धर्म संसदः छत्तीसगड, हरिद्वारमध्ये भरलेली धर्म संसद म्हणजे काय आहे?

फोटो स्रोत, BBC/VARSHA SINGH
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आम्ही गरज पडल्यास जीवही घेऊ, अशा आशयाची शपथ उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये धर्मसंसदेत उपस्थितांना देण्यात आली.
17 ते 19 डिसेंबर दरम्यान भरलेल्या या धर्मसंसदेत उपस्थित अनेक धर्मगुरूंनी इतर धर्मियांना उद्देशून वादग्रस्त विधानं केली.
पाठोपाठ 26 डिसेंबरला रायपूरच्या धर्म संसदेत महाराष्ट्रातल्या अकोल्याचे साधू कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींना अक्षरशः शिवी देत नथुराम गोडसेला वंदन केलं.
अशा वादग्रस्त विधानांमुळे धर्म संसदांचं आयोजन चर्चेत आहे. सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
उत्तर प्रदेशातल्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वादाला राजकीय वळणही मिळताना दिसतंय.
पण मुळात धर्म संसद म्हणजे काय असते? त्यात कोण सहभागी होतं आणि त्याचा राजकारणाशी काय संबंध आहे?
धर्मसंसद म्हणजे काय?
धर्मसंसद म्हणजे धर्माशी निगडीत मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित केलेली परिषद. ही धर्मसंसद कशा स्वरूपाची असते, याविषयी वाराणसीच्या संकटमोचन मंदिराचे मुख्य पुजारी महंत विश्वंभर नाथ मिश्रा यांना आम्ही विचारलं. ते सांगतात की, आपण ऑफिसांत वगैरे जशी बैठक घेतो, तशीच ही बैठक असते.
"तुम्हाला एखाद्या धार्मिक मुद्द्याविषयी अधिक स्पष्टता हवी असेल, विवाहासंदर्भातल्या किंवा अन्य एखाद्या विधीमध्ये काही समस्या येत असेल किंवा बदल करायचे असतील, एखादी धर्मविषयक समस्या सोडवायची असेल, तर मोठ्या धर्मगुरूंना बोलवलं जातं. यात शास्त्र संमत काय निर्णय असावा हे ठरवलं जातं."
भारतात आदि शंकराचार्यांशी निगडीत चार प्रमुख मठ असून सामान्यतः त्यांचे अधिपती धर्मग्रंथांचा अभ्यास करूनच महत्त्वाच्या धार्मिक मुद्यांवरचे निर्णय देऊ शकतात, अशी माहिती विश्वंभर नाथ मिश्रा देतात.

फोटो स्रोत, ANI
पण हिंदू धर्म हा कोणत्याही एका पुस्तकावर आधारीत नाही. त्यात वेगवेगळे प्रवाह आहेत. त्यामुळेच वेगवेगळ्या विचारांचं प्रतिनिधित्व करणारे वेगवेगळ्या मठांचे प्रतिनिधी अशा धर्म संसदेत सहभागी होतात.
वाराणसीतले मुक्त पत्रकार उत्पल पाठक सांगतात की हरिद्वार, प्रयाग, नाशिक अशा ठिकाणी अनेकदा कुंभमेळ्यादरम्यानही अशा परिषदेचं आयोजन झालं आहे.
"एखादा महामंडलेश्वर किंवा त्यापेक्षा वरच्या पदावरची व्यक्ती धर्म संसद बोलावू शकते. आमंत्रित लोक अशा धर्मसंसदेत सहभागी होऊ शकतात. गंगा सफाईच्या मुद्द्यावरची धर्म संसद तर सर्वांसाठी खुली होती.
"धर्मसंसद केवळ हिंदू धर्माअंतर्गत मुद्द्यांवर चर्चेसाठी बोलावली जाते. वेगवेगळ्या धर्मांमधील मुद्द्यांवर चर्चेसाठी सर्वधर्म संसदचंही आयोजन व्हायचं, पण गेल्या काही वर्षांत ते मागे पडलं आहे"
धर्मसंसदचं रूप कसं असतं?
संसदेत जसं सर्व लोकप्रतिनिधींना मुक्तपणे आपलं मत मांडता येतं, तसंच या परिषदेतही सहभागी व्यक्ती आपले विचार मांडू शकतात. एखाद्या सेमीनारसारखंच धर्म संसदमध्ये आधी निश्चित केलेल्या मुद्द्यांवर कधी उलट-सुलट चर्चा होते आणि प्रसंगी एखाद्या धार्मिक बाबतीत निर्णयही घेतला जाऊ शकतो.

