You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना का व कशी केली?
- Author, हर्षल आकुडे,
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आज (9 मे) स्मृतीदिन. त्यानिमित्ताने रयत शिक्षण संस्थेची स्थापना कशी झाली हे सांगणारा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
रयत शिक्षण संस्थेचं नाव महाराष्ट्रातील आघाडीच्या शैक्षणित संस्थांमध्ये घेतलं जातं. या संस्थेची स्थापना तब्बल 102 वर्षापूर्वी करण्यात आली होती.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना नेमकी का व कशी केली होती?
जैन मुनींच्या कुटुंबातील भाऊराव पाटील
कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापुरातील कुंभोज गावी 22 सप्टेंबर 1887 रोजी झाला. ऐतवडे बुद्रुक येथील पाटील घराण्यात त्यांनी जन्म घेतला होता.
पाटील घराणं हे धार्मिक प्रवृत्तीचं तसंच सुसंस्कृत म्हणून ओळखलं जायचं. त्यांच्या दोन पूर्वजांनी दिगंबर जैन मुनी बनण्याचा निर्णय घेतला होता.
भाऊराव पाटील यांची राहणी अत्यंत साधी होती. खादीचं साधं धोतर आणि नेहरू शर्त असा पोशाख ते नेहमी करायचे. सुरुवातीच्या काळात खांद्यावर घोंगडी घालत. नंतर घोंगडी गेली आणि हाती काठी आली.
भाऊरावांचं प्राथमिक शिक्षण आजोळी म्हणजेच कुंभोज येथे झालं. वडिलांची कामानिमित्त सातत्याने बदली होत असल्यामुळे पुढील शिक्षण घेण्यात त्यांना अनेक अडचणी आल्या.
दहिवडी, विटा याठिकाणी शाळेच्या पटावर त्यांचं नाव होतं. पण वर्गाशी त्यांचा फारसा संबंध यायचा नाही.
विद्यार्थी असल्यापासूनच ते अन्याय आणि विषमता यांच्याविरोधात दंड थोपटून उभे राहत. विटा येथे एके ठिकाणी अस्पृश्यतेच्या अनिष्ट प्रथेतून दलित समाजातील लोकांना पाणी भरण्यास मनाई होती. हा अन्याय सहन न होऊन भाऊरावांनी तेथील रहाट मोडून टाकला.
1902 ते 1909 दरम्यान भाऊराव शिक्षणासाठी कोल्हापुरात होते. ते जैन बोर्डिंगमध्ये राहून माध्यमिक शिक्षण घेऊ लागले.
अस्पृश्य मुलांसाठी 'मिस क्लार्क हॉस्टेल'च्या एका कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. त्यामुळे पुन्हा आंघोळ करण्याचा आदेश जैन बोर्डिंगच्या अधीक्षकांनी दिला. पण भाऊराव पाटील यांना हा आदेश मानण्यास स्पष्ट नकार दिला.
याचा परिणाम म्हणून त्यांची जैन बोर्डिंगमधून हकालपट्टी झाली. त्यानंतर ते कोल्हापूर राजवाड्यावर जाऊन राहू लागले.
शाहू महाराजांचा सहवास
कोल्हापूरच्या राजवाड्यावर राहण्यास मिळाल्यामुळे भाऊराव पाटील यांना छत्रपती शाहू महाराज यांचा खूप सहवास लाभला.
महाराजांचे विचार आणि कार्य यांचा खोल ठसा त्यांच्या मनावर उमटू लागला होता. उपेक्षित समाजाबाबत त्यांचा मनात अधिक करूणा निर्माण झाली. त्यांच्या हक्कासाठी व उद्धारासाठी संघर्ष करण्याचं बीज त्याच ठिकाणी त्यांच्या मनात रोवलं गेलं.
'पाटील मास्तर'
कर्मवीर भाऊराव पाटील यांना शिक्षकांनी सहावी उत्तीर्ण केलं नाही. त्यामुळे त्यांना मॅट्रीकमध्ये जाता आलं नव्हतं. त्यामुळे शिक्षण थांबवून काही काळ ते मुंबईत दाखल झाले.
