You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महादजी शिंदे यांनी पानिपतच्या युद्धानंतर फक्त 10 वर्षांमध्ये दिल्ली कशी जिंकली?
- Author, अमृता दुर्वे
- Role, बीबीसी मराठी
इंग्रजांकडून 'द ग्रेट मराठा' अशी उपाधी मिळालेल्या सरदार महादजी शिंदे यांनी दिल्लीपर्यंत मुसंडी मारून आपला दबदबा निर्माण केला होता.
महादजींनी 18व्या शतकाचा उत्तरार्ध गाजवला. त्यांच्या कारकीर्दीतली सर्वात महत्त्वाची समजली जाणारी ही दिल्ली मोहीम काय होती? कशासाठी ही स्वारी करण्यात आली? आणि महादजी शिंदेंनी खरंच दिल्लीवर विजय मिळवला होता का? याची उत्तरं आपण शोधणार आहोत.
आधी थोडं महादजींबद्दल जाणून घेऊयात
महादजी शिंदे कोण होते?
महादजी शिंदे हे मुत्सद्दी मराठा सरदार होते. वडिलांचं नाव शिलेदार राणोजी आणि आईचं चिमाबाई. शिंदे घराणं मूळचं सातारा जिल्ह्यातल्या कण्हेरखेडचं.
राणोजींना एकूण 5 मुलं. त्यापैकी एक महादजी. 1727 मध्ये त्यांचा जन्म झाला.
वडील राणोजींसोबत मोहिमांमध्येच त्यांना लष्करी प्रशिक्षण मिळालं. राणोजींसोबत माळवा आणि उत्तरेतल्या मोहिमांमध्ये महादजी सहभागी झाले होते.
निजामासोबतच तळेगाव - उंबरीच्या लढाईनंतर महादजी नावारूपाला आले.
औरंगाबाद (1751), साखरखेडले (1756), पंजाब (1759) या मोहीमांमध्ये महादजींचा सहभाग होता.
पानिपतच्या तिसऱ्या लढाईत सहभागी झालेले महादजी जायबंदी झाले. पायाला झालेल्या जखमेने त्यांना काहीसं अधूपण आलं. हा काळ होता 1761 चा.
या नंतरच्या काळात महाराष्ट्रात पेशवे होते थोरले माधवराव. पेशवे थोरले माधवरावांनीच महादजींना 1768मध्ये सरदारकी दिली.
1771मध्ये महादजी दिल्लीला रवाना झाले.
महादजी शिंदेंची दिल्ली मोहीम
पानिपताच्या युद्धाने मराठ्यांची अतोनात हानी झाली होती. माणसं मारली गेली, पराभव तर झालाच पण तिजोरीलाही प्रचंड मोठा फटका बसला. पानिपताच्या या युद्धानंतर मराठ्यांच्या एकछत्री वर्चस्वाला कळा लागली. या पराभवाच्या आणि आप्तांना गमावण्याच्या धक्क्याने नानासाहेब पेशव्यांचा मृत्यू झाला.
नानासाहेबांनंतर गादीवर आलेल्या थोरल्या माधवरावांनी पानिपताचं हे अपयश धुवून काढण्यासाठी महादजी शिंदेंना दिल्लीला पाठवल्याचं इतिहासकार सांगतात.
महादजींसोबत या मोहिमेत कारभारी म्हणून होते विसाजीपंत बिनीवाले आणि रामचंद्र कानडे. सरदार तुकोजी होळकरही या मोहिमेत महादजींसोबत होते.
महादजींच्या या दिल्ली मोहिमेविषयी बोलताना इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे सांगतात, "त्यावेळी राजस्थानमध्ये रजपूतांनी उठाव केला होता. मथुरा - भरतपूर भागात जाटांनी बंडखोरी केलेली होती. ती या सगळ्यांनी मोडून काढली. मग त्यांनी झाबेता खानवर (नजीबखान रोहिल्याचा मुलगा) हल्ला करायला दिल्लीकडे मोर्चा वळवला. दिल्लीचा बादशाह असणाऱ्या शाह आलम याने 1770च्या सुमारास दिल्लीतून पळ काढून बिहारमध्ये इंग्रजांचा आश्रय घेतला होता. रोहिल्ल्यांनी आपलं राज्य बळकावलं असून मराठ्यांनी आपल्याला मदत करावी, तख्तावर पुन्हा स्थापना करावी अशी विनंती बादशाह शाह आलमने मराठ्यांना केली होती. महादजींनी इंग्रजांवर मोठं दडपण आणलं आणि त्यांच्या ताब्यात असणाऱ्या शाह आलमला सोडवलं.
