You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Kili Paul : इन्स्टाग्रामवर भारतात व्हायरल झालेले हे दोघे नेमके कोण आहेत?
- Author, प्रिया सिप्पी
- Role, पत्रकार, बीबीसीसाठी
पारंपरिक मसाई पोषाख परिधान केलेला आणि आजुबाजुला गाईंचा घेराव अशा वातावरणात किली आणि निमा पॉल ही भावंडं नवा व्हीडिओ रेकॉर्ड करत होते. गेल्या काही दिवसांत टांझानियामधील नवीन टिकटॉक आणि इन्स्टाग्राम सेन्सेशन म्हणून त्यांनी ओळख मिळवली आहे.
भारतामध्ये टिकटॉकवर बंदी असली तरी इन्साटाग्रामवर हे दोघं त्यांचे व्हीडिओ शेअर करत असून भारतातही ते प्रसिद्ध झाले आहेत.
टांझनियाच्या पूर्व प्वानी भागात असलेल्या मिंदू तुलैनी या छोट्याशा गावात त्यांचं घर आहे. घरापासून काही अंतरावर एका ट्रायपॉडवर स्मार्टफोन लावून व्हीडिओ रेकॉर्ड करण्याची त्यांची लगबग सुरू असते.
त्यांच्या गावापासून एका तासाच्या अंतरावर असलेलं लुगोबा हे छोटं शहर आहे. गावामध्ये वीज नसल्यामुळं किली हे रोज याठिकाणी मोबाईल चार्ज करण्यासाठी जातात.
कॅमेऱ्यासमोर व्हीडिओसाठी पोझिशन घेताना 26 वर्षीय किली हे त्यांची 23 वर्षीय बहीण निमा हिच्या मागे उभे राहतात.
गाणं सुरु होताच ही भावंडं हिंदी गाण्यांवर अगदी हुबेहूब लिप सिंक (नक्कल) करायला सुरुवात करतात. तसंच बॉलिवूडमधील या प्रसिद्ध गाण्यांवर ते डान्सही करतात.
गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांचे लिप सिंक केलेले अनेक व्हीडिओ हे भारतात व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहेत.
यापैकी त्यांचा सर्वात प्रसिद्ध व्हीडिओ शेरशाह या हिंदी चित्रपटातील 'राता लंबिया' गाण्यावर केलेल्या सादरीकरणाचा आहे. या व्हीडिओनं काही दिवसांतच दहा लाखांच्या व्ह्यूजचा आकडा पार केला.
चित्रपटातील प्रमुख कलाकार कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा या दोघांनी हा व्हीडिओ शेअर केला होता.
हे गाणं गायलेला मूळ गायक जुबीन नौटियाल यांनी या भावंडांची एका एफ एम रेडिओसाठी मुलाखत घेत त्यांना खास सरप्राईज दिलं.
"तुम्हाला भारतात प्रत्येकजण ओळखतो. तुम्ही प्रसिद्ध झाले आहात," असं जुबीन यांनी या दोघांना सांगितलं.
'माईंड ब्लोईंग'
मिंदु तुलैनी या गावामध्ये बहुतांश ग्रामस्थांकडे स्मार्टफोनही नाहीत. तिथून व्हीडिओ तयार करणाऱ्या किली आणि निमा यांनी त्यांचे व्हीडिओ भारतातील आणि जगभरातील लाखो लोकांपर्यंत पोहोचतील याचा कधी विचारही केला नव्हता.
"सुरुवातीला केवळ गंमत म्हणून याची सुरुवात केली होती. जगभरात ते व्हायरल होईल याचा आम्ही विचारही केला नव्हता. त्यामुळं जेव्हा व्हीडिओला मिळालेल्या व्ह्यूजचा आकडा आणि भारतातील लोकांचा प्रचंड प्रतिसाद माझ्या लक्षात आला तेव्हा मला धक्काच बसला. मला प्रचंड आनंद झाला होता," असं किली पॉल यांनी सांगितलं.
या भावंडांना व्हीडिओ तयार करण्याची प्रेरणा ही बॉलिवूड चित्रपटांबाबत असलेल्या प्रेमामधून मिळाली. किली यांनी ते जेव्हा राजधानीचं शहर असलेल्या डोडोमा याठिकाणी शाळेत जायचे, त्यावेळी पहिल्यांदा बॉलिवूडचा चित्रपट पाहिला होता.
हिंदी भाषेचं ज्ञान नसतानाही किली आणि त्यांची बहीण निमा यांनी हिंदीमध्ये गाणं गायचं कसं ते स्वतःच शिकलं.
"मी शाळेत असल्यापासून टांझानियातील स्थानिक सिनेमागृहामध्ये बॉलिवूडचे चित्रपट पाहत आहे. मी या चित्रपटांच्या आणि विशेषतः गाण्यांच्या जणू प्रेमातच पडलो आहे. जेव्हा तुमचं एखाद्या गोष्टीवर असं प्रेम असतं, तेव्हा ते शिकणं सोपं ठरतं," असं किली म्हणाले.
"मला गाण्यांचे बोल शिकायला आणि त्याचा सराव करायला दोन दिवसांचा वेळ पुरेसा होतो. गाण्यांचा भावार्थ नेमका काय आहे ते मी इंग्रजीतून जाणून घेतो. त्यामुळं मला त्यावर योग्य हावभाव करायलाही सोपं जातं," असंही ते म्हणाले.
