॅन' नाही. उलट कुठल्याही प्रकारचा वाद आणि अगदी सेलिब्रेशनमध्येही तो दोन पावलं मागेच असतो. पण, भारतीय टेस्ट टीममधला तो 'टीम मॅन' आहे. टीमच्या गरजेला धावून जाणारा आणि आपलं काम चोख करणारा.
ज्येष्ठतेनुसार त्याला टेस्ट टीमची उपकप्तानीही मिळाली. आणि 2020-21 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने या जबाबदारीलाही न्याय दिला.
अँडलेडमध्ये 36 रन्समध्ये बॅटिंगचं पानिपत होऊन टीमचा मानहानीकारक पराभव झालेला असताना त्याने पुढची मेलबर्न टेस्ट भारताला हंगामी कप्तान म्हणून जिंकून दिली.
आणि त्यानंतर ब्रिस्बेन टेस्ट जिंकत बोर्डर-गावस्कर चषक भारताकडेच ठेवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. हे करताना त्याने स्वत:ही मेलबर्नमध्ये शतक झळकवलं.
विराट कोहलीची आक्रमक कप्तानी आणि मैदानावरची आक्रमक देहबोली याच्या तुलनेत शांत, समंजस आणि धीरगंभीर वागणारा अजिंक्य रहाणे तेव्हा कप्तान म्हणूनही अनेकांना आवडला होता.
पण, ऑस्ट्रेलियातल्या त्या विजयानंतर एक सल अजिंक्य रहाणेच्या मनात राहिली आहे. आणि आज दोन वर्षांनंतर एका खाजगी मुलाखतीत त्याने ती बोलून दाखवली आहे.
'मैदानावर मी घेतलेल्या निर्णयांसाठी मला क्रेडिट मिळालं नाही'
क्रीडा पत्रकार बोरिया मुझुमदार यांच्या बॅकस्टेज विथ बोरिया या कार्यक्रमात बोलताना अजिंक्यने आपलं मन मोकळं केलं. "प्रत्यक्ष मैदानात आणि ड्रेसिंग रुममध्ये काही निर्णय मी घेतले. मला त्या क्षणी वाटलं म्हणून उत्स्फूर्तपणे मी ते निर्णय घेतले. पण, त्या निर्णयांचं श्रेय कुणी दुसरीच व्यक्ती घेत आहे."
त्यानंतर आपल्या स्वभावाप्रमाणे अजिंक्य असंही म्हणाला की, "मैदानावर नेमकं काय झालं आणि कुठले निर्णय माझे होते हे मला माहीत आहे. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा हे मी केलं, ते मी केलं हे सांगत बसणार नाही. कुठल्या गोष्टीचं श्रेय एकट्याकडे घेणं माझ्या तत्त्वातही बसत नाही."
अजिंक्याच्या म्हणण्यानुसार, भारतीय टीमने ती सीरिज जिंकली हे जास्त महत्त्वाचं होतं. आणि संघ व्यवस्थापनाकडे त्याने आपली बाजू तेव्हाही मांडली होती. पण, तेव्हाही त्याचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोण 'जाऊ दे, झालं ते झालं,' असा होता. ती गोष्ट आपण 'हसण्यावारी' नेली, असंही तो म्हणाला आहे.

फोटो स्रोत, Quinn Rooney
मीडियामध्ये मात्र अर्थातच त्यानंतर चर्चा सुरू झाली की, अजिंक्यने बोट नक्की कुणाकडे दाखवलं आहे. आणि तो म्हणत असलेला निर्णय नेमका कुठला? काहींनी अजिंक्यची टीका विराट कोहलीवर असल्याचा अर्थही काढला आहे.
पण, विराट कोहली तेव्हा स्वत: आपल्या मुलीच्या जन्मासाठी रजा घेऊन भारतात परतलेला होता. आणि त्यानंतर कुठल्याही मुलाखतीत त्याने ऑस्ट्रेलियातल्या टीमच्या कामगिरीबद्दल अवाक्षरही काढलेलं नाही. तो ऑस्ट्रेलियात असतानाच पहिल्या अॅडलेड टेस्टमध्ये टीम 36 रनवर ऑलआऊट झाली. आणि पुढे तो भारतात परतल्यावर अजिंक्यने फासे पलटवले. त्यासाठी विराटने कधीच विजयाचं श्रेय घेतलेलं नाही.
