You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उत्तर प्रदेश निवडणूक: प्रियंका गांधी यांनी केली उमेदवारांची नावे जाहीर, बलात्कार पीडितेच्या आईला तिकीट
उत्तर प्रदेश काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पहिली यादी जाहीर केली आहे. त्यांनी या यादीत 125 उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये 50 महिला देखील आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रियंका गांधी यांनी ही यादी जाहीर केली.
उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईलाही उमेदवारी दिली असल्याचे प्रियंका गांधींनी सांगितले आहे.
या यादीत असलेल्या महिलांबद्दल माहिती देखील दिली आहे. काँग्रेसने उन्नाव बलात्कार पीडितेची आई आशा सिंह यांना तिकीट दिली आहे.
या प्रकरणात भाजपचे माजी नेते कुलदीप सेंगर हे आरोपी आहेत. त्यांच्यावर बलात्कार आणि हत्येचा आरोप आहे.
या व्यतिरिक्त पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा देखील या यादीत समावेश आहे. प्रियंका गांधी म्हणाल्या, आमचे प्रयत्न आहेत की यादीत 40 टक्के महिला आणि तितक्याच प्रमाणात युवक आहेत. आम्ही काही पत्रकार, संघर्ष करणाऱ्या महिल्यांचा समावेश आहे.
आशा सिंह यांचा परिचय करून देताना प्रियंका म्हणाल्या, त्यांनी आपला संघर्ष अजून सुरू ठेवला आहे. आम्हाला वाटतं की त्यांनी सत्तेत यावे आणि न्यायासाठी आपला संघर्ष सुरू ठेवावा.
उन्नावमध्ये ज्यांच्या मुलीवर भाजपने अन्याय केला त्यांची आईच न्यायाचा चेहरा बनेल, त्या लढतील आणि जिंकतील असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे.
या व्यतिरिक्त शाहजहाँपूर येथून आशा वर्कर पूनम पांडे यांना तिकीट देण्यात आले आहे. प्रियंका गांधी यांनी आरोप केला आहे की पांडे यांच्यासोबत पोलिसांनी मारहाण केली होती.
प्रियंका गांधींना 'भय्याजी' का म्हणतात?
साल 1988. इंदिरा गांधी यांच्या हत्येला 4 वर्षं झाली होती. तेव्हा एका व्यासपीठावर लोकांनी प्रियंका गांधींना बघितलं.
त्यावेळी प्रियंका यांचं वय 16 वर्षं होतं. हे त्यांचं पहिलं सार्वजनिक भाषण होतं.
या भाषणानंतर काँग्रेस समर्थक नेहमी जी मागणी करायचे, ती आता पूर्ण झाली आहे.
काँग्रेसनं प्रियंका गांधी यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करत त्यांना उत्तर प्रदेशची जबाबदारी दिली होती.
2014 च्या निवडणुकांपूर्वी असं समजलं जात होतं की, प्रियंका वाराणसीतून निवडणूक लढतील. मात्र त्यांनी निवडणूक लढवली नव्हती.
प्रियकां गांधी लहानपणी राजीव आणि सोनिया गांधी यांच्यासोबत रायबरेलीला जात असत. त्यांचे केस नेहमीच छोटे असायचे.
अमेठी आणि रायबरेलीतली माणसं प्रियंका यांना राहुलप्रमाणं भय्या म्हणून हाक मारायचे. उत्तर प्रदेशातल्या सामान्य जनतेला प्रियंका गांधी आवडतात.
प्रियंका यांची हेअरस्टाईल, कपड्यांची निवड आणि बोलताना त्यांच्यात इंदिरा गांधीची छाप लगेच जाणवते. यामुळे लोकांना त्या आवडतात.
प्रियंका उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असताना सकाळी 6 वाजता त्यांचा दिवस सुरू होतो. ट्रेडमिलवर व्यायाम केल्यानंतर त्या योगासने करतात.
उत्तर प्रदेश दौऱ्यावर असताना त्या पराठे, रोटी, डाळ खाणं पसंत करतात. यासोबत लोणचंही.
प्रियंका आणि त्यांचे पती रॉबर्ट या दोघांनाही मुघलाई पद्धतीचं जेवण आवडतं.
