You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शुभांगी केदार : 'अभ्यास सोडून हिचं लक्ष गाण्याकडे जातंय' ते इन्स्टाग्राम स्टारपर्यंतचा प्रवास
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठीसाठी
सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करत यश मिळवणाऱ्या, स्वतःचं विश्व समृद्ध करणाऱ्यांचा प्रवास सांगणारी बीबीसी मराठीची ही मालिका
"गोव्याच्या किनार्यावर, नाखवा व्हरीनं नेशील का?
निले सागर दुनियेची, सफर देशील का?"
शुभांगी केदारने गायलेलं हे गाणं काही काळापूर्वी व्हायरल झालं होतं. युट्यूब - इन्स्टाग्रामवरच्या व्हिडिओज आणि रील्समधून लोकांना शुभांगीची ओळख झाली.
हातात युकलेली (Ukulele) हे वाद्य आणि गोड आवाजाने शुभांगीच्या गाण्याच्या व्हिडिओजनी सोशल मीडियाला भुरळ पाडली.
अनेक नवी - जुनी मराठी - हिंदी गाणी, ट्रेंडिग इंग्लिश गाणी असं गात आता शुभांगीने स्वतःची गाणी, चित्रपट गीतंही गायला सुरुवात केली आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या डार्लिंग आणि ओटीटी माध्यमावरच्या 'ग्रे' या मराठी सिनेमासाठी तिने गाणी गायली आहेत. सोशल मीडीयावरची रील्स ते सिनेमा हा शुभांगी केदारचा प्रवास कसा होता? याबाबत बीबीसी मराठीने तिच्याशी गप्पा मारल्या.
"10 वी पर्यंत मी शाळेतील सर्वात हुशार विद्यार्थ्यांच्या यादीत होते. पण जशी कॉलेजमध्ये गेले तेव्हा अभ्यासावरचं लक्ष उडतंय आणि गाण्याकडे ओढ घेतंय, हे लक्षात येऊ लागलं. घरच्यांसाठीही हा धक्का होता. मुलगी अभ्यासात इतकी हुशार असताना अचानक कॉलेजमध्ये गेल्यावर काय होतय की, अभ्यास सोडून हिचं लक्ष गाण्याकडे जातंय?" इस्टाग्राम स्टार आणि तरूण गायिका शुभांगी केदार सांगत होती.
पनवेल जवळच्या रसायनीमध्ये शुभांगीचं बालपण गेलं. गाण्याची ओळख शाळेत असतानाच झाल्याचं ती सांगते.
"गाणं हे माझ्या आयुष्यात दुसरी तिसरीत असल्यापासून आहे. आम्ही शाळेची प्रार्थना म्हणायचो. वडील शिक्षक असल्यामुळे शाळेतले शिक्षक त्यांचे मित्र होते. त्यांनी बाबांना सांगितलं की, हिच्या गळ्यात नैसर्गिक सूर आहे. तिने गाणं शिकलं पाहिजे. मी पाचवीत असताना वडिलांनी मला गाण्याचा क्लास लावला.
"पाचवी ते नववी मी गाणं शिकले. पण कॉलेजमध्ये गेल्यावर मला गाणं हे माझं करिअर असू शकतं हे प्रकर्षाने जाणवत गेलं. मी पुण्यात कॉलेजला अॅडमिशन घेतलं. मी गाण्याच्या स्पर्धा कुठे आहेत? इंटर- कॉलेज स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागले. त्यातून खूप बक्षीसं मिळवली. तेव्हा आपण चांगलं गातोय हा आत्मविश्वास येऊ लागला. "
अकरावी आणि बारावी झाल्यावर पुढे काय हा प्रश्न शुभांगीसमोर होता. गाण्यात तितकासा तिचा जम बसला नव्हता. पुढे काय करायचं? हा प्रश्न समोर होता.
"घरच्यांनी गाण्याला कधी विरोध केला नाही. पण गाण्याबरोबर शिक्षण आणि करियरचा वेगळा पर्याय असायला हवा. हे मत घरच्यांचं होतं," असं शुभांगी सांगते.
