You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'किरण मानेंना असं वाटायचं की त्यांच्यामुळेच मालिका चालते' - दिव्या पुगावकर
- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी साताऱ्याहून
राजकीय भूमिका घेतल्यामुळे प्रोडक्शन हाऊसने आपल्याला मालिकेतून काढून टाकले असं किरण मानेंनी म्हटल्यानंतर आता त्यांच्या सहकलकारांनी त्यांच्या वर्तणुकीबद्दल बीबीसी मराठीशी बातचीत केली आहे.
किरण माने सतत टोमणे मारायचे, माझ्यामुळेच ही मालिका चालते असं वारंवार ते बोलायचे, असं त्यांचे सहकलाकार सांगत आहेत.
"टोमणे मारणं, माझ्यामुळे ही सिरियल चालते, मला कोण काही बोललं तर त्याला बाहेरचा रस्ता दाखवेन अशी माने यांची भाषा होती. त्यांचे अनेक टोमणे मी ऐकले आहेत. एका पॉईंटनंतर या सगळ्याला कंटाळून आम्ही प्रॉडक्शनकडे तक्रार केली," असं म्हणत 'मुलगी झाली हो' मालिकेत माऊची मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या पुगावकर हिने अभिनेते किरण माने यांच्या सेटवरील वागणुकीबद्दल आक्षेप नोंदवला.
किरण माने यांना 'मुलगी झाली हो' या मालिकेतून काढून टाकण्यात आल्यानंतर वाद निर्माण झाला आहे.
सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमुळे त्यांना काढून टाकण्यात आलं असा दावा माने यांनी केला होता, तर त्यांच्या वागणुकीमुळे, व्यावसायिक कारणामुळे काढून टाकल्याचं प्रॉडक्शन हाऊसचं म्हणणं आहे.
त्यामुळे 'मुलगी झाली हो' या मालिकेच्या सेटवर काय वातावरण आहे? माने यांना खरंच कुठल्या कारणासाठी काढून टाकण्यात आलं? हे जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीची टीम 'मुलगी झाली हो' या मालिकेच्या सेटवर गेली.
सेटवर गेल्यानंतर मालिकेतील कलाकारांमध्ये दोन गट असल्याचे दिसून आले. काही महिला कलाकारांनी त्यांच्या वागणुकीबाबात आक्षेप घेतला, तर काही महिला कलाकारांनी त्यांची वागणूक उत्तम असल्याचे सांगितले.
'समज देऊनही मानेंच्या वर्तनात बदल नाही'
प्रॉडक्शन हाऊसने समज देऊनही मानेंच्या वर्तनात बदल झाला नसल्याचं दिव्या यांनी म्हटलं.
"आम्ही याआधी देखील त्यांच्याबद्दल वेळोवेळी तक्रार केली होती. प्रॉडक्शनने त्यांना समज देखील दिली होती. त्यांना ती वृत्ती बदलता आली नाही. 13 नोव्हेंबरला देखील मीटिंग झाली होती तेव्हा त्यांना शेवटची वॉर्निंग देण्यात आली होती. त्यांच्या वागणुकीत बदल दिसला नाही त्यामुळे त्यांना या शो मधून काढून टाकण्यात आलं आहे.''
अभिनेती शर्वाणी पिल्लई यांनी किरण माने यांच्या सेटवरच्या वर्तनाबद्दल बोलताना म्हटलं, ''एकाबद्दल दुसरीकडे बोलणं हे माने यांचं वागणं सर्वांत वाईट होतं. माने हे खरं बोलतायेत असं लोकांना वाटतं याचं कारण म्हणजे इतर कोणी बोललं नाही. आम्हाला सांगण्यात आलं होतं यावर लगेच बोलू नका.
"परंतु किरण माने यांनी या प्रकरणाला राजकीय झालर दिली आहे त्यामुळे आम्ही बोलत आहोत. एखाद्या राजकीय पोस्टसाठी चॅनेल का एखाद्या कलाकाराला काढेल? खूप असे कलाकार आहेत जे कुठल्या ना कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत आणि ते त्या पक्षाचं काम करतात. कधीच चॅनेलने त्यात हस्तक्षेप केला नाही. आम्हाला झालेला त्रास आम्ही वेळोवेळी प्रॉडक्शनला सांगितला आहे. त्यांना तीन वेळा वॉर्निंग देण्यात आली होती,'' शर्वाणी सांगतात.
माने यांच्याबाबात पहिली तक्रार करण्यात आली होती तेव्हापासूनचे रेकॉर्ड काही कलाकारांकडे असल्याचे अभिनेत्री सविता मालपेकर म्हणतात.
