You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ओमिक्रॉनचा फुफ्फुसांवर होणारा परिणाम कमी आहे का?
कोरोना व्हायरस फुफ्फुसांमध्ये झपाट्याने पसरतो. फुफ्फुसांवर हल्ला झाल्यामुळे जगभरात अनेक रुग्णांची फुफ्फुसं निकामी झाली आहेत.
पण, ओमिक्रॉनच्या संसर्गात रुग्णांच्या फुफ्फुसांना कमी इजा होत असल्याचं आढळून आलंय. तज्ज्ञ सांगतात, की कोव्हिड-19 चा मूळ व्हायरस आणि डेल्टा व्हेरियंच्या तुलनेत ओमिक्रॉनमुळे फुफ्फुसांना होणारं नुकसान कमी आहे.
मुंबईतील व्हॉकार्ट रुग्णालयाच्या संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. हनी सावला यांनी याबद्दल सांगितलं, "ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग घशापर्यंतच आढळून आलाय. हा व्हायरस फुफ्फुसांच्या पेशींना अटॅच होत नाही. त्यामुळे न्यूमोनिया आणि इतर गंभीर आजार होऊ शकत नाहीत."
ओमिक्रॉनच्या त्सूनामीमुळे भारतात तिसरी लाट झपाट्याने पसरतीये. पण या लाटेत तुमची फुफ्फुसं सुरक्षित आहेत का? हे आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
फुफ्फुसांमध्ये कोरोना व्हायरस कसा पसरतो?
ओमिक्रॉनचा फुफ्फुसांवर गंभीर परिणाम होतो का नाही, हे समजून घेण्याआधी आपण कोरोना व्हायरसचा फुफ्फुसात संसर्ग कसा पसरतो ते समजून घेऊ.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार,
- फुफ्फुसांच्या पृष्ठभागावर ACE2 प्रोटीन किंवा प्रथिनं असतात.
- कोरोना व्हायरसवर असलेले स्पाईक प्रोटीन, या ACE2 प्रोटीन रिसेप्टर्ससोबत बाईंड होतात किंवा जोडले जातात.
- ज्याच्या मदतीने कोरोना विषाणू फुफ्फुसांच्या पेशीत शिरकाव करतो.
- यामुळे फुफ्फुसात कोरोना व्हायरसचा तीव्र वेगाने गुणाकार होतो आणि व्हायरस पसरतो.
ओमिक्रॉनचा फुफ्फुसांवर गंभीर परिणाम होत नाही?
यूकेच्या केंब्रिज विद्यापीठातील प्राथमिक संशोधनातील पुरावे स्पष्ट करतात की, ओमिक्रॉनमुळे फुफ्फुसांमध्ये होणारा संसर्ग जास्त गंभीर नसेल.
"डेल्टा व्हेरियंच्या स्पाईक प्रोटीनच्या तुलनेत, ओमिक्रॉनचं स्पाईक प्रोटीन ACE2 प्रोटीन रिसेप्टर्स विभागण्यात सक्षम नाहीये.त्यामुळे फुफ्फुसात याचा शिरकाव होत नाही," असं संशोधक सांगतात.
या संशोधनाचे प्राध्यापक डॉ. गुप्ता म्हणाले, "संशोधनात दिसून आलंय की ओमिक्रॉन फुफ्फुसांच्या पेशींमध्ये सहजतेने शिरकाव करू शकत नाही. ओमिक्रॉन श्वसननलिकांमध्ये संसर्ग करतो. पण, फुफ्फुसातील पेशींमध्ये संसर्ग कमी होतोय, असं प्रयोगशाळेतील अभ्यासात दिसून आलंय."
ओमिक्रॉनचा फुफ्फुसांवर गंभीर परिणाम का होत नाही? मुंबईच्या व्हॉकार्ट रुग्णालयातील संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. हनी सावला याची माहिती देतात.
त्या सांगतात, "ओमिक्रॉनच्या होस्ट सेलमध्ये (पेशी) होणाऱ्या प्रक्रियेत हा विषाणू फक्त नाक आणि घशातील पेशींनाच अटॅच होतो. फुफ्फुसांच्या पेशींना अटॅच होत नाही."
ओमिक्रॉनबाबत मुंबईतील डॉक्टर काय सांगतात?
