You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उत्तर प्रदेश निवडणूकः अयोध्येतली मंदिरं ढासळत आहेत कारण.... ग्राऊंड रिपोर्ट
- Author, नितीन श्रीवास्तव
- Role, बीबीसी प्रतिनिधी, अयोध्येहून परतून
थंडीतली एक सकाळ. शरयू नदी किनारी 'राम की पैडी'वर शेकडो श्रद्धाळू सकाळची आंघोळ करण्यात मग्न आहेत. नदीमध्ये डुबकी मारत, उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन झाल्यावर ते पायी शहराच्या दिशेने चालू लागतात.
इथूनच थोड्या अंतरावर, कडेकोट बंदोबस्तात राम मंदिराच्या उभारणीचं काम सुरू आहे. अयोध्येत येणारे सगळे भक्त रांग लावून 'रामलल्ला'चं दर्शन घेतात.
राम की पैडीवर डझनभर मंदिरं आहेत. यातल्याच एका 'प्राचीन शरयू मंदिरात' एक महिला आरती करत होती. आरती झाल्यानंतर महंत सुमन पाठक यांनी सांगितलं, "आजच्या जगात जे दिसतं, तेच विकलं जातं. लोक भव्य गोष्टींच्या मागे लागले आहेत, देवाच्या मागे नाहीत."
या देवळात पूजाअर्चा करणारी, देखरेख करणारी ही त्यांची सातवी पिढी. सुमन पाठक ज्या 'भव्यतेचा' उल्लेख करतात ती राम की पैडीवर स्पष्टपणे पहायला मिळते.
उत्तर प्रदेशातल्या निवडणुका जिंकल्यानंतर 2017मध्ये योगी आदित्यनाथांच्या सरकारने इथले घाट आणि सगळ्या मंदिरांना एक नव रूप देण्यासाठी रंगरंगोटी केली. त्यांची दुरुस्ती केली.
तेव्हापासून दरवर्षी दिवाळीत इथे दीपोत्सव साजरा केला जातो. लाखो दिवे शरयू नदीत सोडले जातात.
'प्रसाद नसला तर पाणी पिऊन झोपू'
अनेक गल्ल्या या राम की पैडीमधून पुढे शहरात जातात. एक गल्लीत शिरताच समोरच 'भागलपूर मंदिराचं' मुख्य द्वार दिसलं. खिळखळं झालेलं फाटक उघडून आत गेल्यावर पुजारी अयोध्या दास भेटले.
त्यांनी सांगितलं, "हे देऊळ दीडशे वर्षं जुनं आहे आणि पूर्वी या परिसरात 200-300 भाविक येऊन राहत. आता फक्त आम्ही तिघे या उजाड जागी राहतो. विहीर आटलीय, छताचा काही भाग कोसळतोय. जर भाविकच येत नसतील तर मग देव जसं काही सगळं चालवतोय, त्याच प्रमाणे आम्ही चालू देतोय. जे आहे त्यात भागवलं जातं. नैवेद्य वाढता आला नाही तर पाणी पिऊन झोपू."
बाबरी मशीद - राम जन्मभूमी वादावरचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर अयोध्येच्या मधोमध भव्य राम मंदिर उभारण्याचं काम सुरू झालंय.
जगभरातल्या भक्तांनी कोट्यवधी रुपये दान केले आहेत. पण याच अयोध्येत सुमारे 175 मंदिरं पार मोडकळीला आली आहेत. लक्ष दिलं नाही तर कदाचित या प्राचीन मंदिरांचे अवशेषही कदाचित उरणार नाहीत.
जुन्या आणि खिळखिळ्या झालेल्या 177 इमारती पाडण्यात याव्यात वा दुरुस्त करण्यात याव्यात असे आदेश 2018 मध्ये अयोध्या नगर निगमने दिले होते. या जुन्या इमारतींच्या यादीत अनेक देवळांचाही समावेश आहे.
अयोध्येत 6,000 मंदिरं असल्याचा दावा
रामायण आणि रामाची नगरी म्हटली जाणारी अयोध्या हिंदूंसाठी विशेष आहे. राजांपासून ते अवधेच्या नवाबांपर्यंत सर्वांनी इथे मंदिर उभारली.
