You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सावित्रीबाई फुले जन्मदिन: मुलींना आत्मविश्वासाचे पंख देणारं फातिमाबी-सावित्रीबाई मुलींचं मैदान
- Author, राहुल रणसुभे,
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी.
"मी फुटबॉलच्या माध्यमातून मुंब्र्याचे विचार बदलू इच्छिते," हे शब्द आहेत मुंब्र्यात राहणाऱ्या मंतशाचे.
मुंब्रा येथील 'फातिमाबी-सावित्रीबाई मैदान' या ठिकाणी फुटबॉलचा सराव करणाऱ्या 17 वर्षांच्या मंतशाला फुटबॉलमध्येच आपलं करिअर करायचं आहे. पण या निर्णयासाठी सुरुवातीला तिला घरातूनच विरोधाचा सामना करावा लागला. मात्र तिच्या जिद्दीपुढे तिच्या घरच्यांना माघार घ्यावी लागली. आता मंतशा परचम संस्थेत फुटबॉल प्रशिक्षक म्हणून काम करते आणि स्वतः सराव देखील करते.
मंतशा सांगते, "मी परचमसाठी मागील 3 वर्षांपासून खेळत आहे. सोबतच मी इतर मुलींना फुटबॉल शिकवते. पूर्वी माझ्यावर घरुन मला काही बंधनं होती. मात्र मी माझ्या आईला खूप समजावलं, तिला माझे विचार पटवून दिले. आता मी स्वतंत्रपणे मोकळेपणाने फुटबॉल खेळू शकते. मात्र पूर्वी मी घराबाहेर जायचे तर मला एक-दीड तासात घरी यावं लागत होतं."
परचममुळे आत्मविश्वास वाढला
घरच्या बंधनासोबतच मंतशाला स्वतःशीपण थोडा संघर्ष करावा लागला. मी पूर्वी खूप लाजाळू होते. मी लोकांमध्ये जास्त मिसळत नव्हते. मात्र परचममध्ये आल्यापासून माझ्या एक वेगळाच आत्मविश्वास आला असल्याचं मंतशा आवर्जून नमूद करते.
मंतशा सांगते की, "सुरुवातीला मी जेव्हा परचममध्ये आले, तेव्हा मी खूप लाजाळू होते. मला कोणाशीही बोलायला भिती वाटायची. मात्र आता माझ्यात एक वेगळाच आत्मविश्वास आला आहे. मी मुलांच्या पालकांना जाऊन भेटते त्यांना परचमच्या कामाविषयी सांगते. एवढंच नाही तर आता आम्ही आमदार, जिल्हाधिकाऱ्यांना भेटतो. त्यांना आमच्या मैदानाविषयी विचारतो. एवढा माझा आत्मविश्वास वाढला आहे. माझ्याकडेच पाहून मला आता विश्वास नाही बसत की मी तिच पूर्वीची मंतशा आहे का"
फुटबॉलमुळे समाजात बदल दिसू लागला
हा बदल केवळ मंतशामध्येच झाला नाही तर तेथील समाजातही झाला आहे. मंतशा सांगते की, "पुर्वी आम्ही बुरखा घातल्याशिवाय घराबाहेर पडत नव्हतो. अगदी फुटबॉल खेळायलाही आम्ही बुरख्यामध्ये किंवा स्कार्फ यायचो."
मात्र आता मुली ट्रॅक पॅन्ट आणि टीशर्टवरही मैदानावर येत आहेत. मला वाटतं हा खूप मोठा बदल झाला आहे आणि हा बदल परचममुळेच शक्य झालाय" असं सांगायला मंतशा विसरत नाही.
40 मुलींना घेऊन झाली परचमची सुरूवात
परचमची सुरूवात 2012 ला झाली. मुलींना फुटबॉलचे प्रशिक्षण देणं तसंच त्यांच्यामधील आत्मविश्वास वाढवणं यासोबतच फुटबॉलच्या माध्यमातून हिंदू-मुस्लीम समाजातील एकोपा वाढावा यासाठी ही संस्था प्रयत्न करते.
सबाह खान या परचमच्या संस्थापक सदस्य आहेत. त्या सांगतात, "2012 ला जेव्हा आम्ही सुरूवात केली होती तेव्हा आमच्याशी 40 मुली जोडल्या गेल्या होत्या. मात्र समाजातील दबावामुळे ही संख्या महिन्याभरातच 15 वर येऊन पोहोचली होती. मात्र आज 2021 मध्ये आमच्यासोबत जवळपास 1500 मुली जोडल्या गेल्या आहेत.
या केवळ मुंब्र्यातीलच नाहीतर मुंबईच्या इतर भागातीलही आहेत. आज पालक स्वतःहून आपल्या मुलांनाही घेऊन परचममध्ये येतात आणि त्यांच्या मुलांना फुटबॉलचं प्रशिक्षण द्यावं अशी विनंती करतात. विशेष म्हणजे आमच्या सर्व कोच या मुली आहेत. परंतु आता पालकांच्या मनात काही शंका नाहीयेत. त्यांचे विचार बदलले आहेत. त्यांनी हे स्वीकारलं आहे की, मुली या केवळ खेळतच नाही तर त्या प्रशिक्षणही देऊ शकतात."
मुलींसाठी स्वतंत्र मैदान कुठंय?
परचमच्या प्रयत्नांमुळे पालक आपल्या मुला-मुलींना खेळायला तर पाठवू लागले मात्र त्यांच्यापुढे सर्वांत मोठी समस्या होती ती म्हणजे मैदानाची. कारण मुंब्र्यातील बहूतेक मैदानं ही मुलांनी भरलेली असायची. अशातच मुलींसाठी कोण जागा देणार. हा प्रश्न त्याच्यापुढे होता.