पण, तेव्हाचे भारतीय टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मात्र काही मुलाखतींमध्ये ऑस्ट्रेलियातील भारताच्या पलटवारासाठी मधल्या फळीतले बॅट्समन आणि खासकरून जसप्रीत बुमरा आणि आर अश्विन हे बॉलर यांना विजयाचं श्रेय दिलं आहे.
मेलबर्नमधल्या विजयानंतर टीममध्ये कशी विजयश्री संचारली याचं वर्णनही शास्त्री यांनी या मुलाखतीत केलं आहे. म्हणजेच अजिंक्यचा रोख हा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडेच आहे.
अजिंक्यचं हंगामी नेतृत्व आणि भारतीय टीमचा सीरिज विजय
कुठल्या निर्णयावरून वाद झाला हे समजण्यापूर्वी भारतीय टीममधली तेव्हाची परिस्थिती आणि मैदानाबरोबरच बाहेर ड्रेसिंग रुममध्ये काय घडत होतं, हे ही पाहिलं पाहिजे.

फोटो स्रोत, Scott Barbour
नोव्हेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 असा तो भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा होता. प्रत्येक ऑस्ट्रेलिया दौरा तिथल्या वेगवान खेळपट्ट्या आणि त्याचा फायदा उठवू शकणारे मिशेल स्टार्क, जोश हेजलवूड सारखे वेगवान बॉलर यांच्यामुळे भारतासाठी आव्हानात्मकच असतो.
पण, यावेळी वन डे आणि टी-20मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला चांगला लढा दिला. वन डे सीरिज 1-2 असी गमावली असली तरी टी-20मध्ये भारतीय टीमने 2-1 असा विजयही मिळवला.
त्यानंतर डिसेंबर महिन्यात पहिल्याच अॅडलेड टेस्टमध्ये भारतीय टीम दुसऱ्या इनिंगमध्ये 36 रनवर ऑलआऊट झाली. ही टेस्टही भारतीय टीमने 8 विकेटनी गमावली.
36 हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातला टीमचा निच्चांकी स्कोअर होता. त्यामुळे अर्थातच टीमवर टीकाही झाली. आणि टीम खचलेली असताना कप्तान विराट कोहलीही मुलीच्या जन्मासाठी भारतात परतला.
हे कमी म्हणून की काय, मयंक अगरवाल, रोहीत शर्मा, के एल राहुल असे महत्त्वाचे बॅट्समन आणि महम्मद शामी, उमेश यादव असे बोलर्स दुखापतग्रस्त झाले.
आधीच पराभवामुळे पाठ भींतीला टेकलेली त्यातच दुखापतग्रस्त खेळाडूंची वाढत जाणारी रांग यामुळे दुसऱ्या मेलबर्न टेस्टपूर्वी भारतीय ड्रेसिंग रुममधलं वातावरण फारसं बरं नव्हतं.

फोटो स्रोत, Getty Images
एका वर्तमानपत्राने भारतीय ड्रेसिंग रुमची तुलना रुग्णालयातल्या अतीदक्षता विभागाशी केली होती, जायबंदी खेळाडूंची संख्या बघून…
अशावेळी हंगामी कप्तान म्हणून अजिंक्य रहाणेनं बॉक्सिंग डे टेस्टसाठी टीमची कमान आपल्या हाती घेतली. आणि टेस्ट मॅचच्या एक दिवस आधी आपल्या नेहमीच्या शांत आवाजात त्याने खेळाडूंसाठी ड्रेसिंग रुममध्ये एक छोटंसं भाषणही केलं.
हे भाषण सीरिज संपल्यानंतर बीसीसीआयने आपल्या बीसीसीआय टीव्ही या युट्यूब चॅनलवर प्रसारितही केलं होतं.
