रिअ‍ॅलिटी शोमध्ये नोटबंदीवर विडंबन; केंद्राची मीडिया हाऊसला नोटीस #5मोठ्याबातम्या

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. रिअ‍ॅलिटी शोमध्ये लहान मुलांचं नोटबंदीवर विडंबन; केंद्राची मीडिया हाऊसला नोटीस

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सोमवारी (17 जानेवारी) झी एंटरटेनमेंट इंटरप्राइजेज लिमिटेडला नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये 15 जानेवारी रोजी प्रसारित झालेल्या रिअॅलिटी शोच्या प्रसारणाबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आलं आहे.

या शोमध्ये दोन मुलांनी नोटाबंदीवर विडंबन केलं होतं. यासोबतच ही मुले पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या पोशाखाची खिल्ली उडवतानाही दिसली होती.

झी तामिळवर प्रसारित होणाऱ्या 'ज्युनियर सुपर स्टार्स- सीझन 4' या रिअॅलिटी टेलिव्हिजन शोच्या एका भागावर भाजपाने चिंता व्यक्त केल्यानंतर ही नोटीस बजावण्यात आली आहे. दोन बालस्पर्धकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कथितपणे खिल्ली उडवणारे स्किट सादर केल्याचा आरोप आहे.

तामिळनाडूमधील भाजपाच्या आयटी आणि सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष सीटीआर निर्मल कुमार यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर कारवाई करत मंत्रालयाने मीडिया हाऊसला सात दिवसांत उत्तर देण्यास सांगितलं आहे.

लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

2. करुणा शर्मांचा आरोप- माझे कार्यक्रम रद्द करण्यासाठी पोलिसांवर दबाव

ठाकरे सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्यामुळे चर्चेत आलेल्या करुणा शर्मा यांच्या औरंगाबादमध्ये मंगळवारी (18 जानेवारी) होणाऱ्या कार्यक्रमाची परवानगी पोलिसांनी नाकारली.

करुणा शर्मा यांनी यावरून नाव न घेता, माझे कार्यक्रम रद्द करण्यासाठी कुणीतरी पोलिसांवर दबाव आणत आहे, असा आरोप केला. महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीवेळी त्या बोलत होत्या.

"कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी परवानगी दिली होती, त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाची तयारी सुद्धा झाली होती. मात्र रात्री अचानक पोलिसांनी कार्यक्रमाच्या आयोजकांना पोलीस ठाण्यात बसून ठेवलं, तसंच परवानगी सुद्धा नाकारली. ज्या हॉटेलमध्ये थांबलो त्याच्या मालकाला सुद्धा माझ्यामुळे त्रास देण्यात आला," असा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.

3. नाना पटोलेंवर कठोर कारवाई करा, भाजपचं राज्यपालांना निवेदन

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मोदींबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदी भाजप नेत्यांनी पटोलेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

मुंबईतील भाजप नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत पटोले यांच्याविरोधात कारवाईची मागणी केलीय. त्याबाबतचं एक निवदेन राज्यपालांना देण्यात आलं आहे.

19 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत पटोले यांच्यावर कारवाई झाली नाही तर चर्चगेट येथील गांधीजी यांच्या पुतळ्याजवळ उपोषणाला बसणार असल्याचा इशारा मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार मंगल प्रभात लोढा यांनी राज्यपालांच्या भेटी दरम्यान दिला.

टीव्ही9 मराठीने ही बातमी दिली आहे.

4. उत्पल पर्रीकर 'आप'कडून लढणार? अरविंद केजरीवाल यांचे खुले आवाहन

गोव्याच्या राजकारणात सध्या राज्याचे माजी दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर चर्चेत आहेत.

उत्पल यांनी आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढवावी असं आवाहन स्वतः अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना केजरीवाल यांनी म्हटलं की, 'मी स्व. मनोहर पर्रीकर यांचा मनापासून आदर करतो. सध्या त्यांच्या मुलाबद्दल चाललेल्या चर्चा माहीत आहेत. त्यांना जर निवडणूक लढवायची असेल आणि त्यांना जर आम आदमी पक्षात यायचे असेल तर त्यांचे स्वागत आहे.'

पणजी हा मनोहर पर्रीकर मतदारसंघ. भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी बाबूश मोन्सेरात यांना पणजीतून उमेदवारी दिली.

या निवडणुकीत वडिलांनी ज्या मतदारसंघातून समाजकारण केले तिथून निवडणूक लढवणारच असा पवित्रा उत्पल यांनी घेतला. उत्पल यांनी दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली. त्यावेळी त्यांना ही जागा बाबूश मोन्सेरात यांनाच देणे सोयीस्कर असेल, कारण ते निवडून येण्याची शक्यता जास्त आहे, असे समजावण्यात आले.

उत्पल यांनी त्यामुळे अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्याची ऑफर दिली आहे.

झी 24 तासनं ही बातमी दिलीये.

5. सूर्याचा 'जय भीम' ऑस्करच्या यूट्यूब चॅनेल वर झळकणार

दाक्षिणात्य अभिनेता सूर्याच्या 'जय भीम' सिनेमाचं प्रचंड कौतुक झालं होतं. आता या सिनेमाने आणखी एक नवा विक्रम केला आहे. ऑस्करच्या यूट्यूब चॅनेलवर झळकणारा तो पाहिला भारतीय सिनेमा ठरला आहे.

काही दिवसांपूर्वी IMDb ने 2021 मधील लोकप्रिय ठरलेल्या सिनेमांची यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये 'जय भीम' या चित्रपटाने पहिला क्रमांक पटकवला होता.

'जय भीम' सिनेमा तमिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातल्या 1995 सालातल्या सत्य घटनेवर बेतलाय. वंचित लोकांसाठी लढणाऱ्या एका वकिलाची कथा सिनेमात दाखवली आहे.

एबीपी माझानं ही बातमी दिलीये.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)