नाशिकच्या मयुर पाटीलने तयार केलं अनोखं एअरफिल्टर, ‘ऍव्हरेज 20 किमी वाढतो आणि प्रदूषण 40% कमी होतं‘

मयूर पाटील

फोटो स्रोत, Rahul ransubhe/bbc

फोटो कॅप्शन, मयूर पाटील
    • Author, राहुल रणसुभे
    • Role, बीबीसी मराठी

भारतात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या पेट्रोल किंमतीनं प्रत्येकजण वैतागला आहे. पण या वाढणाऱ्या दरांबद्दल सामान्य माणूस म्हणून आपण काहीच करु शकत नाही.

दररोज नुसती चर्चा करायची आणि मग गुपचूप पेट्रोल पंपावर जाऊन आहे त्या किंमतीत पेट्रोल भरायचं आणि आपल्या कामाला निघून जायचं असंच प्रत्येकाचं झालंय.

नाशिकच्या मयूर पाटील या तरुणालाही ही समस्या सतावत होती. मात्र तो केवळ वैतागून अथवा मित्रांसोबत याबाबत चर्चा करत बसला नाही, तर त्याने याच समस्येतून एक संधी शोधलीये.

मॅकेनिकल इंजिनिअर असलेल्या मयुरने एक असं एअरफिल्टर बनवलंय, ज्याने गाडीचा ऍव्हरेज साधारण 20 किलोमिटरने वाढतो. सोबतच गाडीमधून होणारं प्रदूषणही 40 टक्क्यांनी कमी होतं, असा त्यांचा दावा आहे.

अशी सुचली एअरफिल्टरची आयडिया

या एअरफिल्टरची आयडीया कशी सुचली, असं विचारल्यावर मयूर सांगतो, "2008 साली मी इंजिनिअरिंग शिकण्यासाठी पुण्यामध्ये आलो होतो. प्रत्येक विद्यार्थ्याचं जसं स्वप्न असतं की आपल्याजवळ एक बाईक असावी तसंच माझं सुद्धा होतं. परंतु माझी आर्थिक परिस्थिती फारशी काही चांगली नव्हती. त्यामुळे मी एका गॅरेजवर ट्रेनी टेक्निशियन म्हणून कामही करायचो.

एअर फिल्टर

फोटो स्रोत, Rahul ransubhe/bbc

फोटो कॅप्शन, एअर फिल्टर

त्यातून कमावलेल्या पैशांनी मी एक जुनी यामाहाची टूस्ट्रोक गाडी विकत घेतली होती. पण यागाडीचा ड्रॉबॅक म्हणजे ती गाडी १६ किलोमिटरचाच ऍव्हरेज द्यायची. तेव्हा मग मी विचार केला की, मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिकतोय आणि गॅरेजवरचा अनुभव असं प्रॅक्टीकल आणि थेरॉटीकल नॉलेज या दोघांचं कॉम्बिनेशन करून जर मी या गाडीचा एव्हरेज सामान्य गाडी एवढाही करू शकलो तरी याचा मला फायदा होणार होता."

एका दगडात दोन पक्षी

मयुरनं त्याच्या गाडीचा एव्हरेज 20 किलोमिटरनं वाढवला. परंतु यासोबतच त्याच्या हेही लक्षात आलं की आपल्या या एअरफिल्टरमुळे गाडीतून होणारं कार्बन उत्सर्जनही कमी झालंय. म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारावेत असंच काहीसं मयुरसोबत झालं होतं.

मयूर पाटील

फोटो स्रोत, Rahul ransubhe/bbc

फोटो कॅप्शन, मयूर पाटील

याबाबत तो सांगतो, "माझी आयडिया एवढीच होती की, माझ्या गाडीचा ऍव्हरेज वाढला पाहिजे. मात्र ज्यावेळेस मी आणि माझ्या मित्रांनी जेव्हा यावर थोडं संशोधन केलं. जर गाडीचा ॲव्हरेज वाढत असेल म्हणजेच त्या इंधनाची ज्वलनशिलता वाढत आहे. परंतु जेव्हा एखाद्या इंधनाची ज्वलनशिलता वाढते तेव्हा कार्बन उत्सर्जनही कमी होतं, अस आम्हाला त्या संशोधनात आढळलं.