सबाह सांगतात की, "आम्ही जेव्हा 2012 मध्ये काम करायला सुरूवात केली. तेव्हा आम्हाला खेळायला मैदानही नव्हते. मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटियन शहरात देखील जी काही मैदानं आहेत तिथे मुलंच खेळताना दिसतात. आम्हाला खेळायला जागा मिळत नव्हती. त्यासाठी आम्हाला मुलांसोबत भांडणं करावी लागत होती. तेव्हा आम्ही स्वाक्षरी मोहीम राबवली आणि आम्ही स्थानिक आमदारांकडे गेलो. त्यांच्याकडे आम्ही मुलींसाठी एक विशेष मैदान आम्हाला उपलब्ध करून द्या अशी मागणी केली. त्यानंतर त्यांनी आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांकडे नेलं आणि आता ठाणे महानगरपालिकेकडून आम्हाला एक जागा देण्यात आली आहे."
फातिमाबी-सावित्रीबाई मैदान
मैदान मिळाल्यावर सबाह यांनी सर्वांत पहिलं एक काम केलं ते म्हणजे या मैदानाचं फातिमाबी-सावित्रीबाई खेळण्याचे मैदान असं नामकरण केलं.
याबाबत त्या सांगतात, "ही जागा जेव्हा आम्हाला मिळाली तेव्हा आम्ही या जागेचं नाव 'फातिमाबी-सावित्रीबाई खेळाचे मैदान' असं ठेवलं. यापाठीमागचं कारण म्हणजे परचमचा जो विचार आहे की, आम्हाला हिंदू- मुस्लीम समाजाला एकत्र आणायचं आहे. या दोघांमधील जी तिरस्काराची भावना आहे ती मिटवायची आहे. हे दोघं आमच्यासाठी प्रेरणा स्थान आहे.
आज आपल्या समाजातील प्रत्येक महिलेसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी या दोघींनी जे काम केलं आहे त्याला तोड नाही. स्वतः अनेक संकटांना तोंड देत त्यांनी जे महिलांना जे समाजात हक्काचं स्थान मिळवून दिलंय, त्यांच्या या कार्याप्रती कृतज्ञता दाखवण्यासाठी, त्यांच्या काम लोकांच्या स्मरणात राहावं यासाठी आम्ही या मैदानाला त्यांचं नावं दिलंय."
मैदान तर मिळालं मात्र सुविधाही मिळाव्यात..
प्रशासनाकडून मुलींसाठीचं मैदान राखीव झालं असलं तरी तिथे काहीच सुविधा नाहीयेत. त्यामुळे मुलींना अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागत आहे. खेळताना मुलींना दुःखापती होत आहेत. त्यामुळे आता तिथे सुसज्ज असंं स्टेडियम उभारावं असं सबाह यांना वाटतं.
सबाह सांगतात, "आम्हाला वाटतं इथे कपडे बदलण्यासाठी खोल्या असाव्यात, टॉयलेट हवं, पाण्याची सुविधा हवी. सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक हवा. या जागेला मैदानाचं स्वरूप यावं जेणे करून कोणालाही दुखापत होणार नाही. त्यामुळे केवळ जागा मिळून काही उपयोग नाही. त्यावर सुविधाही मिळायला हव्यात आणि आम्हाला अपेक्षा आहे की, प्रशासनाकडून आम्हाला या सुविधा मिळतील."
फक्त फुटबॉलपुरचतच मर्यादित नाही
परचम फक्त फुटबॉलपुरतचं मर्यादित काम करत नाही. तर मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व देण्याचा प्रयत्न परचम करत आहे.
परचम मार्फत इंग्लीश स्पीकिंग कोर्स, गोल सेटींग, व्यक्तिमत्त्व विकास असे विविध उपक्रम ही राबवले जातात.
त्यामुळे पालकांना आपली मुलगी फक्त खेळामध्येच अडकतीये असं वाटतं नाही. तर तिचा सर्वांगीण विकास होतोय हे पालकांना दिसतोय. त्यामुळे ते आपल्या मुलींना परचममध्ये पाठवत आहेत, असं सबाह यांना वाटतं.
मुंब्र्याला मिळाली नवी ओळख
मुंब्राची ओळख भारतातील सर्वांत मोठी मुस्लीम 'घेट्टो' वस्ती अशी आहे. मात्र सबाह यांच्यामते ही ओळख आता हळूहळू बदलत आहे.
सबाह सांगतात, "पुर्वी मुंब्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा होता. इथे मुस्लीम लोकं राहतात. पूर्वी तुम्ही गुगलवर मुंब्रा सर्च केलं तर तुम्हाला वेगळंच चित्र पाहायला मिळायचं. मात्र आता जेव्हा तुम्ही मुंब्रा सर्च करता तेव्हा मुली फुटबॉल खेळतात असं दिसतं. परचमचं नाव येतं. खेळाचं नाव येतं.
"आमच्यासोबत जेवढ्या मुली जोडल्या गेल्या होत्या त्या सर्व आता त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण करत आहेत. त्या सर्व स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न पाहत आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात खूप बदल झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांचे विचार बदलले आहेत. समाजाच्या विचारांमध्ये बदल आला आहे. मुंब्रासारख्या भागात मुली फुटबॉल खेळू शकतात हे त्यांनी आता स्वीकारलं आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)