राजस्थान सरकार गाढवांचा शोध का घेत आहे?

    • Author, मोहर सिंह मीणा
    • Role, जयपूरहून, बीबीसी हिंदीसाठी

बीडच्या परळीमध्ये दोन महिन्यांपूर्वी गाढवं चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर पोलिस गाढवांच्या शोधात असल्याचं पाहायला मिळालं. आता राजस्थानातूनही असाच प्रकार समोर आला आहे.

राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गाढवांच्या चोरीचे प्रकार पाहायला मिळत आहेत. त्यामुळं पोलिसांना या गाढवांची चोरी करणाऱ्यांच्या शोधात फिरावं लागत आहे.

या चोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची टीम तयार करण्यात आली आहे. तसंच लोकांनी त्यांची गाढवं घरामध्येच ठेवावीत असा सल्ला देण्यात आला आहे.

हनुमानगड जिल्ह्याच्या नोहर तालुक्यामधील खुईया पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक गावांमध्ये दहा डिसेंबरपासूनच गाढवं चोरी होत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

काही दिवस या तक्रारींकडे फारसं लक्ष देण्यात आलं नाही मात्र काही दिवसांनी चोरी झालेल्या गाढवांच्या मालकांनी स्थानिक नेत्यांसह 28 डिसेंबरला पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केलं.

या आंदोलनानंतर याची दखल घेण्यात आली. पोलिसांनी 15 दिवसांत गाढवं शोधण्याचं आश्वासन दिल्यानतंर आंदोलन मागं घेण्यात आलं.

आतापर्यंत 76 गाढवांची चोरी

मात्र, 29 डिसेंबरच्या रात्री पुन्हा एकदा मंदरपुरा गावातील सहा गाढवांची चोरी झाली. आता या परिसरातील लोक घाबरलेले असून चोरी झालेल्या गाढवांचा तपास करण्याची मागणी करत आहेत.

"पहिल्यांदाच असा प्रकार घडत आहे. दोन-तीन ठिकाणी गाढवं चोरीला गेल्याच्या बातम्या येत आहेत. कुणाचे चार, तर कुणाचे पाच गाढवं चोरीला गेले आहेत. तपासासाठी आम्ही पोलिसांचं पथक कामाला लावलं आहे, प्रयत्न करत आहोत," असं नोहरमधील पोलिस उप-अधीक्षक विनोद कुमार यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.

देवासर गावातील पवन यांच्याकडे मोठ्या प्रमाणात जनावरं आहेत. त्यांच्या तीन गाढवांची चोरी झाल्याचा त्यांचा दावा आहे.

"9 तारखेच्या रात्रीपासूनच गाढवांची चोरी होत आहे. कुणाच्या दोन तर कुणाच्या तीन गाढवांची चोरी झाली आहे. आमच्या गावातून आतापर्यंत 16 गाढवं चोरीला गेली आहेत," असं त्यांनी बीबीसीला फोनवरून बोलताना सांगितलं.

"आम्ही पोलिसांना अनेकदा भेटलो. पोलिसांनी दोन-चार दिवसांचा वेळ मागितला. अखेर आम्ही आंदोलन केलं. त्यावेळी 15 दिवसांचा वेळ पोलिसांनी मागितला," असं माकपचे पंचायत समिती सदस्य मंगेज चौधरी म्हणाले.

"नोहर तालुक्यातील मन्द्रपुरा, कानसर, देवासर, नीमला, जबरासर, राईकावाली, नीमला, जबरासर यासह इतर गावांमधूनही गाढवं चोरीला गेली आहेत," असं चौधरी म्हणाले.

"29 डिसेंबरच्या रात्री आमच्या गावातून 6 गाढवं चोरी गेले आहेत. बिकानेरहून आलेले रामनारायण जाट आणि मुकेश कुमार गोदारा गावात थांबले होते. रात्री त्या दोघांची सहा गाढवं चोरीला गेली," असं मन्द्रपुरा ग्रामपंचायतचे सरपंच शरीफ मोहम्मद म्हणाले.

