यति नरसिंहानंद यांना हरिद्वार पोलिसांनी केली अटक, महिलांबाबत केलं होतं आक्षेपार्ह विधान

फोटो स्रोत, SAMEERATMAJ MISHRA/BBC
- Author, विनित खरे
- Role, बीबीसी प्रतिनिधी, डासना, गाझियाबाद
हरिद्वार पोलिसांनी हिंदुत्ववादी नेते यति नरसिंहानंद यांना महिलांवरील आक्षेपार्ह टीकाप्रकरणी अटक केली आहे. हरिद्वारचे पोलीस अधीक्षक योगेंद्रसिंह रावत यांनी बीबीसीशी बोलताना यति नरसिंहानंद यांना अटक केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
हरिद्वार पोलिसांचे प्रवक्ते विपिन पाठक यांनी बीबीसीला सांगितलं की, "स्वामी यति नरसिंहानंद यांच्याविरोधात हरिद्वारमध्ये अनेक तक्रारी दाखल आहेत. आता त्यांना 18/22 या तक्रारीअंतर्गत अटक केली आहे. ही तक्रार रुचिका नामक तरुणीच्या सांगण्यावरून दाखल करण्यात आली होती."
तर हरिद्वारच्या सर्कल ऑफिसरने एएनआयला एएनआयला सांगितलं की, यति नरसिंहानंद यांच्याविरोधात महिलांबाबत अवमानकारक विधान केल्याची तक्रार दाखल आहे. त्यातच त्यांना अटक झालीय. त्यांच्याविरोधात आणखी 2-3 प्रकरणं आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
दोनच दिवसांपूर्वी हरिद्वार पोलिसांनी जितेंद्र नारायण त्यागी उर्फ वसीम रिझवी यांनाही अटक केलीय. वसीम रिझवी उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष आहेत. धर्मसंसदेत चिथावणीखोर भाषण करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
मुस्लिमांना म्हटलं होतं 'राक्षस'
यति नरसिंहानंद यांचं महिलांबाबत आक्षेपार्ह विधान हे एकमेव प्रकरण नाहीय. यापूर्वी त्यांनी मुस्लिमांबाबतही वादग्रस्त विधानं केली आहेत. त्यावेळी बीबीसीनं त्यांच्याबाबत केलेली बातमी खालीलप्रमाणे :
"इस्लामला धरतीवरून मिटवायला हवं... सर्व मुस्लिमांना संपवून टाकायला हवं."
"आज आपण ज्यांना मुस्लिम म्हणतो, पूर्वी त्यांना राक्षस म्हटलं जात होतं."
"Islam is an organised gang of criminals. आणि त्याचा आधार महिलांचा व्यवसाय करणे आणि महिलांना उध्वस्त करणं तसंच काफिरांच्या महिला हिसकावणं हा आहे."
ही चिथावणीखोर वक्तव्यं आहेत, यति नरसिंहानंद सरस्वती यांची. गाझियाबाद जिल्ह्याच्या डासना गावात देवी मंदिराचे 'पीठाधीश' यति नरसिंहानंद सरस्वती आता जुना आखाड्याचे महामंडलेश्वरदेखील आहेत.
याठिकाणी मुस्लिमांना प्रवेश निषिद्ध आहे, असं मोठ्या अक्षरात लिहिलेला बोर्ड याच देवीच्या मंदिराबाहेर लावण्यात आला आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात एकीकडं ट्विट करणं, वार्तांकन करणं, किंवा सीएएच्या विरोधात पोस्टर लावल्याच्या कारणावरूनही अटक करण्यात आली आहे.
मग मुस्लिमांच्या विरोधात सातत्यानं द्वेष पसरवणारी भाषणं देऊनही यति नरसिंहानंद सरस्वती अद्याप तुरुंगात का नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हिंदुत्ववादी नेत्यांच्या लांबत चाललेल्या यादीमध्ये सध्या सर्वाधिक चर्चेमध्ये आहेत यति नरसिंहानंद सरस्वती हे पोस्टरबॉय.
गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची मुस्लिमांच्या विरोधातील चिथावणीखोर वक्तव्यं समोर येत आहेत.
जुना आखाड्याचे महामंडलेश्वर बनलेल्या नरसिंहानंद यांच्यावर ते डासना देवीचं मंदिर आणि त्याच्या जमिनीचा वापर खासगी संपत्तीसारखा करत आहेत, असाही आरोप आहे.
मुस्लिम-बहुल डासनामधील काही स्थानिकांच्या मते, यति नरसिंहानंद यांच्या भाषणांकडं त्याठिकाणचे कोणीही लक्ष देत नाहीत. मात्र, या भाषणांमुळं हिंदू आणि मुस्लिमांमध्ये ध्रुवीकरणं वाढलं असल्याचं गाझियाबादच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

अशा परिस्थितीत निवडणुका जवळ आलेल्या असताना आणि राज्यात ध्रुवीकरणाची लाट स्पष्टपणे दिसत असतानाच, गाझियाबादच्या या गावात जे काही होत आहे, त्याचा परिणाम जिल्ह्याच्या सीमांपासून दूर संपूर्ण उत्तर प्रदेशातही जाणवायला लागला आहे.
उत्तर प्रदेश दौऱ्यावर असताना अनेक मुस्लिमांनी माझ्याकडे नरसिंहानंद सरस्वती यांच्या विखारी भाषेवर चिंता व्यक्त केली. मात्र योगींच्या राज्यात ते थांबायलाच तयार नाही. पण या मागचं नेमकं कारण काय?
"...मुस्लिमांना मारण्यासाठी तलवारींची गरज नसेल. कारण तलवारींनी ते तुमच्याकडून मरणार नाहीत. तुम्हाला तंत्रज्ञानाच्या बाबतीत, त्याच्या पुढं जावं लागेल," असं हरिद्वारमध्ये नुकत्यात झालेल्या धर्म संसदेत यति नरसिंहानंद यांनी म्हटलं होतं.