आपल्या भाषणात एक एक वाक्य शांतपणे उच्चारत त्याने खेळाडूंना जबाबदारी ओळखून खेळा असा सल्ला दिला. आणि त्यानंतर आधीच्या पराभवामुळे पाठ भिंतीला टेकलेले खेळाडू मागची वाट बंद झाल्यामुळे आता पुढेच जाता येईल या त्वेषाने खेळले. आणि चक्क मेलबर्न टेस्ट भारताने आठ विकेटनी जिंकली.
पण, आता याच टेस्टमधल्या एका निर्णयावरून अजिंक्यने श्रेयवाद सुरू केला आहे.
कुठल्या निर्णयाच्या श्रेयावरून होतोय हा वाद?
मेलबर्न टेस्टमध्ये पहिल्या इनिंगमध्ये जसप्रीत बुमरा आणि उमेश यादव यांच्या पाठोपाठ आठव्याच ओव्हरमध्ये कप्तान अजिंक्य रहाणेनं ऑफस्पिनर आर अश्विनला बॉलिंगला आणलं. आणि त्याने जम बसलेल्या ओपनर मॅथ्यू वेड बरोबरच स्टिव्ह स्मिथ आणि कॅप्टन टीम पेन यांच्या महत्त्वाच्या विकेट झटपट घेतल्या. अश्विनने 24 ओव्हरमध्ये 35 रन देत मोक्याच्या तीन विकेट घेतल्या.

फोटो स्रोत, Getty Images
एरवी उसळत्या खेळपट्टीवर स्पिनरला सुरुवातीला बॉलिंगला आणण्याचा निर्णय धाडसीच म्हणावा लागेल. पण, यालाच इनोव्हेशन किंवा कल्पक विचार म्हणतात.
अजिंक्यच्या म्हणण्यानुसार, अश्विनला आणण्याचा निर्णय त्याने उत्स्फूर्तपणे खेळपट्टीचं स्वरुप पाहून घेतला होता. आणि तो सर्वस्वी त्याचा निर्णय होता.
पण, टेस्ट मॅचनंतर रवी शास्त्रीने या टेस्टचे अनुभव सांगताना काही वेळा या प्रसंगाचं वर्णन निर्णय स्वत:चा असल्यासारखं केलं आहे.
विशेष म्हणजे क्रिकइन्फो या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत रवी अश्विननेही एकदा या निर्णयाचं श्रेय शास्त्री यांना दिलं आहे. या मुलाखतीत तो म्हणतो, "मी अजून तयारही नव्हतो. पण, ड्रेसिंग रुममध्ये शास्त्री माझ्याकडे आले. मला म्हणाले, आज तू पहिल्या दहा ओव्हरमध्येच बोलिंगला ये. मी तसं रहाणेला सांगितलंय. खेळपट्टीत ओलसरपणा आहे. त्याचा तू छान फायदा उचलशील."
अश्विनने पुढे याचंही वर्णन केलं आहे की, त्याचा पहिलाच बॉल कसा हातभर वळला. आणि स्पिनला खेळपट्टी साथ देत असल्याचं पाहून त्याला स्फुरण चढलं.
अजिंक्यने बोरिया मुझुमदार यांना दिलेल्या उदाहरणांमध्ये काही हा एकच प्रसंग नाही. आणि कप्तान म्हणून या एकच नाही तर पुढच्या तीन टेस्टमध्ये अजिंक्यच्या नेतृत्वाखाली टीमने चांगली कामगिरी केली, महत्त्वाचं म्हणजे हार मानली नाही हे खरंच आहे. मीडियामध्ये शांत पण, धीरगंभीर नेतृत्वासाठी अजिंक्यचं तेव्हा कौतुकही झालं.
आज मात्र अचानक हा श्रेयवादाचा वाद पुढे आला आहे. आणि अश्विनच्या जुन्या मुलाखतीमुळे एकतर काही तरी गडबड आहे. किंवा भारतीय टीममध्ये दोन तट आहेत, असं वातावरण तयार झालं आहे. पण, खरं काय आहे?
अजिंक्यचं म्हणणं कितपत योग्य?