"सकाळी गाढवं चोरी गेल्याची माहिती मिळाल्यानं खुईया पोलिस ठाण्याचे पोलिस गावात आले. आम्ही तक्रारही दिली आहे. आधी 70 आणि आता 6 अशा एकूण 76 गाढवांची चोरी झाली आहे," असं शरीफ म्हणाले.

पोलिसांनी पकडली वेगळी गाढवं

गाढवांच्या चोरीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 27 डिसेंबरच्या रात्री 15 गाढवं पकडून आणली. त्यानंतर लोकांना त्यांची गाढवं ओळखण्यासाठी बोलावण्यात आलं.

"पोलिसांच्या टीमनं गाढवं पकडली होती. पण गाढवांची ओळख पटवताना मालकांनी चिंटू, पीकू, कालू अशी नावं घेत त्यांना हाक मारण्यास सुरुवात केली," असं पोलिस कर्मचारी वीरेंद्र शर्मा बीबीसीबरोबर बोलताना म्हणाले.

"त्यानंतर त्यांनी ती गाढवं त्यांची नसल्याचं सांगितलं, कारण नाव घेतल्यानंतर ही गाढवं वळून मागं पाहत नव्हती."

"लोकांनी गाढवांची ओळख पटेल अशा काहीही खुणा सांगितलेल्या नाहीत. तरीही आम्ही गाढवांना शोधण्याचा प्रयत्न करत आहोत," असं पोलिस अधिकारी वीरेंद्र यांचं म्हणणं आहे.

काही गाढवं आम्हाला मिळाली होती, पण मालकांनी ती त्यांची गाढवं नसल्याचं सांगितलं, असं उप-अधीक्षक विनोद कुमार यांनी म्हटलं.

"पोलिस ठाण्यात दाखवली ती गाढवं आमची नव्हती. आम्ही आमच्या प्राण्यांना ओळखतो. पोलिस ठाण्यातील गाढवं भट्टे आणि विटा वाहून नेण्याची काम करणारी होती," असं देवासर गावातून चोरी झालेल्या गाढवांचे मालक पवन म्हणाले.

मेंढपाळांचे मित्र असतात गाढवं

हनुमानगड जिल्ह्यामध्ये कृषीनंतर सर्वाधिक व्यवसाय हा पशुपालनाचा आहे. नोहर आणि भादरा लातुक्यातील बहुतांश गावांमध्ये पशुपालन करणारे किंवा मेंढपाळ यांच्याकडे मोठ्या प्रमाणात जनावरं आहेत.

एका मेंढपाळापडे 300 पर्यंत जनावरे असतात. त्यामुळं प्रत्येक गावात हजारो जनावरं असतात. हे मेंढपाळ मेंढ्या, बकऱ्या, गायी यासह एक दोन गाढवंही सोबत ठेवतात.

त्याचं कारण म्हणजे, ही जनावरं चरण्यासाठी घेऊन जातात तेव्हा ते गाढवावर त्यांच्यासाठीचं अन्न, कपडे, पाणी लादून सोबत नेतात.

अनेकदा तर मेंढ्या, बकऱ्या लहान मुलं यांनाही या गाढवांवर लादलं जातं.

हे लोक गुरं चारताना अनेक जिल्ह्यांमधून प्रवास करत तीन-चार महिन्यांनी त्यांच्या गावामध्ये परत असतात. यादरम्यान त्याचं सर्व सामान याच गाढवांवर लादून ते या जनावरांबरोबर चालत असतात.

यामुळं ही गाढवं त्यांच्यासाठी फायदेशीर ठरत असतात. पण आता ही गाढवं चोरी गेल्यानं अशा मेंढपाळांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

पवन यांच्याकडं जवळपास 100 जनावरं आहेत. "पाच डिसेंबरलाच ते चार महिन्यांनी त्यांच्या जनावरांसह परतले होते. त्यांना परत बाहेर जायचं होतं. पण आता गाढवांशिवाय कसं जाऊ," असा प्रश्न त्यांना पडला आहे.

तर पोलिसही गाढवांच्या वाढत्या चोरी पाहता या परिसरातील ग्रामस्थांना त्यांची गाढवं घरांमध्येच ठेवण्याचा सल्ला देत आहेत.

