You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना: मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना आटोक्यात आला आहे का?
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
'मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे', असं सांगत महापौर किशोरी पेडणेकर यांनी महिनाअखेर शहरातील निर्बंध पूर्णपणे शिथिल करून शहर अनलॉक केलं जाईल, अशी माहिती दिली आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही निर्बंध अनलॉक करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग अटोक्यात आला आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो.
किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, "मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या महिन्याच्या अखेरीस मुंबई अनलॉक होईल. मुंबईतील निर्बंध हटवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. परंतु लोकांनी मास्क घालणं आणि सुरक्षित अंतर पाळणं बंधनकारक असेल."
कोरोनाची तिसरी लाट आल्यानंतर राज्य सरकारने लागू केलेले निर्बंध आता शिथिल करण्यात आले आहेत.
राज्यातील शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्यात आले आहेत. सिनेमा आणि नाट्यगृहांनाही 50 टक्के आसन क्षमतेसह परवानगी देण्यात आली आहे.
मार्च महिन्यात कोरोनाची तिसरी लाट संपुष्टात येईल असा विश्वास काही दिवसांपूर्वीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला होता.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते म्हणाले, "आकडेवारीनुसार कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. रुग्णांची संख्या कमी होत असल्याने निर्बंध कमी करण्याकडे सरकारचा कल आहे."
कोरोनाची सध्याची स्थिती
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 7 फेब्रुवारी रोजी राज्यात 1 लाख 6 हजार 59 कोरोना बाधित सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 96.76 टक्के एवढे आहे. तर मृत्यूदर 1.83 टक्के एवढा आहे.
सध्या राज्यात 6 लाख 73 हजार 875 रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 2 हजार 383 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्याच्या आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या सातत्याने कमी होत आहे. दैनंदिन रुग्णांची नोंद ही दहा हजारांपेक्षा कमी आहे. तसंच 90 टक्के रुग्ण हे लक्षणविरहित किंवा सौम्य लक्षण असलेले आहेत. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे."
"निर्बंध शिथिल करून सामाजिक आणि आर्थिक जनजीवन पूर्ववत करू शकतो. नवीन व्हेरिएंट आढळला तरच रुग्णसंख्या वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे तिसरी लाट ओसरली असं आपल्याला आता म्हणता येईल. इंग्लंड, डेन्मार्क अशा अनेक देशांनी पूर्णपणे लॉकडॉऊन उठवलं आहे."
'कोरोनाची रुग्ण संख्या ओसरली'
महाराष्ट्र कोव्हिड टास्क फओर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "राज्यात कोरोना आटोक्यात आला असं आता म्हणता येणार नाही. पण त्या दिशेने वाटचाल सुरू आहे असं म्हणू शकतो. मुंबईत बऱ्यापैकी आटोक्यात आला आहे. तिसरी लाट जवळजवळ संपली आहे. पण संपूर्ण महाराष्ट्रात तशी परिस्थिती नाही."
आपल्याला गाफिल राहता येणार नाही असंही ते म्हणाले. "युके, अमेरिका यांसारख्या देशात जसं सगळं अनलॉक केलं तसं लगेच करता येणार नाही. कारण आपल्याकडे बंदिस्त जागा, गर्दी आणि वेंटिलेशनची कमतरता हे समीकरण कायम आहे. त्यामुळे खबरदारी घ्यावी लागेल,"
मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर अशा एकूण 12 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या लक्षणीय कमी होत आहे. तर काही ठिकाणी ग्रामीण भागात रुग्णसंख्या कायम आहे.
ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत मात्र सावध राहण्याची आजही गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. डॉ. शशांक जोशी म्हणाले, "ओमिक्रॉनची लागण पुन्हा होण्याची शक्यता असते. BA.1, BA.2, BA.3 हे ओमिक्रॉनचे उपप्रकार आहेत. BA.1ची लागण होऊन गेली असेल तरीही इतर व्हेरिएंट्सची लागण पुन्हा होऊ शकते. त्यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे."
ओमिक्रॉन व्हेरिएंटचे तीन उपप्रकार आतापर्यंत आढळले आहेत असं कोव्हिड टास्क फोर्सने सांगितलं आहे.
BA.1,BA.2 आणि BA.3
"डॉ. अविनाश भोंडवे सांगतात, "25 नोव्हेंबरपासून साधारण 15 जानेवारीपर्यंत ओमिक्रॉनच्या BA.1 या उपप्रकाराची लागण मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसून आलं. आता रुग्ण संख्या कमी झाल्याचं दिसून येत असलं तरी एखादा रुग्ण BA.1 मधून बरा झाला असल्यास त्याला BA.2 ची लागण होऊ शकते. म्हणजेच ओमिक्रॉनमधून बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा लागण होऊ शकते."
