राजेश टोपे- राज्यातली परिस्थिती समाधानकारक, कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट #5मोठ्याबातम्या

विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. राज्यातली परिस्थिती समाधानकारक, कोरोनाची रुग्णसंख्या घटतीये- राजेश टोपे

कोरोनानं वाढलेल्या धोक्यानंतर महाराष्ट्रातून दिलासादायक संकेत मिळालेल आहेत. रोजच्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून राज्यातली स्थिती नियंत्रणात असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

कोरोनाची लागण झाल्यानंतरही अगदी मोजक्या लोकांना रुग्णालयात दाखल करावं लागत आहे, असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. दिव्य मराठीनं याबाबत वृत्त दिलं आहे.

कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढवण्यासठी तसेच अधिकाधिक लोकांचं लसीकरण व्हावं यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

शाळा सुरु करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा होईल. पालक, संस्था चालक, टास्क फोर्स, मंत्रिमंडळ सदस्य, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विचार घेऊन यावर निर्णय घेतला जाईल, असंही मंत्री राजेश टोपे म्हणाले आहे.

2. कोरोनाची लसही मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होणार?

कोरोनाच्या टेस्ट किट प्रमाणेच आता कोरोनावरील लसदेखील लवकरच मेडिकलमध्ये उपलब्ध होणार असल्याची शक्यता असल्याची माहिती आहे. टीव्ही 9 मराठीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

केंद्र सरकारच्या औषध प्राधिकरण तज्ज्ञ समितीनं कोरोना प्रतिबंधक लसींच्या नियमित विक्रीसाठी मान्यतेची शिफारस केली आहे. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींसाठी शिफारस करण्यात आली आहे.

सरकारच्या कोवीन पोर्टलवर नोंदणी करण्यात आलेली रुग्णालयं आणि मेडिकल स्टोअर्स यांना या लसींची विक्री करण्याची परवानगी असेल अशीही माहिती मिळाली आहे.

लस कंपन्यांनी देशाच्या औषध महानियंत्रक म्हणजे DCGI कडे अर्ज केल्यानंतर त्याची दखल घेत, तज्ज्ञांच्या विशेष समितीनं लसींच्या चाचणीसंदर्भातील कागदपत्रांची पडताळणी करत मंजुरी दिली.

या मंजुरीनंतर आता सरकारनं अंतिम मंजुरीची घोषणा केल्यास याला अधिकृतपणे मान्यता मिळू शकते.

3. मविआ एकत्र लढले असते, तर कार्यकर्ते एकमेकांच्या छाताडावर बसले असते- चंद्रकांत पाटील

राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायत तसेच भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेत निवडणुकीत भाजप राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्याचं समोर आलं आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीचे एकत्र आकडे दाखवायला ते एकत्र लढले नाहीत. तसं झालं असतं तर कार्यकर्ते एकमेकांच्या छाताडावर बसले असले, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. लोकसत्तानं याबाबतचं वृत्तं दिलं आहे.

राष्ट्रवादी हुशार पक्ष आहे. मुख्यमंत्रीपद देऊन महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवतं. त्यानंतर धडाधडा फाईली सह्या करून कामं करून घेतली जात आहेत, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

मविआचे एकत्र आकडे पाहिले तरी त्यांनी विधानसभा, लोकसभेचं चित्र बदलणार नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपची ताकद दिसेल. तेव्हा योजना आणि मोदींचा चेहरा सर्वकाही ठरेल, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

4. उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या 'पोस्टर गर्ल'नेच भाजपचं कमळ घेतलं हाती

उत्तर प्रदेशात निवडणुकांच्या तारखा जवळ येऊ लागल्याने आता उमेदवारांच्या फोडाफोडीला जोर आलेला पाहायला मिळत आहे. तिकिटवाटपानंतर तर अनेक नेत्यांची पळापळ सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.

काँग्रेसच्या पोस्टर गर्ल आणि महिला आघाडीच्या झोन उपाध्यक्ष असलेल्या डॉ. प्रियंका मौर्य भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. लोकमतनं याबाबचं वृत्त दिलं आहे.

काँग्रेसच्या 'लडकी हू, लढ सकती हू' या मोहिमेच्या पोस्टरवर डॉ. प्रियंका मौर्य झळकत आहेत. मात्र, तिकिटवाटपावर नाराजी व्यक्त करत त्यांनी काही गंभीर आरोप केले आहेत.

तिकिट देण्यासाठी प्रियंका गांधींचे सचिव संदीप सिंह यांनी 10 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. काँग्रेसनं आपल्या नावाचा, चेहऱ्याचा आणि फॉलोअर्सचा वापर केल्याचंही त्या म्हणाल्या.

5. हवेत धडकणार होती दोन विमानं, थोडक्यात टळला अपघात, शेकडो प्रवासी बचावले

बंगळूरु विमानतळावर काही दिवसांपूर्वी एक मोठा विमान अपघात थोडक्यात टळला असून, या प्रकरणाची चौकशी DGCA च्या माध्यमातून केली जाणार आहे. एनडीटीव्हीनं याबाबतचं वृत्तं दिलं आहे.

डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार 7 जानेवारी 2020 रोजी बेंगळुरूहून कोलकाता आणि भुवनेश्‍वरला जाणारी दोन विमानं हवेत धडकण्यापासून थोडक्यात बचावली होती.

ही दोन विमानं एकाच हवाई मार्गावर होती, त्यामुळं हा धोका निर्माण झाला होता. रडार ऑपरेटर्स आणि एटीसी अधिकाऱ्यांमध्ये संवादाचा अभाव आणि निष्काळजीपणा यात समोर आला.

इंडिगो एअरबसच्या या फ्लाईटमध्ये शेकडो प्रवासी प्रवास करत होते. त्यांच्या जीवाला यामुळं धोका होता. त्यामुळं याची चौकशी करुन दोषींविरोधात कठोर कारवाई करणार असल्याचं डीजीसीएनं म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)