अजिंक्यच्या ताज्या वक्तव्याच्या टायमिंगकडे येऊया. मेलबर्नच्या त्या टेस्टमध्ये अजिंक्य रहाणेनं 112 रन केले हे खरं आहे. पण, मागच्या दोन वर्षातली त्याची ही एकमेव सेंच्युरी आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या मेलबर्न टेस्ट नंतर तो एकूण तेरा टेस्ट मॅच खेळला आहे. आणि यात 20.80च्या सरासरीने त्याने 489 रन केले आहेत. या कालवधीत त्याच्या नावावर आहेत दोन हाफ सेंच्युरी.
नुकत्या संपलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात तर त्याने सहा इनिंगमध्ये 136 रन केले आहेत. त्याच्या घसरलेल्या फॉर्ममुळेच उपकप्तानीही त्याच्या हातून गेली.
आणि आगामी काळात टेस्ट टीममधलं स्थानही तो गमावू शकतो. आयपीएलच्या लिलावात त्याला कितपत मागणी असेल यावरही प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे अशावेळी फॉर्म परत मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे की, असे वाद उकरून काढायचे हा खरा प्रश्न आहे.
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि क्रिकेटविषयी सकस लिखाण केलेले विजय लोकपल्ली अजिंक्यच्या विधानाचं टायमिंग आणि श्रेयवाद उकरून काढायची कृती आवडलेली नाही.
"ऑस्ट्रेलियातल्या विजयाचं श्रेय आपल्याला मिळालं नाही, असं त्याला का वाटावं? मीडियाने तर त्यावेळी त्याचं भरपूर कौतुक केलं होतं. तीन टेस्टमध्ये त्याने टीमचं नेतृत्व केलं. टीममधला तो महत्त्वाचा खेळाडू होता. पण, त्याने गेलेला फॉर्म परत मिळवण्यापेक्षा नको त्या गोष्टीकडे लक्ष वळवलंय," लोकपल्ली यांनी आपलं म्हणणं मांडलं.
साबा करीम, रॉबिन सिंग यासारख्या खेळाडूंनी सुरुवातीला मिळालेल्या संधीनंतर पुन्हा टीममध्ये येण्यासाठी सहा-सहा वर्षं झगडा दिला याची आठवणही विजय लोकपल्ली यांनी करून दिली.
त्यांच्या मते अजिंक्यनेही खेळाची आणि स्वत:ची प्रतिष्ठा राखण्यासाठी रणजी ट्रॉफीत पुन्हा रन करून फॉर्म मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते.
आणखी एक मुद्दा तें मांडतात.
"भारतीय क्रिकेटमध्ये कुठल्याही खेळाडूला कधी असं विजयाचं श्रेय एकट्याला घेताना मी पाहिलेलं नाही. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. इथं तुम्ही कामगिरी करता आणि जिंकते ती तुमची टीम.

फोटो स्रोत, AFP Contributor
सचिन, सुनील, धोणी किंवा अगदी विराटनेही कधी कुठला निर्णय किंवा विजयासाठी एकट्याने श्रेय मागितलेलं नाही. मग टीम मॅन अशी प्रतिमा असलेल्या अजिंक्यने अचानक असं श्रेयासाठी का आतुर व्हावं?" असा प्रश्नच विजय लोकपल्ली यांनी विचारला.
यामागे अजिंक्य किंवा आणखी कुणाचा छुपा अजेंडा असावा अशी शंकाही त्यांनी बोलून दाखवली.
अजिंक्यच्या मनात नेमकं काय धुमसतंय?
तशीही भारतीय क्रिकेटसाठी मागची दोन वर्षं साधी नव्हतीच. 2019च्या वन डे वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलमध्ये झालेला पराभव, टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पत्करलेली हार, त्यानंतर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेबरोबरच्या टेस्ट सीरिजमधले पराभव, यामुळे भारतीय टीममधले अनेक वाद मधल्या काळात बाहेर आले.
यात गाजला तो रोहीत शर्मा आणि विराट कोहली यांच्यामधला वाद. आणि विराट कोहलीचं आर अश्विनला संधी न देणं… विराट कोहली आणि रवी शास्त्री ही जोडी भारतीय क्रिकेटमध्ये एकाधिकारशाही राबवतेय का, काही निर्णय रेटून स्वत:ला हवे तसे घेतले जातायत का यावरही मीडियामध्ये चर्चा रंगली.