BA.2 हा व्हेरिएंट 'छुपा' व्हेरिएंट म्हणून ओळखला जातो. इतर प्रकारांप्रमाणेच BA.2 चा संसर्ग हा लॅटरल फ्लो आणि पीसीआर कोव्हिड टेस्ट किटद्वारे शोधता येऊ शकतो. मात्र, त्यांना BA.2 आणि डेल्टा यांच्यात फरक आढळत नाही. त्यासाठी अधिक खात्रीशीरपणे सांगण्यासाठी जास्तीच्या चाचण्या कराव्या लागतात.
BA.2 हा व्हेरिएंट यापूर्वीच्या व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र, सुदैवानं तो अधिक गंभीर असल्याचं आढळलेलं नाही.
वर्षाच्या पहिल्या महिन्यापासून ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळं जवळपास अर्ध्या जगाला कोव्हिड-19 चा संसर्ग झाल्याचं पाहायला मिळालं.
डॉ. अविनाश भोंडवे सांगतात, "गर्दी टाळणं, मास्क लावणे, सॅनिटायझेशन हे नियम पाळावेच लागणार आहेत. नाहीतर गर्दी झाल्यानंतर पुन्हा रुग्णसंख्या वाढू शकते. सध्याची परिस्थिती पाहता तिसरी लाट ओसरते आहे असं नक्कीच आपण म्हणू शकतो. लसीकरणाचा वेग कमी झालेला दिसून येतो. त्याकडे पुन्हा एकदा लक्ष देण्याची गरज आहे,"
महापालिका निवडणुकांमुळे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय?
कोरोनामुळे मुदत संपूनही नवी मुंबई आणि औरंगाबादसह काही महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर मार्चमध्ये मुंबईसह, पुणे, नागपूर, नाशिक आणि इतर महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई शहरातील निर्बंध पूर्णपणे शिथिल केले जातील अशी माहिती दिली आहे. परंतु आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात येतोय का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यावर प्रतिक्रिया देताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, "हे बिनबुडाचे आरोप आहेत. यात काही तथ्य नाही. शेवटी विरोधी पक्ष आहे त्यामुळे असे आरोप चालायचेच. परंतु मुंबईकरांचं संरक्षण, त्यांच्या आरोग्याची सुरक्षा याला प्राधान्य आहे. त्यामुळे खबरदारी घेऊनच अनलॉक केलं जाईल."
राज्यात ओबीसी राजकीय आरक्षण मंजूर होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भातील विधेयक सुद्धा विधिमंडळात मंजूर करण्यात आलं.
मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आगामी काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणुकांच्या रणधुमाळीत मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचार आणि जाहीर सभांमुळे गर्दी होऊ शकते.
"निवडणुकांच्या तयारीमध्ये किंवा प्रचार सुरू झाल्यास कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची खबरदारी घ्यायला हवी. आटोक्यात आलेली कोरोनाची परिस्थिती यामुळे पुन्हा धोक्यात येऊ शकते." असं डॉ. अविनाश भोंडवे सांगतात.
मास्क मुक्तीचाही निर्णय घेणार?
27 जानेवारी रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्क लावण्याचा नियम शिथिल करण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते.
कोरोना प्रतिबंध लसीकरण मोठ्या संख्येने पूर्ण केलेल्या अनेक देशांमध्ये मास्क घालण्याचे बंधंन काढून टाकण्यात आले आहे. तसंच त्याठिकाणी अनेक निर्बंधही उठवण्यात आले आहेत.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही मास्क लावण्याचा नियम शिथिल करण्यात येऊ शकतो अशी चर्चा बैठकीत झाली.
यासंदर्भात कोव्हिड टास्क फोर्सशी चर्चा केल्यानंतरच अंतिम धोरण ठरवलं जाणार आहे.
आतापर्यंत मास्क घालण्याची सक्ती उठवलेल्या देशांमध्ये ब्रिटन , अमेरिका, स्वीडन, चीन, न्यूझीलंड, हंगेरी, इटली यांचा समावेश आहे.
दरम्यान, भारतात अद्याप केंद्र सरकार किंवा कोणत्याही इतर राज्याने 'मास्कमुक्ती'चा निर्णय घेतलेला नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)