इंडिया गेट : पंचम जॉर्ज यांच्या जागी आता सुभाषचंद्र बोसांचा पुतळा

फोटो स्रोत, Getty Images
- Author, विवेक शुक्ला,
- Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीकरिता..
रेल्वे बोर्डाचे माजी सदस्य डॉ. रविंद्र कुमार हे शुक्रवारी (21 जानेवारी) नवी दिल्लीतील आपल्या घरी निवांत बसले होते. त्यांनी टीव्ही सुरू करून बातम्या पाहिल्या तर इंडिया गेटबद्दलच्या बातम्या सगळीकडे त्यांना दिसल्या.
कधीकाळी सम्राट पंचम जॉर्ज यांचा पुतळा असलेल्या ठिकाणी आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे, ही बातमी ऐकल्यानंतर त्यांच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.
त्यांना अजूनही ते दिवस आठवतात, ज्यावेळी लाल संगमरवरी छत्राखाली सम्राट पंचम जॉर्ज यांचा पुतळा उभा असायचा.
त्याच्या वरच्या बाजूला रात्रीच्या वेळी एक 40-50 वोल्टचा बल्ब पेटवण्यात येत असे.
ब्रिटनचे सम्राट पंचम जॉर्ज यांचा तो पुतळा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही तब्बल 21 वर्षे म्हणजेच 1968 पर्यंत त्याच ठिकाणी उभा होता.
पंचम जॉर्ज यांच्या पुतळ्याचे हावभाव असे होते की जणू काय ते संपूर्ण दिल्लीवर बारीक नजर ठेवून आहेत. पण तो पुतळा तिथून हटवण्यास इतका वेळ का लागला असेल, हाही एक प्रश्नच आहे.
पंचम जॉर्ज यांचा तो पुतळा 1938 साली उभारण्यात आला होता. त्यानंतर 1968 मध्ये हा पुतळा त्या ठिकाणावरून हटवून वायव्य दिल्लीत बुराडी येथील एका कोरोनेशन पार्कमध्ये हटवण्यात आला. त्या ठिकाणी विशेषतः ब्रिटिश काळातील अनेक गोऱ्या लोकांचे पुतळे अस्ताव्यस्त पडलेले आहेत.

फोटो स्रोत, @NARENDRAMODI
आता त्याच्या जवळपास 50 वर्षांनी मोकळ्या असलेल्या या जागेवर पुन्हा पुतळा उभारला जाईल. याठिकाणी लावण्यात येत असलेला सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा 28 फूट उंच तर 6 फूट रुंद, ग्रॅनाईटने बनवण्यात येणार आहे.
खरं तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा लावण्यात येणार असलेल्या ठिकाणी महात्मा गांधी यांचा पुतळा बसवण्याची चर्चाही अनेक वर्षे सुरू होती.
आता आपल्याला या सर्व चर्चांवरून एक प्रश्न पडू शकतो की, त्यावेळी 1938 मध्ये पंचम जॉर्ज यांचाच पुतळा इंडिया गेटवर का उभारण्यात आला होता.
त्याचं उत्तर म्हणजे पंचम जॉर्ज यांचं नवी दिल्लीशी असलेलं विशेष नातं होय. पंचम जॉर्ज यांच्या काळातच 1911 मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्लीला हलवण्याची घोषणा करण्यात आली होती.
त्यामुळेच दिल्लीच्या इतिहासात पंचम जॉर्ज यांचा उल्लेख महत्त्वाचा आहे. त्यामुळेच इंडिया गेट उभारण्यात आला त्यावेळी पंचम जॉर्ज यांचाच पुतळा त्याठिकाणी उभारण्याचा निर्णय 1938 मध्ये घेण्यात आला होता.