"मात्र याची चाचणी कशी करायची हा प्रश्न आमच्यासमोर होता. मग आम्ही ज्या-ज्या गाड्यांना आमचे एअरफिल्टर लावले होते त्या सर्व गाड्या आम्ही पीयूसी स्टेशनवर नेल्या आणि त्यांचे पीयूसी काढले. तेव्हा आम्हाला असं आढळून आलं की, त्या सर्व गाड्यांचं कार्बन उत्सर्जन 30-40 टक्क्यांनी कमी झालं होतं."

पॉवर ऑफ आयडियाज स्पर्धेतून मिळाले 5 लाख रुपये

मयुरकडे आता एक उत्तम आयडीया होती. त्याचं प्रोडक्टही चांगलं होतं. मात्र यावर अजून संशोधन करण्याची मयुरला गरज वाटायला लागली होती आणि त्यासाठी पैसे लागणार होते.

मयूर पाटील आणि त्याची टीम

फोटो स्रोत, Rahul ransubhe/bbc

फोटो कॅप्शन, मयूर पाटील आणि त्याची टीम

"2015-16 दरम्यान मला असं कळालं की, आयआयएम अहमदाबादमध्ये पॉवर ऑफ आयडिया नावाची एक स्टार्टअपसाठी स्पर्धा आहे. त्यामुळे मी 2015ला कंपनी रजिस्टर करायचं ठरवलं आणि त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. 19000 स्पर्धकांमधून मी टॉप 75 स्पर्धकांमध्ये निवडला गेलो आणि मी ही स्पर्धा जिंकली. आणि त्या पाच लाख रुपयांच्या मदतीने मी टेक्नीकल टेक्स्टाईलचा वापर करून एअरफिल्टर बनवायचं ठरवलं," असं मयूर सांगतो.

हे एअरफिल्टर कसं काम करतं?

हे एअर फिल्टर ट्रायबोइलेक्ट्रिक आयन तत्त्वावर कार्य करते. केवळ धूळीपासून सुरक्षा देण्याव्यतिरिक्त हे फिल्टर इंजिनमध्ये प्रवेश करणाऱ्या हवेला ट्रायबोइलेक्ट्रिक चार्ज प्रदान करतं.

हे ट्रायबोइलेक्ट्रिक आयन इंधनाची ज्वलनशीलता सुधारण्यास मदत करतं. त्यामुळे वाहनाची इंधन कार्यक्षमता वाढते आणि कार्बन उत्सर्जन कमी होते. हे एअरफिल्टर 1,00,000 किलोमिटर्सनंतर धुवून पुन्हा वापरले जाऊ शकते.

एअर फिल्टर

फोटो स्रोत, Rahul ransubhe/bbc

फोटो कॅप्शन, एअर फिल्टर

इतर एअरफिल्टरला 7000 ते 10,000 किमी अंतरावर बदलणं आवश्यक असतं. पण याचा अजून एक फायदा असा होतो की, याचा पुनर्वापर झाल्यामुळे प्लास्टीक प्रदूषणही काही प्रमाणात कमी होतं.

सर्वच गाड्यांसाठी बनवणार एअरफिल्टर

आपलं प्रोडक्ट हे केवळ दुचाकींपुरतंच मर्यादित राहायला नको यासाठी मयुरने इतर वाहनांसाठीचं एअरफिल्टर बनवायला सुरूवात केली आहे.