"मराठ्यांनी शाह आलमला सोबत घेऊन दिल्लीवर हल्ला केला. बिनीवाले आणि कानडेंच्या सोबतीने महादजींनी झाबेता खानला कैद केलं आणि दिल्लीचा ताबा घेतला. 10 फेब्रुवारीला महादजींनी दिल्लीचा लाल किल्ला जिंकून घेतला. तिथून बादशहाची मिरवणूक काढण्यात आली आणि त्यांनी त्याला सन्मानपूर्वक दिल्लीच्या बादशाहीवर बसवलं."
यानंतर नजीबखानाचा बदला घेण्यासाठी पानिपत, सोनपत, बागपत, शामली हा पूर्वी मराठ्यांच्या ताब्यात असणारा भाग पुन्हा जिंकण्यासाठी महादजी निघाले. रोहिले, पठाण, बंगश हे अफगाण एकेकाळी बादशहाचे सरदार होते. पण नंतर त्यांनी बंड केलं.
महादजी, तुकोजी होळकरांनी कुंजपुरा, पानिपत, शामली भाग जिंकला. हरिद्वार पार करून मराठे फत्तरगड, गोजगड करत नजीबखानाने वसवलेली राजधानी नजीबाबादपर्यंत पोहोचले. नजीबाबाद त्यांनी ताब्यात घेतलं. नजीबखानाची समाधी उखडून गंगेत मिसळत महादजींनी आपला बदला घेतल्याचं इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे सांगतात.
झाबेताखानने फत्तरगडाच्या खंदकात लपवलेली 30 लाखांची लूट मराठ्यांना मिळाल्याचंही इतिहासकार सांगतात.
यानंतर मराठे हे उत्तरेतले बादशहाचे संरक्षक होते. पंजाब - सिंधमध्ये त्यांना चौथाईचा आणि सरदेशमुखीचा अधिकार होता. पानिपताचा सुभा महादजींचा जावई लाडोजी शितोळेंकडे होता.
लालसोटची लढाई
1786-87 च्या सुमारास मुसलमान सरदार आणि काही राजपूत राजांनी महादजींच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी बंड केलं. याला लालसोटची लढाई म्हणतात. महादजींच्या सैन्यातल्या स्थानिक उत्तर भारतीय सैनिकांनी यावेळी बंड केलं आणि महादजींच्या सैन्यातून पळ काढला.
महादजींनी यावेळेस नाना फडणवीसांकडे मदत मागितली आणि फडणवीसांनी माळव्यातल्या जहागिरीतून मदतीसाठी तिकडचं सैन्य पाठवलं.
गुलाम कादरचा उठाव आणि बादशाह शाह आलम
गुलाम कादर हा झाबेता खान रोहिल्ल्याचा मुलगा आणि नजीबखानाचा नातू. बादशहाला संरक्षण देणारे महादजी शिंदे आणि मराठा सैन्य राजपूतांशी लढत असताना या गुलाम कादरने दिल्लीचा ताबा घेतला.
इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे सांगतात, "गुलाम कादरने बादशाह शाह आलमला कैद केलं. त्यावेळी बादशहाचं वय सत्तरीच्या जवळ होतं. 1780च्या सुमारासची गोष्ट. हिंदुस्तानच्या इतिहासातला हा सगळ्यात काळा इतिहास आहे. या गुलाम कादरने दिवाण - ए - आममध्ये बादशाहच्या जनानखान्याची - कुटुंबातल्या सगळ्या स्त्रियांची बेअब्रू केली. गुलाम कादरने बादशहा शाह आलमचे डोळे फोडले. मथुरेतल्या महादजींना हे समजल्यानंतर अली बहाद्दर (मस्तानीचा मुलगा समशेर बहाद्दरचा मुलगा) आणि राणेखान (पानिपतच्या तिसऱ्या युद्धात महादजींना वाचवणारा भिस्ती) यांना दिल्लीकडे पाठवलं.
अली बहाद्दर आणि राणेखान यांनी दिल्ली जिंकली आणि किल्ल्याला वेढा दिला. गुलाम कादर यादरम्यान मेरठला पळून गेला.