या धर्मसंसदेत त्यांनी मुस्लिमांच्या नरसंहाराबाबत खुलेआम बोलल्याचा आरोप आहे. सोशल मीडियावर झालेल्या गोंधळानंतर उत्तराखंड पोलिसांनी धर्म संसदेतील हेट स्पीच प्रकरणात एफआयआर दाखल करून तपास सुरू केला आहे.
एफआयआरमध्ये यति नरसिंहानंद यांच नाव नंतर जोडण्यात आलं. मात्र, त्यांच्या नावाचा समावेश एफआयआरमध्ये आधीच का केला नाही, हे पोलिसांनी स्पष्ट केलेलं नाही.
नरसिंहानंद यांच्या विरोधातील गुन्हे
त्यांचे वकील आणि डासना देवी मंदिरातील महंत माँ चेतनानंद सरस्वती यांच्या मते, यति यांच्यावर वेगवेगळे असे जवळपास दोन डझनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.
काही प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. तर काही प्रकरणांवर हायकोर्टानं स्टे लावला आहे. तर काही प्रकरणांत तपास सुरू आहे.
उत्तराखंडमध्ये यति नरसिंहानंद यांच्यावर कलम 153-अ आणि 295-अ या दोन कलमांतर्गत खटला चालणार आहे. 153-अ म्हणजे दोन धर्मांमध्ये धर्म, भाषा या आधारे द्वेष पसरवणं आणि 295-अ म्हणजे धार्मिक भावना दुखावणे किंवा त्याचा प्रयत्न करणे.
गाझियाबाद पोलिसांनी ज्या 10 प्रकरणांची माहिती दिली आहे, त्यानुसार यति नरसिंहानंद यांच्या विरोधात आयटी अॅक्टशिवाय आयपीसीच्या 306, 307, 395 कलमांतर्गतही गुन्हे दाखल आहेत.
त्यातील कलम 306 म्हणजे आत्महत्येसाठी प्रवृत्त करणं, 307 म्हणजे हत्येचा प्रयत्न आणि 395 म्हणजे दरोडा.

गाझियाबाद पोलिसांकडून मिळालेली माहिती आम्ही वरिष्ठ वकील राजेश त्यागी यांना दाखवली आणि यति नरसिंहानंद सरस्वती यांची भाषणं आणि इतर प्रकरणांत पोलिसांनी लावलेल्या कलमांबाबत त्यांचं मत काय, हे विचारलं.
हेट स्पीच प्रकरणी सुप्रीम कोर्टाला पत्र लिहून त्याकडं लक्ष वेधणाऱ्या 76 वकिलांमध्ये राजेश त्यागी यांचा समावेश आहे.
"मी सातत्यानं ते व्हीडिओ पाहत होतो. नरसिंहानंद ज्या प्रकारच्या भाषेचा वापर करत आहेत, त्यानुसार पोलिस तर त्यांना एकप्रकारे सूट देत आहे," असं मेरठमध्ये राहणारे राजेश त्यागी म्हणाले.
"त्यांच्यावर दरोडा, हत्येचा प्रयत्न अशी कलमं लावण्यात आली. पण मग या सर्व प्रकरणात ज्यात त्यांनी गुन्ह्यांची पुनरावृत्ती केली आहे, त्यात त्यांना जामीन कसा मिळत आहे. त्यांचा जामीन तर रद्द व्हायला हवा होता," असं ते म्हणाले.
"सरळ-सरळ यांना सत्तेकडून संरक्षण मिळत आहे. यांना पोलिस किंवा प्रशासन कोणीही काहीही म्हणत नाही. फक्त गुन्हा दाखल केला आणि सोडून दिला. त्यानंतर हे लोक निश्चिंत आहेत."
राजेश त्यागी म्हणाले की, "ज्या प्रकारचं विष पेरण्याचं काम केलं जात आहे, त्यामुळं मोठ्या प्रमाणावर कत्तली होतील, हा धोका निर्माण झालेला आहे."
"हे प्रकरण थेट यूएपीए (UAPA)चं असल्याचं स्पष्ट आहे. पण युपी पोलिस यूएपीए लावायला तयार नाही. हरिद्वार प्रकरणात युएपीए लावण्यात आला नाही. ते तर सरळ-सरळ यूएपीएचं प्रकरण आहे. तुमच्याकडे दस्तावेज आहेत. तसंच डिजिटल, व्हीडिओ या रूपात पुरावे आहेत," असंही ते म्हणाले.