नवी दिल्ली नगर परिषदेचे माजी संचालक मदन थपलियाल यांनी 'राजधानी - एक सदी का सफर' या पुस्तकात लिहिलं आहे, "सम्राट पंचम जॉर्ज आणि क्विन मेरी एका विशेष रेल्वेने 7 डिसेंबर 1911 रोजी दिल्लीत दाखल झाले. तत्पूर्वी ते मुंबईला आले होते. पंचम जॉर्ज यांच्या रेल्वेसाठी एक विशेष रेल्वेस्थानकही उभारण्यात आलं होतं.
लाल किल्ल्याच्या मागील बाजूस सलीमगढ परिसरात हे रेल्वेस्थानक उभारलं गेलं होतं. दिल्लीच्या बुराडी डावाजवळ एका मोकळ्या मैदानात लावण्यात आलेला हा तिसरा दिल्ली दरबार होता. यामध्ये सम्राट आणि महाराणी यांनी स्वतः सहभाग घेतला होता. यापूर्वीच्या दोन दिल्ली दरबारांमध्ये शाही दांपत्य उपस्थित नव्हतं."
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त इंडिया गेटवर त्यांचा पुतळा बसवण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली.
त्याशिवाय प्रजासत्ताक दिनानिमित्तचे कार्यक्रम आता 23 जानेवारी या नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जन्मदिनापासून सुरू होतील, तर 30 जानेवारीला महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनी संपतील असा निर्णयही सरकारने घेतला आहे.
यासोबतच 1971 च्या भारत-पाक युद्धातील शहिदांच्या स्मृतिप्रित्यर्थ इंडिया गेटवर 26 जानेवारी 1972 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुरू केलेली अमर जवान ज्योती नॅशनल वॉर मेमोरियलमध्ये विलीन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
अमर जवान ज्योती गेली अनेक वर्षे इंडिया गेटचा महत्त्वपूर्ण भाग होती. ती आता बंद केल्यामुळे देशात काही प्रमाणात नाराजी तर नक्कीच आहे.
सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा कोण बनवणार?
आता इंडिया गेटच्या छत्राखाली उभा करण्यात येत असलेला सुभाष चंद्र बोस यांचा पुतळा कोणत्या शिल्पकाराकडून बनवून घेण्यात येईल, याची उत्सुकता सर्वांना आहे.
शिल्पकाराचं नावही लवकरच निश्चित केलं जाईल, असं सांगितलं जातं. शक्यतो ही जबाबदारी दिग्गज मूर्तिकार राम सुतार किंवा अनिल सुतार यांना दिली जाईल.

फोटो स्रोत, ARCHIVE PHOTOS
सुतार पिता-पुत्र सध्या शरयू नदीकिनारी बांधल्या जात असलेल्या भगवान रामाच्या सर्वात उंच मूर्तीच्या निर्माण कार्यात व्यस्त आहेत. या मूर्तीची उंची 251 फूट इतकी असेल.
राम सुतार यांनीच सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वात उंच पुतळा 'स्टेच्यू ऑफ युनिटी' तयार केला होता.
मूळचे महाराष्ट्रातील असलेल्या सुतार यांच्या शिल्पांमध्ये गती आणि भाव यांचा शानदार समन्वय पाहायला मिळतो.
संसद भवनात स्थापित करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 18 फूट उंच पुतळाही राम सुतार यांनी अतिशय सुंदररित्या बनवला होता.
राम सुतार यांनी याआधीही संसद भवनातील देशातील अनेक महापुरुषांचे पुतळे बनवलेले आहेत. यामध्ये महात्मा गांधी, महाराणा रणजीत सिंह, छत्रपती शाहू महाराज, पंडीत जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, जयप्रकाश नारायण इत्यादींचा समावेश आहे.
संसद भवनात पाऊला-पाऊलांवर राम सुतार यांनी बनवलेले शिल्प आपल्या नजरेस पडतात. त्यांचं काम पाहिल्याशिवाय कुणीही पुढे जाऊ शकणार नाही.
