You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IPL Auction 2022: सगळ्यांत महागडे खेळाडू माहिती आहेत?
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी
इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेचा लिलाव नेहमीच चर्चेत असतो. 15 वर्षात लिलावाच्या माध्यमातून 10 कोटींपेक्षा जास्त बोली लागलेल्या आणि सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंविषयी.
1. ख्रिस मॉरिस- 16.25 कोटी (राजस्थान रॉयल्स)
आतापर्यंत आयपीएलच्या लिलावात सर्वाधिक बोली लागण्याचा विक्रम या लिलावात झाला. ज्या खेळाडूसाठी ही बोली लागली ते नाव चक्रावून टाकणारं होतं.
राजस्थान रॉयल्सने ख्रिस मॉरिसला तब्बल 16.25 कोटी रुपये खर्चून ताफ्यात समाविष्ट केलं. दक्षिण आफ्रिकेचा मॉरिस जगभरात ट्वेन्टी20 लीग खेळतो.
फास्ट बॉलिंग हे त्याचं मुख्य काम. पण याच्या बरोबरीने उपयुक्त फटकेबाजीही करतो. तिशी ओलांडलेला आणि दुखापतीमुळे हंगामातले सगळे सामने खेळण्याबाबत साशंकता असलेल्या खेळाडूसाठी एवढे पैसे राजस्थानने ओतल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आलं.
विशेष म्हणजे मॉरिसने लिलावासाठी बेस प्राईज 75 लाख एवढीच ठेवली होती. बेस प्राईज ते लागलेली बोली हे काहीपटीचं प्रमाण अर्थतज्ज्ञांच्याही आकलनापलीकडचं होतं.
प्रचंड रकमेला जागत मॉरिसने 2021 हंगामात 11 सामने खेळताना 15 विकेट्स घेतल्या. मात्र याने राजस्थानच्या नशिबात काहीही बदल झाला नाही. राजस्थानला शेवटून दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
मॉरिससाठी राजस्थानने प्रचंड खजिना रिता केला मात्र येत्या लिलावासाठी रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये मॉरिसचं नाव नाहीये. काही महिन्यांपूर्वी मॉरिसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. मॉरिसने लिलावासाठी नाव दिलेलं नाही.
2. युवराज सिंग- 16 कोटी (दिल्ली डेअरडेव्हिल्स)
भारताचा हरहुन्नरी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगसाठी दिल्ली संघाने छप्परफाड रक्कम खर्च केली होती. बेंगळुरू संघाने आधीच्या हंगामात 14 कोटी रुपये खर्चून युवराजला संघात घेतलं. मात्र लौकिकाला साजेशी कामगिरी न झाल्याने त्याला संघातून बाजूला करण्यात आलं.
बेंगळुरूसाठी सर्वसाधारण कामगिरी, राष्ट्रीय संघापासूनही दूर युवराजला लिलावात एवढी रक्कम मिळेल असा कोणालाही अंदाज नव्हता. मात्र दिल्लीने युवराजच्या क्षमतेचा फायदा उठवण्याचं ठरवलं.
2011 विश्वविजयाचा शिल्पकार, अव्वल फिनिशर, उपयुक्त फिरकीपटू, अफलातून क्षेत्ररक्षक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव या युवराजच्या जमेच्या बाजू होत्या.
कॅन्सरसारख्या दुर्धर आजारवर मात करत पुनरागमन करणाऱ्या युवराजचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
प्रचंड रक्कम नावावर झालेल्या युवराजला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. त्याने 248 धावा केल्या आणि संपूर्ण हंगामात एक विकेट घेतली.
मोठ्या खेळाडूकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण न झाल्याने दिल्ली संघव्यवस्थापनाची खप्पा मर्जी झाली आणि त्यांनी युवराजला डच्चू दिला.
3. पॅट कमिन्स- 15.5 कोटी (कोलकाता नाईट रायडर्स)
चांगल्या फास्ट बॉलरसाठी मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करायला कोलकाता नाईट रायडर्स संघव्यवस्थापनाला आवडतं. काही वर्षांपूर्वी कोलकाताने ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कसाठी अशी बोली लावली होती.
त्याचा कित्ता गिरवत 2020 लिलावात कोलकाताने ऑस्ट्रेलियाच्याच पॅट कमिन्ससाठी तब्बल 15.5 कोटी रुपये खर्च केले.
