कसबा पोटनिवडणूकः अभिजीत बिचुकले यांच्याबद्दल या गोष्टी माहीत आहेत का?

फोटो स्रोत, Abhijit Bichukale/facebook
- Author, स्वाती पाटील राजगोळकर
- Role, बीबीसी मराठीसाठी
साताऱ्याचे अभिजीत बिचुकले यांनी कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतही अर्ज भरला अजून ते या निव़़डणुकीला सामोरे जात आहेत.
अभिजीत बिचुकले यांच्याबद्दल या गोष्टी माहीत आहेत का?
आतापर्यंत नगरसेवकापासून ते राष्ट्रपतीपदापर्यंत अनेक निवडणुका अभिजीत बिचुकले यांनी लढवल्या आहेत.
बिग बॉस मराठीचे स्पर्धक असलेल्या बिचुकले यांनी 2019 मध्ये आदित्य ठाकरे यांच्याविरोधात देखील निवडणूक लढवली होती. नुकतीच झालेली पंढरपूर-मंगळवेढा निवडणूक देखील लढवली होती. या निवडणुकीत त्यांना 137 मतं पडली आहेत.

2019 मध्ये त्यांच्यावर हा लेख लिहिला होता. तो लेख या निमित्ताने पुन्हा शेअर करत आहोत.
कोण आहेत अभिजीत बिचुकले?
पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले बिचुकले सातारा नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करत होते. पण गेली काही वर्षं ते राजकारणात नशीब आजमावताना दिसत आहेत. २००४पासून ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत आतापर्यंत नगरपालिका ते राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत त्यांनी नशीब आजमावलं आहे. सातारा शहरात गुरुवार पेठ परिसरात पत्र्याच्या छोट्याशा घरात बिचुकले राहतात.
बिचुकले यांनी आजवर अनेक निवडणुका लढवल्या आहेत. पण आजवर एकही निवडणूक ते जिंकू शकले नाहीत. तरीही २०१९च्या लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ जागा लढवणार असल्याचं बॅनर सातारा इथं लावलं होते. २०१९चा मुख्यमंत्री मीच ठरवणार असंही या बॅनरवर लिहिलं होतं.
अभिजीत बिचुकले यांच व्यक्तीमत्त्व नेमकं कसं आहे? हे जाणून घेताना सातारा इथले स्थानिक पत्रकार मोहन मस्कर-पाटील यांनी दहा वर्षापूर्वीचा एक किस्सा सांगितला. २००९ साली उदयनराजे भोसले पहिल्यांदाच खासदार झाले. त्यावेळी लोकसभा निवडणूक जिंकणाऱ्या उदयनराजेंच्या विरोधात अभिजित बिचुकलेंनी एक याचिका दाखल केली होती.
बिचुकलेच्या एका तक्रारीमुळे जिल्हा प्रशासनाचे निवडणुकांचे गणित कोलमडलं होतं. न्यायालयीन प्रक्रियेमुळे सर्व ईव्हीएम आणि त्यातील अंतर्गत प्रणाली सुरक्षा यंत्रणेच्या देखरेखीखाली ठेवावी लागणार होती. त्याचा वापरच करता येणार नव्हता. दुसरे ईव्हीएम उपलब्ध करणे अशक्य होते. त्यामुळं सातारा जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघासाठी आंध्र प्रदेशहून ईव्हीएम मागवून घ्याव्या लागल्या होत्या. अर्थात बिचुकलेंची तक्रार चहाच्या पेल्यातील वादळ ठरलं होतं, असं मोहन पाटील सांगतात.

अभिजित बिचुकले यांनी आजपर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. मात्र एकाही निवडणुकीत त्यांना यश मिळालेलं नाही. पण निवडणुकीला उभं राहणं आणि प्रचाराच्या पद्धतीने ते कायम चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत.
'महाराष्ट्राचा २0१९ चा मुख्यमंत्री मीच ठरविणार..!' अशा आशयाचे बॅनर साताऱ्यात पाहायाला मिळाले. त्यावर बिचुकले यांच्या अतिआत्मविश्वासाची खिल्ली उडवली गेली. सातारा पालिकेतील एक कर्मचारी, लोकसभा उमेदवारी ते 'बिग बॉस-२' पर्यंतचा त्यांचा प्रवास अनाकलनीय म्हणावा लागेल, असंही मोहन पाटील यांना वाटतं.
'कवी मनाचा नेता अशी स्वतःची ओळख सांगणारे बिचुकले आपल्या पत्नी अलंकृता यांची ओळख 'बेळगाव, कारवार-निपाणीसह अखंड महाराष्ट्राच्या वहिनीसाहेब' अशी करून देतात असं त्यांच्या मित्रपरिवाराने सांगितलं.
बिचुकलेंची राष्ट्रपती पदासाठी मागणी
नगरसेवक ते खासदार निवडणूक लढवणारे अभिजित बिचुकले यांनी नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्राची अजूनही चर्चा होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपती पदासाठी पत्र लिहून 'भारताचे राष्ट्रपती म्हणून तुम्ही माझेच नाव घोषित करावे,' अशी विनंती केली होती.
तर सांगली इथं पंतगराव कदम यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत विश्वजित कदम यांच्या बिनविरोध निवडीपेक्षाही विरोधी उमेदवार म्हणून बिचकुलेंच्या माघारीचीच चर्चा सर्वाधिक झाली.

साताऱ्याच्या राजकारणात खा. उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा शब्द अंतिम असला तरी त्यांचा बिचुकले त्यांचा विरोध करताना दिसतात. त्यावर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांनी आपण फक्त बिचुकले यांना घाबरतो अशी मिश्कील टिप्पणी केली होती.
अभिजित बिचुकलेंनी नुकतीच सातारा इथून स्वतः तर सांगलीतून पत्नी अलंकृता यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. पण सांगलीतील अर्ज भरताना डिपॉजिट म्हणून त्यांनी चक्क साडेबारा हजार रुपयांची चिल्लर दिली आणि ती मोजताना अधिकाऱ्यांना घाम फुटला होता, असं मोहन पाटील सांगतात.

फोटो स्रोत, Abhijit Bichukale/facebook
बिचुकलेंच्या बिग बॉसमधील प्रवेशाबाबत त्यांच्या मित्रपरिवाराशी चर्चा केली त्यावेळी बिग बॉसच्या घरातून बिचुकले विजयी होऊन बाहेर येतील असा आत्मविश्वास बिचुकलेंचे मित्र प्रसन्न वंजारी यांनी व्यक्त केला.
बिग बॉसच्या घरात वावरताना मी एक फोन केला तर ५ कोटी सहज येतील अशी भाषा वापरतात. पण त्यांचं घर त्यांची पत्नी चालवते. बिचुकले यांची पत्नी अलंकृता या शिक्षिका आहेत, असं बिचुकलेंच्या एका मित्राने सांगितलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