गुलाम कादरला पकडून महादजींनी दिल्लीत आणलं आणि त्याला बादशहासमोर शिक्षा देण्यात आली. यानंतर बादशहाने देऊ केलेली मुतालिकी पेशव्यांतर्फे स्वीकारली आणि ते वकील - ए - मुतालिक झाले. यानंतर बादशाहने गोहत्याबंदीचं फर्मान काढलं.
उत्तर हिंदुस्तानातल्या वास्तव्या दरम्यान महादजी 14 वर्षं मथुरेत होते.
मराठ्यांनी दिल्लीवर थेट राज्य का केलं नाही?
उत्तर भारतातल्या आपल्या कार्यकाळात महादजींनी दोनदा दिल्ली जिंकली आणि दिल्लीच्या तख्तावर बादशाहची पुन्हा स्थापना केली. बादशाहला महादजी शिंदेंनी संरक्षण दिलं. पण त्यांनी तख्त थेट ताब्यात घेतलं नाही किंवा स्वतःचा स्वतंत्र झेंडा दिल्लीवर फडकवला नाही.
याविषयी बोलताना दिल्ली विद्यापीठातले इतिहासाचे प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे सांगतात, "महादजी शिंदे हे 'Regent of the Emperor' होते. म्हणजे बादशहाचं संरक्षण करण्यासाठी नेमलेली व्यक्ती होते. दिल्लीमध्ये ते बादशहाचे आणि तख्ताचे (Throne) संरक्षक होते. मराठे हे कायमच बादशहाचे संरक्षक होते. बादशहाची जागा घेण्याचा त्यांनी कधीही विचार केला नाही. बादशाहच्याच नावे सर्वांसाठी फर्मान निघत असे. मराठ्यांकडे करवसुलीचा अधिकार होता. मुघल राजांचा संपूर्ण हिंदुस्ताना मोठा अंमल होता. आपण बादशहाचं संरक्षण करत असल्याचं त्याआधी सदाशिवराव भाऊंनीही म्हटलं होतं. मुघल बादशाही उलथवून लावण्याचा विचार त्याकाळी कोणी केला नसता. कारण त्याने उत्तरेतला संपूर्ण मुस्लीम समाज मराठ्यांच्या विरोधात गेला असता. आणि त्याने तिथे राज्य करणं कोणालाही कठीण गेलं असतं. मुघलांचं देशामधलं वर्चस्व अगदी 1857 पर्यंत होतं. 1857च्या इंग्रजांविरोधातल्या उठावामध्येही बाहदूर शाह जफरला बादशहा जाहीर करण्यात आलं होतं."
ही हिंदू विरुद्ध मुघल राज्यकर्त्यांमधली लढाई होती का?
परागंदा झालेल्या मुघल बादशहा शाह आलमला तख्तावर पुन्हा बसवण्यासाठी काढण्यात आलेली ही मोहीम होती. यामध्ये युद्धाच्या एका टप्प्यात महादजी शिंदे आणि मराठा सैन्य बादशहा शाह आलमला घेऊन दिल्लीत शिरलं आणि त्यांनी रोहिल्यांचा पराभव केला.
मराठ्यांनी दिल्ली जिंकली आणि बादशहाला पुन्हा एकदा तख्तावर बसवलं. महादजी शिंदे आणि मराठा सैन्य हे दिल्लीच्या तख्ताचं संरक्षक होतं आणि महादजींकडे वकील - ए - मुतालिक पदवी होती.
उत्तर भारतीय नागरिक आणि राज्यकर्ते महादजींकडे कसे पाहत?
मराठ्यांबाबत त्याकाळी उत्तर भारतात संमिश्र भावना होत्या, असं प्रा. देशपांडे सांगतात. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "रोहिल्ला आणि जाट यांच्यासोबत मराठ्यांचे कायमच संदिग्ध संबंध होते. रोहिल्यांच्या दृष्टीने मराठे हे उत्तर प्रदेशाच्या पश्चिम भागात आलेले Intruder म्हणजे घुसखोर होते. हा प्रदेश रोहिल्यांच्या अंमलाखाली होता. नजीबउद्दौलाचा हा प्रांत होता. त्याने नजीबाबाद वसवलं होतं. या सगळ्या भागात मराठ्यांचा रोहिल्यांशी संघर्ष सुरू असे. महादजी शिंदेंकडे सशस्त्र सैन्याचं आधुनिकीकरण करणारा सेनापती म्हणून पाहिलं जातं."