गाझियाबादचे एसएसपी पवन कुमार यांनी मात्र, यति नरसिंहानंद सरस्वती यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव नसल्याचं बीबीसीबरोबर बोलताना म्हटलं आहे.
उत्तराखंडच्या गढवालचे डीआयजी करण सिंह नागन्याल यांनीही बीबीसीबरोबर बोलताना पोलिसांवर कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव नसून, ते यति नरसिंहानंद यांच्याबाबत सॉफ्ट नाही, असंही म्हटलं आहे.
या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीचा अहवाल कधी येणार हे नागन्याल यांनी सांगितलं नाही. मात्र लवकरात लवकर पुरावे गोळा करून या प्रकरणी अंतिम चार्जशीट पाठवणार असल्याचं ते म्हणाले.
देवी मंदिरच्या परिसरातील एका हॉलमध्ये यति नरसिंहानंद सरस्वती यांचे निकटवर्तीय आणि 'छोटा नरसिंहानंद' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनिल यादव यांनी हसतच याबाबत प्रतिक्रिया दिली. "खटल्यांची तर रांग लागलेली आहे. पण त्यात काही अडचण नाही, हे तर आमचे अलंकार आहेत," असं ते म्हणाले.
"गुरुजींनी कोणताही गुन्हा केलेला नाही आणि त्यांच्या विरोधात पुरावा नाही, हेच कारवाई न होण्याचं कारण आहे," असंही यादव म्हणाले.
गाझियाबाद पोलिसांच्या माहितीनुसार यति नरसिंहानंद सरस्वती यांच्यावर दाखल असलेल्या 13 गुन्ह्यांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल आहे.
तसंच त्यांच्यावर गुंडगिरी कायदा लावण्याचं प्रकरणं जिल्हा दंडाधिकाऱ्यांसमोर प्रलंबित आहे, असंही पोलिसांनी सांगितलं. गाझियाबादचे जिल्हाधिकारी राकेश कुमार सिंह यांच्याशी फोनवरून संपर्क होऊ शकला नाही आणि पाठवलेल्या मॅसेजनाही त्यांच्याकडून उत्तरं मिळाली नाहीत.
नरसिंहानंद यांच्यावर अनेक प्रकरणं सुरू आहेत. तसंच दिल्ली प्रेस क्लब आणि दिल्ली दंगलींदरम्यान द्वेषपूर्ण आणि चिथावणी देणारी भाषणं तसंच धार्मिक वातावरण बिघडण्याचा धोका असतानाही, त्यांची मुस्लिम विरोधी वक्तव्य सातत्यानं समोर येत आहेत.
राजकीय पाठबळ?
नरसिंहानंद यांच्या विरोधात कठोर कारवाई न होण्यामागे त्यांना योगी सरकारकडून असलेलं तथाकथिक राजकीय पाठबळ हे कारण असल्याचं गाझियाबादमधील एका पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं.
"त्यांच्या विरोधात काहीही करायचं नाही, असे संकेत वरून देण्यात आलेले आहेत. यति यांच्या विरोधात प्रकरणात पुढे काही होईल याची शक्यता नाही, याबाबत वाईट वाटतं," असंही या अधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं.
यति नरसिंहानंद यांच्या विरोधात न्यायालयात जे खटले सुरू आहेत, त्यामध्ये वर्षातून एक किंवा दोनपेक्षा जास्त वेळा त्यांना हजर व्हावं लागू नये, असे त्यांच्या वकिलांचे प्रयत्न असतात. त्यासाठी ते लांबच्या तारखा घेत राहतात आणि त्यामुळं कायद्याची प्रक्रिया पुढं सरकत नाही, असंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

यति नरसिंहानंद यांच्या विरोधात गुंडगिरी कायदा लावण्याबाबतच्या नरमाईच्या भूमिकेबाबत बोलताना एक अधिकारी म्हणाले की, ते सिस्टीमचा एक लहानसा भाग आहेत आणि जर सिस्टीमला एखाद्याला वाचवायचं असेल, तर त्यासाठी मार्गही शोधले जातात.
यति नरसिंहानंद सरस्वती यांच्या वकील आणि डासना देवी मंदिरातील साधू माँ चेतनानंद सरस्वती यांनी राजकीय पाठबळाचा आरोप फेटाळला. "कोर्टात राजकीय पाठबळ कसं चालेल, तुम्हीच सांगा?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हेट स्पीच प्रकरणी दाखल केलेले खटले राजकीय असल्याचं त्यांनी म्हटलं. "तब्येत खराब असल्याचं कारण सांगून आम्ही किती वेळा अॅप्लिकेशन मुव्ह करणार? वारंवार तसं केल्यास न्यायालय अजामीनपात्र वॉरंट जारी करेल," असंही त्या म्हणाल्या.