भारतात ओमिक्रॉनची रुग्ण संख्या झपाट्याने पसरतीये. मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांमध्ये दररोज 20 हजारच्या आसपास कोरोना रुग्णांची नोंद होतेय.
मुंबईत बदललेलं हवामान आणि ओमिक्रॉनची लाट यामुळे बहुतांश लोकांना सर्दी, खोकल्याचा त्रास सुरू झालाय. त्यामुळे रुग्णालयात आणि कोरोना चाचणीसाठी दाखल होणाऱ्यांची संख्या वाढतेय.
महाराष्ट्र कोव्हिड टास्कफोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी सांगतात, "मुंबईत ओमिक्रॉनचा संसर्ग नाक आणि घशात प्रामुख्याने दिसून आलाय. फुफ्फुसात फार कमी प्रमाणात दिसून येतोय. रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण सहव्याधीमुळे दाखल होत आहेत."
मुंबईत रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासतेय? रुग्णांच्या फुफ्फुसावर ओमिक्रॉनचा परिणाम दिसून येतोय? याबाबत आम्ही ओमिक्रॉन बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना विचारलं.
ब्रीजकॅंडी रुग्णालयाचे छातीविकारतज्ज्ञ डॉ. प्रतित समदानी सांगतात, "डेल्टा व्हेरियंटचा फुफ्फुसांवर होणारा परिणाम किंवा इजा जास्त दिसून येत होती. ओमिक्रॉनचा मात्र, फुफ्फुसांवर परिणाम जास्त दिसून येत नाही. रुग्णांना ऑक्सिजनची गरजही कमी भासतेय."
तज्ज्ञ सांगतात, पण सहव्याधी असलेल्यांच्या फुफ्फुसांमध्ये संसर्ग आढळून आलाय. "विषाणूने आपलं रूप बदललं तर, फुफ्फुसांना नुकसान होऊ शकतो," डॉ. समदानी पुढे म्हणाले.
डॉ. हनी सावला बीबीसीशी बोलताना म्हणाल्या, "ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग घशापर्यंतच आढळून आलाय. फुफ्फुसात जाऊन न्यूमोनिया आणि इतर गंभीर आजार होऊ शकत नाहीत."
सध्या ओमिक्रॉनची लक्षणं सौम्य दिसून येत आहेत. पण तरीही डेल्टा किंवा डेल्टाच्या उपप्रकारांचा संसर्ग झालेले रुग्ण गंभीर होऊ शकतात.
मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारलम बीबीसीशी बोलताना म्हणाले, "जगभरातील संशोधनात हे स्पष्ट झालंय की, ओमिक्रॉन व्हेरियंटची फुफ्फुसांना नुकसान पोहोचवण्याची क्षमता फार कमी आहे."
तज्ज्ञ म्हणतात की, सध्या ओमिक्रॉनमुळे फुफ्फुसांना इजा होत नसली तरी, 100 टक्के नुकसान होणार नाही असं अजिबात म्हणता येणार नाही. त्यामुळे रुग्णांनी ऑक्सिजनची पातळी सातत्याने तपासली पाहिजे.
नानावटी रुग्णालयाचे इंटर्नल मेडिसिनतज्ज्ञ डॉ. हर्षद लिमये म्हणाले, "ओमिक्रॉनमुळे रुग्णांच्या फुफ्फुसांना इजा कमी होत असल्यानेच ऑक्सिजन आणि व्हॅन्टिलेटरची गरज कमी झालीये. पण, काही रुग्णांच्या फुफ्फुसांना यामुळे इजा झाल्याचंही समोर आलंय, त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे."
डेल्टा आणि ओमिक्रॉन फुफ्फुसांना इजा जास्त कोणामुळे?
कोरोना व्हायरस फुफ्फुसांवर आघात करतो. डेल्टा व्हेरियंटच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली होती.
डॉ. हनी सावला पुढे म्हणाल्या, "डेल्टा व्हेरियंट फुफ्फुसातील पेशींना अटॅच होत असल्यामुळे, जर डेल्टाचा संसर्ग झाल्यास चार-पाच दिवसांत ऑक्सिजनची पातळी कमी होण्याची शक्यता असते. त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागतं, घरी उपचार शक्य होत नाहीत."
पण, तिसऱ्या लाटेसाठी ओमिक्रॉन कारणीभूत असला तरी, ऑक्सिजनची मागणी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत नाहीये.