त्या काळात मराठा, मुघल, रोहिला अशा सगळ्याच सैन्यांकडे वसुली करणाऱ्या, लूट गोळा करणाऱ्या सैनिकांचा ताफा असे. त्यांना 'पिंडारी' म्हटलं जाई. पिंडावरचंही लुटणारा म्हणून 'पिंडारी'
एखाद्या भागात दहशत निर्माण करून जम बसवणं, सैन्यासाठीचा शिधा, रक्कम गोळा करणं हा यामागचा हेतू असे.
17 व्या शतकाच्या उत्तरार्धापासून हे पिंडारी मराठा सैन्यासोबतही असत असं ब्रिटानिका एनसायक्लोपिडीयाने म्हटलंय.
एखाद्या प्रदेशाची टेहळणी करण्यासाठी, मोहीम संपुष्टात आणण्यासाठी, सैन्याला मदत म्हणूनही या पिंडारींचा वापर केला जाई असं प्रा. देशपांडे सांगतात. नंतरच्या काळात या पिंडारींची दहशत इतकी वाढली की ब्रिटीश गव्हर्नर जनरल हेस्टिंग्सने त्यांच्या विरोधात मोहीम उघडली. 1817-18 च्या सुमारास झालेल्या या युद्धाला Pindari War म्हटलं जातं.
सावित्रीबाई फुले विद्यापीठातल्या इतिहास विभागाच्या पोस्ट डॉक्टरल फेलो डॉ. गुंजन गरूड सांगतात, "पिंडारी सगळ्या सैन्यांमध्ये असायचे. शिंदे, होळकरांच्या सैन्यातही पिंडारी असायचे. जिंकलेल्या प्रदेशातली खंडणी गोळा करण्याचं काम त्यांच्याकडे असे. लूटमार करणं हे त्यांचं काम होतं. दबदबा निर्माण करायचा तर दणकट माणसं हवीत. तो दबदबा निर्माण करायचं काम हे पेंढारी करायचे. प्रदेशात जाऊन युद्ध न करता खंडणी गोळा करण्याचं काम ते करीत."
मराठा सैन्यांसोबतचे पिंडारी गावांमध्ये लूट करत असल्याने मराठा सैन्याविषयी त्याकाळच्या उत्तरेतल्या जनतेत संमिश्र भावना होत्या. महादजींनी फ्रेंच अधिकारी सैन्यात नेमल्याने राजपूत मराठा सैन्यावर आणि महादजींवर विशेष खुश नव्हते. उत्तरेतल्या राज्यकर्त्यांसाठी देशावरून आलेले शिंदे हे परप्रांतीय होते.
सैन्याचं आधुनिकीकरण करणारे महादजी
पानिपताच्या युद्धानंतर महादजींनी त्यांच्या सैन्याचं आधुनिकीकरण केलं. तोपर्यंत मराठा सैन्यात फक्त दक्षिणेतल्या - महाराष्ट्रातल्या सैनिकांचा भरणा होता.
महादजींनी सैन्याचं स्वरूप बदललं. उत्तरेत रहायचं तर तिथलं स्थानिक सैन्य हवं म्हणून महादजींनी उत्तरेतून सैन्यात भरती करायला सुरुवात केली. यातूनच शिंद्यांच्या सैन्यामध्ये मोठा सामाजिक बदल घडला. यात महाराष्ट्रातले अधिकारीही होतेच.
डी'बॉईन या फ्रेंच अधिकाऱ्याची नियुक्ती महादजींनी त्यांच्या सैन्यात केली होती.
प्रा. अनिरुद्ध देशपांडे सांगतात, " याशिवाय महादजींनी फ्रेंच अधिकाऱ्यांचीही आपल्या सैन्यात नेमणूक केली. सैनिकांना युद्ध प्रशिक्षण देणं, आधुनिक पाश्चिमात्य युद्ध पद्धती शिकवणं हे या फ्रेंच अधिकाऱ्यांचं काम होतं. यासोबतच महादजी शिंदेंनी तोफखानाही आधुनिक केला. त्यांनी ब्राँझ तोफा घडवून घेतल्या. फौंड्री सुरू करून बंदुका ओतण्याचा कारखाना काढला. महादजी शिंदेंमुळे शिंदेंच्या या सैन्याकडे अतिशय आधुनिक शस्त्रास्त्रं होती."
