दहावी-बारावीचे विद्यार्थी रस्त्यावर का उतरले?

आंदोलक विद्यार्थी

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांच्या धारावी इथल्या कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येनं आलेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं.

परीक्षा ऑनलाईन घ्यावी या मागणीसाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आक्रमक झाले असून मुंबई, नागपूर, उस्मानाबाद, पुणे इथे विद्यार्थी रस्त्यावर उतरले.

पोलिसांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी काही ठिकाणी लाठीचार्ज केल्याचंही वृत्त आहे.

वर्षा गायकवाड यांनी दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाइन आणि वेळापत्रकानुसारच घेण्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून यंदा परीक्षा ऑनलाइन घेण्यात यावी, अशी मागणीही मोठ्या प्रमाणावर होऊ लागली होती.

आज (31 जानेवारी) विद्यार्थी मोठ्या संख्येने वर्षा गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर जमले होते.

विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू होण्याआधी हिंदुस्तानी भाऊ याने एक व्हीडिओ शेअर केला होता.

या व्हीडिओमध्ये हिंदुस्तानी भाऊने म्हटलं होतं की, मी आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन देत आहे. लवकरात लवकर परीक्षा रद्द व्हाव्यात, मुलांची फी माफ व्हावी. इथले एसीपी-डीसीपी यांनी मला सांगितलं आहे की, आम्ही निवेदन शिक्षणमंत्र्यांपर्यंत पोहोचवू. यानंतरही जर त्यांनी आमचं नाही ऐकलं, तर आम्ही पुन्हा अशाच पद्धतीने मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरू.

ही मुलं त्यांच्या हक्काची लढाई लढत आहेत, त्यांना न्याय मिळायला हवा, असंही हिंदुस्तानी भाऊने म्हटलं होतं.

हिंदुस्तानी भाऊ

फोटो स्रोत, Instagram/Hindustani Bhau

'हिंदुस्थानी भाऊ'च्या आवाहनानंतर ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यासाठी आम्ही आंदोलनात उतरलो असं मुंबईत जमलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी अनेक वृत्तवाहिन्यांशी बोलताना सांगितलं.

हिंदुस्तानी भाऊ आपल्या व्हीडिओत विद्यार्थ्यांच्या हक्काची भाषा करत असले तरी ही भूमिका खरंच सर्व विद्यार्थ्यांची आहे का? आक्रमक होत रस्त्यावर उतरलेल्या या विद्यार्थ्यांची मागणी काय आहे? दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करणं किंवा ऑनलाइन घेणं खरंच शक्य आहे का?

या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला.

'परीक्षा रद्द करा'

परीक्षा रद्द करा या मागणीसाठीच विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.

बीबीसी मराठीने काही आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

एका विद्यार्थ्यानं म्हटलं की, "आज चार दिवस झाले पूर्व परीक्षा सुरू आहेत. 80 मार्कांचा पेपर होता. पण मला 80 पैकी 5 मार्कांचंही काही लिहिता येत नाही. पेपर समजत नाही. ऑनलाइन शिकवतात, नीट सांगतही नाहीत. नेटसाठी, वायफायसाठी आमच्या आईवडिलांकडे तितके पैसे नाहीयेत."

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

"पूर्वपरीक्षाही ऑफलाइन घ्यायला हव्या होत्या. आम्ही काहीच म्हटलं नसतं. पण तसं झालं नाही," असं एका विद्यार्थ्याने म्हटलं.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड स्वतः त्यांचे सेमिनार ऑनलाइन घेत आहेत. मग त्या मुलांचा जीव धोक्यात का घालत आहेत? असाही प्रश्न या विद्यार्थ्याने उपस्थित केला.

आक्षेप असेल तर आधी चर्चा करावी - वर्षा गायकवाड

बीबीसी मराठीशी बोलताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, "आम्ही तज्ज्ञांशी चर्चा करूनच ऑफलाईन परीक्षेचा निर्णय घेतला आहे. ज्यांना आक्षेप आहेत त्यांनी आधी आमच्याशी चर्चा करावी. अशा पद्धतीची कृती यावर उपाय असू शकत नाही.""बोर्डाच्या परीक्षा कशा पद्धतीने होतील यासंदर्भातील SOP लवकरच आम्ही देऊ. पण परीक्षा घेण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार आम्ही करत नाहीय. गेली दोन वर्षं परीक्षा रद्द झाल्या. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा."

वर्षा गायकवाड

फोटो स्रोत, Twitter

'हिंदुस्थानी भाऊ' यांच्याशी माझं फोनवरच बोलणं झालं आहे. मी त्यांनाही हेच म्हटलं की तुम्ही भेटायला हवं होतं. तुमचं म्हणणं काय आहे हे आम्ही समजून घेतलं असतं, असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं.

ऑनलाइन परीक्षा घेणं शक्य नाही

ऑनलाइन परीक्षा घेणं सध्याच्या परिस्थितीत शक्य नसल्याचं मत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक प्राध्यापक मुकुंद आंधळकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.

ग्रामीण भागात तांत्रिक सुविधांचा अभाव आहे. आपल्याला ऑनलाइन क्लासेस घेणंही योग्य प्रकारे शक्य झालं नाही. असं असताना ऑनलाइन परीक्षांचा आग्रह धरणं चुकीचं असल्याचं आंधळकर यांनी म्हटलं.

विद्यार्थी

फोटो स्रोत, Getty Images

"तांत्रिक सुविधा नसलेल्या ग्रामीण भागात जुलैपासूनच ऑफलाइन वर्ग सुरू झाले असल्यामुळे तसंच तांत्रिक सुविधा असलेल्या शहरी भागात आधी ऑनलाईन आणि नंतर ऑक्टोबरमध्ये ऑफलाईन वर्ग सुरू करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास पुरेसा झाला आहे. तसंच प्रात्यक्षिकंही पुरेशा प्रमाणात झालेली आहेत. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमही कमी करण्यात आलेला असून परीक्षेची पूर्ण तयारी झालेली आहे," असं आंधळकर यांनी सांगितलं.

गेल्या वर्षी 2021 च्या बारावीच्या ऑफलाइन परीक्षा घेता आल्या नव्हत्या. मात्र, या विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिलेली असल्यामुळे त्या गुणांच्या आधारे मूल्यमापन करता आलं होतं. परंतु आता यावर्षी हे शक्य होणार नाही. आता कोरोनाचा प्रभाव पुरेसा कमी झाला असून जनजीवन जवळपास सुरळीत झालं आहे, अशावेळी विद्यार्थ्यांना परीक्षेपासून दूर ठेवणे योग्य ठरणार नसल्याची भूमिका त्यांनी मांडली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)