"अनेकदा गाणं नेमकं काय आहे किंवा त्याचा अर्थ समजण्याआधीच संगीत ऐकल्यानंतर त्या माध्यमातून मी आपोआप गाण्याशी जोडला जातो."
किली हे सुरुवातील व्हीडिओमध्ये एकटेच झळकायचे. मात्र हळू हळू किली यांनी बहीण निमालाही त्यात सहभागी करून घेतलं. त्यांनाही बॉलिवूडबद्दल प्रचंड आकर्षण आहे.
"मला जेव्हा माझ्या भावानं त्याच्याबरोबर व्हीडिओ तयार करण्याबाबत विचारलं तेव्हा मी सुरुवातीला नकार दिला. कारण मला कॅमेऱ्याच्या समोर येण्याची लाज वाटायची," असं निमा यांनी सांगितलं.
"नंतर मला हळू हळू याची सवय होऊ लागली. पण आता जे काही घडत आहे, ते आश्चर्यकारक आहे. असा एखदा दिवस येईल असं आम्हाला कधीही वाटलं नव्हतं."
गावात गोंधळाचं वातावरण
पूर्वी शेती आणि जनावरं सांभाळण्यात दिवस घालवणारी ही भावंडं आता दिवसभर भारतातील मोठ मोठ्या टीव्ही वाहिन्या आणि रेडिओ चॅनलवर मुलाखती देण्यामध्ये व्यस्त असतात.
दुसरीकडे, त्यांच्या देशात म्हणजे टांझानियामध्येही त्यांनी सर्वात प्रसिद्ध टिकटॉक स्टार्स अशी ओळख मिळाली आहे.
किली यांच्या व्हेरीफाईड टिकटॉक अकाऊंटवर सध्या 18 लाख फॉलोअर्स आहेत. त्यांनी अकाऊंट सुरू करून अद्याप एक वर्षही पूर्ण झालेलं नाही. मित्रांच्या माध्यमातून त्यांनी या अॅपबाबत ऐकलं होतं.
किली यांचं इन्स्टाग्राम अकाऊंटही आहे. त्यावरही जवळपास साडेपाच लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. तर किली यांची बहीण निमा यांनीही त्यांचं वेगळं इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू केलं असून, त्यावर जवळपास 65 हजार फॉलोअर्स आहेत.
पण संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय पातळीवर या भावंडांच्या यशाची चर्चा असताना आणि त्यांना ओळख मिळत असताना, त्यांचं कुटुंब आणि गावातील इतरांना तसंच समाजातील लोकांना मात्र याची अगदीच क्वचित अशी माहिती आहे.
"याठिकाणी अनेक लोकांकडे स्मार्टफोन नाहीत. त्यांना सोशल मीडियाबाबतही फार काही माहिती नाही. अगदी निमालाही यातलं फार काही कळत नाही. तिला याचा नेमका किती प्रभाव आहे हे माहिती नाही, ती केवळ हे करण्याचा आनंद घेते," असं किली म्हणाले.
"पत्रकार जेव्हा टीव्ही वाहिन्यांच्या ताफ्यासह आमच्या गावात यायला सुरुवात झाली, त्यावेळी सगळ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं."
"मी गायीकडं लक्ष देण्याऐवजी गाणं किंवा डान्स का करत आहे, याचं माझ्या कुटुंबीयांना आश्चर्य वाटलं होतं."
"मात्र मी काहीतरी चांगलं करत आहे, हे त्यांना आता लक्षात यायला लागलं आहे."
'स्वप्न सत्यात उतरलं'
या भावंडांना अद्याप त्यांच्या कामातून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळालेली नाही. मात्र लवकरच त्यांना मोठ्या पडद्यावर संधी मिळून त्यांचं आयुष्य बदलण्याची शक्यता आहे.
भारतातील काही माध्यमांनी त्यांना बॉलिवूडमधील अनेक ऑफर येऊ लागल्याच्या बातम्या दिल्या आहेत.
किली आणि निमा यांच्यासाठी हे स्वप्न सत्यात उतल्यासारखं आहे. आम्हाला नेहमीच मनोरंजन क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती, पण ते कधी शक्य होईल असं वाटलं नसल्याचं दोघं म्हणाले.
"आम्ही शहराबाहेरच्या एका लहान खेड्यात राहतो. त्यामुळं अभिनेत्री बनण्याचं आणि कॅमेऱ्यासमोर येण्याचं माझं स्वप्न कधी पूर्ण होईल याचा मी विचारही केला नव्हता. हे स्वप्न कायम माझ्या मनातच होतं," असं निमा म्हणाल्या. निमा आणि त्यांचा भाऊ किली हे कधीही मिंदु तुलैनी गावातून बाहेर राहिलेले नाहीत.
"भारतात फिरायला मिळण्याची संधी मिळणं हे फार आश्चर्यकारक असेल."
संपूर्ण जगाचं लक्ष असल्यामुळं आता फॉलोअर्ससाठी नवा कंटेंट तयार करण्यासाठी उत्सुक असल्याचं त्या दोघांनी सांगितलं आहे.
"लोकांनी आमचे व्हीडिओ पाहून आनंदी व्हावं एवढंच आम्हाला वाटतं, त्यामुळं आम्ही याची सुरुवात केली होती," असं किली यांनी सांगितलं.
"अनेक मोठ्या गोष्टी भविष्यात येणार आहेत, त्यामुळं आमच्या चाहत्यांनी आमच्या बरोबर राहावं."
प्रिया सिप्पी या लंडनमधील फ्रीलान्स पत्रकार आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)