मुंबईत दुसऱ्या लाटेत सर्वोच्च अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 11 एप्रिलला 91,108 पर्यंत पोहोचली होती. तिसऱ्या लाटेत सद्यस्थितीत 1,06,037 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.
मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे ट्विटरवर माहिती देतात, "दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेची तुलना केली तर, ऑक्सिजन आणि ICU बेड्सची उपलब्धता यात खरा फरक दिसून येतोय."
मुंबईत आता 8,291 पेक्षा जास्त ऑक्सिजन बेड्स रिकामे आहेत. तर, उपलब्ध ICU बेड्सची संख्या 1,779 आहे. शहरात जवळपास 980 व्हॅन्टिलेटर्स उपलब्ध आहेत.
अश्विनी भिडे यांनी ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या लाटेत मुंबई सर्वोच्च अॅक्टिव्ह रुग्ण असताना फक्त 89 ICU बेड्स, 1507 ऑक्सिजन आणि 32 व्हॅन्टिलेटर्स उपलब्ध होते. मुंबईत सद्यस्थितीत 3035 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.
जगभरातील संशोधन काय सांगतं?
हॉंगकॉंग विद्यापिठाच्या फॅकल्टी ऑफ मेडिसिनने, ओमिक्रॉन व्हेरियंटचा रुग्णांच्या श्वसनप्रणालीवर (respiratory tract) कसा संसर्ग होतो, याबाबत संशोधन केलं.
संशोधनात आढळून आलं,
- संसर्गाच्या 24 तासांनंतर डेल्टा व्हेरियंट आणि कोव्हिड-19 च्या मूळ व्हायरसच्या तुलनेत ओमिक्रॉन श्वसननलिकेत 70 पटींनी जास्त वेगाने गुणाकार करतो.
- ओमिक्रॉनमुळे रुग्णांच्या फुफ्फुसात होणारा संसर्ग मूळ कोरोना व्हायरसच्या तुलनेत फार कमी आहे. ज्यामुळे आजार गंभीर बनत नाही.
हॉंगकॉंग विद्यापीठाचे मुख्य संशोधक डॉ. मायकल चान-ची-वाय यांनी ओमिक्रॉनबाबत संशोधन केलंय.
ते लिहितात, "फुफ्फुसांच्या पेशीत ओमिक्रॉनचा प्रसार तीव्रतेने होत नाही. कोरोना व्हायरसच्या मूळ रूपाच्या तुलनेत ओमिक्रॉनची फुफ्फुसात होणारी वाढ 10 पट कमी दिसून आलीये. त्यामुळे आजार गंभीर होताना दिसून येत नाहीये."
यूकेमधील ग्लास्गो विद्यापिठाच्या संशोधकांनी, ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे फफ्फुसांमधील पेशींना इजा का होत नाही यावर अभ्यास केला.
संशोधनात आढळून आलं की, फुफ्फुसांच्या पेशींवर TMPRSS2 नावाचं प्रोटीन असतं. हे प्रोटीन कोरोना व्हायरसच्या व्हेरियंटला फुफ्फुसांच्या पेशींमध्ये शिरकाव करण्यासाठी मदत करतं. पण हे प्रोटीन ओमिक्रॉन व्हेरियंटसोबत सहजतेने जोडलं जात नाही.
त्यामुळे ओमिक्रॉनचा फफ्फुसातील पेशींमध्ये शिरकाव होण्यास अडचण निर्माण होते. हेच कारण आहे की ओमिक्रॉनचा फुफ्फुसांमध्ये संसर्ग कमी प्रमाणात होतो.
अमेरिकन आणि जपानच्या संशोधकांना ओमिक्रॉन बाधित उंदरावर चाचणी केली होती. या चाचणीत उंदराच्या फुफ्फुसांना जास्त इजा झाली नसल्याचं स्पष्ट झालं होतं. ओमिक्रॉनच्या संसर्गात रुग्णांच्या फुफ्फुसांना कमी इजा होत असल्याचं आढळून आलंय. तज्ज्ञ सांगतात, कोव्हिड-19 चा मूळ व्हायरस आणि डेल्टा व्हेरियंच्या तुलनेत, ओमिक्रॉनमुळे फुफ्फुसांना होणारं नुकसान कमी आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)