रिक्षाची सैर
प्रियंका यांनी 2004मध्ये काँग्रेससाठी प्रचार सुरू केला. तेव्हा त्या एका महिन्यासाठी रायबरेलीमध्ये रमेश बहादूर सिंह यांच्या निवासस्थानी थांबल्या होत्या.
रमेश यांनी 2016मध्ये बीबीसीला सांगितलं होतं की, प्रियंका एकट्याच प्रचारासाठी जात आणि त्यांना यायला रात्री उशीर व्हायचा. दोन्ही मुलं घरीच थांबलेली असायची.
एके दिवशी त्या लवकर घरी आल्या आणि म्हणाल्या की, मला मुलांना रिक्षातून फिरवायचं आहे, त्यासाठी दोन रिक्षा मिळू शकतील का?
रिक्षा आल्यानंतर त्या दोन मुलांसोबत बाहेर पडल्या आणि मग सुरक्षारक्षक त्यांच्या मागेमागे गेले. अर्ध्या तासानंतर त्या परत आल्या आणि त्यांनी 50 रुपयांची नोट रिक्षावाल्याच्या हातात दिली.
'24 अकबर रोड' पुस्तक लिहिणाऱ्या रशीद किडवई यांनी प्रियंका यांची काँग्रेसला गरज का आहे, याबाबत एक रंजक गोष्ट सांगितली आहे.
2004 मध्ये प्रचार
2004 मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसची स्थिती वाईट आहे, असं वातावरण तयार झालं होतं. त्यानंतर पक्षानं एका व्यावसायिक संस्थेची सेवा घेतली. या संस्थेनं सोनिया गांधींना सांगितलं की, तुम्ही एकट्या भाजपचे मोठे नेते आणि तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना टक्कर देऊ शकत नाही.
यानंतर राहुल गांधी सक्रिय राजकारणात आले.
या निवडणुकीत अमेठीचा निकाल जेव्हा यायला लागला तेव्हा प्रियंका यांच्या चेहऱ्यावरील हास्य क्षणाक्षणाला वाढत होतं.
काही क्षणानंतर त्या उठून उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, 'मम्मी हॅज डन ईट...'
रशीद सांगतात की, याच संस्थेकडून सोनिया यांनी सल्ला मागवला. तेव्हा त्यांना सल्ला मिळाला की, काँग्रेसला जोरदार वापसी करायची असेल तर राहुल आणि प्रियंका या दोघांच्या संयुक्त एजन्सीची गरज आहे.
जेव्हा प्रियंकांनी 10 मिनिटं नेत्यांना खडे बोल सुनावले
2012 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक सुरू होती. प्रियंका रायबरेलीतल्या बछरांवा जागेसाठी प्रचार करत होत्या.
एका गावात त्यांच्या स्वागतासाठी गावातले मोठे काँग्रेस नेते आणि माजी आमदार उभे होते.
हे पाहिल्यानंतर प्रियंका यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. त्यांनी त्यांच्या गाडीतील नेत्यांना खाली उतरवलं आणि त्या गावातील नेत्याला गाडीत बसवलं.
गाडीच्या फ्रंट सीटवर बसलेल्या प्रियंका यांनी पुढची 10 मिनिटं या नेत्याला झापलं. त्यांनी म्हटलं, यापुढे मला हे असं चित्र नकोय. मला सगळं काही माहिती नाही. आता गाडीतून हसत-हसत उतरा.
यानंतर स्थानिक नेत्यांची एक बैठक झाली. मध्येच प्रियंका यांनी एका स्थानिक नेत्याला मागील खोलीत नेलं. 5 मिनिटांनी तो नेता बाहेर आला तेव्हा त्याच्या डोळ्यांत पाणी होतं.
काही महिन्यांनंतर तिकीट वाटपादरम्यान प्रियंका गांधींनी या नेत्याचा सल्लासुद्धा ऐकला होता.
प्रियंका गांधींचा प्रवास
12 जानेवारी 1972ला जन्म
मॉडर्न स्कूलमध्ये शालेय शिक्षण
दिल्ली युनिव्हर्सिटीच्या जीझस अँड मेरी कॉलेजमधून मानसशास्त्राचं शिक्षण
1997 मध्ये व्यापारी रॉबर्ट वाड्रा यांच्याशी लग्न
2004 मध्ये सोनिया गांधी यांच्यासाठी प्रचार
प्रियंका गांधी यांना 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)