राम सुतार यांचं नाव आधुनिक भारतीय मूर्ती कला क्षेत्रातील महत्त्वाच्या नावांमध्ये घेतलं जात राहील. सुतार हे कोणत्याही शिल्पावर काम सुरू करण्यापूर्वी त्याबाबत संशोधन करणं महत्त्वाचं मानतात. तसंच ते आपल्या स्वतःच्याच अटी व शर्थींनुसार काम करतात, असं त्यांच्याबाबत सांगितलं जातं.
एडवर्ड यांचा पुतळा हटवून नेताजींचा पुतळा बसवला तेव्हा..
नेताजी यांचा पुतळा इंडिया गेटवर लावण्याचे मथितार्थ काहीही का असेना, त्यावर चर्चा होणार हे खरं.
राजधानीत नेताजींचा पहिला पुतळा लुटियन्स दिल्लीऐवजी लाल किल्ल्याजवळ 23 जानेवारी 1975 रोजी एडवर्ड पार्कमध्ये लावण्यात आला होता.

फोटो स्रोत, @NARENDRAMODI
एडवर्ड हे ब्रिटनचेच सम्राट होते. ते 1901 मध्ये महाराणी व्हिक्टोरिया यांच्यानंतर गादीवर बसले होते. सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा लावल्यानंतरच तेथील एडवर्ड पार्कचं नाव सुभाष पार्क करण्यात आलं होतं. तेव्हाही सम्राट एडवर्ट यांचा पुतळा कोरोनेशन पार्कला पाठवून देण्यात आला होता.
सुभाष पार्कमध्ये लावण्यात आलेला पुतळा हा इंडियन नॅशनल आर्मी (INA) च्या साथीदारांसोबत आहे. त्याचं अनावरण तत्कालीन उपराष्ट्रपती बी. डी. जत्ती यांनी केलं होतं.
ही मूर्ती याठिकाणी स्थापित करण्यासाठी किमान दहा दिवस लागले होते. त्यानंतर लोक त्याला अभिवादन करण्यासाठी जात होते.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा सुभाष पार्कमधील पुतळा महाराष्ट्रातील महान शिल्पकार सदाशिवराव साठे यांनी बनवला होता.
महात्मा गांधी यांचा राजधानी दिल्लीतील पहिला पुतळा 1952 मध्ये लावण्यात आला होता. चांदणी चौकात टाऊन हॉलच्या बाहेर ला पुतळा लावला होता.
सदाशिवराव साठे यांचं गेल्या वर्षी मुंबईत निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीसुद्धा त्यांच्या कामाचे प्रशंसक होते.
एडवर्ड पार्कमधून भगत सिंह यांच्यासाठी गांधींची सभा
एडवर्ड पार्क (सुभाष पार्क) मध्ये 7 फेब्रुवारी 1930 रोजी दिल्लीतील नागरिक एकत्र होत होते. कारण होतं महात्मा गांधींची सभा.
ब्रिटिश सरकारवर दबाव टाकून भगत सिंह आणि त्यांचे दोन साथीदार राजगुरू आणि सुखदेव यांना फाशीच्या शिक्षेपासून वाचवणं हा या सभेचा उद्देश होता.

सभेला संबोधित करत असताना महात्मा गांधी म्हणाले होते, "मी कोणत्याही परिस्थितीत फाशीची शिक्षा देण्याचा स्वीकार करू शकत नाही. भगत सिंह यांच्यासारख्या वीर पुरुषाला फाशी होते, याचा मी विचारही करू शकत नाही."
महात्मा गांधी त्यावेळी एडवर्ड पार्कजवळ दरियागंजमध्ये काँग्रेस नेते डॉ. एम. ए. अन्सारी यांच्या घरी थांबलेले होते. डॉ. अन्सारी हे गांधीजींचे वैयक्तिक डॉक्टर होते.
