रोहित पाटील : 23व्या वर्षी नगरपंचायत जिंकणारा तरूण

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी

संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायती मध्ये रोहित आर आर पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दणदणीत विजय मिळवला आहे. 17 पैकी 10 जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.

रोहित पाटलांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी कवठेमहांकाळ नगर पंचायत निवडणुकीमध्ये झाली होती. माजी खासदार संजय काका पाटील, शिवसेनेचे नेते माजी मंत्री अजित घोरपडे, राष्ट्रवादीचा एक गट आणि काँग्रेस अशी शेतकरी विकास आघाडी रोहित पाटलांच्या विरोधात होती. अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीमध्ये रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे.

कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. रोहित पाटील यांनी या निवडणुकीमध्ये स्वतः प्रचाराची धुरा सांभाळली होती.

रोहित पाटील असं का म्हणाले, 'निकालानंतर तुम्हाला आबा आठवल्याशिवाय राहणार नाही'

21 डिसेंबरला कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या 17 पैकी 13 जागेसाठी मतदान झालं.

'आबा आठवल्याशिवाय राहणार नाही'

"सगळे पक्ष एकाबाजूला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते दुसऱ्या बाजूला. तुम्ही म्हणाला 25 वर्षांच्या तरुणाला हरवण्यासाठी सगळे एकवटले आहेत. पण माझं वय 23 वर्षे आहे. 25 पर्यंत कोणाला शिल्लक ठेवत नाही," असं तेव्हा प्रचारा दरम्यान रोहित पाटील म्हणाले होते.

ही निवडणूक रंगतदार झाली. कारण रोहित पाटील विरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी पॅनल उभं केलं. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (सगरे गट), काँग्रेस अशा सर्वपक्षीय नेत्यांनी आघाडी करत पॅनेल उभं केलं. त्यामुळे रोहित पाटील पॅनल विरुद्ध इतर सर्वपक्षीय पॅनल अशी लढत झाली.

कोण आहेत रोहित पाटील?

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आणि अनुभवी दिवंगत नेते रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच आर. आर. पाटील उर्फ आबा यांचा रोहित पाटील हा मुलगा आहे.

8 नोव्हेंबर 2014 रोजी आर. आर.पाटील यांचं निधन झालं. त्यांची राजकीय कारकीर्द मोठी होती.

जिल्हा परिषद सदस्य ते सहा वेळा आमदार, ग्रामविकासमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री ते अगदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुराही त्यांनी सांभाळली होती.

2008 साली मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यानंतर आर. आर. पाटील यांच्यावर तीव्र टीकाही झाली होती. यामुळे त्यांना उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता.

आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर रोहित पाटील यांच्याकडे आता पहिल्यांदाच पक्षाकडून स्वतंत्र राजकीय जबाबदारी देण्यात आल्याचं दिसतं.

यापूर्वी 2019 विधानसभा निवडणुकीसाठी आर.आर.पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील यांनी निवडणूक लढवली होती. यावेळी रोहित यांच्याकडे प्रचाराची जबाबदारी होती. पण ही नगर पंचायत निवडणूक रोहित त्यांच्या राजकीय करिअरच्यादृष्टीने महत्त्वाची मानली जात होती.

रोहित पाटील यांची बहिण स्मिता पाटील यांनीही राजकारणात प्रवेश केला होता. त्यांच्याकडे राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद होतं.

रोहित पाटील सोशल मीडियावर सुद्धा सक्रिया असतात. इन्स्टाग्रामवर त्यांचे 83 हजार फॉलोअर्स आहेत. तर ट्वीटरवर त्यांचे 32 हजार फॉलोअर्स आहेत.

रोहित पाटील पॅनल विरुद्ध सर्वपक्षीय पॅनल

कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीसाठी 17 पैकी 13 जागांसाठी 21 डिसेंबरला मतदान झालं होतं. तर उर्वरित जागांवर 18 जानेवारीला मतदान झालं.

भाजपचे संजयकाका पाटील, माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते अजित घोरपडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अनिता सगरे गट, काँग्रेसचे स्थानिक नेते यांनी एकत्र येत आघाडी करून पॅनल उभं केलं होतं.

रोहित पवार यांचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधक एकवटले आहेत आहेत, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रचारादरम्यान जाहीर भाषणात म्हटलं होतं.

याला प्रत्युत्तर देत रोहित पाटील म्हणाले होते, "मी आता 23 वर्षांचा आहे. 25 वर्षांचा होईपर्यंत विरोधकांचं काही शिल्लक ठेवणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि आबांचे कुटुंबीय सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचले आहेत."

सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट पक्षाच्या उमेदवाराविरोधात प्रचारात सक्रिय असल्याचं स्थानिक पत्रकारांकडून सांगितलं जातं होतं. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही प्रश्न विचारण्यात आला.

तेव्हा ते म्हणाले होते, "स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्या त्या जिल्ह्यातील परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागतो. रोहित गेल्याच आठवड्यात मला एका कामानिमित्त भेटला होता. मी त्याला फोन करून याबाबत विचारेन. पण असं कोणी कोणाला एकटं पाडेल असं मला वाटत नाही."

रोहित पाटील यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली गोली. ज्येष्ठ पत्रकार दीपक भातुसे सांगतात, "रोहित यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे, कारण यातून पुढे त्यांना राजकीय संधी मिळणार आहे. या निवडणुकीत ते उत्तीर्ण झाले तर त्या मतदारसंघात त्यांचं नेतृत्व प्रस्थापित होईल."

सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न?

कवठेमहांकाळ नगरपंचायतीसाठीचा प्रचार आता संपला आहे. प्रचाराची सांगता करताना रोहित पाटील यांनी, "निकालानंतर तुम्हाला माझ्या बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही," अशी घोषणा केली होती.

ते म्हणाले, "मी कवठेमहांकाळचा परिसर फिरलो असून विस्तारित भाग आणि तिथली परिस्थिती काय आहे मला माहित आहे."

"मला बालीश म्हणायचं आणि शहरातल्या नेत्यांनी माझ्यावरच बोलत रहायचं ही वेळ त्यांच्यावर आली आहे," असा टोलाही त्यांनी लगावला.

यापूर्वीही आर.आर.पाटील आणि संजयकाका पाटील यांच्यातला राजकीय संघर्ष सर्वश्रुत होता. आता नगरपंचायतीच्या निवडणुकीतही या दोन गटात संघर्ष पाहायाला मिळत आहे.

भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी रोहित पाटील यांना प्रत्युत्तर दिलं होतं, "विरोधक शिल्लक ठेवणार नाही" या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले, "ही भाषा पुन्हा वापरली तर संघर्ष अटळ आहे."

सांगली लोकमत आवृत्तीचे प्रमुख श्रीनिवास नागे सांगतात, "एकटं पाडलं असं केवळ राजकीय चित्र निर्माण करण्यात आलं आहे असं मला वाटतं. कारण मुळातच सांगली जिल्ह्यातील तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन स्वतंत्र गट सक्रिय आहेत."

ते पुढे सांगतात, "आर. आर. पाटील यांचे धाकटे भाऊ सुरेश पाटील जिल्हा बँकेचे संचालक आहेत. निर्णय प्रक्रियेत ते असतात. पण यामुळे कवठेमहांकाळ तालुक्यातील पक्षाचे जुने कार्यकर्ते, नेते दुखावले जातात असं चित्र आहे. म्हणूनच म्हटलं इथे दोन गट आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नेतेही इकडे लक्ष घालत नाहीत. सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले होते स्थानिक पातळीवर निर्णय घ्या. त्यालाही हेच कारण आहे असं मला वाटतं."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)