महादजींकडे 30 हजार कवायती पायदळ, 500 तोफा, 30 हजारांचं घोडदल होतं. हे सैन्य ग्वाल्हेरला तैनात असे. इथूनच शिंदे हे ग्वाल्हेरचे शिंदे म्हणून प्रसिद्ध झाले.
सिंधिया म्हणून आज ओळखले जाणारे भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया उर्फ शिंदे, त्यांचे वडील माधवराव आणि आजी विजयाराजे या याच शिंदे घराण्यातल्या.
भाविक महादजी शिंदे
महादजी शिंदे वारकरी संप्रदायाचे होते. 18व्या शतकात, पेशवे काळात वारकरी संप्रदायातले संत मल्लप्पा वास्कर (ज्यांच्या नावे वास्कर दिंडी काढली जाते) यांच्याकडून महादजींनी भागवत धर्माची दीक्षा घेतली होती. महादजींच्या गळ्यात तुळशीची माळ असे. त्यांनी ज्ञानेश्वरीवर निरूपण करणारा एक टीकाग्रंथही लिहीला होता. हिंदी, ऊर्दू, संस्कृत, फारसी या भाषांवर महादजींचं प्रभुत्वं होतं. महादजी मराठी व हिंदी भाषांत कविता करत असत
इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे सांगतात, "महादजींनी भागवत पुराणही लिहीलं होतं. पंढरपूर आणि पांडुरंगावर त्यांनी अनेक अभंग रचले. महादजींनी दत्त संप्रदायाची दीक्षा घेतली होती. तर बीडमध्ये शाह मन्सूर बाबा म्हणून फकीर होते. ते कृष्णभक्त होते. कबीरी संत होते. त्यांच्याकडून महादजींनी कृष्ण संप्रदायाची दीक्षा घेतली होती. त्यांनी मथुरेत राहून कृष्णभक्तीच्या अनेक रासलीला लिहील्या होत्या. महादजींच्या देवघरात मन्सूर बाबांच्या पादुका, कृष्ण, पांडुरंग आणि दत्ताच्या मूर्ती होत्या. आज हे सगळं ग्वाल्हेरला आहे. तिथे मन्सूर बाबाचा उरूसही होतो."
महादजींचा मृत्यू
दिल्लीतल्या वास्तव्यानंतर महादजी शिंदे 1792मध्ये पुण्याला परतले. वानवडीला भरलेलया दरबारात त्यांनी सवाई माधवराव पेशव्यांना मुतालिकी अर्पण केली. त्यानंतर सुमारे दोन वर्षं महादजी पुण्यातच वास्तव्याला होते.
पुण्याजवळच्या वानवडीमध्ये 12 फेब्रुवारी 1794 ला महादजींचं ज्वराने निधन झालं. महादजींच्या समाधीसाठी सवाई माधवरावांनी वानवडीमध्येच जमीन दिली. महादजींची छत्री आजही वानवडीत आहे. महादजींना अपत्य नसल्याने त्यांनी त्यांच्या भावाच्या नातवाची दौलतरावांची जहागिरीचा उत्तराधिकारी म्हणून निवड केली होती.
संदर्भ
- महादजी शिंदे, मराठी विश्वकोश - https://vishwakosh.marathi.gov.in/33475/
- शिंदे घराणे, मराठी विश्वकोश - https://vishwakosh.marathi.gov.in/33474/
- ग्वाल्हेर संस्थान, मराठी विश्वकोश - https://vishwakosh.marathi.gov.in/22727/
- पिंडारी, ब्रिटानिका एनसायक्लोपीडिया - https://www.britannica.com/topic/Pindari
- पिंडारी वॉर, ब्रिटानिका एनसायक्लोपीडिया - https://www.britannica.com/topic/Pindari-War
- English Record of Maratha History Vol - 1, Mahadaji Sindhia and North Indian Affairs - Author Jadunath Sarkar
- https://www.indianculture.gov.in/ebooks/english-record-maratha-history-voli-mahadji-sindhia-and-north-indian-affairs-1785-1794
- डॉ. गुंजन गरूड, पोस्ट डॉक्टरल फेलो, इतिहास विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
- पांडुरंग बलकवडे, इतिहास अभ्यासक
- प्रा. अनिरुद्ध देशपांडे, दिल्ली विद्यापीठ
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)