''13 नोव्हेंबरला झालेला फोन त्यावेळी माने यांनी मागितलेली माफी हे सगळं रेकॉर्ड आहे. त्यांच्या घरचा विचार करुन निर्मात्यांनी त्यांना सुरुवातीला काढून टाकलं नाही. परंतु वॉर्निंग देऊनही बदल न झाल्याने निर्मात्यांनी हा निर्णय घेतला.'' असंही मालपेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
'त्या मीटिंगची कल्पना नाही'
13 नोव्हेंबरच्या मिटींगबाबत कल्पना नसल्याचे अभिनेत्री प्राजक्ता केळकर याचं म्हणणं आहे.
केळकर यांनी म्हटलं, "माने यांची आमच्याशी वर्तणूक ही कुठेही आक्षेप घेण्यासारखी नव्हती. 13 नोव्हेंबरच्या मीटींगबाबत आम्हाला कल्पना नाही. त्या मिटींगमध्ये आम्हाला विचारलं नव्हतं. त्यांना काढून टाकण्याबाबत सेटवर चर्चा झाली नव्हती. आमचं प्रॉडक्शन हाऊस चांगलं आहे आम्ही सगळे एकत्र काम करतो. आमच्यात असा विषय कधी निघत नाही."
किरण माने यांना काढून टाकण्यात आलं ही बातमी धक्कादायक होती असं अभिनेत्री श्वेता आंबिकर सांगतात.
त्यांनी म्हटलं, "त्यांना का काढून टाकण्यात आलं हे मलाही माहित नाही. माझ्यासाठी सुद्धा हे धक्कादायक होतं. शूटिंग करुन घरी गेल्यावर मला ही बातमी कळाली होती. त्यांच्या वागणुकीबद्दल बोलायचं झालं तर ते माणूस म्हणूनच आमच्याशी कायम बोलत राहिले. त्यांच्या तोंडातून कधी शिवी किंवा अपशब्द ऐकले नाहीत.
मी पहिल्या दिवसापासून या मालिकेत काम करत आहे. कधीही मला असा अनुभव आला नाही. सेटवर आल्यावर ते त्याचं काम करायचे. कधी एखादा विनोद झाला तर आम्ही हसायचो. आता समोरच्यांना काय वाटतं हे मी नाही सांगू शकत. आमच्यासमोर टोमणे मारणं, काही चुकीचं बोलणं असं कधीच झालं नाही. ''
सोशल मीडियावर काय लिहायचं याबाबत प्रोडक्शन हाऊसने कधी दबाव आणला नसल्याचं देखील आंबिकर म्हणाल्या.
माने यांच्या वागणुकीबाबत बोलताना अभिनेत्री शीतल गीते म्हणाल्या, ''एक स्री म्हणून मला कधीच त्यांचा त्रास झाला नाही. मला कधीही गैरवर्तणुकीचा अनुभव आला नाही. आम्हाला अचानक कळालं त्यांना काढून टाकलं. स्किप्ट वाचून पाठांतर करणं आणि काम व्यवस्थित करणं एवढंच त्यांनी केलं. आम्हाला त्यांनी नेहमीच पाठींबा दिला आहे.''
'माने यांना तीनदा समज दिली होती'
माने यांना काढण्याबाबत प्रॉडक्शन हाऊसची भूमिका लाइन प्रोड्युसर सचिन ससाणे यांनी स्पष्ट केली.
ससाणे म्हणाले, "त्यांच्या विधानांबाबत तसंच सहकलाकारांसोबत असलेल्या वर्तणुकीबाबत माने यांना तीन वेळा बजावण्यात आलं होतं. परंतु त्यानंतरही त्यांच्या वागणुकीत बदल न दिसल्याने त्यांची रिप्लेसमेंट करण्यात आली.
"खरं कारण पुढे येऊ नये म्हणून त्यांनी राजकीय पोस्टच कारण पुढे केलं. दोन तीन दिवस त्यांच्या पोस्ट येत होत्या. त्यांना इथून काढून टाकल्यानंतर इतर ठिकाणी काम मिळणार नाही, असं होऊ नये म्हणून प्रोडक्शन हाऊस काही बोललं नाही.
"वादग्रस्त पोस्ट करू नका असं देखील त्यांना सांगण्यात आलं होतं. काही सहकलाकार त्यांच्यासोबत काम करायचं नाही म्हणून मालिका सोडून देखील चालले होते. मालिका बंद करण्याचा ते प्रयत्न करतायेत ते चुकीचं आहे," ससाणे सांगतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)