ओमिक्रॉन : तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी भारतानं सज्ज होणं किती गरजेचं?

एनआयव्ही
    • Author, योगिता लिमये
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

भारतातील सर्वात जुन्या जिनोम सिक्वेंन्सिंग सुविधांपैकी एक असलेल्या पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूय ऑफ व्हायरलॉजी (NIV)मध्ये सध्या घाई आणि गोंधळाचं वातावरण आहे.

त्याचं कारण म्हणजे देशात ओमिक्रॉनचा संसर्ग पसरण्यापासून रोखण्यासाठी NIV सारख्या प्रयोगशाळांमध्ये सध्या 24 तास काम सुरू आहे. ओमिक्रॉनची लागण झालेल्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न याठिकाणी सध्या सुरू आहे.

या ठिकाणी रोज लहान बॉक्समध्ये बंद असलेले नाकातून आणि घशातून घेतलेल्या स्वॅबचे जवळपास 100 नमुणे तपासणीसाठी येतात. ओमिक्रॉन व्हेरिएंट येण्याआधी याठिकाणी जेवढ्या नमुन्यांची तपासणी केली जात होती, त्या तुलनेत हे प्रमाण पाच पटींनी अधिक आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेला हा ओमिक्रॉन व्हेरिएंट सध्या जगभरात पसरत आहे.

हवाबंद खोलीमध्ये संरक्षक सूट परिधान केलेले शास्त्रज्ञ हे लहान बॉक्स उघडतात आणि त्यातून विषाणू वेगळे करण्याची प्रक्रिया सुरू होते. या सॅम्पलवर विशिष्ट क्रमांकाचे लेबल लावलेले असते. त्यामुळं ते कोणाचे सॅम्पल चेक करत आहेत, हे शास्त्रज्ञांच्या लक्षात येत नाही.

"आमच्यावर सध्या लवकरात लवकर काम करण्यासाठी प्रचंड दबाव आहे. मात्र आम्हाला अचूक काम करणं गरजेचं आहे आणि ती काही झटपट होणारी प्रक्रिया नाही," असं NIV मधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि ग्रुप लीडर डॉ. वर्षा पोतदार म्हणाल्या. दरम्यान, त्यांचा फोनही सातत्यानं वाजत होता.

सिक्वेंन्सिंग मशीनमध्ये टाकण्यासाठी सॅम्पल तयार करण्यासाठी अनेक तासांचा कालावधी लागतो. कोरोनाची साथ सुरू झाली तेव्हा गेल्यावर्षी मार्च महिन्यात हे मशीन विकत घेतलं होतं. या मशीनमधून माहिती मिळते आणि एका सॉफ्टवेअर प्रोग्रामद्वारे या माहितीची तुलना वुहानमध्ये आढळलेल्या कोव्हिड 19 च्या सर्वात पहिल्या विषाणूबरोबर केली जाते. त्यावर शास्त्रज्ञांना कोणता व्हेरिएंट आढळला आहे याची माहिती मिळते.

तिसऱ्या लाटेचा इशारा

या वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या दुसऱ्या लाटेच्या वेळी भारतानं जगाला डेल्टा विषाणू विषयी लवकर माहिती न दिल्यानं जगभरातून टीका झाली होती. कारण डेल्टा विषाणूचा जगभरात अगदी कमी वेळामध्ये परिणाम पाहायला मिळालं होतं. पण तेव्हापासून आतापर्यंत काय बदललं आहे?

"आम्ही त्यापासून खूप काही शिकलो आहोत. आपण विषाणूचा जेवढा प्रसार होऊ देऊ तेवढी नवीन व्हेरिएंट समोर येण्याची शक्यता अधिक असते हे आम्हाला माहिती आहे. आपण सध्या अधिक सुसज्ज आणि सक्रिय आहोत," असं NIV च्या संचालिका डॉ. प्रिया अब्राहम म्हणाल्या.

मात्र भारताच्या लोकसंख्येचा विचार करता यालाही काही मर्यादा आहेत, असंही त्या म्हणाल्या.

"आपण अमेरिका आणि युके सारख्या विकसित देशांच्या जवळपासही नाही, मात्र आपण बरंच काही मिळवलं आहे असं मला वाटतं. लक्षात ठेवा या सर्व उपाय योजनांबरोबरच सर्वांनी काळजी घेत राहणं गरजेच आहे, असा संदेश देत राहायला हवं," असंही त्या म्हणाल्या.

"मला वाटतं तिसरी लाट येणं हे, आपण कशाप्रकारे तिचं स्वागत करतो यावर अवलंबून आहे. जर लस घेण्याकडे कानाडोळा केला जात असेल, किंवा बंदिस्त जागेत प्रचंड गर्दीचे कार्यक्रम होत असतील तर, तिसरी लाट नक्कीच येईल."