"ग्रामस्थांनी त्यांची गाढवं मोकळी सोडू नये असं सांगण्यात आलं आहे. आम्ही लोकांना गाढवं घरात ठेवायलाही सांगत आहोत," असं पोलिस अधिकारी वीरेंद्र शर्मा बीबीसीबरोबर बोलताना म्हणाले.

भीतीचं वातावरण, 20 हजारांपर्यंत किमतीचा दावा

एकापाठोपाठ अशाप्रकारे गाढवांची चोरी होत असल्यामुळं लोक घाबरलेले आहेत. त्यात आता इतर जनावरांबाबत सगळ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.

एका मेंढपाळाकडे शेकडो जनावरं आहेत. एकाची किंमत अंदाजे दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत आहे. अशा परिस्थितीत या जनावरांचीही चोरी होऊ लागली तर आम्ही काय करणार, असा सवाल ते करत आहेत.

"एका गाढवाची किंमत तेरा ते पंधरा हजार रुपये आहे. आम्ही पशुपालनाद्वारेच उदरनिर्वाह चालवतो," असं देवासर गावातील पवन म्हणाले.

"गाढवं चोरी जायला लागल्यापासून रात्रीची झोप येत नाही. अशाचप्रकारे जनावरं चोरी जायला लागली तर काय होईल?" असं ते म्हणाले.

मेंढपाळ राजेंद्र सारण यांनी तर एक गाढवाची किंमत 20 हजारांपर्यंत असल्याचा दावा केला. आम्ही गाढवांशिवाय आमचं सामान कसं घेऊन जाणार, असं ते म्हणाले.

गाढवांचा बाजारही भरतो

गाढवांचा वापर हा प्रामुख्यानं ओझं वाहण्यासाठी करतात. आजही शेतीतील अनेक कामांमध्येही गाढवांचा वापर होतो. अधिकृत आकडा नसला तरी याची संख्या मात्र आता घटली आहे.

या ठिकाणी विक्रीसाठी येणाऱ्या गाढवांच्या खरेदीसाठीही लोक मोठ्या संख्येनं येतात. पण आता इथं गाढवांची संख्या फारशी नसते.

गाढवांची किंमत त्यांच्या उंची आणि शरिरानुसार ठरत असते. उज्जैनमध्ये गेल्या महिन्यात भरलेल्या जनावरांच्या बाजारात 16 हजार गाढवं विकली गेल्याच्या बातम्या होत्या.

याठिकाणी यावेळी गाढवांची संख्या कमी झालेली पाहायला मिळाली. तर विक्रीसाठी दोन-तीन हजारांपासूनही गाढवं उपलब्ध होती. ही किंमत 12 हजारांपर्यंत असते.

सरासरी 15 हजार रुपये किंमत धरली तरी चोरी झालेल्या 76 गाढवांची एकूण किंमत 11 लाख 40 हजार रुपये होते.

मात्र, गाढवांच्या किमतीपेक्षा जास्त दुःख हे कामात मदत करणारे हे प्राणी गमावल्यामुळं या मेंढपाळांना झालं आहे.

बीडमध्ये नेमकं काय घडलं होतं?

बीड जिल्ह्यातल्या परळीमध्येदेखील ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस अशाप्रकारे गाढवांच्या चोरीची तक्रार पोलिसांकडे आली होती. त्यावेळी यावरून बराच गोंधळ झाला होता.

परळीमधील जवळपास 100 पेक्षा जास्त गाढवं चोरी केल्याची तक्रार करण्यात येत होती.

वीट भट्टीवर काम करणाऱ्या लोकांसाठी उपजीविका चालवण्यासाठी गाढवं अत्यंत महत्त्वाची असतात. या वीट भट्ट्यांवरूनच गाढवं चोरीला गेल्याचं सांगण्यात आलं होतं.

पोलिसांनी या प्रकरणी तपासही सुरू केला होता. आता परळीपाठोपाठ राजस्थानातही असा प्रकार घडल्यामुळं या दोन्ही घटनांच आपसांत काही संबंध तर नाही, अशाही चर्चा आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)