अनिल यादव हे यति नरसिंहानंद यांच्या विचारसरणीचे वारसदार असल्याचा दावा करतात. "गुरुजी आणि योगी यांच्यात चांगले संबंध आहेत," हे सांगायलाही ते मागंपुढं पाहत नाहीत.
गुरुजी म्हणजे यति नरसिंहानंद यांना भाजपचे अनेक नेते पुजनीय मानतात. मात्र, राजकीय गणितांमुळं ते कधी समोर येत नाही, असंही ते म्हणाले.
अनिल यादव यांनी भाजप नेते कपिल मिश्रा यांचाही उल्लेख केला. त्यांचं याठिकाणी येणं जाणं होतं. पण नंतर एका ट्विटनंतर त्यांनी दुरावा केला. कदाचित त्यांच्या पक्षाचा नाईलाज असेल असं ते म्हणाले.
भाजप नेते कपिल मिश्रा यांनी कधीही यति नरसिंहानंद यांच्या वक्तव्यांवर आक्षेप घेतला नव्हता आणि त्यांनी एप्रिल 2021 मध्ये त्यांच्यासाठी निधीही गोळा केला होता, असंही ते म्हणाले.
कपिल मिश्रा यांनीही याबाबत बीबीसीला माहिती दिली. "यति यांच्यावर हलल्याचा विषय झाला आणि त्यांच्या विरोधात फतवे जारी करण्यात आले, तेव्हा मला वाटलं की, अशाप्रकारे थेटपणे धमकी देऊन एखाद्या व्यक्तीला मारण्याच्या गप्पा करणं आणि कमलेश तिवारी सारखी त्यांची अवस्था होऊ नये म्हणजे त्यांना सुरक्षा द्यायला हवी.
"त्यासाठी आम्ही एक निधी गोळा केला आणि त्यांच्या सुरक्षेसाठी 50 लाख गोळा केले. त्यानंतर त्यांनी काही वक्तव्य केली. ती मला आवडली नाही. विशेषतः महिलांच्या बाबतीत. तेव्हा मी म्हटलं की, मंदिरातील एखाद्या व्यक्तीनं अशी वक्तव्य करणं योग्य वाटत नाही. त्यानंतर मी जाणं आणि भेटणं बंद केलं," मिश्रा सांगतात.
''पक्षाचा विचार करता त्याठिकाणी याबाबत चर्चा होत नाही. पक्षात चर्चेसाठी इतर अनेक मुद्दे आहेत. भाजपमध्ये कोणत्याही पातळीवर अशी चर्चा होत असेल, असं मला वाटत नाही,'' असं कपिल मिश्रा म्हणाले.

उत्तर प्रदेशचे भाजप प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी यति नरसिंहानंद यांच्या कोणत्याही प्रकरणामध्ये सरकारी हस्तक्षेपाचा मुद्दा नाकारला आहे.
"उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांचं सरकार आल्यानंतर पोलिसांना पूर्णपणे कामाचं स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यानं हिरवी वस्त्रं परिधान केलेली असो वा भगवी, त्याची जात, धर्म कोणताही असला तरी कारवाई व्हावी," असं ते म्हणाले.
धार्मिक वातावरण खराब होईल अशा तसंच मतभेद निर्माण करणाऱ्या कोणत्याही मुद्द्याचा सरकार निषेध करत असल्याचंही राकेश त्रिपाठी म्हणाले.
याठिकाणी हेही सांगणं गरजेचं आहे की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील मुस्लिमांना लक्ष्य करत 'अब्बाजान', 'अली' आणि 'बजरंगबली' असे शब्द वापरून मतभेद निर्माण केले आहेत.
"यापूर्वी त्यांनी हिंदू आणि मुस्लिम या वेगवेगळ्या संस्कृती असून त्या एकत्र राहू शकत नाही," असं म्हटलं आहे.
दरम्यान, संविधान मानण्याचा दावा करणारे 'छोटा यति' अनिल यादव यांनी यति समर्थक योगी आदित्यनाथ यांच्यासाठी प्रचार करणार असल्याचंही सांगितलं आहे.
"भाजपमध्ये एक नेते आहेत, त्यांचं नाव योगी आदित्यनाथ आहे," असं ते म्हणतात.
त्यांनी मोदींबाबतही वक्तव्य केलं. "माननीय मोदीजींनी मुस्लिमांसाठी खूप मार्ग खुले केले आहेत. 10 वर्षांच्या काळात त्यांना खूप शक्तिशालीही बनवलं आहे," असं ते म्हणाले.
यति नरसिंहानंद आणि त्यांचे साथीदार काम करत असलेल्या टीमनं कट्टर हिंदुत्ववादी अजेंडा अवलंबला आहे तसंच ते 'हिंदुंचं आणि हिंदू धर्माचं रक्षण' करण्याचं आवाहन करतात.
डासना मंदिराच्या परिसरात सगळीकडे पोस्टर लावलेले आहेत त्यात हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी हिंदुंनी किमान पाच मुलं जन्माला घालावी अशी विनंती करण्यात आली आहे.
सरकारी खर्चाने मंदिराची सुरक्षा
डासनामध्ये 80 टक्क्यांपेक्षा अधिक मुस्लिम राहतात. याठिकाणी बहुतांश लोक हे लहान-मोठी कामं, शेती किंवा मजुरी करतात.
याठिकाणच्या स्थानिक लोकांशी बोलल्यानंतर हिंदू-मुस्लीम यांच्यातील वाढता अविश्वास, संशय, दुरावा याची जाणीव होते. मात्र ही भावना केव्हापासून निर्माण झाली आणि आता तिनं केवढं मोठं रुप घेतलं आहे, हे जाणणं सोपं नाही.
मंदिराच्या अगदी समोरच काँग्रेसचे सतीश शर्मा यांचं घर आहे. त्यांचा जन्म डासनामध्येच झाला आहे. इतरांप्रमाणे तेही लहानपणापासून मंदिरात खेळण्यासाठी, स्वच्छतेसाठी किंवा व्यायामासाठी जात होते.
सकाळच्या थंडीमध्ये पडणाऱ्या सोनेरी उन्हात घराबाहेर बसलेल्या सतीश शर्मा यांनी त्यांचं मत मांडलं. "मी पक्षाचा कार्यकर्ता नंतर आहे आधी मी कट्टर हिंदू आहे, पण हिंदुत्ववादी नाही," असं ते म्हणाले.