तिथं मोती पारखण्याची कला शिकण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. पण भाऊरावांना त्या कामात रस आला नाही. यादरम्यान भाऊराव पाटील यांचा विवाहसुद्धा झालेला होता.
पण भाऊराव कोणत्याही कामाविना तसाच वेळ घालवत आहेत, हे पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांची पत्नीदेखत कानउघडणी केली. यानंतर भाऊराव आपलं राहतं घर सोडून सातारा याठिकाणी खासगी शिकवणी घेण्याचं काम करू लागले.
काही कालावधीतच साताऱ्यात ते 'पाटील मास्तर' म्हणून लोकप्रिय झाले.
1909 मध्ये भाऊराव पाटील यांनी दुधगाव याठिकाणी ग्रामस्थांच्या मदतीने दुधगाव विद्यार्थी आश्रम सुरू केला. हा प्रयोग त्यावेळी चांगलाच यशस्वी झाला होता.
तुरुंगवास आणि आत्महत्येचा प्रयत्न
1914 दरम्यान कोल्हापुरात एका डांबर प्रकरणात लठ्ठे नामक व्यक्तीविरुद्ध खोटी साक्ष देण्याचं नाकारल्यामुळे भाऊराव पाटील यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
यानंतर भाऊराव यांच्यावरच सतत खोटे आरोप करून त्यांना तुरुंगवासात टाकण्यात आलं होतं. या कालावधीत भाऊरावांवर अनन्वित छळ करण्यात आला. छळास कंटाळून त्यांनी तुरुंगातच तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
मात्र नंतर या प्रकरणातून भाऊराव पाटील यांची निर्दोष मुक्तता झाली.
बाहेर पडल्यानंतर पाटील यांनी काही काळ किर्लोस्कर ब्रदर्सच्या लोखंडी कारखान्यात विक्रेते प्रतिनिधी म्हणूनही काम केलं. नंतर त्या नोकरीचाही राजीनामा दिला.
बहुजन समाजासाठीची रयत शिक्षण संस्था
भाऊराव पाटील हे महात्मा फुले यांना आपला आदर्श मानत असत. त्यांनी सत्यशोधक समाजाच्या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवला. आपल्या वक्तृत्वगुणांमुळे त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
त्यावेळी समाजप्रबोधनासाठीच्या जवळपास सर्वच कार्यक्रमांमध्ये भाऊरावांनी सहभाग घेतला.
अस्पृश्यतेविरुद्ध बंड, वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, अंधश्रद्धा, कामगारांचा छळ आणि आर्थिक विषमता या विषयांवर ते अत्यंत आक्रमकपणे बोलायचे.
यादरम्यान कराड तालुक्यातील काले याठिकाणी झालेल्या सत्यशोधक समाजाच्या परिषदेत भाऊराव पाटील यांनी बहुजनांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक संस्था स्थापन करण्यासंबंधीचा ठराव मंजूर करून घेतला. त्यानुसार 4 ऑक्टोबर 1919 रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली.
काले याठिकाणी संस्थेमार्फत एक वसतीगृह, एक प्राथमिक शाळा तसंच एक रात्रशाळा काढून शैक्षणिक कार्याची सुरुवात करण्यात आली.
1924 साली रयत शिक्षण संस्थेचं काले येथून सातारा शहरात स्थलांतर करण्यात आलं. याठिकाणी सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांसाठी एक मिश्र वसतीगृह सुरू करण्यात आलं.
1927 मध्ये या वसतीगृहाचं महात्मा गांधी यांच्या हस्ते 'श्री छत्रपती शाहू महाराज बोर्डिंग हाऊस' असं नामकरण करण्यात आलं.
याठिकाणी सर्व जातीधर्माची मुले एकत्र जेवतात, काम करून एकत्रित शिक्षण घेतात हे पाहून गांधीजींनी त्यांचं कौतुक केलं.
गांधीजी त्यावेळी भाऊराव पाटलांना म्हणाले, "भाऊराव, साबरमती आश्रमात मला जे जमलं नाही ते तुम्ही याठिकाणी यशस्वीरित्या करून दाखवलं आहे. तुमच्या कार्यास माझे आशीर्वाद."