यापूर्वी विराट कोहलीशी जमत नसल्यामुळेच आधीचे कोच अनिल कुंबळे यांनी पदाचा राजिनामा दिला होता. आणि त्यानंतर कोच म्हणून आपल्याला रवी शास्त्री आवडतील असं जाहीर विधान विराट कोहलीने केलं होतं.
त्याप्रमाणे रवी शास्त्री कोच झालेही. म्हणूनच टीममधले खेळाडू आणि इतर नियुक्त्या करतानाही विराट कोहली आक्रमकपणे आपलं तेच खरं करतो का असंही बोललं जाऊ लागलं.

फोटो स्रोत, Delhi Capitals
विराट कोहलीची नियुक्ती झाली तेव्हा बीसीसीआयवर लोढा समितीच्या निर्णयामुळे कुठलंही कार्यकारी मंडळ नव्हतं. क्रिकेटविषयक समिती होती. निवडणुका होऊन नवी कार्यकारिणी स्थापन झाली ती अलीकडे 2020मध्ये. त्यामुळेच विराटच्या एकछत्री अंमलाला विरोध करेल असा कुणी बीसीसीआयमध्ये नव्हता.
स्वत: अजिंक्यने ऑस्ट्रेलिया दौऱ्या दरम्यानच काही खेळाडूंना बरोबर घेऊन टीम व्यवस्थापनाविषयी बीबीसीआयकडे ईमेल करून लेखी तक्रार केली होती. तशी बातमी तेव्हा एका विश्वसनीय वर्तमानपत्राने दिली होती.
पण, सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदी आले. जय शाह, अजय सिंग धुमाण विश्वस्त झाले. आणि बोर्डाच्या कारभार त्यांच्या हातात आला. तिथून त्यांनी विराटच्या हातातली सत्ता आवळायलाही सुरुवात केली.
टी-20 आणि पाठोपाठ वन डे टीमचं नेतृत्वही विराटला गमवावं लागलं. टी-20 कप्तानीचा निर्णय आपला नव्हता असं सांगून विराटने अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याशीही शाब्दिक वाद घातला.
पण, मधल्या काळात विराटकडे जवळपास सगळी सूत्रं होती तेव्हा अनेक खेळाडूंची घुसमट झाल्याच्या चर्चा होत होत्या. इथं चर्चा म्हणण्याचं कारण, तसं कधी उघडपणे कुणी म्हटलं नाही. अजिंक्यने बोर्डाला लिहिलेलं ईमेलही त्याच काळातलं आहे. हा मनातला उद्वेग आज बाहेर आला आहे का?
विजय लोकपल्ली यांच्या मते, दोन वर्षं मनात जे धुमसत होतं ते आज बाहेर पडलंय. पण, तरीही ही वेळ योग्य नाही.
"इतकी वर्षं मनात जे साचलं होतं ते बाहेर आलंय हे खरं आहे. पण, तरीही आता बोलणं योग्य नव्हतंच. सहा-सहा वर्षंही ज्यांना टीममध्ये संधी मिळाली नाही, असे खेळाडू प्रयत्न करत राहतात. मग, अजिंक्यनेही तेच करायला हवं. त्याने आधी रन करायला हवेत. त्याचं टायमिंग साफ चुकलंय."
लोकपल्ली यांच्या मते आताच्या विधानानंतर अजिंक्यला ड्रेसिंग रुममध्येही वेगळ्या नजरेनं पाहिलं जाईल. याला श्रेय हवं असतं असा समज इतर खेळाडूंमध्ये पसरेल.
दुसरीकडे अजिंक्य रहाणे बोरिया मुझुमदार यांच्या मुलाखतीत आपल्या कारकीर्दीविषयीही बोलला आहे. आपल्यात क्रिकेट अजून बाकी आहे. आणि क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी काय करायचं ते आपल्याला ठाऊक आहे असं तो म्हणतो. आपण या वादानंतर एवढीच अपेक्षा करूया की आपल्याला त्याच्यातलं क्रिकेट आणि मोठ्या खेळीच बघायला मिळतील.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