सतीश शर्मा यांना विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून तिकिट मिळण्याची आशा आहे.
डासना हे गंगा-जमुना संस्कृतीचं दर्शन घडवणारं शहर असल्याचं ते सांगतात. याठिकाणी हिंदू आणि मुस्लीम एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होत होते. ते सोबतच मंदिरात जायचे. 1947 असो वा 1992 याठिकाणी धार्मिक दंगली कधीही झाल्या नाहीत, असं ते म्हणाले.
पूर्वी राजस्थान किंवा इतर ठिकाणाहून लोक डासना मंदिरात दर्शनासाठी यायचे, असं ते सांगतात.
सतीश शर्मा यांचे नीकटवर्तीय आणि डासना येथील रहिवासी तसेच समाजवादी पार्टीशी संलग्न असलेले साजीद हुसेन यांनी काही आठवणी सांगितल्या. मंदिरात होणाऱ्या दसऱ्याच्या पुजेसाठी ते पैसे द्यायचे, तसंच छठ पूजेमध्ये सहभागी व्हायचे असं ते सांगतात.
पण आज मंदिरात मुस्लिमांच्या प्रवेशास बंदी आहे. मंदिरात जाण्यासाठी ओळखपत्र दाखवावं लागतं. तसंच गेटजवळच एक पोलिस कर्मचारी सर्व माहिती नोंदवून घेतो.

पोलिसांच्या मते, "यति नरसिंहानंद यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळं मंदिरात कायम 22-28 पोलिस कर्मचारी तैनात असतात. त्यांच्यावर महिन्याला 25-30 लाखांचा सरकारी खर्च होत आहे."
"आता जे द्वेषाचं वातावरण तयार होत आहे, त्यामुळं आपसांतील प्रेम आणि सौहार्दाचं वातावरण खराब होत आहे. मुस्लीम आता इथं यायला घाबरतात, टाळतात," असं सतीश शर्मा म्हणाले.
थोडं पुढं गेल्यानंतर इकला आणि रघुनाथपूर गाव लागतं. याठिकाणी चर्चेदरम्यान काही हिंदूंनी दावा केला की, "यति नरसिंहानंद मंदिरात येण्यापूर्वी मंदिराच्या बाहेर आणि आत मुस्लीम तरुण हिंदू तरुणींची छेड काढायचे, मंदिरात चोरी करायचे पण आता सर्वकाही ठीक आहे."
ही माहिती त्यांना कुणाकडून मिळाली माहिती नाही, मात्र रघुनाथपूर गावातील मतनवती नावाच्या महिलेनंही असंही काही सांगितलं. "हिंदू मुलं थोडंच तिथं जातील आणि असं करतील, मुस्लीमच करतील. परिसरच मुस्लिमांचा आहे," असं त्या म्हणाल्या.
पण मग ते केवळ ऐकलेल्या गोष्टीच बोलत आहेत, की असं घडलेल्या एखाद्या महिलेशी ते भेटही घालून देऊ शकतात? यावर एक तर काहीही उत्तर मिळालं नाही, किंवा आपल्या कुटुंबातील मुलीबाबत अशी गोष्ट कोण सर्वासमोर सांगेल, असं उत्तर मिळालं.
एका हिंदू व्यक्तीनं असाही दावा केला की, यापूर्वी मंदिरात मुस्लीत तरुणांची छेड काढल्याने वाद किंवा मारहाण व्हायची तेव्हा त्यांचाही त्यात सहभाग होता.
"आम्ही त्यांच्या मशिदीत जात नाही. ते येऊही देणार नाही. तिथं बसून तुम्ही हनुमान चालिसा वाचणार का? जसे (गुरुग्राम मध्ये) गुरुद्वाऱ्यात बोलावून किंवा मंदिरात बोलावून नमाज पठण करायला लावलं जात आहे, किंवा दुर्गा पुजेच्या मंडपात नमाज पठण करत आहेत, ते तिथं हनुमान चालिसा वाचू देतील का?" असं इकला गावातील विकास गुजर म्हणाले.

रस्त्याच्या कडेला असलेलं दुकान चालवणारे नरेंद्र शर्मा यांच्या मते, यति नरसिंहानंद हे मंदिरात आले त्यामुळं "हिंदू जागरूक झाले असून त्यांच्यात एकता निर्माण झाली आहे."
थोडं लांब गेल्यानंतर काही हिंदू महिलांनी यापेक्षा वेगळा दावा केला. मंदिरात पूर्वी नव्हे तर आता छेडछाडीचे प्रकार होतात, असं त्या म्हणाल्या.
जवळच्या बाजीग्रान परिसरात एका मुस्लीम व्यक्तीला जेव्हा यति नरसिंहानंदच्या व्हीडिओबाबत विचारलं तर त्यांनी यति "वेडे" असल्याचं म्हटलं.
"काहीही वेड्यासारखं बोललं तर वेडंच म्हणणार ना. ते याठिकाणचं वातावरण खराब करण्याचा एवढा प्रयत्न करतात पण तरीही याठिकाणी सगळे चांगल्याप्रकारे राहतात," असं ते म्हणाले.

भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या एका मुस्लीम मुलाला गेल्यावर्षी मार्च महिन्यात देवी मंदिरात पाणी पिण्यासाठी गेल्यानं मारहाण करण्यात आली होती, तोच हा परिसर आहे.
त्यांनंतर त्या मुलाचं कुटुंब भाड्याचं घर सोडून दुसरीकडे कुठंतरी निघून गेलं.
प्राचीन देवी मंदिराच्या आसपास अजूनही मोठ्या प्रमाणावर मुस्लीम लोकसंख्या आहे. आसपासच्या अनेक हिंदुंनी बोलताना त्यांची लोकसंख्या कमी असल्याचा उल्लेख केला.
त्यांच्या बोलण्यावरून आणि हाव भावांवरून कमी लोकसंख्या असल्यानं त्यांच्यात असुरक्षिततेची भावना होती, असं जाणवत होतं.
2011 चे आकडे पाहता गाझियाबाद जिल्ह्यात 82.5 टक्के हिंदु आणि 14.18 टक्के मुस्लीम होते.
मंदिराचा इतिहास, यति नरसिंहानंद यांचा प्रवेश
सरकारी कागदपत्रांनुसार जमीन मंदिराच्या नावावर आहे. मंदिराशी संबधित अनेक आख्यायिका समोर आलेल्या आहेत.
काँग्रेसचे सतीश शर्मा यांच्या मते, "एक हजार वर्षे जुन्या या मंदिरामध्ये पूर्वी लोक हे गंगा स्नानासाठी जाताना रात्रीचा वेळ घालवण्यासाठी थांबत होते."
या मंदिराच्या जवळ असलेल्या तलावात स्नान केल्यानं त्वचारोग बरे होतात, अशी आख्यायिका आहे.

मंदिरातील अनिल यादव यांच्या मते, तलावाच्या जवळच्या शिवालयात परशुरामांनी स्वतः शिवलिंगाची स्थापना केली होती.
लंकापती रावणाच्या वडिलांनी अनेक वर्षे याठिकाणी तपस्या केली होती तसंच खुद्द रावणानं याठिकाणी पूजा केली होती, असं सांगितलं जातं.
त्याचबरोबर महाभारताच्या युद्धाच्या पूर्वी कुंती आणि पाच पांडवांनी लाक्षागृहामधून वाचल्यानंतर याठिकाणी गुप्तपणे काही काळ घालवला होता, असंगी सांगितलं जातं. हे प्राचीन मंदिर असून डासनामध्ये भाविकांची यावर मोठी श्रद्धा आहे.
यति नरसिंहानंद सरस्वती देवी मंदिरात येण्यापूर्वी अनेक वर्षे मौनी बाबा नावाच्या एका पुजाऱ्यानं याठिकाणची जबाबदारी सांभाळली होती.

स्थानिकांच्या मते, 2005 मध्ये चोरांनी मौनी बाबाला मारहाण केली आणि त्यानंतर काही काळानं ते मंदिर सोडून निघून गेले.
त्यानंतर मौनी बाबाचा शिष्य असल्याचे सांगणाऱ्या गणेश शर्मा ऊर्फ गणेश गिरी यांनी मंदिराचं काम सांभाळलं. पण तेही मंदिर सोडून कुठंतरी निघून गेले.
अनिल यादव यांच्या मते, यति नरसिंहानंद सरस्वती 2007 मध्ये महंत म्हणून अशावेळी देवी मंदिरात आले, ज्यावेळी मंदिरातील प्रमुखाचं पद रिक्त होतं.
संन्यास घेण्यापूर्वी यति नरसिंहानंद यांचं नाव दीपक त्यागी होतं.
अनिल यादव यांच्या मते, दीपक त्यागी मॉस्कोमध्ये शिकत होते. त्यांनी अखेरची नोकरी लंडनमध्ये केली होती.
नंतर ते राजकारणात आले. 1998 मध्ये समाजवादी पार्टीचे महानगर अध्यक्ष बनले. पण जेव्हा 'लव्ह जिहाद'च्या एका तथाकथित प्रकरणात त्यांना मुलीची मदत करता आली नाही, तेव्हा त्यांना अपराधी भावना निर्माण झाली.
अनिल यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार धर्म परिवर्तनाचं कारण सांगत दीपक त्यागी मशिदी आणि मदरशांमध्ये गेले. त्यामुळं त्यांचं मन पूर्णपणे बदलून गेलं.
1999-2000 मध्ये दीपक त्यागी यांनी संन्यास घेतला.
ते भाजपा खासदार बीएल शर्मा यांच्या संपर्कात आले आणि 'पूर्णपणे हिंदुत्ववादी बनले.' मंदिरात बीएल शर्मा यांची मूर्ती आहे, यति नरसिंहानंद त्यांना गुरू मानतात.
मंदिराची जमीन आणि ट्रस्ट
ही कथा इथेच संपत नाही.
गाझियाबादच्याच राहणाऱ्या जिंदल कुटुंबातील गौरव जिंदल यांच्या मते, ज्या जमिनीवर देवी मंदिर आहे ती प्रत्यक्षात त्यांच्या कुटुंबाची होती आणि सुमारे 500-1000 वर्षांपूर्वी त्यांच्या पूर्वजांनी हे मंदिर तयार केलं होतं. त्याची देखरेख महाराणी देवी मंदिर ट्रस्ट अंतर्गत होत होती.
पेशाने वकील असलेल्या गौरव जिंदल यांच्या मते पूर्वी या जमिनीवर शेती होत होती. जवळत्या तलावातून पाणी वापरलं जायचं.