गेल्या दोन दशकांपासून अयोध्येबद्दल संशोधन करत असलेले लेखक आणि इतिहासकार यतींद्र मिश्र सांगतात, "स्कंदपुराणातलं अयोध्येचं महात्म्य याविषयीची ब्रिटीश गॅझेटियर पाहिली तर त्यात अयोध्येत सहा हजार देवळं असल्याचा उल्लेख आहे. काही शे कमीही असू शकतील. वेगवेगळ्या जातींची, राज घराण्यांची देवळं आहेत. दर दुसरं घर हे ठाकूरवाडी आहे जिथे रामाची पूजाअर्चा होते. प्रत्येक जागी एका ठराविक पद्धतीचं देऊळ जरी नसलं तरी एखादा चौथरा आहे, तिथे चार लोकं राहतायत आणि राम-सीतेच्या मूर्ती असतील तर ते एकप्रकारचं मंदीरचं आहे."
या शहराची श्रद्धा अजूनही भक्कम असली तरी मन मात्र खचलेलं आहे. शेकडो वर्षं जुन्या इमारती - मंदिरं आता कोसळण्याच्या उंबरठ्यावर आहेत. परिणामी लोकांच्या आशाही संपुष्टात यायला लागल्या आहेत.
राम की पैडीपासून काहीच अंतरावर 'नया घाट' आहे. इथेही अनेक आखाडे आणि देवळं आहेत. यापैकीच एक आहे कर्तलिया बाबा आश्रम. राम दास इथले महंत आहेत.
ते म्हणाले, "ज्या मंदिरांना नोटिस देण्यात आली ते भग्न अवस्थेत आहेत. कुठे गेट तुटलंय, तर कुठे छत. काही आश्रम जर्जर अवस्थेत आहेत. ना कोणी त्यांची देखरेख करतंय, ना मेंटेनन्स - प्लास्टर. आणि तिथेही लोक राहत आहेत. हे सगळं संपुष्टात येईल. इथली प्राचीनता इथल्या मठ मंदिरांमुळेच तर आहे."
'या देवळांतही राम सीता आहेत'
अयोध्येतल्या बहुतेक मंदिरांचे महंत किंवा पुजारी स्वत: जीर्णोद्धार करण्याच्या परिस्थितीत नाहीत. तर सरकारने अनुदान देऊन या देवळांची दुरु्ती करावी असं काहींना वाटतं.
स्वर्गद्वाराच्या जवळ एक देऊळ आहे. गेल्या दीड दशकात या देवळाचे दोन मजले ढासळलेत. बाहेरच्या गेटवरच महंत केशव दासजी भेटले.
राम मंदिराच्या बांधकाम स्थळी जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीकडे इशारा करत त्यांनी त्यांचं दु:ख सांगितलं, "ईश्वर तर सगळीकडे एकच आहे, पण तिथे जास्त देव दिसतोय आणि इतर ठिकाणच्या देवांना काही मान उरलेला नाही. ईश्वर तर एकाच रूपात आहे नं...सगळे राम जानकीच आहेत. पण तिथे अब्जावधींचे राम जानकी आहेत. इथे आठ आण्याचे राम जानकी आहेत."
राम मंदिरांचं बांधकाम आणि दीपोत्सवाच्या झगमगाटामध्ये अयोध्याची खरी ओळख असलेला प्राचीन वारसा इतिहासाच्या गर्तेमध्ये ढकलला जात असल्याचं स्थानिकांना वाटतंय.
महंत सुमन पाठक यांच्या मते, "इथे दीपोत्सव केला जातो, पण तो दीपोत्सव जिथे केला जातो तिथली देवळं कशी जीर्ण अवस्थेत आहेत, याकडे कुणी पाहात नाही. ही मंदिरं नाहीत का? आम्ही या अयोध्येत राहात नाही का? पण नाही, दीपोत्सव हा केवळ एक देखावा आहे. व्होट बँक आहे. आम्ही व्होटबँकेत जगतोय."
'चांगल्या कामासाठी त्याग तर करावाच लागेल'
"प्राचीन परंपरा वाचवायला हवी, पण लोकांची सुरक्षाही महत्त्वाची असल्याचं" अयोध्येच्या स्थानिक प्रशासनाचं म्हणणं आहे.
अयोध्येच्या सहाय्यक नगर आयुक्त अंकिता शुक्ला यांनी पुढे सांगितलं, "विकास होत असेल तर बदलही घडवावे लागतात. आणि हे सगळ्यांच्या भल्यासाठी असतं. कारण जी जुनी मंदिर पडतायत, त्यांमुळे लोकांच्या जिवालाही धोका आहे. आणि ही काही मनमानी नाही. जर काही चांगलं व्हायचं तर त्यासाठी काही सॅक्रिफाईज (त्याग) करावा लागेल. मग सगळ्यांनाच चांगले बदल पहायला मिळतील."