महात्मा गांधी त्यावेळी ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांची सातत्याने भेट घेत होते. भगत सिंह यांना फाशीच्या शिक्षेतून माफी मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. याच घटनाक्रमात ते 19 मार्च 1931 रोजी व्हाईसरॉय हाऊस (आताचं राष्ट्रपती भवन) येथे जाऊन लॉर्ड आयर्विन यांना भेटले.
या भेटीनंतर त्यांना कराची येथे होत असलेल्या काँग्रेसच्या बैठकीसाठी निघायचं होतं.
कराचीला जाण्यासाठी गांधीजी पुरानी दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोहोचले त्यादिवशी त्यांना माहिती मिळाली की भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांना फाशी देण्यात आली आहे. ही 23 मार्च 1930 ची गोष्ट आहे.
इंडिया गेटच्या नक्षीकामावर कोणाचा प्रभाव?
ड्यूक ऑफ कॅनॉट यांनी 10 फेब्रुवारी 1921 रोजी वॉर मेमोरियल म्हणजेच इंडिया गेटची पायाभरणी केली होती. ड्यूक ऑफ कॅनॉट यांच्या नावानेच याठिकाणी कॅनॉट प्लेस परिसराचं नाव ठेवण्यात आलं. यासाठी गोलाकार अशी जागा निवडण्यात आली. सर एडवर्ड लुटियन्स यांनी याचं तसंच छत्रीचं डिझाईन बनवलं होतं.
इंडिया गेटचं डिझाईन पॅरिसमधील आर्क डी ट्रॉम्फ स्मारकावरून प्रेरित आहे. त्याठिकाणी पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या सैनिकांचं स्मारक आहे.

त्याच्या दहा वर्षांनी म्हणजेच 12 फेब्रुवारी 1931 रोजी इंडिया गेटचं उद्घाटन करण्यात आलं होतं. पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे स्मारक बनवण्यात आलं होतं.
इंडिया गेट हे लाल आणि बदामीसर रंगाच्या दगडांनी आणि ग्रॅनाईटने बनवण्यात आलेलं आहे. इंडिया गेटच्या आतमध्ये सुमारे 300 पायऱ्या आहेत. त्याच्या मदतीने वरच्या घुमटापर्यंत पोहोचता येतं.
इंडिया गेटवरचं बॉलीवूड प्रेम
इंडिया गेटवर बॉलीवूड चित्रपट कलाकारांचंही तितकंच जास्त प्रेम असल्याचं आपल्याला इतिहासात डोकावल्यास दिसून येईल.
शेजारच्या हैदराबाद हाऊसमध्ये लोकप्रिय क्रीडा कमेंटेटर गौस मोहम्मद गेल्या 50 वर्षांपेक्षा जास्त काळ राहतात. इंडिया गेटजवळ 'रोटी, कपडा और मकान' चित्रपटाचं चित्रीकरण झाल्याचं त्यांना चांगलंच आठवलं. यामध्ये लोकांनी कँडल मार्च काढताना दाखवलेलं आहे.
याशिवाय, फना, रंग दे बसंती, जन्नत 2, बँड बाजा बाराज, चकदे इंडिया, न्यू दिल्ली टाईम्स यांसारख्या चित्रपटांचं शूटिंगही इथं झालेलं आहे. 'न्यू दिल्ली टाईम्स' चित्रपटात संपादकाच्या भूमिकेत असलेले शशी कपूर इंडिया गेटच्या भोवती फियाट कार चालवताना दिसून येतात.
पूर्वी व्हायचा क्रिकेट सराव
इंडिया गेट परिसरातील मैदानांवर पूर्वी मुले क्रिकेट खेळत असत. पण आता याठिकाणी सुरक्षारक्षकांचा कडा पहारा आहे. त्यामुळे याठिकाणी क्रिकेट सराव करणं जवळपास अशक्य बनलं आहे.
इंडिया गेट परिसरात अनेक पिढ्यांमधील क्रिकेटपटूंनी सराव केला आहे. किर्ती आझाद, अजय जडेजा, मनिंदर सिंह यांसारखे मोठे क्रिकेटपटू वर्षानुवर्ष याठिकाणी सराव करत होते.