कोरोना व्हायरस

भारतातील निम्म्याहून अधिक लोकसंख्येचं पूर्ण लसीकरण झालेलं आहे. पण तरीही अजूनही कोट्यवधी लोकांवर धोक्याची टांगती तलवार आहेच. ओमिक्रॉनमुळं तिसरी लाट आली तर अत्यंत कमी वेळेमध्ये वैद्यकीय सेवांवरील ताण हा प्रचंड वाढेल असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

"दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णालयांची क्षमता ही थोडीफार नव्हे तर प्रचंड प्रमाणात अनेकदा अपुरी पडली. अनेकदा रुग्णालयांत खाटाच शिल्लक नसल्याचं चित्र होतं. त्यामुळं आपल्याकडे अगदी लहानही तिसरी लाट आली तरी त्याचा आरोग्य यंत्रणेवर मोठा परिणाम होईल हे नक्की आहे," असं मत मुंबईतील फिजिशियन डॉ. स्वप्नील पारीख यांनी मांडलं.

"त्यामुळं हे घडणार आहे का? किंवा हे कधी घडणार? असं विचारत बसण्याऐवजी आपलण त्यासाठी सज्ज राहण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवं."

दिल्लीच्या होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये गेल्या आठवड्यात अचानकपणे कोव्हिडच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, जवळपास एका महिन्यापेक्षा अधिक कालावधीत याठिकाणी कोरोनाचा एकही रुग्ण दाखल झाला नव्हता.

"आपण पुन्हा एकदा दुसऱ्या लाटेसारख्याच मार्गावर निघालो आहोत का? याबाबत प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण होऊ लागलं आहे," असं या रुग्णालयातील प्रमुख डॉक्टर सुमित रे म्हणाले.

"यात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या काही नागरिकांनाही नव्याने कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळं पुन्हा एकदा प्रचंड काळजी घेणं गरजेचं आहे."

कोव्हिड चाचणी

फोटो स्रोत, Getty Images

एप्रिल महिन्यात दुसऱ्या लाटेदरम्यान अत्यंत वाईट परिस्थिती असताना बीबीसीनं या रुग्णालयाला भेट दिली होती. त्याठिकाणी क्षमतेपेक्षा खूप जास्त रुग्ण होते. जास्तीत जास्त रुग्णांवर उपचार करायला जागा मिळावी म्हणून त्यांनी जागा मिळेल तिथं ट्रॉली आणि व्हीलचेअर रचून ठेवले होते. तरीही त्यांना लोकांना परत पाठवावं लागत होतं.

त्यावेळी शहरात ऑक्सिजनचीही प्रचंड कमतरता निर्माण झाली होती. त्यावेळी अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्णांची अवस्था पाहून डॉ. रे हे जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठा मिळावा म्हणून सतत फोन करत होते.

दिल्ली आणि देशातील काही भागांतील रुग्णालयात अनेक लोक ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं मृत्यू पावले.

भारत सरकारनं उपलब्ध असलेल्या वैद्यकीय संसाधनांचं योग्य नियोजन करून आवश्यकतेनुसार त्याचा पुरवठा करायला हवा, असं डॉ. रे यांनी म्हटलं.

"लोकांना बेडसाठी एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात जावं लागू नये. हे कधीही स्वीकार्य नाही. यासाठी अधिक चांगलं समन्वय असायला हवं. मला वाटतं आपल्याकडे तयारीसाठी वेळ आहे आणि ती व्हायला हवी," असं ते म्हणाले.

"तुम्हाला लोकांचे जीव वाचवण्याचा प्रशिक्षण दिलेलं असतं. पण पुरेशी साधनं नसल्यानं ते करता आलं नाही तर अपयशाची जाणीव होते. वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी म्हणून हा माझ्या जीवनातील सर्वात वाईट काळ होता."

या सर्वासाठी तयारी सुरू असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र अजूनही बरंच काही व्हायचं शिल्लक आहे, असं मुंबईचे डॉ. पारीख म्हणाले.

"मला वाटतं आपण शक्य तितक्या लोकांचं पूर्ण लसीकरण करायला हवं. त्याचबरोबर ज्येष्ठ आणि आजारी असलेल्या तसंच रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांसाठी आणि त्याचबरोबर आरोग्य कर्मचारी फ्रंटलाईन वर्कर्स यांच्यासाठी तिसरा डोसही सुरू करायला हवा," असंही ते म्हणाले.

"आपल्या देशात आपण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळामध्ये एक प्रकारचा जुगार खेळलो आणि पराभूत झालो. त्यामुळं यावेळी जरा उलटं करुया. चला जरा जास्तीची तयारी करुन ठेवूया."

(अतिरिक्त रिपोर्टींग - कुणाल सेहगल)

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)