गौरव यांच्या मते, एके दिवशी तलावातून दगडाची एक देवीची मूर्ती निघाली. त्यासाठी याठिकाणी मंदिर तयार करण्यात आलं.
त्यांच्या मते, मंदिराच्या इतिहासाशी पांडव, परशुराम आणि रावणाला जोडणं या केवळ अफवा आहेच.
गौरव यांच्या मते, यति नरसिंहानंद सरस्वती यांचा संबंध पूर्वी हिंदू महासभेबरोबर होता. डासनामधील एक व्यक्तीच त्यांना देवी मंदिरात घेऊन आले होते.

गौरव यांच्या मते, "यति संन्यास घेतल्यानंतर मंदिरात आले. यति कट्टर हिंदू असल्यानं गौरव यांचे वडील स्वर्गवासी कृष्ण मुरारी जिंदल यांचा यति यांच्याकडे ओढा वाढला. त्यामुळं यति मंदिरात राहू लागले आणि नंतर कधीही मंदिर सोडून गेले नाही," असं गौरव सांगतात.
गौरव यांच्या मते, "पूर्वी त्यांच्या वडिलांनी मंदिरात आयोजित एका राजकीय कार्यक्रमाला विरोध केला होता. त्यानंतर हे प्रकरण वादापर्यंत पोहोचलं होतं."
या प्रकारानंतर मंदिर त्यांच्या हातून निघून गेलं. आजही त्यांचे कुटुंबीय भीतीच्या वातावरणात मंदिरात दर्शनाला येतात, असं गौरव सांगतात.
त्यांच्या कुटुंबाला मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मिळावी अशी गौरव यांची इच्छा आहे.

मंदिरावर दावा करणारी तिसरी बाजू आहे आनंद गुप्ता यांची. त्यांच्या दाव्यानुसार जमिनीचा एक भाग त्याच्या पूर्वजांनी दान केला होता आणि त्या जमिनीवर आता यति अनाधिकृतपणे राहत आहेत.
आनंद गुप्ता यांचं घर मंदिराच्या अगदी समोर आहे. घराच्या पहिल्या माळ्यावर त्यांनी मंदिराशी संबंधित अनेक कागदपत्रं दाखवली.
2010 मध्ये या प्रकरणी खटला दाखल केला होता आणि तेव्हापासून खालच्या न्यायालयात प्रकरणावर सुनावणी सुरू असल्याचंही आनंद गुप्ता यांनी सांगितलं.
मंदिरातील अनिल यादव यांच्या मते," न्यायालयात असं कोणतंही प्रकरण सुरू नसून जमिनीच्या मालकीबाबत काहीही वाद नाही. कारण आता जमीन मंदिराची आहे."

"मी आज जर असा दावा केला की, माझे आजोबा, पंजोबा यांनी एखाद्या ट्रस्ट, मंदिर किंवा धर्मशालेला जागा दिली आणि ती मला परत हवी आहे, तर ते चुकीचं ठरेल," असं ते म्हणाले.
ट्रस्टचा विचार करता, देवी मंदिर ट्रस्टचं विभाजन वेगवेगळ्या ट्रस्टमध्ये करण्यात आलं आहे आणि या सर्व ट्रस्टचे प्रमुख यति नरसिंहानंद सरस्वती आहेत.
अनिल यादव यांच्या मते 2021 मध्ये तीन ट्रस्ट तयार केल्या आहेत. यति नरसिंहानंद सरस्वती फाऊंडेशन, श्री कृष्ण योगधाम आणि हर हर महादेव भक्त मंडळ तर चौथी ट्रस्ट तयार करण्याचं काम सुरू आहे.
यति नरसिंहानंद सरस्वती फाऊंडेशन ट्रस्टच्या कामांमध्ये नवीन काम सुरू करणं याचा समावेश आहे. दुसऱ्या ट्रस्टचं काम मुलांना खेळांची ओळख करून देणं आणि त्यांना लष्करात भरतीसाठी तयार करणं तर तिसऱ्या ट्रस्टची जबाबदारी मंदिरात देवीची सेवा करणं हे आहे. चौथ्या ट्रस्टवर शाळा आणि गोशाळा यांची जबाबदारी असेल.
यादव यांच्या मते, मंदिरात 25-30 जणांचा स्टाफ आहे. तसंच मंदिरावर दर महिन्याला अडिच ते तीन लाख रुपयांचा खर्च येतो.
अनिल यादव यांच्या मते, मंदिराचं उत्पन्न कमी आहे. त्यामुळं कर्मचाऱ्यांच्या वेतनाची जबाबदारी इतरांनी खांद्यावर उचलली आहे.
सोशल मीडियावर पकड
योगींच्या राज्यात यति नरसिंहानंद यांना अभय मिळाले आहे का? असा प्रश्न विचारताच अनिल यादव म्हणाले, "हरिद्वारमध्ये योगीजी नाहीत. दिल्लीमध्ये योगीजी नाहीत. तसंच पाच वर्षांपूर्वी 2017 पूर्वीही योगीजी नव्हते.
"कदाचित तेव्हा यापेक्षा मोठ्या गोष्टी होत्या. पण लोकांपर्यंत पोहोचलेलो नव्हतो. 2017 पूर्वीच यापेक्षा मोठी वक्तव्ये केलेली असू शकतात, पण त्यावेळी आम्ही फार लोकांपर्यंत पोहोचलेलो नव्हतो."
यतिचे निकटवर्तीय असलेले अनिल यादव एखाद्या परिपूर्ण अशा सोशल मीडिया प्रोफेशनल सारखे बोलत होते.