गांधीजींच्या हरिजन-सेवक संघाकडून या वसतीगृहाला 1933 पासून वार्षिक 500 रुपये इतकी मदत देण्यात येत होती.
संस्थेचा विस्तार वाढला
वसतीगृहात विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार करता येतात, या विचाराने भाऊराव पाटील यांनी पुण्यात 1932 मध्ये युनियन बोर्डिंग हाऊस सुरू केलं.
दलित आणि उपेक्षितांच्या शिक्षणासाठी त्यांनी अशी अनेक वसतीगृहे उघडली. सध्या रयत शिक्षण संस्थेमार्फत शंभरच्या आसपास अशी वसतीगृहे चालवली जात आहेत.
त्यावेळी अनाथ मुले आणि बालगुन्हेगार यांना जुवेनाईल कोर्टामार्फत सुधारगृहात पाठवलं जायचं. या मुलांनाही इतर मुलांबरोबर सर्वसाधारण वसतीगृहात ठेवावं, वेगळं ठेवू नये, असं भाऊरावांना वाटायचं.
त्यांनी यासंदर्भात राज्यशासनाशी चर्चा करून आपले विचार पटवून दिले. त्यानंतर विधीसंघर्षग्रस्त मुलांनाही आपल्या वसतीगृहात ठेवण्यास त्यांनी सुरुवात केली.
मुदत संपल्यानंतरही संस्थेमार्फत त्यांचं शिक्षण पूर्ण होण्याची व्यवस्था केली जात असे. शाळेविना एकही खेडं असू नये, प्रशिक्षित शिक्षकाविना एकही शाळा असू नये, असा विचार ते करत.
त्या प्रेरणेतून त्यांनी शैक्षणिक शिक्षक देणारे अनेक अध्यापक विद्यालय सुरू केले. पुढे प्राथमिक, माध्यमिक, उच्च-माध्यमिक शिक्षण देणारी अनेक महाविद्यालये रयत शिक्षण संस्थेमार्फत त्यांनी सुरू केली.
या कामात त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांचाही मोठा वाटा आहे. त्यांनी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची पर्वा न करता आपल्याला समाजकार्यात झोकून दिलं.
कर्मवीर भाऊराव पाटलांच्या या योगदानामुळे त्यांना वेळोवेळी विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.
1959 साली राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. तर पुणे विद्यापीठानेही डी. लिट पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. आपल्या कार्यामुळे जनतेकडून त्यांना कर्मवीर ही उपाधी आधीच मिळालेली होती.
सततचं काम, प्रवास यांमुळे कर्मवीर भाऊराव पाटील यांची प्रकृती नंतर खालावली. 9 मे 1959 मध्ये पुण्याच्या ससून रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रयत शिक्षण संस्थेची सद्यस्थिती
रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार हे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे या पदाची जबाबदारी आहे.
संस्थेच्या तब्बल 739 शाखा असून त्यामध्ये सुमारे 16 हजार 172 कर्मचारी कार्यरत आहेत.
रयत शिक्षण संस्थेच्या वेबसाईटवरील माहितीनुसार संस्थेच्या 438 शाळा (त्यापैकी 26 मुलींच्या शाळा), 17 शेतकी शाळा, 42 महाविद्यालय, 80 वसतीगृह (त्यापैकी 29 मुलींचे वसतीगृह) तसंच 8 आश्रमशाळा आहेत.
यामध्ये सध्या सुमारे 4 लाख 50 हजार विद्यार्थी रयत शिक्षण संस्थांच्या विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतात.
यामध्ये विद्यार्थ्यांना डिजिटल, क्रीडा कौशल्य विकास, सामाजिक एकोपा याप्रकारचं शिक्षण दिलं जातं. तसंच कमवा व शिका योजनेसह गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची तरतूदही संस्थेत आहे. याव्यतिरिक्त विविध शैक्षणिक उपक्रमांचं आयोजन संस्थेमार्फत केलं जातं.
संदर्भ -
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)