त्यानंतर शुभांगीने मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्णही केलं. पण शुभांगीची गाण्याची ओढ मात्र पूर्वीपेक्षाही वाढली होती.
सोशल मीडियाचा सजगपणे वापर
सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करणं आणि त्यातून प्रसिद्ध होणं... याची सुरुवात कुठून झाली? या प्रश्नांवर शुभांगी केदार सांगते, "2015 साली मी पहिल्यांदा हिंदी गाण्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि तो माझ्या YouTube चॅनेलवर 'पब्लिश' केला. तेव्हा कसलंच फारसं ज्ञान नव्हतं.
त्याला फार प्रतिसाद आला नाही. नंतर मलाच तो व्हीडीओ आवडेनासा झाला. असं वाटू लागलं की, आपण काय पोस्ट केलंय? आज तो गाण्याचा व्हिडीओ माझ्या चॅनेलवरून मी काढून टाकला आहे."
सोशल मिडीया स्टार ते एका सिनेमासाठी गाणारी गायिका हा गेल्या पाच वर्षांतला प्रवास अनेक गोष्टी शिकवणारा होता, असं शुभांगी सांगते. 2017 साली शुभांगीने शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली. ते शिकताना खूप पूर्वीपासून हे शिकण्याची गरज होती ही जाणीव झाल्याचं शुभांगी सांगते.
गोव्याच्या किनार्यावर.... या शुभांगीच्या गाण्याला पहिल्यांदा सोशल मीडियावर पसंती मिळाली. त्यातून ओळख मिळाली. त्यानंतर ती असे व्हिडीओ अधिक पोस्ट करायला लागली.
शुभांगी सांगते, "सोशल मीडिया आपल्यासाठी आहे. आपण सोशल मीडियासाठी नाही. जे गाणं ट्रेन्डमध्ये आहे, ते शूट करून पोस्ट करण्याची घाई अनेकजण करतात. पण त्यातून 'ओरिजिनल कन्टेंट' मागे पडतो. 'ओरिजिनल कन्टेंटवर' काम केलं पाहिजे."
सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या शुभांगी केदार हिने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या डार्लिंग आणि zee5 वर प्रदर्शित झालेल्या 'ग्रे' चित्रपटातली गाणी गायली आहेत.
सोशल मीडियाच्या मागे न धावता आपण आपलं कौशल्य विकसित करण्यावर भर दिला पाहिजे असं शुभांगी सांगते.
सोशल मीडियावर शुभांगीने सुरुवातीला अनेक गाण्यांची कव्हर्स (एखाद्या गायकाने / गायिकेने स्वतः गायलेलं आधी प्रसिद्ध झालेलं दुसऱ्या गायकाचं गाणं), ट्रेंडिग गाणी शूट करून पोस्ट केली. त्या व्हिडिओजना चांगला प्रतिसादही मिळाला. पण आता मात्र आपल्याला स्वतःची गाणी गाण्यावर लक्ष द्यायचं असल्याचं ती सांगते.
पुढे काय? असं विचारल्यावर शुभांगी म्हणते, "इथून पुढचा माझा प्लॅन वेगळा आहे. स्वतःचे विचार लिहून ते लोकांपर्यंत पोचवायचे आहेत. माझे विचार आवडतात म्हणून लोकांनी मला ऐकणं, हे मला हवंय..."
तुम्हीही असंच सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचं विश्व समृद्ध केलंयत का? किंवा तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या एखाद्या व्यक्तीची कहाणी तुम्हाला जाणून घ्यायची आहे का?
आम्हाला अशा व्यक्तींची नावं सुचवा [email protected]या ईमेल आयडीवर. सोबत पुढचा तपशील द्यायला विसरू नका.
- तुमचं पूर्ण नाव
- वय
- तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव सुचवताय ती व्यक्ती
- या व्यक्तीशी तुमचं काय नातं आहे?
- तुमची (स्वतःच नाव देत असल्यास) वा त्या व्यक्तीची यशोगाथा थोडक्यात
- संपर्कासाठीचा तपशील (आमच्या संपादकीय टीमला त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी)
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)