याबाबत मयूर सांगतो, "आतापर्यंत आम्ही रॉयल इनफिल्डच्या सर्वच मॉडेल्ससाठी एअरफिल्टर बनवले आहेत. क्लासिक 350, 500, स्टँडर्ड 350 आणि 500 सीसी, थंडरबर्ड 350-500. आमचं प्रोडक्शन प्लानिंग आहे की, 100-200 सीसी आणि 350-400 सीसी ट्वीन सिलेंडर मोटरसायकलसाठी आम्ही हे एअरफिल्टर बनवू शकू.

"मार्च-एप्रिलमध्ये ज्या फ्लीट्स आहेत म्हणजेच ज्या कॅब्स आहेत, ज्या डीझेल कार्स आहेत ज्या दूर अंतरावर चालतात, ज्यावर सर्वांत जास्त फायदा होतो अशा कारसाठी आम्ही एअरफिल्टर बनवणार आहोत. ट्रक आणि बससाठीचे एअरफिल्टर आमच्याकडे आजही उपलब्ध आहेत."

KSRTC च्या बसेसमध्ये लावले होते हे एअरफिल्टर

वर्ल्ड रिसोर्सेस इंस्टिट्यूट (WRI) इंडिया अंतर्गत अजून एक स्टार्टअप स्पर्धा होती. या स्पर्धेचं नाव होतं बेटर बर्स्ट चॅलेंज. त्या स्पर्धेतही आम्ही भाग घेतला आणि तिथेही आम्ही जिंकलो. तेव्हा आम्हाला पायलट प्रोजेक्ट करण्यासाठी काही रक्कमही मिळाली, असं मयूर सांगतो.

"ज्यातून आम्ही कर्नाटक स्टेट रोड ट्रान्स्पोर्टच्या (KSRTC) 10 बसेसवरती हे एअरफिल्टर्स लावले. तिथे आम्हाला त्या प्रत्येक बसचा 6-10 किमी ॲव्हरेज वाढल्याचं आणि 30-35 टक्के कार्बन उत्सर्जनही कमी झाल्याचं दिसून आलं."

मयूर पाटील

फोटो स्रोत, Rahul ransubhe/bbc

या एअरफिल्टरचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी मयुरला अटल न्यू इंडिया चॅलेंजतर्फे 90 लाखांचं आर्थिक सहाय्य मिळालंय. यासोबतच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मयुरचं फोन करून अभिनंदन केलंय.

त्या दिवसाबद्दल मयूर सांगतो की, "मला हे असं एक्स्पेक्टेड नव्हतं की, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी मला फोन करतील आणि या कामाची शाबासकी देतील. त्यावेळी माझ्या अंगावर अक्षरशः शहारे आले. मला काही समजतच नव्हतं. हे माझं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं होतं."

हे एअरफिल्टर जास्तीत जास्त लोकांपर्यंत-संस्थांपर्यंत कसे पोहोचतील याबाबत मयुरची टीम काम करत आहे. सोबतच देशातील परिवहन मंडळांनी त्याच्या बसेसमध्ये हे एअरफिल्टर लावावेत यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

याबाबत स्मॉल स्पार्क कन्सेप्टच्या सहसंस्थापक आणि संचालक सुकन्या पाटील सांगतात, "आमचे जे फ्यूचर गोल्स आहेत त्यामध्ये आम्ही परिवहन मंडळांना विनंती करत आहोत की, त्यांनी आमचे हे एअरफिल्टर्स त्यांच्या बसेसमध्ये लावून पाहावेत.

सोबतच महानगरपालिकांतर्फे घंटागाडी आणि कचरा उचलणाऱ्या ज्या गाड्यांमध्येही हे एअरफिल्टर लावावेत अशी आमची इच्छा आहे. याबाबत महानगरपालिकांसोबत आम्ही चर्चा करत आहोत. याशिवाय या फिल्टर्सच्या ट्रायल्ससाठी काही ऑटोमोटिव्ह कंपन्यांच्याही संपर्कात आहोत."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)