उंचपुरा कमिन्स ऑस्ट्रेलियाचा प्रमुख गोलंदाज आहे. तिन्ही फॉरमॅट खेळत असल्याने कोलकाता संघासाठी तो पूर्ण हंगाम खेळेल का याविषयी साशंकता होती. पण कोलकाताने कमिन्सच्या क्षमतेवर विश्वास ठेवला.
कमिन्स आता ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आहे. त्याच्याच नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने प्रतिष्ठेची अशेस मालिका जिंकली. पण कोलकाताने यंदाच्या लिलावासाठी रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये कमिन्सचं नाव नाही.
लिलावात कमिन्सचं नाव आहे आणि पुन्हा एकदा तो कोटीच्या कोटी उड्डाणं घेऊ शकतो.
4. बेन स्टोक्स- 14.5 कोटी (रायझिंग पुणे सुपरजायंट्स)
धडाकेबाज फलंदाज, भागीदारी तोडण्यात वाकबगार गोलंदाज, अतिशय चपळ क्षेत्ररक्षक अशा सगळ्या आघाड्या समर्थपणे सांभाळणारा स्टोक्स प्रत्येक संघासाठी चलनी नाणं ठरू शकतो.
फिक्सिंगप्रकरणी चेन्नई आणि राजस्थान संघावर बंदीची कारवाई झाल्याने रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि गुजरात लायन्स या संघांची निर्मिती करण्यात आली.
पुणे संघाने स्टोक्सची गुणवत्ता हेरत त्याच्यासाठी प्रचंड रक्कम खर्च केली. स्टोक्समुळे संघाचं संतुलन व्यवस्थित होतं आणि अतिरिक्त फलंदाज किंवा गोलंदाज खेळवता येतो.
स्टोक्ससाठी मुंबई, दिल्ली, बेंगळुरू यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळाली. मुंबईने माघार घेतल्यानंतर हैदराबाद शर्यतीत उतरलं.
अगदी शेवटच्या क्षणी पुण्याने स्टोक्ससाठी बोली लावली. स्टोक्सला मिळवणारच असा चंग केलेल्या पुण्याने त्याला घसघशीत रक्कम देऊन संघात सामील केलं.
5.युवराज सिंग- 14 कोटी (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू)
अष्टपैलू गुणकौशल्यांमुळे युवराज सिंग लिलावात नेहमीच खपणीय असतो. जेतेपदासाठी आतूर बेंगळुरू संघाने 2014 हंगामासाठी युवराज सिंगला ताफ्यात समाविष्ट केलं. यासाठी 14 कोटी एवढी प्रचंड रक्कम त्यांना खर्चावी लागली.
हा सौदा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. बेंगळुरू संघाचे मालक विजय मल्या यांनी यासंदर्भात तक्रारही दाखल केली.
लिलावात युवराजला 10 कोटीची अंतिम बोली लागली. मात्र यानंतरही लिलावकर्त्यांनी बोली सुरूच ठेवल्याने आम्हाला 4 कोटी अतिरिक्त द्यावे लागले असं मल्या यांचं म्हणणं होतं.
युवराजची निवड बेंगळुरूचं नशीब बदलू शकलं नाही. युवराजची कामगिरी यथातथा झाल्याने बेंगळुरूने त्याला लगेचच डच्चू दिला.
6. बेन स्टोक्स- 12.5 कोटी (राजस्थान रॉयल्स)
इंग्लंड संघाचा अविभाज्य भाग झालेल्या स्टोक्सची उपयुक्तता आयपीएलच्या आधीच्या हंगामांमध्ये पाहायला मिळाली होती. यामुळेच 2018 हंगामापूर्वी झालेल्या लिलावात राजस्थानने स्टोक्ससाठी 12.5 कोटी रुपये खर्च केले.
प्रयोगशील खेळ आणि दृष्टिकोनासाठी राजस्थानचा संघ ओळखला जातो. युवा खेळाडूंना संधी देणारा संघ अशी राजस्थानची ओळख आहे.
कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्याची क्षमता, डावात कोणत्याही टप्प्यावर गोलंदाजी करण्याची हातोटी, अफलातून क्षेत्ररक्षक, गरज भासल्यास कर्णधारपद हाताळू शकतो हे सगळं लक्षात घेऊन राजस्थानने स्टोक्सला घेतलं.
चार वर्ष स्टोक्स राजस्थान संघाचा भाग राहिला. राजस्थानसाठी खेळताना स्टोक्सच्या नावावर शतकही आहे.
इंग्लंडसाठी खेळायला प्राधान्य देत असल्याने स्टोक्सने यंदाच्या लिलावासाठी नाव दिलेलं नाही. स्टोक्ससारख्या सर्वांगीण खेळाडूची उणीव प्रत्येक संघाला जाणवणार आहे.