अयोध्येतली अनेक देवळं आणि धर्मशाळा दीर्घकाळापासून भाडेकरूंकडे आहेत. त्यांनीच या मोडकळीला आलेल्या बांधकांमांची दुरुस्ती करून घेतली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मालक आणि भाडेकरूंमध्ये सुरू असलेल्या कायदेशीर वादांमुळे अनेक देवळं जीर्ण झालेली आहेत.
सध्याचं केंद्रातलं आणि उत्तर प्रदेशातलं भाजप सरकार अयोध्येत उभं राहणारं राम मंदिर एक 'सुवर्ण अध्याय' आणि 'ऐतिहासिक' विजय असल्याचं मानतं. पण सोबतच या शहरातून उमटणारे विरोधाचे सूरही त्यांना ऐकावे लागतायत.
आधुनिकीकरणाममुळे विस्थापनाचा धोका
अयोध्येचं नूतनीकरण करण्याच्या प्रयत्नांचा सध्या विरोध करण्यात येतोय. कारण बांधकाम सुरू असलेल्या राम मंदिराकडे जाणारे रस्ते रुंद करून 18 फुटांचे करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय.
अयोध्या एक पुरातन आण दाटीनं वसलेलं शहर आहे. या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला असणारी लहानमोठी दुकानं आणि घरं किंवा मंदिरांचे दरवाजे तोडण्यात येतील. लोकांना याची भरपाई मिळेल आणि नवी जागाही देण्यात येईल, असं सरकारचं म्हणणं आहे.
पण यामुळे विस्थापित होण्याचा धोका असलेली 1,200 कुटुंब नाराज आहेत.
अशाच एका देवळाच्या दरवाजापाशी 52 वर्षांच्या रंभा देवी पूजेचं साहित्य विकतात. दुकान हटवण्याची नोटीस त्यांना देण्यात आलीय.
त्यांनी सांगितलं, "आम्ही उदरनिर्वाहासाठी हे दुकान चालवतो, माझी दोन मुलं मजुरीचं काम करतात. आता जर दुसरीकडे कुठे जागा देईल, सोय करेल पण तिथे भाविक कसे येणार, याची चिंता वाटतेच. इथे राम मंदिराकडे जाणाऱ्यांची गर्दी असते. यापुढे आयुष्य कसं जगायचं याची भीती सगळ्यांच्याच मनात आहे."
सरकारपर्यंत पोचवण्यात आली लोकांची व्यथा
अयोध्येतल्या मंदिरं धर्मशाळांमध्ये राहणाऱ्यांच्या व्यथा सत्ताधारी भाजपपर्यंत पोहचवण्यात आलेल्या आहेत. संत समाजासोबतच विश्व हिंदू परिषद आणि इतर काही हिंदू संघटनांनीही सरकारला आवाहन केलं आहे.
भाजपचे प्रदेश प्रवक्ते संजय चौधरी यांनी सांगितलं, "जोपर्यंत आर्थिक आधारावर विकास होत नाही, तोपर्यंत कसं होईल? पर्यटन हा एक खूप मोठा उद्योग आहे. जेव्हा तो वाढेल तेव्हा त्याचा फायदा अयोध्येतही होईल. ही तर सुरुवात आहे. अयोध्येला नक्की अजून चांगली करू. हॉटेलं तयार करण्याविषयीही चर्चा होतं आहे. सरकार त्यांच्यातर्फेही गेस्ट हाऊस उभारत आहे. अशाने जर अयोध्येत येणारा पर्यटक आसपासच्या मंदिरांतही जाईल. याने अयोध्येची शोभा वाढेल."
पण येत्या काही दिवसांत गुजराण कशी होणार ही अयोध्यावासीयांची भीती वास्तविक आहे. पण उत्साहात इथे आलेल्या भाविकांचं याकडे लक्ष फारसं जात नाही.
शहरातल्या शरयू कुंज मंदिरातले महंत युगल शास्त्री सांगतात, "राम मंदिरावर लक्ष केंद्रित करा, पण राम मंदिर इतकं मोठं होऊ नये की सगळ्यांवर उपाशी मरण्याची पाळी येईल आणि मग त्यांना वाटी पुढे करत भीक मागावी लागेल."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)