अनिल यादव यांच्या मते, जेव्हा एखाद्या सोशल मीडियावर मंदिर किंवा यति नरसिंहानंद नावाचं हँडल सुरू होतं, तेव्हा त्याला त्या प्लॅटफॉर्मवर नियमांच्या उल्लंघनाच्या रिपोर्टिंगमुळं ते बंद करावं लागतं.
यापासून वाचण्यासाठी ते जास्त सबस्क्राईबर्स असलेल्या यूट्यूबर्सची मदत घेतात. त्यामुळं मॅसेज वेगवेगळ्या हँडलद्वारे प्रसारित होतो, त्यावेळी त्यावर अशाप्रकारच्या रिपोर्टिंगचा धोका कमी असतो.
"एखादी गोष्ट एकाच प्लॅटफॉर्मवर परत-परत चालवली तर त्याची रिपोर्टिंग होते. ती बदलून बदलून चालवली तर त्याचं रिपोर्टिंग होत नाही," असं ते म्हणाले.
"एखादी क्लिप पसरवण्यासाठी एखाद्या व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये टाकली जाते, यति समर्थक ती त्यांच्या सोशल मीडिया हँडलद्वारे समोर पाठवतात," असं त्यांनी सांगितलं.

"व्हाट्सअॅपला कोणी ब्लॉक करू शकत नाही," असं अनिल यादव म्हणतात.
या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मशिवाय अनिल यादव सूर्या बुलेटिन नामाच्या हिंदी वृत्तपत्र आणि न्यूज पोर्टलचेही संपादक आहेत.
याठिकाणी काम करणाऱ्यांना पगार मिळतो, असं ते सांगतात. प्लॅटफॉर्मवर 'ग्रीन कंटेंट' म्हणजे वाद नसलेला कंटेंट येतो. पण या कंटेंटमधूनही ते वैचारिक संदेश पाठवतातच असं त्यांनी सांगितलं. हिंदूंना मुस्लिमांपासून धोका असल्याचा तो संदेश आहे.
ऑक्टोबर 2021 च्या 50 रुपये किंमत असलेल्या अंकाची पानं उलटून पाहिली तर, 'काश्मीर', 'आर्यन खान', 'जिहादी' अशा शब्दांनी भरलेल्या हेडलाईनखाली अनेक लेख दिसतात.
सोशल मीडिया त्यांच्यासाठी शक्तीशाली माध्यम आहे. त्यांच्या मते ते हिंदूंना एकत्र आणण्याचं काम करत असून त्याचं म्हणणं अनेकांपर्यंत पोहोचवण्याचा हा मार्ग आहे.
धर्म संसददेखील याच रणनितीचा एक भाग आहे. यापूर्वी वर्षातून एकदा धर्म संसद आयोजित केली जात होती. पण उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक धर्म संसदांचं आयोजन करण्याचा विचार आहे.

हरिद्वारमध्ये धर्म संसदेच्या नंतर नव्या वर्षातील पहिली धर्मसंसद डासनामध्ये एक आणि दोन जानेवारीला होणार होता. मात्र, हरिद्वार आणि रायपूरमध्ये झालेल्या धर्म संसदांवरून वाद निर्माण झाल्यानंतर हा कार्यक्रम पुढं ढकलावा लागला होता.
यति नरसिंहानंद सरस्वती यांनी हरिद्वारमध्ये बोलताना, उत्तराखंड सरकार मुस्लिमांच्या दबावात असून कोण्त्याही किमतीवर धर्मसंसद होईलच असं म्हटलं होतं.
धर्म संसंदेमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा होणार आहे, यावर पोलिसांची नजर असेल असं, गाझियाबादचे एसएसपी पवन कुमार म्हणाले.
"चुकीचा संदेश जाईल किंवा गुन्ह्यासाठी चालना मिळेल असा वादग्रस्त विषय असेल तर नक्कीच त्यावर कारवाई केली जाईल," असं ते म्हणाले.

पण, धर्म संसदेमध्ये नेमका काय बोललं जाणार हे कसं ठरणार.
हरिद्वार आणि रायपूरची उदाहरणं सर्वांसमोर आहेत. या कार्यक्रमांमध्ये उघडपणे मुस्लिम नरसंहाराबाबत बोललं गेलं.
"आधीच्या उदाहरणांवरून पुढंही तेच बोललं जाईल, असं समजता येणार नाही," असं पवन कुमार म्हणाले.
उत्तर प्रदेशमध्ये पसरत असलेल्या हा द्वेषाचा विखार कोण रोखणार? तसंच युपीमधील योगी आदित्यनाथ यांचं सरकार मुस्लिमांविरोधात द्वेष पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार का? हे प्रश्न मात्र कायम आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