7. गौतम गंभीर- 11.4 कोटी (कोलकाता नाईट रायडर्स)
भारतीय, आंतरराष्ट्रीय, युवा-अनुभवी अशा सगळ्या खेळाडूंची मोट बांधू शकेल अशा कर्णधाराची कोलकाताला आवश्यकता होती. गौतम गंभीरच्या रुपात कोलकाताला असा खेळाडू मिळाला.
धडाकेबाज सलामीवीर, लढवय्या कर्णधार गंभीरसाठी कोलकाताने 11.4 कोटी रुपये खर्च केले. हा निर्णय कोलकातासाठी अतिशय फलदायी ठरला.
गंभीरच्या नेतृत्वातच कोलकाताने आयपीएलचं जेतेपद पटकावलं. गंभीरने अतिशय सक्षम अशी संघाची बांधणी केली. कर्णधारपद सांभाळताना गंभीरने स्वत:मधल्या फलंदाजावर अन्याय होऊ दिला नाही.
राहुलची छप्पर फाड कमाई
या खेळाडूंमध्ये मोठया भारतीय खेळाडूंची नावं नसल्यामुळे तुम्ही आश्चर्यचकित झाले असाल ना. त्याचं उत्तरही जाणून घेऊया. आयपीएलच्या संरचनेनुसार सुरुवातीच्या वर्षांमध्ये प्रत्येक संघाकडे आयकॉन प्लेयर्स होते.
या खेळाडूला लिलावाआधीच मोठी रक्कम देऊन ताफ्यात घेतलं जातं. हा खेळाडू प्रामुख्याने भारतीय असतो. यामुळेच विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी यासारख्या मोठ्या खेळाडूंचा लिलावात समावेश नसतो.
आयपीएल संघांनी कायम केलेले खेळाडू आणि 10 कोटींपेक्षा जास्त मानधन असलेले खेळाडू.
- चेन्नई सुपर किंग्स- रवींद्र जडेजा (16 कोटी), महेंद्रसिंग धोनी (12 कोटी)
- कोलकाता नाईट रायडर्स- आंद्रे रसेल (12 कोटी)
- सनरायझर्स हैदराबाद- केन विल्यमसन (14 कोटी)
- मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा (16 कोटी), जसप्रीत बुमराह (12 कोटी)
- रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू- विराट कोहली (15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल (11 कोटी)
- दिल्ली कॅपिटल्स- ऋषभ पंत (16 कोटी)
- राजस्थान रॉयल्स- संजू सॅमसन (14 कोटी), जोस बटलर (10 कोटी)
- पंजाब किंग्ज-मयांक अगरवाल (12 कोटी)
- लखनौ सुपरजायंट्स- के.एल राहुल (17 कोटी)
- अहमदाबाद टायटन्स- हार्दिक पंड्या (15 कोटी), रशीद खान (15 कोटी)
या यादीकडे नजर टाकली तर लक्षात येईल की लिलावाव्यतिरिक्त सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत लखनौ सुपरजायंट्स संघाचा कर्णधार के. एल. राहुलचं नाव अव्वल स्थानी आहे.
राहुलला 2022 हंगामासाठी लखनौ संघ 17 कोटी रुपये मानधन देणार आहे. आयपीएल लिलावाच्या इतिहासात सर्वाधिक बोली ख्रिस मॉरिससाठी लागली होती. त्या रकमेपेक्षा जास्त मानधन राहुलला मिळणार आहे. पण काही दिवसांवर आलेल्या लिलावात हा आकडाही पार होण्याची शक्यता आहे.
चेन्नईसाठी रवींद्र जडेजा तर मुंबईसाठी रोहित शर्मा यांना प्रत्येकी 16 कोटी रुपये मिळणार आहेत. दिल्ली कॅपिल्स संघ तेवढीच रक्कम कर्णधार ऋषभ पंतला मानधन म्हणून देणार आहे.
संघाचं हित लक्षात घेऊन विराट कोहलीने मानधन कमी घ्यायचं ठरवलं आहे. सुधारित रचनेनुसार कोहलीला यंदाच्या हंगामासाठी 15 कोटी रुपये मिळतील.
पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवणाऱ्या हार्दिक पंड्याला तसंच जगप्रसिद्ध फिरकीपटू रशीद पंड्या यांनाही प्रत्येकी 15 कोटी रुपये मानधन अहमदाबाद संघव्यवस्थापन देणार आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)