पूर्वीच्या काळी याठिकाणी निजाम क्रिकेट चॅम्पियनशीप नामक एक क्रिकेट स्पर्धा व्हायची. यामध्ये राजधानी दिल्ली, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील मोठे क्लब सहभागी व्हायचे.
दिल्लच्या रणजी ट्रॉफी तसंच दुलीप ट्रॉफी संघाचे कर्णधार राहिलेले वेंकट सुंदरम सांगतात, याठिकाणी मी बराच काळ सराव केला होता. तिथं मद्रास क्लबचंच नेट लावलेलं असायचं.
पतंग उडवणं
इंडिया गेटवर वरील सर्व गोष्टींशिवाय पतंग उडवण्याचा खेळही होत असे. बहुतांश पतंग उडवणारे जुन्या दिल्लीतून याठिकाणी यायचे. सुट्टीच्या दिवशी सकाळपासूनच पतंग उडवणाऱ्यांची गर्दी जमायची.

फोटो स्रोत, MANAN VATSYAYANA
मुलं याठिकाणी आठ-दहा पतंग आणि मांजाचे चरखे घेऊन येत. एकमेकांचं पतंग कापण्याची स्पर्धा लोकांमध्ये व्हायची. अत्यंत धमाल वातावरण असायचं.
पतंग स्पर्धा पाहण्यासाठी लोक याठिकाणी जमा होत. राष्ट्रीय युद्ध स्मारक बनवण्यात आल्यानंतर येथून पतंग उडवणाऱ्यांपासून चहाच्या टपऱ्या, फुगेवाले आणि इतर खाद्यपदार्थ विक्रेते दूर झाले आहेत.
शिवाय आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा लावल्यानंतर याठिकाणची सुरक्षाव्यवस्था आणखी कडक करण्यात येईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
काय बदललं नाही?
इंडिया गेट परिसरातील वातावरण गेल्या काही वर्षांत पूर्णपणे बदलून गेलं आहे. पण येथील गोल चक्करवरचं एक दृश्य अजूनही बदललेलं नाही. ते म्हणजे आईसक्रिम खाणाऱ्यांची गर्दी.
इथं रात्री नऊनंतर अत्यंत सुंदर वातावरण पाहायला मिळतं. काही आईस्क्रीम विक्रेते तर रात्री एक दोनपर्यंत उभे असतात.
पण गेल्या दोन वर्षांत कोरोना व्हायरस आल्यापासून ते चित्रही थोडंफार बदललं आहे.
जेव्हा राजीव-सोनिया इंडिया गेटवर यायचे
राजीव गांधी 1980 पूर्वी अत्यंत सामान्य आयुष्य जगत होते. ते पत्नी सोनिया गांधी यांना घेऊन फियाट कार किंवा अम्बेसिडर कारने इंडिया गेटवर फिरायला यायचे. राजीव-सोनिया याठिकाणी आईस्क्रिम खाण्याचा आनंद घेत.

फोटो स्रोत, ARCHIVE PHOTO
काही वेळ निवांत बसून आसपास ते मोकळेपणाने फिरत. त्यावेळी देशात दहशतवादाने डोकं वर काढलेलं नव्हतं. त्यामुळे त्यांना कोणतीही अडचण यायची नाही.
आता साठ वर्षांनंतर इंडिया गेटवर आणखी एक बदल होत आहे. हे सगळे बदल पाहत असलेल्या डॉ. रविंद्र कुमार यांना आता सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवण्याची प्रतीक्षा आहे.
ते म्हणतात, ज्या दिवशी हा पुतळा बसवला जाईल, त्याच दिवशी मी नेताजी सुभाष चंद्रांना पाहण्यासाठी कुटुंबीयांना घेऊन इंडिया गेटला जाईन.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