फोटो स्रोत, BBC/VARSHA SINGH
पण गेल्या काही वर्षांत धर्म संसदेचं स्वरूप बदलताना दिसत आहे. हरिद्वारमध्ये झालेल्या धर्मसंसदेत तर ते आणखी उग्र झालेलं दिसलं.
हरिद्वारमधल्या धर्म संसदचे स्थानिक आयोजक आणि परशुराम आखाड्याचे अध्यक्ष पंडित अधीर कौशिक म्हणतात, "गेल्या सात वर्षांपासून अशा प्रकारे धर्म संसदेचं आयोजन केलं जात आहे. याचा उद्देश हिंदुराष्ट्र बनवण्याची तयारी करणं हे आहे. त्यासाठी शस्त्र हाती घ्यावं लागलं तर तेही घेऊ."
धर्मसंसद आणि राजकारण
रायपुरच्या धर्म संसदेत गांधीजींवरच्या अपमानजनक टिप्पणीनंतर तिथल्या काही उपस्थितांनीच नाराजी व्यक्त केली.
कालीचरण यांच्या भाषणानंतर महंत रामसुंदर दास यांनी त्याच मंचावरून नाराजी व्यक्त केली आणि मी या धर्मसंसदेपासून वेगळा होत असल्याचं जाहीर केलं. रामसुंदर दास छत्तीसगड गोसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि कांग्रेसचे माजी आमदार आहेत.

फोटो स्रोत, CG KHABAR/BBC
तर हरिद्वारमधली वादग्रस्त विधानं म्हणजे 'हेट स्पीच' अर्थात द्वेषानं भरलेलं भाषण आहे, एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करण्याचा उद्देश त्यामागे आहे आणि हे नरसंहाराचं आवाहन आहे, अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत.
व्हीडियो व्हायरल झाल्यावर पोलीसांनी वसीम रिझवी उर्प जितेंद्र नारायण त्यागींविरोधात गुन्हा दाखल केलाय.
पण व्हीडियोत दिसणाऱ्या इतरांवर इतके दिवस झाले तरी अजून कारवाई का झालेली नाही, असा प्रश्नही विचारला जातो आहे.
मरण्या-मारण्याची शपथ देणारे सुदर्शन टीव्हीचे प्रमुख सुरेश चव्हाणके हे टीव्ही चॅनल्सवर जाऊन पुन्हा तीच भाषा वापरत आहेत. आणि कपिल मिश्रांसारखे भाजपचे नेते त्यांना प्रोत्साहन आणि पाठिंबा देत आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
काही तज्ज्ञांच्या मते हे निवडणुकीच्या पूर्वीचं राजकारण आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत येत्या दोन महिन्यांत निवडणुका होणार आहेत.
त्या पार्श्वभूमीवर अशी विधानं येणं नवीन नाही, असं उत्तर प्रदेशातल्या वरिष्ठ पत्रकार सुमन गुप्ता सांगतात.
"केवळ मठ-आखाडेच नाही, तर विश्व हिंदू परिषदसारख्या संघटनाही आपापल्या साधू-महंतांच्या धर्मसंसद भरवतात. आधी अयोध्या आंदोलनावरून अनेकदा धर्म संसदेचं आयोजन व्हायचं. त्यावेळीही वादग्रस्त वक्तव्य केली जायची.
"निवडणुकीच्या वेळेला असे प्रकार वाढताना दिसतात, त्यामागे एका पक्षाचा अजेंडा असतो. धर्मसंसद मग एखाद्या पॉलिटिकल टूल सारखं काम करते," असं सुमन गुप्ता नमूद करतात.

त्यांच्या मते धर्मसंसदेचं रूप आणखी कट्टर बनलं आहे "आता धर्मसंसदांमधली भाषा आणखी टोकाची बनते आहे. हा बदल घडला आहे, कारण हिंदुत्ववादी पक्ष राज्यात, देशात सत्तेत आहे. त्यामुळे लोकां कट्टर भाषा वापरणाऱ्यांना अभय मिळालं असून अशी विधानं बिनधास्त होताना दिसतात."
धर्मातल्या तत्वज्ञानाऐवजी राजकीय आणि फूट पाडणाऱ्या मुद्द्यांभोवती धर्मसंसदा फिरू लागल्या आहेत, असं महंत विश्वंभर नाथ मिश्रा सांगतात.
"आपल्या धर्मातील गोष्टींविषयी निर्णय घेण्यासाठी धर्मसंसद भरू शकते. दुसऱ्या धर्मातील लोकांशी आपण कसं वागायचं, हे नियम सांगायला देशाची राज्यघटना आहेच की. शेवटी 'राष्ट्रधर्म' काय सांगतो, तर राज्यघटनेचं पालन करा."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








